Friday, March 25, 2011

गाणी, गाणी, गाणी!

मला वाटतं प्रत्येक माणसाचा असतो तसा प्रत्येक गाण्याचाही एक स्वभाव असतो. काही लोक सतत दुर्मुखलेले, तर काहींमधे उत्साह ठासून भरलेला. काही हसरे तर काही उदास. काही खूप वर्षे एकत्र घालवूनही लांब लांब भासणारे तर काही क्षणात काळजाला चटका लावून जाणारे. गाणीही अशीच असतात. काही मन प्रसन्न करणारी तर काही उदास. काही नाचरी तर काही गंभीर. काही वात्रट तर काही या दुनियेतली अंतिम सत्यं सांगणारी.

आता 'गुनगुना रहें हैं भँवरें, खिल रही है कलीं कलीं' हे आराधना चित्रपटातलं गाणं घ्या. हे गाणं कानावर पडलं की मन कसं आनंदानं भरून जातं. भर उन्हाळ्यात अचानक एक कारंजं सुरू व्हावं आणि थंड पाण्याचे आल्हाददायक तुषार अंगावर यावेत असं काहीसं वाटतं हे गाणं ऐकलं की. आराधनामधलंच 'मेरे सपनों की रानी कब आयेगी तू' हे गाणंही तसंच. शंभर वर्षांच्या चिरनिद्रेतून जागा झालो तरी हे गाणं मी सुरुवातीच्या तुकड्यावरूनही सहज ओळखीन. शर्मिलीमधलं 'ओ मेरी शर्मिली', जॉनी मेरा नाम मधलं 'पल भर के लिये कोई हमें' ही गाणी याच पठडीतली. दिवसभर कामं करून थकून आलात की ही गाणी ऐकावीत, थकवा पळालाच म्हणून समजा. संगीत ऐकवलं की पीकं जोमानं वाढतात आणि गाई जास्त दूध देतात ही वाक्यं ही गाणी ऐकली की मुळीच खोटी वाटत नाहीत.

दुसरीकडे 'जिंदगी का सफर है ये कैसा सफर' हे सफर चित्रपटातलं गाणं. कुठलीतरी खोल जखम अचानक उघडी पडावी अन्य त्यातून भळाभळा रक्त वहायला लागावं असं हे गाणं ऐकलं की दरवेळी का वाटावं? 'जिंदगी को बहोत प्यार हमनें किया, मौतसेभी मोहोब्बत निभाएंगे हम' - एक कसलीशी, व्यक्त न करता येणारी वेदना. ह्दयात दुखतं तर आहे पण नेमकं कुठे ते समजू नये असं काहीसं. तीच गत 'जिंदगी के सफरमें गुजर जाते है जो मकाँ' ह्या आप की कसममधल्या गाण्याची. (बाकी ह्या गाण्यात वरचढ काय आहे, म्हणजे शब्द, संगीत की गायकाचं कसब हा एका वेगळ्या लेखाचा मुद्दा होऊ शकतो.) हे गाणं ऐकलं की असं का वाटावं की हा नायक नव्हे तर मीच कुठेतरी चाललो आहे एकटा. माझ्यावर प्रेम करणा-या सगळ्यांना मागे टाकून. दूर कुठेतरी, लांब, जिथे फक्त दु:ख आणि दु:खच भरलेलं आहे अशा दिशेने. 'तेरी गलियोमें ना रखेंगे कदम आज के बाद' हे गाणं असंच. ह्या गाण्यातला दर्द ऐकून असं का वाटावं की नायक नायिका नव्हे तर जगणंच सोडून चालला आहे? मराठीतलं 'वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले' हे गाणं याच गटातलं. हे गाणं लागलं की वाटतं एखाद्या उदास संध्याकाळी दूरवर कुणीतरी एखादं वाद्य वाजवत असावं आणि वा-यावर तरंगणारे त्याचे सूर आपल्याला अस्वस्थ करत जावेत.

आता काही वात्रट गाणी. उदाहरणार्थ गोविंदा नि चंकीचं आंखेमधलं 'ओ लाल दुपट्टेवाली तेरा नाम तो बता' - माझं जाम आवडतं गाणं. हे कधीही लागलं तरी मी पूर्ण ऐकतो आणि ते दर वेळी माझ्या मनात स्मितहास्य फुलवतंच. आँटी नंबर वन चित्रपटाचं शीर्षकगीत, हिरो नंबर वन मधलं 'मै तो रस्तेसे जा रहा था', कसौटीमधलं 'हम बोलेगा तो बोलेगे के बोलता हैं', हाफ टिकट मधलं 'आके सीधी लगी दिलपे जैसे कटरिया' किंवा चल्ती का नाम गाडी मधलं 'बाबू समझो इशारे' ही गाणी अशीच. ती ऐकावी नि गालातल्या गालात हसावं. तेजाबमधलं 'एक दो तीन, चार पाँच छे...' हे असंच एक मारू गाणं. हे लागलं आणि आजूबाजूला कुणी नसलं, की मी थोडीशी का होईना, कंबर हालवून घेतोच.

काही गाणी एकदम बिनधास्त - 'मै जिंदगी का साथ निभाता चला गया, मैं फिक्र को धुएंमे उडाता चला गया' असं म्हणणारी. काही 'मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा' असं म्हणत आपल्याच मस्तीत जगणारी. काही 'ए मेरे वतनके लोगों, जराँ आँखमें भरलों पानी' असं म्हणत रडवणारी तर काही 'दुनियामे रहनाहोतो काम करो प्यारे, हाथ जोड सबको सलाम करो प्यारे' असं म्हणत जगण्याचं कटू तत्वज्ञान सांगणारी.

तर अशी ही गाणी. वेगवेगळ्या स्वभावांची. वेगवेगळ्या रंगांची. ही नसती तर जगणं अशक्य झालं असतं हे मात्र नक्की.

Thursday, March 17, 2011

माझ्या लाडक्या सख्या हरी...

लारा दत्ताने महेश भूपतिशी लग्न केल्यामुळे तू प्रचंड निराश झालास आणि स्वतःला गेले एक महिना खोलीत बंद करून घेतलेस हे मला आज कुणीसे सांगितले नि मला मोठाच धक्का बसला. लाराने एका घटस्फोटित माणसाशी लग्न करावे या गोष्टीचा तुला सात्विक संताप आला आणि तू हे पाऊल उचललेस असे समजते. सख्या हरी, अरे लाराने महेशशी लग्न केले यात एवढं निराश होण्यासारखं काय आहे? समजा तिने ब्रायन लाराशी लग्न केले असते तर तिचे नाव लारा लारा झाले असते; त्यापेक्षा हे लखपटीने बरे नाही का?

सख्या हरी, तुला माहित नसेल, पण हिरॉईनींनी विवाहित माणसाशी लग्न करण्याची आपल्या चित्रपटसृष्टीतली चाल बरीच जुनी आहे. वैजयंतिमाला, जयाप्रदा, हेमा मालिनी, हेलन, श्रीदेवी, शबाना आझमी, रविना टंडन, करिष्मा कपूर, शिल्पा शेट्टी, किती नावे सांगू तुला? अरे अफवा तर अशी आहे, 'मेरा पति सिर्फ मेरा है' या चित्रपटावर चित्रपटसृष्टीतल्या झाडून सगळ्या अभिनेत्रींनी बहिष्कार टाकला आणि त्यामुळेच तो चित्रपट आपटला.

अरे मागचे कशाला, आत्ताचीच बातमी ऐक. तुझी आवडती राणी मुखर्जी लवकरच आदित्य चोप्राशी लग्न करते आहे. त्यामुळेच ह्या राणीला एक दिवशी आपली राणी बनवीन अशी दिवास्वप्ने जर तू पहात असशील तर तो विचार सोडून दे; नाहीतर राणीच्या नव्या चित्रपटाप्रमाणे तुझेही पानिपत व्हायला वेळ लागणार नाही. तीच गोष्ट करिनाची. करेना करेना म्हणता म्हणता ती एक दिवस सैफशी लग्न करेल आणि तू असाच हात चोळत बसशील.

सख्या हरी, माझे ऐक. तू मला मागणी घाल. ती लारा जरी गेली असली तरी ही तारा तुझ्याशी लग्न करायला एका पायावर तयार आहे. तुझ्या रागाचा पारा चढल्यावर मी तुला माझ्या प्रेमरूपी पंख्याने वारा घालेन आणि तुझ्यावर माझ्या प्रेमाचा मारा करताकरता तुझ्याकडून लग्नाचा प्रेमसारा वसूल करेन. मग, मला मागणी घालायला कधी येतोस?

हो, पण आपलं लग्न झाल्यावर 'आता आपण विवाहीत, आता तर हिरॉईनी आपल्याला सहज पटतील' असं म्हणत जास्त चेकाळून तू त्यांच्यामागे पळणार नाहीस ना?

टीप :
सदर लेख सुप्रसिद्ध मराठी लेखक दत्तू बांदेकर यांच्या 'सख्या हरी' या व्यक्तिविशेषावर आधारलेला आहे. कोण होता हा सख्या हरी? अत्र्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर, "आपल्या अलौकिक प्रतिभेतून त्यांनी [दत्तू बांदेकरांनी] 'सख्या हरी' नावाचा एक अजब नमुना निर्माण केला. चाळीत राहणारा, मळकट कपडे अंगात राहणारा, नळावर बायकांशी चावटपणा करणारा, चौपाटीवर भेळ खाऊन शीळ फुंकणारा आणि मुंबईच्या सा-या गमतींचा वात्रटपणाने नि मिस्किलपण आस्वाद घेणारा दत्तू बांदेकरांचा 'सख्या हरी' म्हणजे, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण विनोदाचा एक अविस्मरणीय नमुना होय. त्यांच्या ह्या 'सख्या हरी'ने एक वेळ बहुजनसमाजाला वेड लावले होते." दत्तू बांदेकरांविषयी अधिक माहिती आणि सख्या हरीचा आणखी एक नमुना मी पुर्वी लिहिलेल्या एका लेखात वाचता येईल. दत्तू बांदेकरांवरचा हा लेखही त्यांची चांगली माहिती करून देणारा आहे.

Tuesday, March 8, 2011

महाराष्ट्रातल्या राजकीय कोलांट्याउड्या

नेहमी एकमेकांना लोळवणा-या नि एकमेकांना धोबीपछाड देणा-या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचा आवडता खेळ कुस्ती असला पाहिजे असा माझा कालपर्यंत समज होता; पण राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, मनसे यांनी पुण्यात आणि शिवसेनेने ठाण्यात नुकत्याच मारलेल्या कोलांट्याउड्या पाहून मात्र माझा हा समज चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे!

पुणे महापालिकेतील स्थायी समितीची निवडणूक नुकतीच झाली. एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सगळीकडे हिंडणा-या काँग्रेस नि राष्ट्रवादी काँग्रेस या जोडीत का कोण जाणे, यावेळी मात्र काहीतरी बिनसले आणि भाजपाने राष्ट्रवादीला डोळा मारून मनसेशी चुम्माचाटी करत अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली. जे झाले ते तर मजेदार होतेच, पण नंतर यावर राजकीय पक्षांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्या अधिक मनोरंजक होत्या. काँग्रेसने राष्ट्रवादीवर टीका केली आणि शिवसेनेने भाजपावर. 'लोकनेते' गोपीनाथ मुंडे यांनी 'ही युती फक्त पुण्यापुरती आहे' असे म्हणून तिचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला, त्यांचे ते विधान एखाद्या लफडेबाज नव-याने 'ति'चे नि माझे लफडे फक्त तिच्या घरापुरतेच मर्यादित आहे असे म्हणून स्वतःचे समर्थन करण्याइतकेच हास्यास्पद होते. राष्ट्रवादीचे काय सांगावे? सत्तेसाठी कुणाबरोबरही जाण्यात आम्हाला ना नाही हे त्यांनी पुन्हापुन्हा सिद्ध केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुलायमसिंह यादव आणि अमरसिंह यांच्याबरोबर शरद पवार यांचे झळकलेले फोटो हे याचे एक उत्तम उदाहरण. सत्तेसाठी हा पक्ष उद्या ओसामा बिन लादेन किंवा दाऊद इब्राहीमच्या पक्षाशीही युती करण्यास मागेपुढे पाहणार नाही हे नक्की.

मनसेचे वागणे त्यांच्या खंद्या पाठीराख्यांना अस्वस्थ करून गेले हे मात्र खरे. शेवटी काय, बोलायच्या गोष्टी वेगळ्या नि करायच्या वेगळ्या हे कसलेल्या राज्यकर्त्यांचे धोरण राज ठाकरेंनीही अवलंबलेच. आजकाल त्यांचा प्रवास पाहता ते हळूहळू एक मुरब्बी राजकारणी बनत चालले आहेत म्हणावे लागते आहे, पण ते खेदाने. सगळ्यात मोठे हसे झाले ते काँग्रेसचे आणि यात काहीच नवे नाही. आपण एक प्रचंड मोठा इतिहास असलेला एक अतिशय नितिमान पक्ष आहोत असा दिखावा करत हा पक्ष वागतो खरे, पण शेवटी त्याला नेहमीच तोंडावर पडायची वेळ येते; ही वेळही त्याला अपवाद नव्हती.

दुसरी घटना ठाण्याची. तिथे नुकतीच शिवसेनेने मुस्लिम महासंघ स्थापन केल्याची घोषणा केली. त्यांची ही घोषणा अबू आझमींकडून मराठी महासंघाची किंवा कलमाडींकडून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघाची घोषणा होण्याइतकीच धक्कादायक होती. पण बारकाईने पाहिले तर शिवसेनेचा इतिहासच अशा घटनांनी भरलेला दिसतो. शिवसेनेने सुरुवात केली मराठीच्या मुद्दयावर. 'लुंगी हटाव, पुंगी बजाव' असे म्हणत त्यांनी दक्षिण भारतीयांविरुद्द शस्त्रे परजली. नंतर त्यांचा रोख वळला तो उत्तर भारतीयांकडे. त्यापश्चात्, का कोण जाणे त्यांनी मराठीचा सोडून हिंदुत्वाचा मुद्दा पकडला आणि दक्षिणच काय उत्तर भारतीयांनाही आपल्या पक्षात सामील करून घेतले. (आठवा ते संजय निरुपम यांच्या कार्यालयाचे स्वतः बाळासाहेबांनी केलेले उद्घाटन.) पाकिस्तान नि भारतीय मुस्लिमांवर टीका करणे हा त्यावेळी त्यांचा एककलमी कार्यक्रम होता. आता हिंदुत्वाचाही मुद्दा त्यांनी सोडला असावा, त्याशिवाय त्यांनी मुस्लिम महासंघाची स्थापना केली नसती. काही दिवसांनी त्यांनी परवेझ मुशर्रफांना भारतरत्न मिळावा अशी मागणी केली तरी आश्चर्य वाटायला नको.

म्हणजे मुस्लिमांसाठी महासंघ बनवण्यात काही गैर आहे असे नव्हे; भारतीय मुस्लिम आजही सामाजिक/आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत आणि एका पक्षाने (राजकीय स्वार्थ मनात ठेवूनही) त्यांच्यासाठी काही चांगले काम केले तर त्याचे स्वागतच व्हायला हवे. माझा आक्षेप आहे शिवसेनेच्या वागण्यावर. परदेशी संस्कृतीला नावे ठेवत असताना मायकल जॅक्सनचा कार्यक्रम आयोजित करणे आणि फक्त वॅलेंटाईन डेची शुभेच्छापत्रे विक्रीस ठेवली म्हणून मराठी दुकानदारांची दुकाने फोडणे ही कामे केली शिवसेनेनेच. काहीही कारण नसताना एखाद्या समूहाला वर्षानुवर्षे शिव्या द्यायच्या नि एके दिवशी अचानक आपली भूमिका गुंडाळून त्यांच्याविषयी काळजीचा आव आणायचा यामुळे आपण हास्यास्पद दिसतो नि विनोदाचा विषय होतो हे शिवसेनेला कधी कळणार? शिवाय आपण असेच वागत राहिलो तर आपल्याला शिवीगाळ करण्यासाठी 'शत्रू'च उरणार नाहीत हे शिवसेनेने समजून घ्यायला हवे. म्हणजे आता शिव्या देणार कोणाला, फक्त मनसेला? त्या ऐकून आम्हाला आधीच कंटाळा आलाय हो!

असो, पण राजकीय पक्ष या कोलांट्याउड्या मारत असताना महाराष्ट्रातली जनता काय करते आहे? ती धुंद झाली आहे क्रिकेट पहाण्यात. देवा, या महाराष्ट्राचे कसे होणार? मला त्याची मोठीच काळजी लागून राहिली आहे रे!

Sunday, February 27, 2011

जागतिक मराठी दिन की अगतिक मराठी दिन?

आज जागतिक मराठी दिन. कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर अर्थात तात्या शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यातच कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीस या वर्षीपासून सुरूवात होत असल्याने या वर्षीचा जागतिक मराठी दिन विशेष महत्वाचा आहे. पण जागतिक मराठी दिन साजरा होत असताना आज मराठीची नेमकी स्थिती कशी दिसते?

सोनेरी मुकुट परिधान केलेली मराठी अंगावर लक्तरे घालून मंत्रालयाच्या दारात उभी आहे असे वक्तव्य कुसुमाग्रजांनी एकेकाळी केले होते, पण त्यांचे ते म्हणणे शासनाला उद्देशून होते. त्यावेळी मराठीला लोकाश्रय तरी होता; आज मात्र दुर्दैवाने तसे म्हणता येणार नाही. आजच्या मराठी भाषेच्या अंगावर लक्तरे काय, लज्जारक्षणासाठीही पुरेसे कपडे नाहीत असेच खेदाने म्हणावे लागेल आणि तिच्या या अवस्थेसाठी मराठी माणूस नि फक्त मराठी माणूसच जबाबदार आहे हे कटू सत्य मान्य करून घ्यावेच लागेल. मराठी शाळा ओस पडत आहेत, मराठी पुस्तकांचे वाचन घटत आहे. दारांवरच्या नावाच्या पट्ट्यांवरून, दुकानांच्या नामफलकांवरून मराठी हद्दपार होते आहे. इंग्रजी शब्द जास्त नि मराठी शब्द कमी अशी धेडगुजरी "मराठी" वाक्ये आजचा मराठी माणूस बोलत आहे. किंबहुना त्याला मराठीची लाज वाटते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. जन्माला आलेला प्रत्येक जीव एकेदिवशी मृत्यु पावतो, भाषेचेही असेच असते. जगात पहिल्या क्रमांकावर असलेली मॅंडेरीन, स्वत:ला जागतिक भाषा म्हणवणारी इंग्रजी या भाषाही एके दिवशी अस्तंगत होणार, मग मराठी त्याला अपवाद कशी असेल? पण मराठीचे हाल असेच चालू राहिले तर तिचे मरण नैसर्गिक म्हणता येणार नाही, तो एक खून असेल, मराठीचा मराठी भाषिकांनी केलेला खून!

सर्वप्रथम, मराठी नष्ट झाली तर होणारे नुकसान हे आपले असेल हे मराठी भाषिकांनी ध्यानात घ्यायला हवे. मराठी नष्ट झाली तर जगातले भाषातज्ञ काही वेळ हळहळतील पण सगळ्यात मोठा तोटा होईल तो आपला, हे मराठी भाषिकांना का कळत नाही? आपण ओळखले जातो ते आपल्या भाषेमुळे. मराठी, गुजराथी, पंजाबी, मल्याळी हे मानवसमुह या नावांनी का ओळखले जातात? त्यांच्या भाषेमुळे. जर मराठी नष्ट झाली तर आपली ओळखच आपण गमावून बसू हे मराठी भाषकांना का समजत नाही?

इंग्रजी अर्थार्जनासाठी आवश्यक आहे हे मान्य, पण ती मातृभाषा कशी होईल? लहान मुलाला झोपताना "निंबोणीच्या झाडामागे" हीच कविता हवी, संकटांचे काळे ढग दाटून आलेले असताना धीर येण्यासाठी कुसुमाग्रजांची "कणा" कविताच हवी आणि श्रावण महिन्यात उनपावसाचा खेळ पाहून झालेला आनंद वाटून घेण्यासाठी बालकवींची "श्रावणमासी, हर्ष मानसी" हीच कविता हवी. आयुष्याच्या सुखदु:खाच्या खेळात फक्त आपली मातृभाषाच साथ देऊ शकते हे मराठी माणसाच्या ध्यानात का येत नाही?

पण आणि हा पणच खूप महत्वाचा आहे. स्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. आपण आजही मराठी वाचवू शकतो आणि वाढवूही शकतो. यासाठी मी स्वत: वापरत असलेले काही उपाय मी इथे सांगतो आहे. मराठी संवर्धनासाठीचे काही उपाय जर आपल्याकडेही असतील तर त्यांचे इथे स्वागतच आहे.

१) मराठीचा वापर करा. पण कुठे? शक्य असेल तिथे तिथे! दुकानात, रस्त्यावर, दूरध्वनीवर बोलताना, पत्रे लिहिताना, याद्या करताना, आपले नाव लिहिताना जिथे जिथे मराठी वापरता येईल तिथे ती वापरा. आपली मातृभाषा मराठी आहे नि इंग्रजी ही आपण फक्त अर्थार्जनासाठी स्विकारलेली परकीय भाषा आहे हे नेहमी लक्षात ठेवा. इंग्रजी नि मराठी हे पर्याय उपलब्ध असतील तर नक्की मराठीचाच पर्याय निवडा. (एटीएम सोयीचा वापर करताना मी नेहमी मराठीचाच पर्याय निवडतो.) कायद्याचे कागद मराठीतच करा.(नुकताच आम्ही केलेला जमिनखरेदीचा व्यवहार आम्ही मराठीतच नोंदवला.) बॅंका, विविधवस्तूभांडारे, उंची हॉटेले इत्यादी ठिकाणी आवर्जून मराठी बोला. जर मराठी भाषेचा पर्याय ह्या संस्था तुम्हाला उपलब्ध करून देत नसतील तर त्यांच्याशी भांडा, पण मराठीचाच आग्रह धरा.

२) इतरांकडूनही मराठीचा आग्रह धरा. जर तुमचे मित्र इंग्रजी वापरत असतील तर त्यांना तसे न करण्याबाबत सांगा. जर वाहिन्यांवर, रेडिओवर, वर्तमानपत्रांमधील मराठीबाबत आपण समाधानी नसाल तर त्यांना तसे नक्की कळवा. आपण महाराष्ट्रात राहतो आणि या राज्याची अधिकृत भाषा असलेल्या मराठी भाषेचा आग्रह धरण्यात काहीही चुकीचे नाही हे नेहमी ध्यानात ठेवा.

३) मराठीच्या शुद्धतेचा आग्रह धरा. फक्त सर्वनामे नि क्रियापदे मराठीत वापरणे म्हणजे मराठी बोलणे नव्हे. अंक, वारांची नावे मराठीच वापरा. (मी नेहमी माझा भ्रमणध्वनी क्रमांक मराठीतच सांगतो.) रुळलेल्या मराठी शब्दांच्या जागी जर कुणी इंग्रजी शब्द वापरत असेल तर ती चूक त्यांच्या लक्षात आणून द्या. मराठी लिहिताना तुम्ही ती शुद्ध लिहाल याची काळजी घ्या आणि इतरांकडूनही मराठीच्या शुद्धतेबाबत आग्रही धरा. मराठी अशुद्ध लिहिणा-या नि वर त्याचे समर्थन करणा-यांना मी एकच प्रश्न विचारून निरूत्तर करतो. जर तुम्ही तुमचे नाव लिहिताना ते अचूक लिहिण्याची काळजी घेत असाल तर इतर मराठी शब्द लिहिताना निष्काळजीपणा का दाखवता? इंग्रजी शब्द लिहिताना त्यांमधे चुका न होण्याबाबत तुम्ही खबरदारी घेता, मग मराठीबाबतच ही बेपर्वाई का?

४) अमराठी सहका-यांना मराठी शिकवा, त्यांना मराठीची ओळख करून द्या. अमराठी लोक मराठी शिकण्यासाठी नेहमीच तयार असतात असा माझा तरी अनुभव आहे. त्यांच्याशी शक्य असेल तिथे मराठी बोला. त्यांना मराठी शिकवा, साधीसोपी वाक्ये त्यांना ऐकवा, त्यांचा अर्थ त्यांना समजावून द्या.

चला तर मग! भाषिकांच्या संख्येनुसार जगातल्या पहिल्या पंचवीस भाषांमधे मोडणारी, भारतात भाषिकांच्या संख्येनुसार प्रादेशिक भाषांमधे पहिल्या क्रमाकांवर असणारी, एकाचवेळी राकट, कणखर आणि नाजूक, कोमल, फुलांसारखी मृदु असणारी अमृताहूनी गोड अशी ही आपली मातृभाषा - मराठी टिकवूया आणि वाढवूया!

Saturday, February 19, 2011

कवडी गावाला भेट

मागच्या महिन्यात तेवीस तारखेला कवडीला जाऊन आलो, पण वेळ न मिळाल्याने त्यावर लिहिणे किंवा फोटो टाकणे जमले नव्हते. आता किंचीत सवड मिळाल्यावर हे काम करतो आहे.

कवडी अर्थात् कवडीपाट हे पुणे सोलापूर रस्त्यावर पुण्यापासून साधारण १५ किमी दूर असे एक लहानसे गाव आहे. सोलापूर रस्त्यावर पहिला टोलनाका पार केला की अगदी लगेच डावीकडे एक रस्ता जातो तो पकडावा, साधारण ३/४ किमी पुढे जावे (इथे एक रेल्वे फाटकही लागते) की कवडी गाव आलेच. गावातून वाहणारी नदी नि त्यावरचा बंधारा ही अनेक प्रकारच्या पक्षांची आवडती जागा दिसते. स्थानिक आणि स्थलांतरित अशा सुमारे १५ जातींचे पक्षी आम्हाला इथे पहाता आले.

अनेक पक्षांचा वावर असला तरी कवडीची स्थिती अतिशय वेदनादायक आहे हे नक्की. पाण्यातून वाहत येणारी प्रचंड घाण (पुणेकरांनो, आपण कधी सुधारणार?), पाण्यावर तरंगणारी जलपर्णी, त्यावर पसरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या हे दृश्य मन अक्षरश: सुन्न करते. त्यातच अस्वच्छता फैलावण्याच्या कामात आम्ही मुळीच मागे नाही असे म्हणत कवडीवासीही थर्माकोलची ताटे, कचरा टाकून या कामात आपला हातभार लावताना दिसतात. पण असे असूनही या अस्वच्छतेतच जलक्रीडा करणा-या पक्षांना पाहिल्यावर एक प्रजाती म्हणून आपली लाज वाटल्याशिवाय रहात नाही!

असो, तर कवडीला दिसलेल्या पक्ष्यांचे हे फोटो. हे सारे कॅनॉन १०००डी आणि कॅनॉन ४०० एम एम ५.६ लेन्स या जोडीने काढले आहेत.

Tuesday, February 15, 2011

डीएसेलार कॅमेरे - काही गैरसमज

डिजीटल कॅमे-यांचे कमी झालेले भाव, त्यांमधे आलेला सुटसुटीतपणा आणि त्यांच्याभोवती असलेले वलय यामुळे आजकाल अनेक जण त्याची खरेदी करताना दिसतात. हे कॅमेरे - जी काही वर्षांपुर्वीपर्यंत फक्त व्यावसायिक छायाचित्रकारांची ओळख होती - आज सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने हौशी छायाचित्रकारांनाही आपले कौशल्य दाखवण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. ह्याच कॅमे-यांची एक ओळख करून देण्यासाठी आणि त्यांबाबतचे काही गैरसमज दूर करण्यासाठी हा लेख!

डीएसेलार कॅमे-यांबाबत लोकांमधे असलेल्या समजुती थक्क करणा-या आहेत. फक्त व्यावसायिक लोकांनी वापरायचा हा एक भयंकर अवघड प्रकार आहे, हा वापरला की कुठलाही फोटो हमखास 'भारी' येतो ते हा उशाखाली घेऊन झोपला की अमावस्येच्या रात्री गुप्तधन पुरलेली जागा दिसते अशा अनेक समजुती लोकांच्या मनात आहेत. दुर्दैवाने (की सुदैवाने) त्या सा-या चुकीच्या आहेत.

पाहूया काही प्रमुख गैरसमजुतींकडे.

१) डीएसेलार कॅमेरा जेवढा महाग, त्यातून येणारी छायाचित्रे तेवढी भारी!

चूक. डीएसेलार कॅमेरा ही काही जादूची कांडी नव्हे की जी फिरवली की तुम्ही अंशुल अडुमसेचे अॅन्सल अॅडम्स [http://en.wikipedia.org/wiki/Ansel_Adams] व्हाल. कॅनन ५ डी मार्क दोन + कॅनन १६-३५ एम एम ही जोडी वापरून तुम्ही खराब फोटो काढू शकता आणि कॅननचाच ए ४९५ हा चिमुकला कॅमेरा वापरून अप्रतिम फोटो! फोटो कसा निघणार हे कॅमे-यापेक्षा त्यामागे कोण आहे यावर जास्त अवलंबून असतं. यावरून मी कुठेतरी वाचलेल्या इंग्रजी ओळी आठवतात, त्यांचा साधारण तजुर्मा असा.

उत्तम निबंध, कुठला टाईपरायटर वापरलात तुम्ही?
उत्तम पदार्थ, कुठला तवा वापरलात तुम्ही?
उत्तम फोटो, कुठला कॅमेरा वापरलात तुम्ही?

२) डीएसेलार कॅमेरे वापरायला अवघड आहेत.

चूक. डीएसेलार कॅमेरे वापरणे दिवसेंदिवस सोपे होत आहे, याचे महत्वाचे कारण म्हणजे एखादी वस्तू खपण्यासाठी ती वस्तू वापरण्यास सोपी असावी या मुद्द्याला आलेले महत्व आणि सर्वसामान्य जनताही डीएसेलार कॅमेरे वापरू लागली आहे ही निर्मात्या कंपन्यांना झालेली जाणीव. आजचे डीएसेलार कॅमेरे पुर्वीच्या डीएसेलार कॅमे-यांपेक्षा खूप सोपे आहेत. किंबहुना ते वापरणे, बाजारात आलेला एखादा नविन भ्रमणध्वनी वापरण्याइतकेच सोपे आहे.

३) डीएसेलार कॅमेरा छायाचित्रण स्वस्त होत आहे.

चूक. डीएसेलार कॅमेरे आज जरी स्वस्त झाले असले तरी त्यांबरोबर वापरायच्या लेन्सेसचे भाव मात्र कमी झालेले नाहीत. विशेषतः चांगल्या दर्जाच्या लेन्सेसचे. डीएसेलार कॅमेरा वापरून होणा-या छायाचित्रणात कॅमेरा ही एक प्राथमिक गुंतवणूक असते, मोठा खर्च होतो तो लेन्सेसवर. आणि लेन्सेसचे व्यसन वाईट, एकवेळ गर्दचे व्यसन सुटेल पण लेन्सेसचे व्यसन सुटणे महाकठीण. माझेच उदाहरण सांगतो, मी आज सहज हिशोब केला तेव्हा असे दिसले की माझ्या एकूण छायाचित्रण संचाची किंमत चक्क दीड लाख आहे आणि यातला कॅमेरा आहे फक्त १४ हजारांचा.

४) डीएसेलार कॅमेरा माझ्यासाठी आहे.

चूक. स्पष्ट सांगायचे झाले तर, आपल्या 'बंटी'चे 'फॅन्सी ड्रेस स्पर्धे'तले फोटो काढण्यासाठी, आपल्या कुटुंबाचे सारसबागेत फोटो काढण्यासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमात (कार्यक्रमाकडे लक्ष न देता) कचाकचा फ्लॅश मारून लोकांना वैताग देण्यासाठी जर तुम्ही तुमच्या कॅमे-याचा वापर करत असाल तर डीएसेलार कॅमेरा तुमच्यासाठी नव्हे. पण जर तुम्हाला छायाचित्रण कलेची आवड असेल, ती शिकण्याची इच्छा असेल, चांगला फोटो कशाला म्हणावे हे जर तुम्हाला कळत असेल तर मात्र छायाचित्रणासाठी डीएसेलार कॅमे-यासारखा दुसरा पर्याय नाही!

तुमची छायाचित्रण कलेची आवड जोपासण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!

Monday, February 14, 2011

रामगणेशगडकरी.कॉम - एक नवे सुंदर मराठी संकेतस्थळ

राम गणेश गडकरी यांचे समग्र साहित्य महाजालावर उपलब्ध करून देणा-या रामगणेशगडकरी.कॉम या संकेतस्थळाविषयी नुकतेच मनोगतावर [http://www.manogat.com/node/21505] वाचले आणि एखाद्या तहानलेल्या माणसाला अचानक शीतल, नितळ पाण्याचा झरा समोर दिसावा तसे वाटले. गडक-यांची नाटके आणि (त्याहून अधिक) त्यांचे विनोदी लेखन मी गेले कित्येक दिवस शोधत होतो; ते असे अचानक पुढे आल्यावर झालेला आनंद कसा सांगावा! मराठी संकेतस्थळांमधील उत्कृष्ट संकेतस्थळांमधे या संकेतस्थळाची गणना करता येईल यात काय शंका?

ऐरोळी, नवी मुंबई येथील संगणक प्रकाशनाने तयार केलेल्या या संकेतस्थळावर गडकरींचे सारे साहित्य आहे. एकच प्याला, पुण्यप्रभाव, भावबंधन यांसारखी गडक-यांची गाजलेली नाटके, त्यांच्या कविता, रिकामपणाची कामगिरी, लग्नाच्या मोहिमेची पूर्वतयारी, स्वयंपाक घरातील गोष्टी असे त्यांचे गाजलेले विनोदी लेख असे सगळे लेखन इथे आहे. महत्वाचे म्हणजे हे लेखन युनिकोडमधे आहे, त्यामुळे ते इतरत्र डकवणे किंवा त्यामधील नेमकी माहिती शोधणे अतिशय सोपे झाले आहे.

इंग्रजी भाषेत Project Gutenberg (www.gutenberg.org) या नावाचा एक उपक्रम गेले कित्येक वर्षे सुरु आहे. इंग्रजी भाषेतील स्वामित्वहक्क संपलेली सगळी पुस्तके या ठिकाणी मोफत उपलब्ध आहेत. या उपक्रमामुळे इंग्रजी भाषेतले हे ज्ञानभांडार आज इंटरनेट जोडणी असलेल्या प्रत्येकासाठी खुले झाले आहे. मराठीत असे संकेतस्थळ नसले तरी हा त्या दिशेने झालेला एक उत्तम प्रयत्न आहे हे नक्की. इलेक्ट्रॉनिक पुस्तकांचा हा पर्याय छापील पुस्तकांपेक्षा स्वस्त आहे आणि पर्यावरणाला अधिक अनूकुलही.

महाजालावर असणा-या प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी या अनमोल खजिन्याला भेट द्यायलाच हवी!

संकेतस्थळाचा पत्ता : http://ramganeshgadkari.com/egadlari/