Wednesday, March 17, 2010

'ग्राउंडहॉग डे' - एक झकास विनोदी चित्रपट!

चित्रपट दोन प्रकारचे असतात, खूप गाजलेले पण आपल्याला न आवडलेले आणि खूप गाजलेले नि आपल्याला चक्क आवडलेले. आज मी दुस-या वर्गातल्या अशाच एका चित्रपटाविषयी तुम्हाला सांगणार आहे, ज्याचं नाव आहे 'ग्राउंडहॉग डे'.

'ग्राउंडहॉग दिवस' हा अमेरिकेतला एक उत्सवदिवस. सगळ्या अमेरिकेत हा दिवस दुसर्‍या फेब्रुवारीला साजरा केला जातो. हिवाळी मोसमाच्या अखेरी मोठ्या उंदरासारखा दिसणारा ग्राउंडहॉग हा प्राणी त्याच्या बिळातून बाहेर येतो नि हिवाळा संपणार की अजून सहा आठवडे चालणार याचा निर्णय देतो अशी ह्या दिवसाची पुर्वापार चालत आलेली कथा आहे. आपल्या चित्रपटाचा नायक 'फिल कॉनर्स' हा एका वृत्तवाहिनीवर हवामानतज्ञ म्हणून काम करतो आहे. आपल्या कामात हुशार असला तरी फिलचा स्वभाव तुसडा आहे. आपल्याबरोबर काम करणार्‍या लोकांशी तो अगदी तुटकपणे वागतो, विशेषतः त्याचा चालक 'लॅरी'शी. आपण कुणीतरी खास आहोत असं मानून इतर लोकांकडे पाहणार्‍या लोकांची एक जमात असते, त्या जमातीतलाच फिल आहे.

सालाबादाप्रमाणे ह्या वर्षीही फिलवर 'पंक्सटॉनी' या गावात जाउन ग्राउंडहॉग दिवसाचं वार्तांकन करायची जबाबदारी येते. ग्राउंडहॉग दिवस जरी पुर्ण अमेरिकेत साजरा होत असला तरी पंक्सटॉनी या गावात साजरा होणारा हा उत्सव अमेरिकेतला सगळ्यात जुना उत्सव आहे. तिथे हा उत्सव वर्षानुवर्षे साजरा होत आलेला आहे. हा उत्सव एवढा प्रसिद्ध आहे की जगाची अनौपचारिक हवामान राजधानी असा पंक्सटॉनीवासी आपल्या गावाचा कौतुकाने उल्लेख करतात. अर्थातच फिलला हे सारं काही पसंत नाही. हा शुद्ध फालतूपणा आहे, थिल्लरपणा आहे नि वेळ वाया घालवायचा एक बालिश प्रकार आहे असं त्याचं स्पष्ट मत आहे. पण करणार काय, तेव्हा 'आलिया भोगासी...' असं म्हणत तो लॅरी नि रिटाबरोबर आदल्या दिवशी ह्या गावात येतो. दुसर्‍या दिवशी सगळं आवरून साहेब तयार होतात नि ग्राउंडहॉग उत्सव जिथं साजरा होतो त्या मैदानावर पोहोचतात. तिथलं वातावरण अगदी उत्साहानं ओसंडणारं असतं. लोक रात्रभर गात असतात, नाचत असतात आणि थोडे थकले की शेकोटीपाशी जाऊन, ऊब घेऊन ताजेतवाने होऊन पुन्हा नाचगाण्यात सामील होत असतात. पण फिलला हे सगळं थोतांड वाटतं, तो कार्यक्रमात पोचतो नि अगदी दोन मिनिटातच आपलं वार्तांकन संपवतो. ते संपलं की त्याला ह्या गावात एक क्षणही थांबण्यात रस नसतो, रिटा नि लॅरीबरोबर तो परतीच्या प्रवासाला निघतोही. पण इथेच मोठी माशी शिंकते. जे हिमवादळ पंक्सटॉनी टाळून अल्टूना ह्या गावी धडकणार आहे असं फिलनं काल मोठ्या तोर्‍यात सांगितलेलं असतं, तेच फिलला त्याच्या परतीच्या प्रवासात गाठतं. परतीचा मार्ग बंद! आता फिलला परत पंक्सटॉनीमधे परतण्याशिवाय काही पर्यायच नसतो. त्याची खूप चरफड होते, पण करतो काय?

दुसर्‍या दिवशीचा सकाळचा सहाचा गजर लावून फिल उठतो तेव्हाच त्याला आपल्याबरोबर विचित्र काहीतरी घडतंय अशी जाणीव होते. काल त्यानं रेडिओवर जो कार्यक्रम ऐकलेला असतो तोच आज परत लागलेला असतो. 'हे चाललंय काय?' फिल स्वत:शी म्हणतो नि सगळं आवरुन खाली येतो. त्याला आदल्या दिवशी भेटलेले सगळे लोक त्याला अगदी त्याच क्रमाने भेटतात, तेच प्रसंग, सारं काही तेच ते. आपण कालचाच दिवस पुन्हा जगतोय असा संशय फिलला येतो नि जसजसा दिवस पुढे सरकतो तसतसा तो खरा होत जातो. तिसरा दिवस उजाडतो, पुन्हा तोच दिवस, दोन फेब्रुवारी अर्थात ग्राउंडहॉग डे. फिल पहिल्यांदा वैतागतो, मग चिडतो नि नंतर सारं काही लक्षात आल्यावर आपल्यावरची सगळी बंधनं झुगारून देऊन अक्षरशः बेदुंध जीवन जगतो. समाजाचे सारे नियम धाब्यावर बसवत तो मस्त दारू पितो, आपल्या दोन मित्रांबरोबर गावभर उंडारतो नि चक्क अपघात करून पोलिस स्टेशनाची हवाही खातो. मग 'नॅन्सी टेलर' या मुलीची माहिती आधी तिच्याकडूनच काढून मग पुन्हा तिला पटवणे, बँकेतली रोकड पळवून ऐश करणे असे उद्योगही करुन होतात. ह्याचं कारण म्हणजे फिलचं शरीर जरी रोज 'ग्राउंडहॉग दिवस' हा एकच दिवस जगत असलं तरी तरी फिलच्या मनातल्या आठवणी मात्र पुसल्या जात नसतात, त्यामुळे काल आपण काय केलं, कुणाशी बोललो हे त्याला पक्कं आठवत असतं. इतर मुली झाल्यावर रिटाची सगळी माहिती तिच्याकडूनच काढून तिला आपल्या प्रेमजाळ्यात ओढायचा पुरेपूर प्रयत्न फिल करतो. पण रिटा कसली त्याला बधते, त्याला आपल्याबाबतची इतकी माहिती असलेली पाहून तिला संशय येतो नि असं करण्यामागे फिलचा काही डाव आहे असं वाटून ती त्याच्या श्रीमुखात भडकावते.(अनेकवेळा, जवळपास रोजच!)

पण हे सारं किती दिवस करणार? फिल लवकरच या सगळ्या गोष्टींना कंटाळतो आणि आत्महत्येचा प्रयत्न करतो. एकदा नव्हे अनेकदा. पण त्याचं नशिब त्याची अशी सहजासहजी पाठ सोडणार नसतं. आदल्या दिवशी मेला तरीही फिल दुसर्‍या दिवशी पुन्हा त्याच्या अंथरूणात असतोच, जिवंत.


असे अनेक दिवस गेल्यावर आणि सगळं काही करून झाल्यावर मात्र फिल बदलतो, अंतर्बाह्य. त्याला जाणवतं की इतके दिवस आपण फक्त स्वत:चा विचार करत होतो, आता बस्स, आता जगायचं ते इतरांसाठी. मग त्याचं आयुष्य पालटतं. रोज पियानो शिकणं, बर्फाच्या मुर्ती करायला शिकणं असे नवे उद्योग तो हाती घेतो. जेवताना घशात काही अडकल्याने श्वास कोंडला जात असलेल्या एका माणसाला वाचवणं, तीन म्हातार्‍यांची गाडी पंक्चर झाल्यावर त्यांच्या गाडीचं चाक बदलून देणं, रोज सकाळी भेटत असलेल्या त्याच्या जुन्या वैतागवाण्या मित्राकडून विमा पॉलिसी विकत घेणं अशा अनेक चांगल्या गोष्टी तो करतो. त्या दिवशी संध्याकाळच्या ग्राउंडहॉग पार्टीत तो झक्कास पियानो वाजवून (रिटासह) सगळ्यांना पार वेडं करून टाकतो. त्यानं मदत केलेले सगळे लोक तिथे असतातच, ते त्याला धन्यवाद देतात. रिटा हे सगळं पहाते. आणि तेव्हाच फिल तिला तिच्यावर प्रेम असल्याचं सांगतो. फिलचं हे बदललेलं रूप पाहत असलेली रिटाही आता त्याला प्रतिसाद देते. ते दोघं फिलच्या रुमवर जातात नि झोपी जातात. सकाळी जेव्हा फिल जागा होतो तेव्हा तारीख असते ३ फेब्रुवारी. त्या दुष्टचक्रातून फिल एकदाचा बाहेर पडलेला असतो!


अतिशय साधी पण दमदार कथा, मुख्य कलाकारांचा अप्रतिम अभिनय नि दुय्यम कलाकारांनी त्यांना दिलेली साथ यामुळे चित्रपट प्रेक्षणीय झालाय. 'बिल मरे' ह्या नटानं फिलची भुमिका अतिशय उत्तम वठवली आहे. पहिला माणुसघाणा, घमेंडखोर ते नंतरचा शांत, सगळ्यांना मदत करणारा मितभाषी फिल हा बदल त्यानं अगदी सहज दाखवलाय. त्याचे डोळे कमालीचे बोलके आहेत आणि चेहेर्‍यावरच्या अगदी लहानशा हालचालींनी आपल्या भावना व्यक्त करायचं कसब त्याला साधलंय. 'अँडी मॅक्डोवेल'ही अभिनेत्रीही तशीच. गोड, निरागस नि प्रेमळ रिटा तिनं सहज उभी केलीय. आपली भुमिका जगणं हे हॉलीवूडपटातल्या प्रत्येक अभिनेत्याचं नि अभिनेत्रीचं वैशिष्ट्य राहिलं आहे, ह्या चित्रपटातले अभिनेतेही त्याला अपवाद नाहीत. 'अभिनेते अभिनय करत आहेत असं न वाटणं त्यालाच उत्तम अभिनय म्हणतात' हे वाक्य ह्या दोघांकडे पाहिल्यावर पटतं. दुय्यम अभिनेत्यांचीही तीच गोष्ट. मग तो फिलचा लोचट मित्र नि विमा पॉलिसी विक्रेता टेड असो, ड्रायव्हर लॅरी असो किंवा फिलच्या घरमालकीण मिसेस लँकॅस्टर असोत. आपल्या प्रत्येक चित्रपटात शाहरूख खानच वाटणार्‍या शाहरूखसारख्या अभिनेत्यांनी हे असले चित्रपट जरूर पहावेत, अभिनय म्हणजे काय हे तेव्हा त्यांना कळेल! चित्रपट चालतात ते अभिनयामुळे, भपकेबाज कपड्यांमुळे, परदेशातील चित्रीकरणामुळे किंवा कोट्यावधींच्या प्रसिद्धीमुळे नव्हे ही गोष्ट आपल्या निर्मात्यांना कधी समजणार?

उत्तम चित्रपट उत्तम असतात कारण ते नुसतं तुमचं मनोरंजनच करीत नाहीत अप्रत्यक्षरित्या तुम्हाला काही सांगतातही. 'ग्राउंडहॉग डे'ही याला अपवाद नाही. अर्थातच चित्रपटाचं तात्पर्य मी तुम्हाला सांगणार नाही, ते प्रत्येकानं आपापलं ठरवायचं असतं. आणि ते अगदी दर वेळी स्पष्ट समोर दिसेलच असं नाही, ते कधीकधी अप्रत्यक्षरित्यादेखील तुम्हाला येऊन धडकु शकतं. तेव्हा 'ग्राउंडहॉग डे'चं तात्पर्य तुम्ही काढा किंवा काढुही नका, पण एक सुंदर चित्रपट म्हणून तरी तो बघायला काय हरकत आहे?

1 comment:

  1. अतिशय सुंदर चित्रपट आणि त्यावरचा सुंदर लेख!

    ReplyDelete