[वि. सू. ज्या सद्गृहस्थांना नि विदुषींना चावटपणा ह्या प्रकारचे वावडे आहे किंवा आपल्या उच्चअभिरुचीबद्दल ज्यांना आत्यंतिक अभिमान आहे, त्यांनी हा लेख न वाचलेलाच उत्तम. नंतर कसलीही तक्रार चालणार नाही!]
’शोले’ हा इतका महान चित्रपट आहे की सगळ्या हिंदी चित्रपटांचे शोलेपूर्व नि शोलेपश्चात् असे वर्गीकरण करता येईल असे शेखर कपूर या दिग्दर्शकाचे एक वाक्य आहे, त्यात थोडासा बदल करून मी म्हणेन की ’गुंडा’ हा इतका महान चित्रपट आहे की सगळ्या हिंदी चित्रपटांचे "गुंडा" नि "जे ’गुंडा’ नाहीत ते" असे वर्गीकरण करता येईल! जे माझ्याशी सहमत नाहीत त्यांच्याविषयी मी एकच म्हणू शकतो, त्यांनी नक्कीच ’गुंडा’ पाहिलेला नाही!
१९९८ साली प्रदर्शित झालेल्या ’गुंडा’चे दिग्दर्शक आहेत कांती शाह. या दिग्दर्शकाने अनेक महान चित्रपट दिले आहेत, पण त्यापैकी ’गुंडा’ची सर कशालाच नाही! ’गुंडा’ हा कांती शाह यांचा ’मास्टरपीस’ आहे. ’शोले’शी मी ’गुंडा’ची तुलना करतो ती त्याच्या महानतेमुळेच नव्हे, त्यांच्यात इतर अनेक बाबींतही साम्य आहे. आपल्या नातलगांचा खलनायकाने खून केल्यामुळे चित्रपटाच्या नायकाने त्याचा घेतलेला बदला अशी ’शोले’ चित्रपटाची कथा आहे, ’गुंडा’ची कथाही साधारण अशीच. अनेक पात्रे आणि त्यांची महत्वाची किंवा बिनमहत्वाची अशी वर्गवारी करणे कठीण हा ’शोले’मधला प्रकार ’गुंडा’तही दिसतो. दोन नायक (शोलेत धर्मेंद्र नि अमिताभ तर गुंडात मिथुन नि त्याचे माकड), एक मुख्य खलनायक नि त्याचे सहकारी (शोलेत गब्बर नि त्याचे साथीदार तर गुंडात बुल्ला नि त्याची गॅंग) ही आणखी काही साम्यस्थळे.
पण गुंड बुल्ला, त्याचा भाऊ चुटिया, पोटे, इबू हटेला नि भ्रष्ट पोलिस अधिकारी काळे ह्यांना खलनायक का म्हणावे? इतर चित्रपटांमधले खलनायक हिरोला बदडतात नि प्रेक्षकांना रडवतात, पण ’गुंडा’मधले खलनायक मात्र आपले प्रत्येक वाक्य यमक जुळवून बोलतात नि आपल्या कर्णकटू शब्दांनी हिरोच्या नि प्रेक्षकांच्या कानांना त्रास होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतात. आमच्या ’गुंडा’चे हेच तर वैशिष्ट्य आहे, इथले खलनायकही कविमनाचे आहेत!
नमुन्यादाखल ही पहा काही पात्रांची ठराविक वाक्ये.
बुल्ला - मेरा नाम है बुल्ला, रखता हुं खुल्ला।(इथे ’शर्टका बटन’ हा अर्थ अभिप्रेत आहे याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.)
पोटे - मेरा नाम है पोते, जो अपने बापकेभी नही होते।
इबू हटेला - मेरा नाम है इबू हटेला। मॉं मेरी चुडेल की बेटी, बाप मेरा सैतान का चेला। बोल खायेगा केला? (हाय!)
चुटिया - नाम है मेरा चुटिया, अच्छेअच्छोंकी खडा करता हुं मै खटिया।
चित्रपटाची कथा सुरू होते विमानतळावर. एक ’कफनचोर’ नेता गुंड ’लंबू आटा’ला आपला प्रतिस्पर्धी ’बाचुभाई भिगोना’चा खून करण्याची सुपारी देतो. का? कारण गुंड बुल्लाला आपली सुपारी त्या नेत्याने दिल्याची पक्की खबर त्याच्याकडे असते. पण हुशार लंबू आटा त्यापुढे एक वेगळीच योजना ठेवतो. बाचुभाई बरोबर बुल्लाचाही खातमा करायची. पण अट एकच, या नेत्याने पोलिसांना सांभाळावे, त्यांना मधे येऊन राडा करू देऊ नये. मग काय? योजनेचा प्रारंभ करत लंबू आटा सगळ्यात पहिल्यांदा बुल्लाच्या बहिणीला आडवे करतो.(अक्षरश: आडवे - फारच ह्दयद्रावक प्रसंग आहे हा!) अर्थात्, आपल्या बहिणीचा खुनाचा बदला घेणार नाही तो बुल्ला कसला? तो लंबू आटाला अगदी सहज लंबा करतो [बुल्ला मारत असताना लंबू आटाने जो अभिनय केला आहे तो अफलातून आहे, त्याला तोड नाही, या अभिनेत्याला ’जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात यावे अशी शिफारस मी करतो!] नि गुन्हेगारीविश्वाचा अनभिषिक्त सम्राट बनतो. नंतर बाचुभाई भिगोना पुन्हा त्याला आपल्या मूळ सुपारीची आठवण करुन देताच बुल्ला जागा होतो नि त्या नेत्याच्या मागे लागतो. बुल्लाचा हस्तक त्याला मारतो खरा, पण आपला हिरो शंकर (मिथुन) त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देतो नि ईथेच चित्रपटाला ख-या अर्थाने सुरूवात होते. [वाचकांनी कृपया नोंद घ्यावी - कुठल्याही चांगल्या चित्रपटसमीक्षेत हे वाक्य असायलाच हवे.]
या नंतर चित्रपटात मुडदे असे पडतात, पोटेंच्याच शब्दांत सांगायचे झाले तर "जैसे नन्हेमुन्ने बच्चेकी नुन्नीसे पिशाबकी बुंदे!" इथून चित्रपट वेग पकडतो नि मग पुढे दोन तास प्रेक्षक अगदी जागेवर खिळून राहतात. [हे वाक्यही.] पुढे अनेक घटना घडतात, जसे की शंकरने गोदीमधे गुंडाचा फक्त हात पिरगाळून त्याच्याविरुद्धची लढत जिंकणे, लंडनहून आणलेल्या गोळ्या खाऊन चुटियाने(हो, हे पात्र थोडेसे ’तसले’ आहे) मिथुनच्या बहिणीची अब्रू लुटणे, मिथुनने ४/५ सरकारी गाड्या नि ७/८ मोटारसायकल स्वार यांच्या संरक्षणात असलेल्या भ्रष्ट नेत्याला सगळ्यांसमोर खत्म करणे, शेवटी शेकडो रिक्षावाल्यांसह बुल्लाने मिथुन वर मशीनगनने हल्ला करणे पण तरीही मिथुन त्यातून वाचणे! पण त्यांचे रसभरीत वर्णन करून मी प्रेक्षकांचा रसभंग करणार नाही, ह्या सगळ्या गोष्टींची मजा पडद्यावरच घ्यायला हवी.
मिथुनला म्हातारा म्हणून हिणवणा-या सा-यांना मिथुनने या चित्रपटाद्वारे अगदी सणसणीत चपराक दिली आहे. त्याला गुंडांना मारताना किंवा नायिकेबरोबर थिरकताना पहावे, डोळे अगदी निवतात. मी तर असे म्हणेन की ह्रितीकने गुंडा पहावा, त्याला मिथूनकडून बरेच शिकण्यासारखे आहे.
’गुंडा’ची निर्मितीमुल्ये सामान्य आहेत अशी तक्रार काहीजण करतील, करूदेत बापडे! त्यांना आमचे एकच म्हणणे आहे, उत्तम निर्मितीमुल्ये हवी असतील तर त्यांनी जेम्स कॅमेरूनचा ’अवतार’ किंवा ’टायटॅनिक’ किंवा अगदीच परवडेत नसेल तर संजय लीला भन्सालीचा ’देवदास’ बघावा. ज्यांना चित्रपटात निर्मितीमुल्ये (नि फक्त निर्मितीमुल्येच) महत्वाची वाटतात त्यांनी ’गुंडा’च्या वाटेला जाऊच नये. ’गुंडा’ अद्वितीय ठरला आहे तो त्यामधल्या अविस्मरणीय अभिनयाने, ह्दयाला हात घालणा-या संवादांमुळे नि अप्रतिम दिग्दर्शनामुळे! पैशांचा ओंगळवाणा चकचकाट दिसायला तो काही ’काईटस्’ नव्हे, तो ’गुंडा’ आहे, ’गुंडा’!
यापुढेही जाऊन आम्ही असे म्हणू की गुंडा हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड आहे!