Friday, October 21, 2011

खडकवासल्याचा धडा!

खडकवासला विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचा निकाल पाहून भल्याभल्यांनी आ वासला असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हर्षदा वांजळे या हमखास विजयी होणार अशा पैजा अनेकांनी मारल्या असल्या तरी प्रत्यक्षात भाजपाचे भीमराव तापकीर यांनी त्यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव केला आणि सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

हा पराभव श्रीमती वांजळेंचा असला तरी प्रसारमाध्यमांनी तो राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा असल्याचे चित्र निर्माण केले आणि माझ्या मते ते अगदी योग्यच होते. अजितदादांनी ही मिरवणूक (कारण नसतानाही) विलक्षण प्रतिष्ठेची बनवली आणि त्याची परिणीती त्यांच्या जोरदार दाततोड आपटी खाण्यात झाली. श्रीमती वांजळेंच्या पराभवाला अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही मुख्य कारणांकडे पाहू.

श्रीमती वांजळेंच्या पराभवाचे पहिले कारण म्हणजे त्यांनी आयत्या वेळी घेतलेली कोलांटीउडी. वांजळे काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य, त्यांचे दिवंगत पती मनसे पक्षाचे पण या निवडणुकीत त्या उभ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हे मतदारांना फारसे रूचले नाही. 'आज इथे तर उद्या तिथे असे करणारे नेते परवा आपल्याला वा-यावर सोडणार नाहीत कशावरून?' असे जनतेला वाटले तर त्यात चुकीचे काय? वांजळे मनसेकडून ही निवडणूक लढल्या असत्या तर नक्कीच विजयी झाल्या असत्या हे अगदी बालवाडीतला मुलगाही सांगू शकत होता; पण काही अगम्य कारणांमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. ती त्यांची घोडचूक होती. जनतेच्या सहानभुतीचा फायदा मिळणार असल्याने त्यांचा विजय नक्की असे मानून अजित पवारांनी त्यांना तिकीट दिलेही, पण प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. नाराज झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आपला विश्वासघात झाला असे मानणारे मनसे कार्यकर्ते श्रीमती वांजळेंच्या विरोधात गेले आणि त्यांच्या पराभवाला हातभार लावणारे ठरले.

श्रीमती वांजळेंच्या पराभवाचे दुसरे कारण म्हणजे अजित पवारांची टगेगिरी. गेल्या हजार वर्षात या महाराष्ट्रात आपल्यासारखा महामानव जन्मला नाही, या महाराष्ट्रावर्षाला मिळालेले आपण एकमेव अद्वितीय, असाधारण, अतुलनीय नेते आहोत असा त्यांचा गोड गैरसमज आहे, जो कुणीतरी दूर करायला हवा. ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले आहेत खरे, पण ते फक्त शरद पवारांच्या पुण्याईवर. ते जर शरद पवारांचे पुतणे नसते तर आज काय करत असते हे सांगायलाच हवे का? आपण ठरवू ती पूर्व दिशा, आपण म्हणू ते सत्य ही जी त्यांची धारणा आहे ती त्यांनी बदलायला हवी. त्यांच्या या वागण्याला जनता, इतर पक्ष एवढेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षातील लोकही कंटाळले आहेत हे त्यांना कधी समजणार? पवारांचा जोर दिसतो तो फक्त बोलण्यात, कामात त्यांचा जोर कधी दिसणार? (इथे नुकत्याच आलेल्या 'बेंगलुरूत मेट्रो सुरू' या बातमीची आठवण येते - बेंगलुरूत मेट्रो धावली देखील, पुण्यात अजून तिचे कामही सुरु झालेले नाही.) पण प्रश्न असा, अजित पवार यातून काही बोध घेतील की आपला खाक्या असाच चालू ठेवतील?

बाकी भीमराव तापकीरांच्या विजयाची अजूनही कारणे होती. त्यांचा मितभाषी, नम्र स्वभाव, त्यांनी धनकवडीत केलेले काम ह्या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या. जनतेमधे सरकारविरुद्ध असलेली चीडही त्यांच्या विजयाला सहाय्यभूत ठरली.

असो, जे झाले ते झाले. प्रत्येक विजयातून नि पराभवातून शिकण्यासारखे बरेच असते; ह्या निकालातून महाराष्ट्रातले राजकारणी काही बोध घेतात की नाही हे काही दिवसात दिसणार आहेच!

Saturday, October 15, 2011

स्टीव जॉब्जचा मृत्यू आणि अश्रूंचा महापूर!

कुणाचाही मृत्यू (मग तो माणूस कितीही सामान्य का असेना) एक दु:खद घटना असते; नुकताच झालेला स्टीव जॉब्जचा मृत्यूदेखील त्याला अपवाद कसा असणार? पण त्याच्या मृत्युला मिळालेली प्रसिद्धी पाहून आणि त्याच्या स्तुतीने भरलेले रकानेच्या रकाने पाहून मी खरोखरीच आश्चर्यचकीत झालो. मेलेल्या माणसाबद्दल अशी चर्चा योग्य नव्हे, त्यामुळे ह्या लेखाचा विषय काही लोकांना आवडणार नाही; पण माझा प्रश्न असा आहे, स्टीवच्या मृत्युमुळे एवढा गजहब होण्याइतके खरेच त्याचे मानवजातीला योगदान मोठे होते?

स्टीव हा एका प्रसिद्ध कंपनीचा तिच्याहून प्रसिद्ध सर्वेसर्वा होता. पण सवाल असा आहे, स्टीवचे या जगाला योगदान काय? त्याच्या कार्यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला असा दावा कुणाला करता येईल काय? आपल्या कर्तुत्वाने त्याने त्याच्या कालखंडावर आपली छाप सोडली असे त्याच्याबाबत म्हणता येईल काय? मला वाटते या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत. स्टीवचे काम त्याच्या कंपनीपुरतेच मर्यादीत होते आणि ते सारे या कंपनीचा नफा वाढवायचा ह्याच हेतूने झालेले होते. बरे, नफ्याचे सोडा, तो तर प्रत्येकच कंपनीला कमवायचा असतो; पण उत्पादने बनवताना सामान्य लोकांना समोर ठेवून काम केले तर समाजसेवा करता येतेच की. याचे एक उत्तम देशी उदाहरण 'जमशेदजी टाटा' तर एक चांगले विदेशी उदाहरण म्हणजे 'हेन्री फोर्ड'. टाटांच्या नॅनोसारखे एखादे उत्पादन स्टीवने तयार केले असते तर ती वेगळी गोष्ट, पण त्याची सगळी उत्पादने श्रीमंतांसाठी बनवलेली होती (नि आजही आहेत). स्टीवने प्रचंड प्ररिश्रम घेतले नि आपली कंपनी पहिल्या क्रमांकावर नेली हे मान्य, पण ते श्रम फक्त त्याच्या नि कंपनीच्या भल्यासाठी होते हे मान्य करण्यात काहीही अडचण नसावी. एखाद्या कंपनीचा अध्यक्ष मोठे कष्ट उपसून आपल्या कंपनीला नवजीवन देतो ही गोष्ट कौतुकास्पद असेल, पण त्यात विशेष काय?

स्टीवने बनवलेली उत्पादने वेगळी, चांगली असतील पण समजा ती बाजारात आली नसती तर जगाला काय फरक पडला असता? ग्राहम बेलने टेलिफोन बनवला, टीम बर्नर्स लीने इंटरनेट बनवले, बिल गेटस् ने विन्डोज बनवून घरगुती संगणक क्षेत्रात क्रांती केली, स्टीव जॉब्जबाबत असे काही म्हणता येईल? स्टीवच्या मृत्युला मिळालेली ही प्रसिद्धी मला जास्त टोचली ती एका बातमीमुळे. ही बातमी म्हणजे 'सी' या संगणक भाषेचा निर्माता 'डेनिस रिची' याच्या निधनाची. या भाषेच्या निर्मितीबरोबरच 'युनिक्स' (जिच्यापासून पुढे लिनक्स बनली), 'मल्टिक्स' या संगणक प्रणालींच्या निर्मितीतही रिची यांचा महत्वाचा सहभाग होता. किंबहुना रिची नसते तर जॉब्ज घडलेच नसते [http://www.zdnet.com/blog/perlow/without-dennis-ritchie-there-would-be-no-jobs/19020] असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. पण नेहमी चमचमाटाकडेच लक्ष देणा-या माध्यमांनी स्टीवच्या मृत्युची बातमी पहिल्या पानावर छापून डेनिस रिचीच्या जाण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावे हे काहीसे अपेक्षितच आहे, नाही का?

आता 'ऍपल मला अजिबात न आवडणारी कंपनी आहे' किंवा 'स्टीव माझा अत्यंत नावडता माणूस होता' असं असल्यामुळे मी हा लेख लिहिला असं काही लोक म्हणतील, पण तसं काही नाही. स्टीवच्या जाण्यामुळे अश्रू ढाळणा-या लोकांना मला एवढंच विचारायचं आहे, मानवजातीवर उपकार करणा-या महामानवांच्या मृत्युचा शोक आपण करतो; स्टीव जॉब्जला खरंच या यादीत बसवता येईल?