Sunday, August 29, 2010

अखेर नव्या घरात!

अखेर आम्ही आमचे स्वत:चे घर सोडले आणि भाड्याच्या घरात रहायला आलो. ’भाड्याच्या घराचा शोध’ हा खरोखरच एक भयंकर अनुभव होता; इतका भयंकर की तो आयुष्यात पुन्हा कधीही घ्यायला लागू नये अशीच माझी ईच्छा आहे!

आमचे घर विकले गेल्यावर ते लगेच खाली करून द्यावे असा धोशा घेणा-यांनी लावला नि आम्हाला भाड्याचे घर शोधणे क्रमप्राप्त झाले. पण आम्ही घराचा शोध सुरू केला नि हे काम वाटते तितके सोपे नाही ही जाणीव आम्हाला झाली. ’अरे हाय काय अन नाय काय? कुठलेतरी घर बघायचे, मालकाच्या डोक्यावर पैसे नेऊन आदळायचे आणि घर ताब्यात घ्यायचे!’ असा माझा घर भाड्याने घेण्याबाबत सर्वसाधारण समज होता, तो पूर्णपणे खोटा ठरला. भाड्याचे घर शोधण्यात तीन आठवडे घालवल्यावर हे जगातले सगळ्यात अवघड नि कटकटीचे काम आहे असे माझे मत झाले आहे. मी तर असे म्हणेन की एकवेळ मनाजोगती बायको मिळणे सोपे पण मनाजोगते भाड्याचे घर मिळणे अतिकठीण!

आजकाल लग्नाच्या बाजारात मुलींच्या (नि मुलांच्याही) आपल्याविषयी जशा अवास्तव कल्पना असतात नि समोरच्याकडून जशा अवाजवी अपेक्षा असतात, थोडीफार तशीच परिस्थिती आजकाल पुण्यातील घरमालकांची झाली आहे. आपली दोन बेडरूम्सची सदनिका ही सदनिका नसून राजवाडा आहे नि ती पुणे सातारा रोडवर नव्हे तर डेक्कन जिमखाना येथे आहे असाच आम्ही भेटलेल्या बहुतांश घरमालकांचा समज झालेला दिसला. त्यांनी सांगितलेले भाड्याचे नि पागडीचे भाव ऐकून तर आम्ही अक्षरश: हबकून गेलो. त्या पैशात पुण्यात पंधरा वर्षांपुर्वी चक्क एक घर खरेदी करता आले असते! एक दोन उदाहरणे - आमच्या घराजवळच असलेल्या सोसायटीतल्या एका फ्लॅटची कथा. ही ईमारत सुमारे वीस वर्षे जुनी. इथे पार्किंग नावापुरतेच, तेही फक्त आठ फुट उंच! खाली अस्वच्छता आणि गाड्यांची भरपूर गर्दी. आम्ही वेळ ठरवून फ्लॅट पहायला गेलो, तर काकू जिन्यातच दाराच्या कुलुपाशी खटपट करत होत्या. नंतर आमच्याकडे पाहून गोड हसत म्हटल्या, "अहो फ्लॅटची किल्ली म्हणून दुसरीच किल्ली आणली मी, थांबा किल्ली घेऊन आलेच मी दोन मिनिटात." दोन मिनिटांचा वायदा करून गेलेल्या काकू परतल्या दहा ते पंधरा मिनिटांनी. तोपर्यंत आम्ही असेच जिन्यात उभे. बरे हा जिना इतका अरूंद, की कुणी आले की आम्हाला पुढेमागे झुलत त्यांना वाट करून द्यावी लागत होती. एकूनच सोसायटीचा रागरंग पाहून मी तिथून निघण्याचा विचार करत होतो पण आमचे संस्कार आड आले आणि आम्ही काकुंची वाट पाहत तसेच थांबलो. पण सदनिका पाहून आमचा अपेक्षाभंग झाला नाही हे मात्र खरे; अगदी आम्ही कल्पना केली होती तशीच होती ती. फारसा प्रकाश नसलेल्या खोल्या, भडक रंग, अगदी साधी फरशी. धक्कादायक गोष्ट म्हणजे सदनिकेतले तोंड धुण्याचे बेसिन फुटलेले होते आणि वर्तमानपत्रात जाहिरात देण्याआधी ते दुरुस्त करण्याचे साधे सौजन्यही मालकांनी दाखवले नव्हते. दुसरे उदाहरण असेच. बावीस वर्षे जुनी इमारत नि चौथा मजला. लिफ्ट होती पण वीज गेल्यावर काही पर्यायी व्यवस्था नसल्याने ती गेल्यावर हिमालय चढणे आले. इथे एकच संडास/बाथरूम होती नि तरीही मालकांची भाड्याची अपेक्षा दहा हजार होती. वर ’इथे मुले रहात होती. फ्लॅट अजून साफ केलेला नाहीये, पण पाह्यचा तर पाहून घ्या.’ अशी प्रेमळ सूचना! तिसरे उदाहरण एका बंगल्याचे. बालाजीनगर इथल्या बंगल्यांच्या सोसायटीतला हा बंगला. जाहिरात पाहून आम्ही तो बघायला गेल्यावर "तुमचे बजेट काय आहे?" असा पहिलाच प्रश्न मालकीणबाईंनी विचारला. आमचे बजेट दहापर्यंत आहे सांगितल्यावर "एवढ्या बजेटमधे तुम्हाला ’बंगलो सोसायटी’त कुठेच घर मिळणार नाही, पण तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला दहापर्यंत एक बेडरूम बंद करून एक बीएचके देऊ शकेन." असे औदार्य मालकीणबाईंनी दाखवले. आम्ही मनातून खट्टू झालो पण आता आलोच आहोत तर घर पाहून घेऊ असे वाटल्याने आम्ही त्यांच्याबरोबर बंगला पहायला निघालो. तेवढ्यातल्या तेवढ्यात मालकीण बाईंनी मला सगळे प्रश्न विचारून घेतले. ’तू काय करतोस, तुझा भाऊ काय करतो, तुझी आई/बाबा काय करतात, तुम्ही पुण्यात किती वर्षे आहात’ अशी प्रश्नांची फेरीच त्यांनी माझ्यावर झाडली. आम्ही पुण्यात पंधरा वर्षे आहोत हे कळाल्यावर ’काय? नि अजून तुमचे पुण्यात घर नाही?’ हा पुढचा प्रश्नही त्यांच्याकडे तयार होता. शेवटी तर त्यांनी ’तुझे शिक्षण कुठे झाले?’ हेही विचारले. आत्तापर्यंत मला हा प्रश्न मुली बघायला गेल्यावरही कुणी विचारला नव्हता. एवढे प्रश्न विचारल्यावर त्या नक्कीच मला कुणीतरी मुलगी सुचवतील अशी भीती मला वाटत होती, पण सुदैवाने तसे काही झाले नाही. तर आता बंगल्याविषयी - हा बंगला ’प्रशस्त’ म्हणजे जरा जास्तच प्रशस्त होता. खोल्या एवढ्या मोठ्या की त्यांमधे क्रिकेट खेळता आले असते. आमच्याकडे सामान जरा जास्त पण ह्या खोल्यांमधे ते कुठल्याकुठे गडप झाले असते. बांधकामाचा दर्जाही एकूण सामान्यच होता. अशा या चार खोल्यांच्या घरासाठी या मालकीणबाईंनी पंधरा हजार हवे होते! ’बाई, साडेदहाहजारात आम्हाला तुमच्यापेक्षा अर्धा किलोमीटर जवळ असलेल्या चकाचक नव्या सोसायटीत दोन बीएचके फ्लॅट मिळतो, पंधरा हजार घालवून तुमचे हे घर घेण्यासाठी तुम्ही आम्हाला एकतरी सबळ कारण सांगू शकता का?’ हा एकच प्रश्न विचारून काकूंना निरूत्तर करावे असे मला वाटले, पण पुन्हा एकदा आमचे (सु)संस्कार आड आले!

घर शोधताना प्रचंड त्रासदायक ठरणारी दुसरी गोष्ट म्हणजे एजंट लोक. एजंट बनण्यासाठी भ्रमणध्वनी असणे हीच एकमेव आवश्यक गोष्ट आहे असा समज झाल्यामुळे आजकाल कुणीही उठसूट एजंट बनू लागला आहे. शेतीबरोबर पुर्वी लोक कोंबड्या पाळणे/गाई पाळणे/शेळ्या पाळणे असा जोडधंदा करीत, आजकाल लोक इतर धंद्याबरोबर एजंटगिरी हा जोडधंदा करू लागले आहेत. हे एजंट नि त्यांच्या अजब गजब कहाण्यांवर एक वेगळा लेख(की पुस्तक?) लिहिता येईल! समाधानाची बाब एवढीच की पुणे सातारा रस्त्याचा परिसर पुण्याच्या ’उच्चभ्रू’ भागात येत असल्याने एजंट लोक अजूनतरी एकाच भाड्यामधे समाधान मानत आहेत!

असो, पण भाड्याचे घर शोधण्याच्या या अनुभवामधून बाहेर आलेली एक चांगली गोष्ट म्हणजे भाड्याने घर घेऊन राहणा-या लोकांच्या दु:खाची मला झालेली जाणीव. भाड्याच्या घरात राहणा-यांच्या वेदना मी आता जाणतो, दर अकरा महिन्यांनी या फे-यातून जाणा-या लोकांविषयी मला आता सहानुभुती वाटते. घरमालक, एजंट यांच्या कात्रीत सापडलेल्या या लोकांचे दु:ख मी आता समजू शकतो. चला, भाड्याच्या घराचा अनुभव भयानक असला तरी त्यामुळे ही एक सकारात्मक गोष्ट घडली, हे चांगलेच नाही का?

1 comment: