’कारूण्याचा विनोदी शाहीर’ असे अत्र्यांनी ज्यांना म्हटले त्या दत्तू बांदेकरांना मी जनसामान्यांचा विनोदवीर मानतो. इतके साधे, सोपे, सरळ, तरीही काळजाला चटका लावणारे लेखन करणारा विनोदी लेखक चि. वि. जोशींनंतर मी अजून पाहिलेला नाही. अर्थात चिवींचे लिखाण हे पांढरपेशा मध्यमवर्गीय जगाचे चित्रण करणारे होते, बांदेकरांचे लिखाण मात्र त्याहून वेगळे आहे. हे लिखाण गरीबांचे आहे, वेश्यांचे आहे, भिका-यांचे आहे, नायकिणींचे आहे, झोपडपट्टीत राहणा-या लोकांचे आहे, आणि वेगळ्या शब्दांत सांगायचे तर भारतातल्या शंभरातील नव्वदांचे आहे.
कारवारला राहणा-या नि कानडीतून शिक्षण झालेल्या बांदेकरांनी मराठी भाषेत विनोदाचे एक नवे युग निर्माण करावे हा एक चमत्कारच नव्हे तर काय! बहुजनसमाजाला पोट धरूनधरून हसायला लावणारा त्यांच्यासारखा विनोदी लेखक पुन्हा झाला नाही. विनोद ही उच्च अभिरूची असलेल्या लोकांनी आस्वाद घ्यायची एक खास गोष्ट आहे हा समज बांदेकरांनी खोटा ठरवला. किंबहुना अगदी साध्यासुध्या, रोजच्या प्रसंगातूनही उत्तम विनोदनिर्मिती होऊ शकते हे त्यांनी स्वत: आपल्या लेखनाने सिद्ध केले. उत्तम विनोदाला कारूण्याची झालर असते हे अनेक विनोदवीरांनी पुन्हापुन्हा दाखवून दिले आहे, बांदेकरांचा विनोदही असाच आहे. गरीबांची रोजची दु:खे, त्यांच्या समोरची संकटे, त्यांची जगण्याची लढाई यातून बांदेकरांचा विनोद फुलत असल्याने तो वाचताना एकाचवेळी हसूही येते नि ह्दयही गलबलते. त्यात बांदेकर पत्रकार, त्यांचे बरेचसे लेखन वर्तमानपत्रात झाले, तिथे लेखन करणे ही तर आणखीनच अवघड गोष्ट. कुठल्यातरी आयत्या विषयावर हे लेखन अचानक करावे लागते आणि तरीही ते दर्जेदार असावे लागते. मराठीत शिक्षणही न घेतलेल्या नि विनोदाचीच काय, इतर कुठलीही पुस्तके न वाचलेल्या बांदेकरांना हे कसे जमले असेल? आणि एवढे सगळे करूनही बांदेकर वृत्तीने अगदी अलिप्त होते हे विशेष. स्वस्तुती करणे, इतरांची हांजी हांजी करणे, पुरस्कारांवर डोळा ठेवणे, आदर/मानमरातब यांसाठी प्रयत्न करणे हे सगळे सोडाच, आपल्या लेखनाविषयी बोलणेही त्यांना मंजूर नव्हते. अशा या निगर्वी, साध्या नि एकलकोंड्या विनोदवीराचे वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी ४ ऑक्टोबर १९५९ रोजी निधन झाले. ज्या संयुक्त महाराष्ट्रासाठी बांदेकरांनी आपली लेखणी झिजवली तो संयुक्त महाराष्ट्र शेवटी बांदेकरांना पहायला मिळाला नाही ही नियतीची केवढी क्रूर थट्टा!
बांदेकरांचा सुप्रसिद्ध ’सख्या हरी’ जर आज असता तर काय झाले असते त्याची कल्पना करून मी हा लेख लिहिला आहे. मात्र वाचकांनी हे ध्यानात असू द्यावे की हा लेख माझा आहे, त्यामुळे त्यात आढळणारे दोष नि त्रुटी या माझ्याच आहेत. ह्या लेखावरून मूळ सख्या हरीची पात्रता जोखण्याचा प्रयत्न वाचकांनी करू नये. हा फक्त बांदेकरांच्या एका चाहत्याचा त्यांना साहित्यरूपी आदरांजली देण्याचा एक प्रयत्न आहे हे लक्षात असू द्यावे.
माझ्या लाडक्या सख्या हरी, ’पॉल’ ऑक्टोपसाचे प्रताप पाहून एक ऑक्टोपस पाळावयाचे नि त्याजकडून लोकांचे भविष्य ऐकवण्याचे तुझे इरादे ऐकून माझी हसून हसून मुरकुंडी वळली आहे. त्यातच हा ऑक्टोपस तारापोरवाला मत्स्यालयातून पळवण्याची तुझी मनिषा ऐकून तर हसावे की रडावे हेच मला कळेनासे झाले आहे. सख्याहरी, तुला वेड तर लागले नाही ना? अरे ऑक्टोपस काय मांजर आहे की कुत्रा आहे? आणि त्या ऑक्टोपसाला तू काय खायला घालणार आहेस? कांदे बटाटे? जेम्स बॉन्डचा ’ऑक्टोपसी’ पाहून तू मागे एकदा वेडा झाला होतास, आता खरोखरीचा ऑक्टोपस पाहून तू वेडा झाला आहेस! बाकी चित्रविचित्र प्राणी पाळायची ही तुझी सवय जुनीच. मागे एकदा ’कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा’ हे गाणे ऐकून तू एक ससा पाळला होतास हे तुला आठवते का? पण त्या सशाने पहिल्या दिवशी तुझ्या घरातली विजेची तार, दुस-या दिवशी तुझ्या पहिली पास ते दहावी नापास पर्यंतच्या सगळ्या गुणपत्रिका नि तिस-या दिवशी तुझी आतली चड्डी कुरतडली(नशिब तू ती तेव्हा घातली नव्हतीस!) तेव्हा कुठे तुझे डोके ठिकाणावर आले नि तू त्याला राणीच्या बागेत सोडून आलास. सख्याहारी तू हे धंदे का करतोस, तू आधीच तुझ्या घरात बक्कळ झुरळे नि ढेकणे पाळली आहेत हे काय कमी आहे का?
माझ्या लाडक्या प्रियकरा, माझे ऐक नि हे खूळ तुझ्या डोक्यातून काढून टाक. अरे ज्योतिषाच्या या धंद्याने आजपर्यंत कुणाचेही भले झाले नाही. पोपट जवळ ठेवून फुटपाथवर बसलेले ते कुडमुडे ज्योतिषी तू पाहिले नाहीस काय? अरे जर खरंच त्यांना ज्योतिष कळत असते तर ते जन्मभर असे फुटपाथवरच का राहिले असते? ज्योतिष वगेरे खरे होण्याचे दिवस वेगळे होते, तो काळ सत्ययुगातला होता. तप करून मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचा तो काळ होता, सध्याचा काळ जिवंत माणसाला मृत बनविण्याचा आहे. तेव्हा माझे ऐक नि हा विचार मनातून अजिबात काढून टाक.
माझ्या प्रेमाच्या गुलकंदा, का कोण जाणे, पण मला तर अशी शंका येत आहे की तुझ्या रेसच्या नादामुळेच तू हा धंदा करायचे ठरवले आहेस. ह्या ऑक्टोपसाकडून रेसचे निकाल माहित करून घ्यायचे नि त्यावर बक्कळ पैसे कमवायचे असा एकंदर तुझा उद्योग दिसतो. सख्याहरी हे रेसचे खूळ तुझ्या डोक्यातून कधी जाणार आहे? ’तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता, पण त्याला पाणी प्यायला लावू शकत नाही’ या उक्तीनुसार कितीही समजावले तरी तू पुन्हा घोड्यांवर पैसे लावतोसच! अरे मंत्र्यांच्या घोडेबाजारात सौदे करून तू एकवेळ करोडपती होऊ शकशील पण घोड्य़ांच्या शर्यतींवर पैसा लावून तुला कधी १०० रुपयेही मिळवता येणार नाहीत हे तुला का समजत नाही? त्यापेक्षा तू शेअरबाजारात पैसे लावत जा, तिथे सध्या ’इन्फोसिस’चा घोडा (नव्हे शेअर) जोरात आहे असे मी ऐकते, तू तिथे का प्रयत्न करत नाहीस?
जिवलगा, ऑक्टोपस पाळण्यात अजूनही अनेक धोके आहेत हे तू ध्यानात घे. पिटा संस्थेचे सभासद सध्या अशा गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवून असतात हे लक्षात ठेव. माणूस सोडून इतर कुठल्याही प्राण्याचे शोषण केलेले या संस्थेला चालत नाही हे तू विसरू नकोस आणि त्या मेनका गांधी आत्ता सरकारात नसल्या तरी त्या काहीच करू शकत नाहीत असेही वाटून घेऊ नकोस. त्या शेवटी ’गांधी’ आहेत आणि आपल्या देशात त्या आडनावाला मोठे मोल आहे हे समजूनच पुढची पाऊले टाक. नाहीतर ऑक्टोपसाच्या आठ पायांसाठी त्या तुला आठ वर्षे जेलात टाकतील नि मला इथे तुझी वाट पहात एकटीनेच झुरत रहावे लागेल. त्याशिवाय आपल्या ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’लाही हे तुझे धंदे मुळीच आवडणार नाहीत हे मी खात्रीने सांगते. तिचे ते दाभोळकर ’ऑक्टोपस भविष्य वर्तावतो हे सिद्ध करा नाहीतर मुंडण करून घ्या’ असे आव्हान तुला देतील नि ते न पेलल्यामुळे तुझ्या डोक्याचे मुंडण त्यांनी केले तर नाक कापले गेलेल्या तुझ्याशी मी आयुष्यात कधीच लग्न करणार नाही हेही ध्यानात ठेव. म्हणूनच म्हणते सख्याहरी, हे नसते धंदे सोड नि दुसरा एखादा व्यवसाय शोध!
माझ्या गुलाबाच्या फुला, माझे ऐक नि हा विचार मनातून कायमचा काढून टाक. अरे ह्या धंद्यात काहीच राम नाही, किंबहुना ह्या धंद्याला काहीच भविष्य नाही असे म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये. आता ह्या अकरावीच्याच मुलांचे उदाहरण पहा. १२ वेगवेगळ्या राशींची ही मुले होती, पण ’बेस्ट ऑफ फाईव्ह’ने त्यांचे सगळ्यांचे भविष्य एकत्रच टांगणीला लावले की नाही? आणि तू पॉलची स्तुतीगीते गातोस, पण सिंगापूरमधल्या ’मणी’ ह्या पोपटाचा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा अंदाज चुकलाच की! तेव्हा जरा डोक्याचा वापर कर नि भविष्य सांगण्याचा हा व्यवसाय तुझ्या डोक्यातून काढून टाक. ह्याऐवजी एखादा झनाना व्यवसाय तुला करू द्यायचीही माझी तयारी आहे. तू साड्या वीक, बांगड्या वीक, फुलांच्या वेण्या वीक, अत्तर, साबण, तेल, कुंकू, पाऊडर अशा बायकी वस्तू वीक, पण ऑक्टोपस घेऊन लोकांचे भविष्य सांगण्याचा (नि स्वत:चे भविष्य धोक्यात घालण्याचा) हा व्यवसाय तू करू नकोस!
प्राणनाथा, माझे बोलणे कठोर वाटले तरी तू रागावू नकोस, अरे तुझ्या भल्यासाठीच मी हे सांगते आहे. भविष्य सांगणे हा लोकांना उल्लू बनवण्याचा एक प्रकार आहे असे माझे स्पष्ट मत आहे. तू एक कर्तबगार तरूण आहेस, तू या धंद्याच्या नादी का लागतोस? मला सांग, भविष्य जर खरे होत असते तर जगात लाखो लग्ने रोज का मोडली असती? भविष्य जर खरे होत असते तर निवडणुकीला उभे असलेले सगळेच उमेदवार विजयी झाले नसते का? आणि भविष्य जर खरे होत असते तर जगातले प्रत्येक मूल डॉक्टर इंजिनियर किंवा कलेक्टर झाले नसते का? आता बेळगावचेच उदाहरण घे, बेळगाव महाराष्ट्रात येणार नाही असे कुठल्याही कुडमुड्या ज्योतिषाने हजार वेळा ओरडून सांगितले तरी तसे झाल्याशिवाय राहणार आहे का? तेव्हा सख्याहरी तो ऑक्टोपस चोरण्याचा विचार सोड, दुस-या कुठल्यातरी धंद्याचे सामान गोळा कर, वाटल्यास तुला मदत करायला मी तुझ्याबरोबर येते! सख्याहरी तू सुरूवात तर करून पहा, तुला साथ द्यायला ही मी मागून आलेच!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment