Thursday, June 2, 2011

सचिनच्या चाहत्याच्या लेखाला उत्तर!

नमस्कार मिलिंद कारेकर साहेब, आपल्या http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8670221.cms या लेखाला उत्तर म्हणून सदर लेख लिहितो आहे. आता 'हे पत्र्युत्तर तुम्हाला मागितले कुणी?' असा प्रश्न तुम्ही विचाराल, त्याचे उत्तर सोपे आहे. अहो आम्ही पुणेकर, जे कुणीही करायला सांगितले नाही (किंवा करू नका असे सांगितले आहे) नेमके ते करणे हा आमचा स्वभावच आहे, त्याला आम्ही काय करणार! बाकी हा लेख वाचून 'आम्हाला शिकवणारे टिकोजीराव तुम्ही कोण?' असे म्हणू नकात म्हणजे झाले, कारण आमचे खरे नावच टिकोजीराव आहे.

असो, बाकी तुमचा लेख आम्हाला आवडला. पोटतिडीकीने म्हणतात तो काय तसा लिहिल्यासारखा वाटला. किंबहुना सचिनवरचे तुमचे प्रेम पाहून आम्ही अक्षरशः धन्य झालो. इतके की आम्हाला अचानक 'हर किसीको नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगीमे' हे गाणेच ऐकू यायला लागले. पण नंतर ते आमच्या खुराड्यात बसणा-या आमच्या सहका-याच्या भ्रमणध्वनीचे केकाटणे असल्याचे कळाल्यावर मात्र आमची निराशा झाली. (बाकी पकडलेत बरोबर हो तुम्ही आम्हाला! हो, हो, कार्यालयातच वाचला आम्ही हा लेख.) असो. (हा शब्द या लेखात पुन्हापुन्हा येतो आहे हे आम्ही जाणतो, पण ते पुण्याचे वैशिष्ट्य आहे आणि त्याला आमचा नाईलाज आहे.)

तर तुमच्या लेखाविषयी. या लेखाच्या सुरुवातीलाच तुम्ही म्हणता 'सचिन हा काही लोकांसाठी देव आहे देव! मी देखील त्याला देव मानतो. पण फक्त मैदानावर. मैदानाबाहेर मी त्याच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा वागतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.' कारेकर साहेब, मला तुमचे हे वाक्य भयंकर वाटते. वैयक्तिक प्रश्न? अहो साहेब, माणूस सार्वजनिक झाला की त्याला वैयक्तिक काही नसते, त्याचे सगळे काही सार्वजनिक होते. आता समजा, महाराष्ट्रातल्या एखाद्या मंत्र्याने त्याच्या घरात काम करणा-या एका मुलीवर बलात्कार केला, तर तुम्ही तिथे हाच युक्तिवाद करणार आहात का? अहो, जेव्हा लोक एखाद्यावर एवढे प्रेम करतात, तेव्हा त्याचे वागणे आदर्श असावे अशी अपेक्षा लोकांनी केली तर त्यात चुकीचे काय? प्रत्येक मोठी व्यक्ती शेवटी माणूस असते हे खरे, त्यामुळे तिच्या चुका लोक माफ करतीलही, पण तिचे अपराध कसे काय माफ केले जावेत?

पुढे तुम्ही म्हणता, 'आपण खोटेपणा करून देशाचं नुकसान केलं तर ते चालतं. पण सचिनने कायद्यात राहून जर स्वतःचा पैसा वाचवायचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरतो काय?' अहो कारेकर साहेब, पण काही लोक सरकारचे नुकसान करतात ही गोष्ट चुकीचीच नाही का? इथे लक्षात घ्या, सचिनने केलेली मागणी बेकायदेशीर आहे असे नव्हे तर ती नैतिकदृष्ट्या चुकीची आहे म्हणून तिच्यावर टीका झाली. (आता तो बेकायदेशीर गोष्टी करत नाही म्हणून तुम्ही त्याचा सत्कार करणार असाल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.)

आता तुमचे हे वाक्य, 'पैसा कमावणं जितकं कठीण असतं ना त्याही पेक्षा पैसा टिकवणं जास्त कठीण असतं. नुसता आपल्या जवळ पैसा आहे म्हणून तो कसाही उडवून चालत नाही तर त्याची कदरही असावी लागते.' अहो, करावी ना, सचिनने जरून धनवृद्धी करावी, पैसा कमवावा, टिकवावा, पण असा खोटेपणा करून? नाही, ही गोष्ट चुकीची आहे, आणि असेल. पुढे तुम्ही म्हणता, 'बेकायदेशीररित्या FSI वाढवून घेऊन मग पेनल्टी भरून ते बांधकाम कायदेशीर करून घेता येतं, पण तसं न करता त्याने सरळ FSI वाढवायला परवानगी मागितली. हा त्याचा चांगुलपणा आपल्या लक्षात का येत नाही?' कारेकर साहेब, आपण पुन्हा पुन्हा चुकीची कामे करणा-यांचे संदर्भ का देता आहात? अहो, एका हि-याची तुलना दुस-या हि-याशी केली जावी, दगडाशी नव्हे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, 'बाकीचे लोक चुकीच्या गोष्टी करतात आणि सचिन तसे करत नाही म्हणून तो महान.' हा आपला युक्तिवाद ऐकून आम्हाला हसावे की रडावे तेच कळेनासे झाले आहे.

पुढे तुम्ही लिहिता, 'फेरारी ३६० मॉडेना ह्या गाडीवर कस्टमने सूट दिल्यामुळे त्याच्यावर लोकांनी खूप चिखलफेक केली.' मग काय चूक त्यात? अहो, सर्वसामान्य माणसाला हे कस्टम्सवाले किती त्रास देतात हे तुम्ही कधी पाहिले आहे काय? जर नियमात बसत नसेल तर परदेशातून आणलेल्या वस्तूवर सामान्य माणूस आयातशुल्क भरतोच ना? मग अब्जाधीश असलेल्या सचिनला त्यात अवघड ते काय? पण 'मी कुणीतरी खास आहे, म्हणून मला खास वागणूक हवी' असे तो म्हटला नि त्यामुळेच त्याच्यावर सडकून टीका झाली.

नंतर तुम्ही म्हणता, 'माझा स्वतःचा सत्यसाईबाबांवर विश्वास नाही. पण माझा विश्वास नाही म्हणून सचिनचा देखील विश्वास नसावा अशी अपेक्षा मी करीत नाही.' अर्थात सत्यसाईबाबा हे एक भोंदू होते हे तुम्ही मान्य करताच ना? उद्या, आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्वामी नित्यानंदांना आपल्या कार्यालयात आणून आपल्या खुर्चीवर बसवले तर तुमची भूमिका काय असेल? सचिनच्या एका भोंदू बाबावरील श्रद्धेमुळे लोकांमधे चुकीचा संदेश जातो हे तुम्ही नाकारता आहात काय?

आणि सगळ्यात शेवटी तर आपण कडी केली आहे. 'अरे ज्याला केलेल्या कामाचे पैसे पण देऊ नयेत, अशा सैफ अली खानला "पद्मश्री" देतात तेव्हा आमच्या तोंडून 'ब्र' निघत नाही. पण सचिन तेंडुलकर हे नाव घेतलं की आपण लगेच बाह्या वर करून चर्चा करायला का लागतो?' कारेकर साहेब हे काय आहे? अहो, सैफ अली खानच्या पद्मश्रीचा इथे संबंध काय? आणि सैफ अली खानला पद्मश्री मिळाल्यावर महाराष्ट्रात पेढे वाटले गेले होते नि सचिनला भारतरत्न मिळाल्यास महाराष्ट्रात सुतक पाळले जाईल असे आपल्याला म्हणायचे आहे काय?

मिलिंदराव, 'सचिनने तरी' असे करू नये असे आम्ही म्हणतो आहोत आणि 'सचिनने' हे केले तर काय हरकत आहे असे म्हणता आहात, आपल्या दोघांच्या दृष्टीकोनात हाच तर फरक आहे. अहो, भारतरत्न मिळवण्याच्या लायकीचा माणूस हा. लहानसहान आहे का हा सन्मान? मराठी माणसांमधे बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, धों. के. कर्वे अशा महान व्यक्तींना मिळाला हा सन्मान. हाच सन्मान सचिनलाही देण्याच्या गोष्टी आम्ही करत असताना सचिनने काही रुपड्यांसाठी असा खोटेपणा करावा? छे, आम्हाला नाही पटत!

बाकी कारेकर साहेब, आपल्या या लेखाबद्दल आम्ही तुम्हाला दोष देत नाही, अहो हा देश नि या देशाची मनोवृत्तीच तशी आहे. 'एखादा माणूस आम्हाला आवडला की त्याचे शंभर गुन्हे माफ' ही मनोवृत्ती एकदा स्वीकारली की मग लहान मुलांच्या नरबळीच्या बातम्या येऊनही आसाराम बापूंची व्याख्याने हाउसफुल्ल होतात, गंभीर गुन्हे करूनही संयज दत्त, सलमान यांना प्रत्यक्ष पहायला मारामारी होते आणि खुनाचे अनेक गुन्हे असूनही नेते सलग १० वेळा मतदारसंघातून निवडून येतात. अहो चालायचेच, आताशा तर आम्हाला त्याची सवय झाली आहे. नुसते 'मेरा भारत महान' म्हणायचे नि एक सुस्कारा सोडायचा झाला!

असो (हा शेवटचा),
पत्रोत्तर द्याच.
आपला विश्वासू,
टिकोजीराव तिरशिंगराव पुणेकर.

ता.क. मिलिंदराव, आमचे मराठी थोडे कच्चे असल्याने पुन्हा पुन्हा वाचूनही आपण खाली लिहिलेल्या परिच्छेदाचा अर्थ आम्हाला समजलेला नाही, तो समजावून देण्याचे कष्ट आपण घ्याल काय?

आम्हाला भ्रष्ट मुख्यमंत्री चालतो. लालू, कलमाडी, ए. राजा आणि कनीमोळी सारखे घोटाळेबाज आम्ही सहन करतो. स्वतःच्या मनमानीने कारभार करणारे आणि नवनवीन कायदे अमलात आणणारे गृहराज्यमंत्री आम्हाला चालतात. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने लाख लाख रुपयांच्या हंड्या बांधणारे नेते आम्हाला जास्त प्रिय. मग त्या चढाओढीत छोट्या मंडळातील कुणाचा अगदी जीव गेला तरी आम्हाला फिकीर नसते.' पण सचिनने मात्र शॉवरखाली आंघोळ न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करा.' असा जरुरीचा सल्ला दिला तरी आम्ही तो मनावर घेत नाही.

8 comments:

  1. आवडलं. मलाही ते कारेकरसाहेबांचा लेख वाचून हसावं की रडावं हेच कळेनास झालं होतं.
    पत्रकारिता ही पण किती एकांगी लिहू शकते याचा उत्तम नमुना. दुसर्‍यानी चुका केल्या म्हणून सचिनच्या चुका पोटात घाला, हा युक्तिवाद तर अतिशय हास्यास्पद.

    उत्तम मांडलाय.
    शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. सचिनला 'भारतरत्‍न' मिळावा ही मागणी करण्यात आपण मागे राहू नये याची राजकारण्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकजण पुरेपूर काळजी घेताना दिसत आहेत.

    पण त्याचे करसवलतीचे 'कर्तृत्व'(फेरारी काय किंवा अभिनयाबद्दल मागितलेली सवलत काय) तपासायला तयारच नाही कोणी, कर्तृत्वाकडे 'सोयीस्करपणे' दुर्लक्ष करून 'भारतरत्‍न' द्या ही मागणी पुढे रेटत राहणे हाच प्रत्येकाचा एकमेव अजेंडा.

    'अभिनेता' सचिनला आता 'भारतरत्न' द्याच; जाहिरातींच्या उत्पन्नावर कर 'सवलत' मिळविल्याबद्दल 'ई-सकाळ' वाचकांकडून अशी उपहासात्मक टीका झाली आहे.

    उठसूट कुणाच्याही संपत्तीचा खुलासा करण्याची मागणी करणारे काँग्रेसचे 'साक्षात्कारी' सरचिटणीस दिग्विजयसिंह हे सचिनची कोणकोणत्या शहरात किती अलिशान घरे आहेत, किती महागडया गाड्या आहेत, संपत्ती किती आहे याचा खुलासा सचिनने करावा अशी मागणी करताना का दिसत नाहीत? अथवा सचिन स्वतः होऊन आपली संपत्ती का जाहीर करत नाही?

    ReplyDelete
  3. मिलिंद साहेब कुठल्यातरी पक्षाचे कार्यकर्ते आहेत. जे एकतर्फी बाष्कळ बडबड करत आहेत. एखाद्याची गाडी जशी सुटल्यावर १० जणांना उडवल्याशिवाय राहत नाही तसेच काहीतरी यांच्या लिखाणात दिसून येते आहे.
    १) सचिनच्या बाबतीत मराठी-अमराठीचा संदर्भ कशासाठी पाहिजे. तो त्यापलीकडे जाऊन पोहोचला आहे.
    २) ए आर रहमानचा काय संदर्भ आहे मला अजूनही कळले नाही, त्याने त्याचे नाव, धर्म बदलणे, हा वैयक्तिक प्रश्न न समजता तुम्ही सामाजिक पातळीवर आणलात. कारण मुस्लीम धर्म (लेखाला संवेदनशीलता आणली आहे उगीच...एकता कपूर सारखी) जोडला गेला यात म्हणूनच.
    ३) जो करोडो रुपये कमावतो त्याला काही लक्ष रुपये कर देण्यात कशाला विचार करायला हवा. (म्हणे मेहनतीचा पैसा आहे)... मिलिंद साहेब मेहनतीचा पैसा फक्त क्रिकेट खेळून मिळवलेला यालाच म्हणावा, जाहीरातबाजीमधील पैसा हा मेहनतीचा असतो का ?
    अजून बरेच काही आहे... पण देव सगळीकडे आहे हि समज सचिन बद्दल समज असणार्यांबरोबर वाद घालणे म्हणजे अर्जुन रामपालला उत्कृष्ट अभिनेत्याचे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देण्यासारखे आहे

    ReplyDelete
  4. अभिजित, मला हसू आवरत नाहीये... सही सही!!! :D

    ReplyDelete
  5. पण समोरच्याने कसे वागावे हे आपण ठरवणारे कोण? हा अधिकार आपल्याला कोणी दिला? तसेच एखाद्याने असेच वागावे तसेच वागावे हा अट्टाहास का? एखाद्याने कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न?
    एकमेकांच्या विचारसरणीवर असे शिंतोडे उडवून, आरोप-प्रतिआरोप करून काय सध्या होणार आहे (आता या ठिकाणी सचिन/समोरची व्यक्ती बाजूला राहून सचिन/समोर च्या व्यक्तीने कसे वागावे याचे पाठ वाचले जातील आणि जो तो सचिन/समोर ची व्यक्ती सोडून माझा मुद्दा बरोबर कि तुझा हेच सिद्ध करण्यात पत्र्यव्यवहार किंवा आपले मत जाहीरपणे प्रदर्शित करण्यात वेळ घालवेल)? इतके करीत बसण्यापेक्षा जर एखाद्याला खरेच सचिन/समोर च्या व्यक्तीचे चुकले असेल वाटत असेल तर Google वरून त्याचा पत्ता शोधून त्याला थेट पत्र पाठवावे किंवा समोरासमोर बोलावे ना? इथे मूळ व्यक्ती आणि मूळ मुद्दा राहिला बाजूला पण बाकीचे लोक विनाकारण गरज नसताना (किमानपक्षी माझ्यासाठी तरी) त्यावर बडबड करीत राहतात ... या ठिकाणी थेट त्या व्यक्तीशी न बोलता इतर लोक आपापसात बडबड करून काय साध्य होणार आहे? (कदाचित हे सिद्ध होईल की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा चांगला वादविवाद करू शकते).

    _*Why lose a lifetime to know how to live, why not use life time to live.*_

    ReplyDelete
  6. अमर गायकवाड,
    मुद्दा पटला. पण जेव्हा "भारतरत्न" ची मागणी केली जाते, तेव्हा या गोष्टी नाकारून चालत नाही.
    शेवटी भारताच्या "रत्नाने" असले "पराक्रम" केलेले नसावेत ही साधीशी "भारतीय" सामान्य जनतेची मागणी रास्तच आहे.

    ReplyDelete
  7. Amar Gaikwad (अमर गायकवाड) said...
    पण समोरच्याने कसे वागावे हे आपण ठरवणारे कोण? हा अधिकार आपल्याला कोणी दिला? तसेच एखाद्याने असेच वागावे तसेच वागावे हा अट्टाहास का? एखाद्याने कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न?
    एकमेकांच्या विचारसरणीवर असे शिंतोडे उडवून, आरोप-प्रतिआरोप करून काय सध्या होणार आहे (आता या ठिकाणी सचिन/समोरची व्यक्ती बाजूला राहून सचिन/समोर च्या व्यक्तीने कसे वागावे याचे पाठ वाचले जातील आणि जो तो सचिन/समोर ची व्यक्ती सोडून माझा मुद्दा बरोबर कि तुझा हेच सिद्ध करण्यात पत्र्यव्यवहार किंवा आपले मत जाहीरपणे प्रदर्शित करण्यात वेळ घालवेल)? इतके करीत बसण्यापेक्षा जर एखाद्याला खरेच सचिन/समोर च्या व्यक्तीचे चुकले असेल वाटत असेल तर Google वरून त्याचा पत्ता शोधून त्याला थेट पत्र पाठवावे किंवा समोरासमोर बोलावे ना? इथे मूळ व्यक्ती आणि मूळ मुद्दा राहिला बाजूला पण बाकीचे लोक विनाकारण गरज नसताना (किमानपक्षी माझ्यासाठी तरी) त्यावर बडबड करीत राहतात ... या ठिकाणी थेट त्या व्यक्तीशी न बोलता इतर लोक आपापसात बडबड करून काय साध्य होणार आहे? (कदाचित हे सिद्ध होईल की एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा चांगला वादविवाद करू शकते).
    _*Why lose a lifetime to know how to live, why not use life time to live.*_


    अमर चुकतोयेस तू. माझा लेख पुन्हा एकदा वाच. 'माणूस सार्वजनिक झाला की त्याला वैयक्तिक काही नसते, त्याचे सगळे काही सार्वजनिक होते.' असे मी त्यात एके ठिकाणी म्हटले आहे आणि ते १००% खरे आहे. ' पण समोरच्याने कसे वागावे हे आपण ठरवणारे कोण? हा अधिकार आपल्याला कोणी दिला? तसेच एखाद्याने असेच वागावे तसेच वागावे हा अट्टाहास का? एखाद्याने कसे वागावे हा ज्याचा त्याचा प्रश्न?' या तुझ्या प्रश्नांची उत्तरे मी देतो. समोरच्याने कसे वागावे हा अधिकार मला मला दिला आहे ह्या देशाने, त्याच्या राज्यघटनेने. हा अधिकार आहे भाषणस्वातंत्र्याचा अधिकार. कोणी कसे वागावे हे मी खुशाल कुणालाही न घाबरता सांगू शकतो (आणि तो माणूस सचिनसारखा सार्वजनिक व्यक्ती असेल तर नक्कीच.) हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि कुणीही तो माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.

    'एकमेकांच्या विचारसरणीवर असे शिंतोडे उडवून, आरोप-प्रतिआरोप करून काय सध्या होणार आहे' असे तू म्हणतोस. पण मी म्हणतो, ह्यातून खूप काही साध्य होणार आहे. सचिन हा लेख कदाचित वाचणार नाही, पण जे घडले ते कसे चुकीचे आहे हे सत्य जगासमोर मांडण्याची माझी इच्छा तर पूर्ण होणार आहे! आणि माझा लेख पुन्हा एकदा वाच, मी कुणावरही शिंतोडे उडवीत नाही किंवा कुणावरही आरोप करत नाही. मी फक्त माझी नापसंती दर्शवतो आहे.

    'इतके करीत बसण्यापेक्षा जर एखाद्याला खरेच सचिन/समोर च्या व्यक्तीचे चुकले असेल वाटत असेल तर Google वरून त्याचा पत्ता शोधून त्याला थेट पत्र पाठवावे किंवा समोरासमोर बोलावे ना?' पुन्हा तेच. मी असे का करावे? सचिनला किंवा कुणालाही त्याचे काय चुकते आहे हे सांगण्याचा अधिकार मला आहे आणि तो मी बजावणारच. मी हे पत्र सचिनला पाठवले तर तो फक्त सचिन नि माझ्यातला संवाद असेल, मला तो नको आहे. माझे मत सार्वजनिक करून, त्यावर लोकांची मते आजमावून विचारमंथन करायचे हा माझा हा लेख लिहिण्यामागे उद्देश आहे. अरे अशा विचारमंथनातूनच पुढे मग नवनविन मते मांडली जातात, मुद्दे खोडून काढले जातात, सत्य बाहेर पडते आणि काहीतरी नविन घडते. जालनिशी (Blog) ह्या व्यासपीठाचा उद्देश हाच तर आहे ना?

    तुझ्या प्रत्युत्तराच्या प्रतीक्षेत,
    अभिजीत.

    ReplyDelete