Thursday, April 28, 2011

लोकशाही आणि भारत

"लोकशाहीत, तुमची जी लायकी असते तसंच सरकार तुम्हाला मिळतं." या अर्थाचं जोसेफ हेलर या अमेरिकन कादंबरीकाराचं एक वाक्य आहे. आपल्या भारतातली सध्याची परिस्थिती पाहिली की मला हे वाक्य अगदी तंतोतंत पटतं.

आता हेच पहा - परवा सत्यसाईबाबांचं निधन झालं. ह्या घटनेचं वार्तांकन करताना भारतातल्या जवळपास प्रत्येक वृत्तपत्रानं त्यांचा उल्लेख 'थोर संत/प्रत्यक्ष देव' असा केला आणि वेळोवेळी त्यांच्यावर केल्या गेलेल्या आरोपांमधला एक चकार शब्दही आपल्या लेखात येणार नाही याची काळजी घेतली. त्यांच्या आश्रमात घडलेले लैंगिक अत्याचाराचे प्रकार/त्यांनी उभं केलेलं प्रचंड बेहिशोबी आर्थिक साम्राज्य यांविषयी कुणी 'ब्र'ही काढला नाही. बीबीसीनेही बाबांच्या मृत्युची बातमी छापली पण बातमीच्या शेवटी But his critics say that many of (his) activities were publicity stunts. They say that he was a persuasive fraudster who used his huge popularity to avoid being investigated over allegations of murky financial practices and sexual abuse. ही पुष्टी जोडायला ते विसरले नाहीत. हा भारतीय माध्यमांचा खोटारडेपणा म्हणता येईल की आपले वाचक/प्रेक्षक नाराज होऊ नयेत म्हणून नाईलाजाने केलेली तडजोड?

सत्यसाईबाबांच्या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या अतिमहत्वाच्या लोकांची यादी थक्क करणारी होती. आपल्या 'आदरणीय' राष्ट्रपतीजी किंवा आडवाणीजी राहूद्या पण सचिन तेंडुलकर, मनमोहन सिंग आणि एपीजे अब्दुल कलाम हेही सत्यसाईंचे भक्त होते हे पाहून त्यांच्याविषयीचा आदर थोडा कमी झालाच. बाकी सगळे ठीक, पण कलाम साहेब तुम्ही पण? आता बाबांवरचे आरोप सिद्ध झाले नव्हते असे त्यांचे भक्त म्हणू शकतातही पण लुंगासुंगा राजकारणीही सगळ्या यंत्रणेला कसा खिशात घालू शकतो हे आपल्याला दिसत असताना बाबांवर कारवाई होईल नि त्यांवरचे आरोप सिद्ध होतील ही अपेक्षा आम्ही कशी ठेवावी? अर्थात राजकारण्यांचे नि सत्यसाईंचे संबंध होते यात नवल काय? प्रचंड मोठ्या जनशक्तीला काबूत ठेवण्याचं आध्यात्मिक बाबांजवळ असणारं सामर्थ्य आणि काळा पैसा सहज पांढरा करण्याची त्यांची शक्ती या दोन गोष्टींमुळे ते राजकारण्यांना जवळचे वाटतात तर आपल्या कृष्णकृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी राजकारणी त्यांना. पण हे सामान्य जनतेला समजवणार कोण? सत्यसाईबाबांवर कितीही गंभीर आरोप होवोत, आसाराम बापूंच्या आश्रमात नरबळींचे प्रकार होवोत किंवा स्वामी नित्यानंद प्रणयचाळे करोत, जनतेचा बाबांवरचा विश्वास मात्र अबाधितच! शिर्डीचे साईबाबा, शेगांवचे गजानन महाराज, मुंबईचे अनिरुद्ध बापू, कोकणातले नरेंद्र महाराज या सगळ्या महाराजांना मोठे करणारे कोण? आपण सामान्य लोकच. महाराष्ट्र जरी आपल्या पुरोगामित्वाची घमेंड मारत असला तरी समाजाला सदुपदेश करण्यासाठी ज्ञानेश्वरी सांगणा-या ज्ञानेश्वरांपेक्षा किंवा समाजातल्या बुवाबाजी, ढोंग, अंधश्रद्धा यांवर आपल्या अभंगातून प्रहार करणा-या तुकोबांपेक्षा सध्या लोकांना शिर्डीचे साईबाबा किंवा नरेंद्र महाराज जवळचे वाटतात हे वास्तव नाकारून कसे चालेल?

'आम्ही वाटेल तसे वागू, तुम्ही आम्हाला शिकवू नका.' हा न्याय मग पुढे इतर ठिकाणीही लागू होतो. भ्रष्टाचार, अकार्यक्षमता याबाबत मंत्र्यांना दूषणे देत असतानाच 'आपल्या' आमदाराला आपल्या मतदारसंघात पुन्हा एकदा विजयी केले जाते, सलमान खानवर, संजय दत्तवर कितीही गंभीर आरोप असोत, त्यांचे चित्रपट आवडीने बघितले जातात आणि इतरांना नावे ठेवता ठेवता कित्येक नियम आपल्या सोयीने मोडले जातात. आपण असे वागत असताना देशात मात्र उत्कृष्ट लोकशाहीची अपेक्षा धरतो, हे चुकीचे नाही का?

हे सगळं बदलायचं असेल तर आपणच प्रयत्न करायला हवेत. पण आपण असं करू शकू? आपल्याला हे जमलं तरच आपला देश महान बनण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे असं आपण म्हणू शकू, नाहीतर, नुसता म्हणायलाच 'मेरा भारत महान'! हो की नाही?

Saturday, April 16, 2011

हचिको - एक इमानी कुत्रा

विकीपिडीयावरचा एखादा लेख वाचून डोळ्यांच्या कडा पाणावल्या असं तुमचं कधी झालं आहे का? माझं असं नुकतंच झालं, हचिको या इमानी कुत्र्यावरचा लेख वाचून.

१९२४ साली, टोक्यो विद्यापीठात शेतकी खात्यात काम करणा-या एका प्रोफेसर साहेबांनी अकिता जातीचं एक छोटं कुत्र्याचं पिल्लू आपल्या घरी आणलं, त्याचं नाव होतं 'हचिको'. छोटा हचिको थोड्याच दिवसात आपल्या धन्याच्या घरी रूळला, एवढंच काय, दर संध्याकाळी आपल्या धन्याचं स्वागत करण्यासाठी तो 'शिबुया' रेल्वेस्टेशनवरही जाऊ लागला. हा दिनक्रम चालू राहिला साधारण एक वर्षे. मे १९२५ सालच्या एका दिवशी मात्र अघटित घडलं, प्रोफेसर साहेब त्या दिवशी घरी परतलेच नाहीत. ते आता कधीच घरी परतणार नव्हते; मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यु झाला होता! छोट्या हचिकोच्या लक्षात मात्र ही गोष्ट आलीच नाही, तो रोजच्या नेमानुसार आपल्या धन्याला आणण्यासाठी रेल्वेस्टेशनवर पोचला. आपला धनी आता कधीच परत येणार नाही हे त्या इमानी जीवाला कसे कळणार?

काही दिवस उलटले, हचिकोसाठी एक नविन घर शोधून त्याला नविन मालकाच्या ताब्यातही दिले गेले. हचिको मात्र तिथून निसटला, पुन्हापुन्हा. आपल्या जुन्या घरी अनेकदा धडकल्यावर आपले मालक इथे राहत नाहीत हे शेवटी त्या मुक्या जीवाला समजले असावे, पण ते सध्या आहेत कुठे हे त्याला कसे समजावे? आपले मालक इथे रहात नसले तरी ते शिबुया स्टेशनवर आपल्याला नक्की भेटतील असे हचिकोला वाटले आणि त्याने आपल्या नेहमीच्या वेळी स्टेशनवर आपल्या धन्याची वाट पाहण्याचे ठरवले. हचिको आपल्या धन्याची वाट पहातच राहिला, एक दोन नव्हे तर तब्बल नऊ वर्षे!

रेल्वे स्थानकात येण्याच्या ठराविक वेळी नेमाने तिथे उभी असणारी हचिकोची मुर्ती काही दिवसांत लोकांच्या ओळखीची झाली, यापैकी काही लोकांनी त्याला त्याच्या धन्याबरोबर पाहिले होते. या लोकांनी त्याला खाणे-पिणे द्यायला सुरूवात केली. प्राध्यापकसाहेबांचा एका विद्यार्थी हचिकोचा हा प्रवास जवळून पहात होता, त्याने हचिकोवर अनेक लेख लिहिले. टोक्योच्या 'असाही शिंबून' दैनिकात हे लेख प्रसिद्ध झाल्यावर सा-या जपानचे (नि जगाचेही?) लक्ष हचिकोकडे वेधले गेले.

आपल्या इमानी वृत्तीमुळे सगळ्या जगभरात प्रसिद्ध झालेल्या या श्वानोत्तमाचा अखेर ८ मार्च १९३५ रोजी मृत्यु झाला. आपल्या कुत्र्यावरील प्रेमामुळे प्रत्यक्ष स्वर्गालाही नकार देणा-या अर्जुनाची कथा आपण अनेकवेळा ऐकली आहे, स्वर्गात पोचल्यावर आपले धनी जर स्वर्गात नसतील तर आपणही तिथे जाणार नाही असेच हचिको म्हटला नसेल कशावरून?

बुद्धीची देणगी असल्यामुळे आपण इतर प्राण्यांपेक्षा वरचढ आहोत असं आपण कितीही म्हटलो तरी प्रत्यक्षात परिस्थिती याहून अगदी उलटी आहे असं माझं मत आहे. हचिकोची ही कहाणी वाचल्यावर काहीसं असंच वाटतं, नाही?

हचिकोवरील विकीपिडिया लेखाचा पत्ता : http://en.wikipedia.org/wiki/Hachik%C5%8D

Wednesday, April 6, 2011

विश्वकरंडक जिंकण्यासाठी भारतीय संघाला धमक्या?

जर भारत विश्वकरंडक जिंकला तर मी माझे सगळे कपडे उतरवेन असे 'पूनम पांडे'ने जाहीर करताच सगळ्यांनीच डोळे वटारले. (तिला पहाण्यासाठी?) अर्थात तिने तिचे विधान (अजूनपर्यंत तरी) खरे केले नाही हा तिच्याकडे डोळे लावून बसलेल्या तमाम चाहत्यांचा अपमानच नव्हे काय? पण हे झाले आपल्या संघाला जिंकण्यासाठी अमिष दाखवण्याबाबत. समजा कुणी आपल्या संघाला 'तुम्ही विश्वकरंडक जिंकला नाहीत तर...' अशा धमक्या दिल्या असत्या तर?

कशा असत्या या धमक्या?

राखी सावंत : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी माझे सगळे कपडे उतरवेन.

अशोक चव्हाण : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी भारतीय संघातल्या प्रत्येक खेळाडूला आदर्श सोसायटीतला एकेक फ्लॅट बक्षीस देईन.

हिमेश रेशमिया : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी पंधरा खेळाडूंसाठी पंधरा नवी गाणी रेकॉर्ड करेन आणि ती सगळी आळीपाळीने प्रत्येक खेळाडूच्या घराबाहेर वाजवेन.

तुषार कपूर : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी एकताला प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यावर चित्रपट काढायला लावेन आणि प्रत्येक चित्रपटात खेळाडूची भूमिका मीच करेन.

अभिषेक बच्चन : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी रावण-२ काढेन.

मल्लिका शेरावत : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी हिस्स-२ काढणार नाही.

राम गोपाल वर्मा : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी तुषार कपूर आणि अभिषेक बच्चन यांना घेऊन रक्तचरित्र-३ काढेन.

शाहरूख खान : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी 'चक दे इंडिया-२' काढेन आणि यात खेळ हॉकी नव्हे तर क्रिकेट असेल.

करिना कपूर : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी आणखी वजन उतरवून 'साईज -१' होईन.

सुरेश कलमाडी : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी सरकारला दर वर्षी विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करायला लावेन आणि तिचा आयोजक मीच असेन.

ए राजा : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी आयपीएलचे लिलाव टू जी स्पेक्ट्रम लिलावाच्या धर्तीवर करेन.

आणि सगळ्यात शेवटी...

रजनीकांत : जर भारत विश्वकरंडक जिंकला नाही तर मी पुढची विश्वकरंडक स्पर्धाच आयोजित होऊ देणार नाही.

Monday, April 4, 2011

भारत विश्वविजेता!

शनिवारी झालेल्या प्रचंड उत्कंठावर्धक सामन्यात भारताने श्रीलंकेला हरवले आणि २०११चा क्रिकेट विश्वचषक दिमाखात आपल्या खिशात घातला. तब्बल २८ वर्षांनंतर भारताने विश्वचषक जिंकला आणि करोडो भारतीयांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार केले. विश्वचषक जिंकणे ही मोठी गोष्ट खरीच, पण ज्या चिकाटीने नि जिगरबाज वृत्तीने खेळ करून महेंद्रसिंग धोनीच्या संघाने तो जिंकला तिला खरोखरच तोड नाही!

यावेळेचा विश्वचषक मला खास वाटला तो खेळाडूंमधे दर सामन्यात दिसलेल्या विजयी वृत्तीमुळे. भरपूर क्षमता पण चिकाटीचा, जिद्दीचा अभाव आणि पडखाऊ वृत्ती हे खेळांमधे (त्यात क्रिकेट आलेच) भारताचे नेहमीच दुखणे राहिले आहे. पण यावेळी चित्र वेगळे होते, यावेळी प्रत्येक सामन्यात दिसली ती भारताची आक्रमकता, विजय खेचून आणण्याची वृत्ती, लढवैय्येगिरी. आणि माझ्या मते हेच खूप महत्वाचे आहे. नशिबाने रडतखडत सामने जिंकण्यापेक्षा लढून हार पत्करणे कधीही चांगले, नाही का?

अंतिम सामन्यापर्यंतचा भारताचा प्रवास सोपा नव्हता. उपांत्यपूर्व सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि उपांत्य सामन्यात पाकिस्तान असे दोन महाभयंकर संघ त्यांच्या वाटेत उभे होते. पण धोनीच्या संघाने त्यांना हरवले आणि आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले. अंतिम सामन्यात नाणेफेकीचा कौल हरल्यावर क्रिकेटप्रेमींमधे निराशा पसरली पण श्रीलंकेचा पहिल्या काही षटकांचा खेळ पाहिल्यावर ती आनंदात परिवर्तित झाली. अर्थात क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे याचा प्रत्यय लगेच आला; शेवटच्या काही षटकांमधे श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची व्यवस्थित धुलाई केली नि भारतीय क्रिकेटरसिकांचा जीव पुन्हा टांगणीला लागला. डावाच्या दुस-याच चेंडूवर सेहवाग बाद झाला नि टांगणीला लागलेला हा जीव थोडा आणखी वर गेला. सचिनने दोन सुरेख चौकार मारून चांगली सुरुवात केली खरी, पण एका सुंदर चेंडूवर तो बाद झाल्यावर, खरे बोलायचे तर, भारतीय क्रिकेटरसिकांनी सामना वजा खात्यात टाकला होता. नंतर जे झाले ते अभूतपूर्व होते. त्यावेळी जे घडले ते भारतीय नव्हते, ते अस्सल अभारतीय होते. तिसरा, चौथा, पाचवा अशी बळींची रांग पहाण्याची क्रिकेटरसिक अपेक्षा करत असताना गंभीर नि कोहलीने मात्र त्यांना उच्च दर्जाच्या क्रिकेटचे दर्शन घडवले. कोहली बाद झाल्यावर धोनी मैदानात आला. इकडे गंभीर दुस-या बाजूला टिकून होता. उत्तम फलंदाजी काय असते हे त्याने त्या दिवशी सा-या जगाला दाखवून दिले. शंभराला तीन धावा बाकी असताना तो बाद झाल्यावर वाटले, त्याचे शतक हुकल्याचे दु:ख त्याच्यापेक्षा क्रिकेटरसिकांना जास्त झाले असेल. गंभीर गेला तरी कप्तान धोनी बिचकला नाही, तो चिवटपणे तिथेच टिकून राहिला. नायक शब्दाची व्याख्या स्पष्ट करेल असा त्याचा त्या दिवशीचा खेळ होता. द्रौपदीने धावा केल्यावर जसा कृष्ण धावत आला नि त्याने तिचे लज्जारक्षण केले, धोनीचे वागणे त्या दिवशी काहीसे तसेच होते.

नंतर? नंतर शंभर, नव्वद, पन्नास अशी विजयासाठी आवश्यक धावांची संख्या कमीकमी होत गेली नि स्टेडीयममधल्या भारतीयांचा आवाज वाढतवाढत गेला. शेवटच्या चेंडूवर धोनीने षटकार मारून चषकाला आपल्याकडे ओढले, मला वाटते हा चुरशीचा सामना संपविण्याचा याहून देखणा दुसरा प्रकार कुठला असूच शकत नव्हता! संघातल्या नवोदित खेळाडूंनी हा विजय सचिनला अर्पण केला. या महान खेळाडूने केलेल्या विक्रमांच्या पुष्पगुच्छात फक्त एकाच गुलाबाची जागा रिकामी होती, झाले तीही भरली गेली.

आणखी काय लिहावे! धोनी, या विजयासाठी तुला नि तुझ्या संघाला खूप खूप धन्यवाद देऊन हा लेख संपवतो. भारतातल्या आजकालच्या घटना पाहून भारतीय असल्याची लाज वाटावी अशी परिस्थिती आली असताना तू मात्र भारतीय असल्याचा अभिमान वाटेल असा पराक्रम घडवलास, याबद्दल तुझे आभार किती मानावेत?

ता.क. भारतीय संघाने प्रचंड पराक्रम दाखवून हा विजय मिळवला असला तरी आपल्या ओंगळवाण्या वागण्याने त्यावर बोळा फिरवण्याचे काम राजकारण्यांनी केलेच. याला सुरुवात केली दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांनी. संघातील फक्त दिल्लीच्या खेळाडूंना त्यांनी बक्षिसे जाहीर केली. शीला दिक्षीत बाई, ही बक्षिसे जर सगळ्या खेळाडूंना दिली असती तर आपले सरकार भिकेला लागले असते काय? याचीच री पुढे उत्तराखंड, महाराष्ट्र, पंजाब नि गुजरात सरकारने 'आपापल्या' खेळाडूंना पारितोषिके जाहीर करून ओढली. अरे क्रिकेट हा एक सांघिक खेळ, निदान त्याचा विश्वचषक जिंकल्यावर तरी असा कद्रूपणा दाखवू नका!