Sunday, May 29, 2011

कॉलेजकाळातली ती घटना

मी आकुर्डीतल्या डी वाय पाटील अभियांत्रिकी कॉलेजात शिकत असताना घडलेली ही घटना आहे. डी वाय पाटील कॉलेजातला तो काळ आठवला की मला आजही मोठा अचंबा वाटतो, त्या दिवसांत अभ्यास सोडून मी बाकी सगळे काही केले. आयुष्यातल्या एवढ्या महत्वाच्या त्या काळात आपण असे का वागलो असू ह्या प्रश्नाचे उत्तर मला बराच विचार करूनही आजपर्यंत सापडलेले नाही. कॉलेजच्या त्या दिवसांवर लेख लिहायचा झाला तर तो 'अलिफ लैला' मालिकेच्या कुठल्याही भागापेक्षा जास्त रोमांचक होईल यात काय शंका? तूर्तास, अभियांत्रिकीची पहिल्या वर्षाची पहिली सहामाही सोडली तर नंतरच्या कुठल्याही सहामाहीत मी सगळ्या विषयांत पास झालो नाही आणि चार वर्षांचा हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मी साडेपाच वर्षे घेतली एवढीच रंजक माहिती वाचकांना देऊन मूळ विषयाकडे वळतो.

ही घटना आहे शिवाजीनगर ते आकुर्डी लोकल प्रवासातली. पुर्वी पिंपरीला असलेले आमचे अभियांत्रिकी कॉलेज नंतर आकुर्डीला हलवले गेले आणि आम्हाला बस सोडून लोकलचा सहारा घ्यावा लागला. नेमके आठवत नाही, पण मी कॉलेजच्या दुस-या किंवा तिस-या वर्षाला असेन. नेहमीप्रमाणेच कॉलेजला उशिरा येऊन मी दुपारीच घरी परत चाललो होतो. लोकल्सना तेव्हा बरीच गर्दी असे. त्यातच पुण्याला जाणारी ही दुपारची लोकल दोन तासांनी असल्याने ब-यापैकी भरलेली असे. बसायला जागा नव्हतीच, तेव्हा आसनांशेजारी दाटीत उभे राहण्यापेक्षा बरे म्हणून मी उजव्या बाजूच्या दारात उभा राहिलो. असे उभे राहिल्यामुळे हवा लागे आणि बाहेरची दृश्येही पाहता येत. मी दारातल्या लोखंडी दांड्याला टेकलो आणि टंगळमंगळ करीत बाहेर पहायला सुरुवात केली. थोड्याच वेळात गाडीने चिंचवड स्टेशन मागे टेकले आणि ती पिंपरी स्टेशनात शिरली. काही लोक उतरले, बरेच लोक चढले. गाडी आता कुठल्याही क्षणी निघेल अशी स्थिती असताना अचानक मला समोरून एक माणूस येताना दिसला. तो जोरात पळत होता आणि त्याचे कारण सोपे होते, त्याला ही गाडी पकडायची होती. अशा वेळी पादचारी पुलाचा वापर कोण कशाला करेल? त्याने पटकन फलाटावरून खाली उडी टाकली आणि शेजारची रेल्वेलाईन पार करून तो माझ्या दाराजवळ आला. पण अडचण अशी होती की फलाट गाडीच्या डाव्या बाजूला होता आणि उजव्या बाजूने आत शिरायचे तर गाडीची उंची बरीच होती. इतक्यात गाडी सुरू झाली. 'आता काय करावे?' त्या माणसाच्या चेह-यावरचा हा प्रश्न मी स्पष्टपणे वाचला. अचानक त्याने आपला हात पुढे केला. मी त्याला उचलून वर घ्यावे यासाठी त्याने तसे केले होते हे साफ होते. मीही नैसर्गिक प्रतिक्रियेने त्याचा हात पकडला आणि त्याला वर खेचून घेऊ लागलो. पण एवढे सोपे का होते ते? त्याचा एक पाय गाडीच्या फूटबोर्डावर होता तर दुसरा पाय जमिनीवर, त्यात गाडी जोरात वेग पकडत असलेली. अशा परिस्थितीत जे होते तेच झाले आणि त्याचा गाडीच्या फूटबोर्डावरचा पाय घसरला. त्याचे दोन्ही पाय गाडीच्या चाकांकडे ढकलले गेले नि मी धरलेला त्याचा हात नि डोके सोडले तर तो मला पार दिसेनासा झाला. मी अक्षरश: हादरलो. आता कुठल्याही क्षणी एक किंकाळी आपल्या कानांवर येणार नि रक्ताच्या चिळकांड्या आपल्याला पहायला लागणार हे विचार सरसर माझ्या मनात धावले. आणि ह्या परिस्थितीत मी नेमके काय करावे हे मला कळेना! त्याचा हात सोडावा तर तो गाडीच्या चाकांखाली सापडणार आणि धरून ठेवावा तर तो गाडीसोबत फरफटणार हे नक्की. पण का कोण जाणे, मी त्याचा हात सोडण्याचा निर्णय घेतला. मी तसे करताच आपले हिरोसाहेब खाली आदळले आणि धडपडत, ठेचकाळत रुळांशेजारच्या खडीवर पडले. चित्त जरासे स्थिर होताच मी लगेच मागे वळून पाहिले आणि सुटकेचा मोठा निश्वास सोडला; आपले हिरोसाहेब अगदी धडधाकट होते, दुरूनतरी त्यांचे सगळे अवयव जागच्याजागी व्यवस्थित दिसत होते. मी आजूबाजूला पाहिले, एवढे रामायण घडले तरी कुणाला त्याचे विशेष वाटले नसावे. एकदोघांनी माझ्याकडे पाहून आपली भुवई उंचावली इतकेच. मी मात्र जाम हादरलो होतो, इतका की आपण शिवाजीनगरला कधी पोचलो आणि तिथे उतरून आपल्या बसथांब्यापर्यंत कसे गेलो हे मला कळलेच नाही!

आजही ती घटना आठवली की ह्दयाची धडधड थोडी वाढते आणि एक थंड शिरशिरी शरीरातून जाते. आपण केलेली ती हिरोगिरी त्या माणसाला आणि आपल्यालाही बरीच महागात पडली असती हा विचार मनात पुन्हा पुन्हा येत रहातो. आपण (अजाणतेपणे का होईना) कुणाच्या तरी मृत्युला कारणीभूत ठरलो असतो हा विचार कितीही म्हटले तरी भयंकरच, नाही का?

4 comments:

  1. अभिजित,
    किस्सा खतरनाक पण इन्टरेस्टिंग आहे. पण तुम्हा दोघांचे दैव बलवत्तर होते त्या दिवशी....हि वाईटात चांगली गोष्ट.:)
    आणि त्या वेळी लोकल ८ डब्यांची असायची त्या मुळे सुद्धा प्रवास खतरनाक नि खचाखच गर्दीचा असायचा.आता लोकल १२ डब्यांची झाल्याने किंचित थोडं बरे आहे.(कृपया वाचताना किंचित वर किंचित जास्त जोर द्यावा:))

    ReplyDelete
  2. अभिजीत

    छान रोमांचक अनुभव आहे.

    ReplyDelete
  3. बापरे... वाचतानाच एवढी धडधड झाली तर प्रत्यक्षात काय झालं असेल याची कल्पनाच केलेली बरी...

    ReplyDelete
  4. Dolyasamor prasang ubha rahila. Nasheeb balavattar kharech.

    ReplyDelete