Thursday, March 17, 2011

माझ्या लाडक्या सख्या हरी...

लारा दत्ताने महेश भूपतिशी लग्न केल्यामुळे तू प्रचंड निराश झालास आणि स्वतःला गेले एक महिना खोलीत बंद करून घेतलेस हे मला आज कुणीसे सांगितले नि मला मोठाच धक्का बसला. लाराने एका घटस्फोटित माणसाशी लग्न करावे या गोष्टीचा तुला सात्विक संताप आला आणि तू हे पाऊल उचललेस असे समजते. सख्या हरी, अरे लाराने महेशशी लग्न केले यात एवढं निराश होण्यासारखं काय आहे? समजा तिने ब्रायन लाराशी लग्न केले असते तर तिचे नाव लारा लारा झाले असते; त्यापेक्षा हे लखपटीने बरे नाही का?

सख्या हरी, तुला माहित नसेल, पण हिरॉईनींनी विवाहित माणसाशी लग्न करण्याची आपल्या चित्रपटसृष्टीतली चाल बरीच जुनी आहे. वैजयंतिमाला, जयाप्रदा, हेमा मालिनी, हेलन, श्रीदेवी, शबाना आझमी, रविना टंडन, करिष्मा कपूर, शिल्पा शेट्टी, किती नावे सांगू तुला? अरे अफवा तर अशी आहे, 'मेरा पति सिर्फ मेरा है' या चित्रपटावर चित्रपटसृष्टीतल्या झाडून सगळ्या अभिनेत्रींनी बहिष्कार टाकला आणि त्यामुळेच तो चित्रपट आपटला.

अरे मागचे कशाला, आत्ताचीच बातमी ऐक. तुझी आवडती राणी मुखर्जी लवकरच आदित्य चोप्राशी लग्न करते आहे. त्यामुळेच ह्या राणीला एक दिवशी आपली राणी बनवीन अशी दिवास्वप्ने जर तू पहात असशील तर तो विचार सोडून दे; नाहीतर राणीच्या नव्या चित्रपटाप्रमाणे तुझेही पानिपत व्हायला वेळ लागणार नाही. तीच गोष्ट करिनाची. करेना करेना म्हणता म्हणता ती एक दिवस सैफशी लग्न करेल आणि तू असाच हात चोळत बसशील.

सख्या हरी, माझे ऐक. तू मला मागणी घाल. ती लारा जरी गेली असली तरी ही तारा तुझ्याशी लग्न करायला एका पायावर तयार आहे. तुझ्या रागाचा पारा चढल्यावर मी तुला माझ्या प्रेमरूपी पंख्याने वारा घालेन आणि तुझ्यावर माझ्या प्रेमाचा मारा करताकरता तुझ्याकडून लग्नाचा प्रेमसारा वसूल करेन. मग, मला मागणी घालायला कधी येतोस?

हो, पण आपलं लग्न झाल्यावर 'आता आपण विवाहीत, आता तर हिरॉईनी आपल्याला सहज पटतील' असं म्हणत जास्त चेकाळून तू त्यांच्यामागे पळणार नाहीस ना?

टीप :
सदर लेख सुप्रसिद्ध मराठी लेखक दत्तू बांदेकर यांच्या 'सख्या हरी' या व्यक्तिविशेषावर आधारलेला आहे. कोण होता हा सख्या हरी? अत्र्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर, "आपल्या अलौकिक प्रतिभेतून त्यांनी [दत्तू बांदेकरांनी] 'सख्या हरी' नावाचा एक अजब नमुना निर्माण केला. चाळीत राहणारा, मळकट कपडे अंगात राहणारा, नळावर बायकांशी चावटपणा करणारा, चौपाटीवर भेळ खाऊन शीळ फुंकणारा आणि मुंबईच्या सा-या गमतींचा वात्रटपणाने नि मिस्किलपण आस्वाद घेणारा दत्तू बांदेकरांचा 'सख्या हरी' म्हणजे, त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण विनोदाचा एक अविस्मरणीय नमुना होय. त्यांच्या ह्या 'सख्या हरी'ने एक वेळ बहुजनसमाजाला वेड लावले होते." दत्तू बांदेकरांविषयी अधिक माहिती आणि सख्या हरीचा आणखी एक नमुना मी पुर्वी लिहिलेल्या एका लेखात वाचता येईल. दत्तू बांदेकरांवरचा हा लेखही त्यांची चांगली माहिती करून देणारा आहे.

1 comment: