Friday, August 12, 2011

कोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी

'मी वेगळा आहे म्हणून ते मला हसतात आणि ते सगळे एकसारखे आहेत म्हणून मी त्यांना हसतो.' या अर्थाचे एक इंग्रजी वाक्य आहे. आमचे थोडे असेच आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वेचा मार्ग हिरवागार झाला असताना तिने प्रवास करण्यास आम्ही उत्सुक तर एवढ्या दरडी कोसळत असताना तिने जाण्याचे कारण काय असा आमच्या विरोधकांचा सवाल. शेवटी 'ऐकावे जनाचे नि करावे मनाचे' असे आम्ही नेहमीप्रमाणे म्हटले नि कोकण रेल्वेने रत्नागिरीपर्यंत जायचे निश्चित केले. तसे केल्याने कोकण रेल्वेचा प्रवास नि रत्नागिरीदर्शन असे दोन्ही पक्षी आम्ही एकाच दगडात मारू शकत होतो. लगेच मित्रांना इ-पत्रे धाडली, पण नोकरी नि छोकरी यांच्यात दिवसेंदिवस गुरफटत चाललेल्या आमच्या मित्रांची त्यावरची प्रतिक्रिया अगदी अपेक्षित अशीच होती. काम घेऊन गेलो की ते टाळण्यासाठी सरकारी कर्मचारी जसे विविध बहाणे सांगतात अगदी तशीच कारणे आमच्या मित्रांनी दिली होती. किंबहुना माझी ही इ-पत्रे मला दिवसेंदिवस राष्ट्रपतींसाठी मंजुरीसाठी पाठविल्या जाणा-या बिलांसारखी वाटू लागली आहेत. राष्ट्रपतींची मंजुरी ही जशी एक औपचारिकता - ठरलेली गोष्ट असते तसाच ह्या मित्रांचा नकारही ठरलेलाच. पण ते असो, हो नाही करताकरता शेवटी एक मित्र तयार झाला नि दोघे तर दोघे असे म्हणत आम्ही रत्नागिरी सहलीसाठी २२ जुलै - शुक्रवारची तारीख निश्चित केली.

पुणे-ठाणे, ठाणे-रत्नागिरी आणि परतीची रेल्वे तिकिटे काढली नि मग सुरू झाली कंटाळवाणी प्रतिक्षा. या प्रतिक्षेतच सोमवार उजाडला तो कोकण रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळल्याची खबर घेऊन. त्यात गाड्या सुरू होण्यास गुरुवार उजाडेल असे कळल्याने आम्ही चिंतेत पडलो. पण आम्ही या सहलीला जावे अशी देवाचीच इच्छा असावी, त्यामुळे बुधवारीच गाड्या सुरू झाल्या नि आम्ही पुन्हा निश्चिंत झालो.

शुक्रवारी सकाळी शिवाजीनगर स्टेशनवर आम्ही सह्याद्रि 'एक्सप्रेस' पकडली खरी, पण तिच्यात बसल्यावर आपण मोठी चूक केल्याचे आमच्या लक्षात आले. आपले 'सह्याद्रि' एक्सप्रेस हे नाव या गाडीने खूपच गंभीरपणे घेतले असावे कारण मुंबई पुणे सपाट लोहमार्गावरही तिचे धावणे सह्याद्रिमधल्या डोंगररांगांमधून धावत असल्यासारखे दुडूदुडू होते. अखेर १४५ किलोमीटरचे 'विशाल' अंतर तिने ४ तासात कापले नि आम्ही ११ च्या सुमारास ठाण्याला उतरलो. तिथे काही वेळ वाट पाहिल्यावर आमच्या नेत्रावती एक्सप्रेसचे आगमन झाले आणि आमच्या रत्नागिरी सहलीला ख-या अर्थाने सुरूवात झाली. आधीची मांडवी एक्सप्रेस रद्द झाली असल्याने नेत्रावती आलेली पाहताच आम्हाला विशेष आनंद झाला हे मान्य करायलाच हवे!

कोकण रेल्वेची खरी मजा सुरू होते ती पनवेलनंतर. हळूहळू भोवतालचा सपाट प्रदेश डोंगरटेकड्यांचा बनायला लागतो आणि आपण कोकणात प्रवेश करत असल्याचे आपल्या लक्षात येते. या प्रवासाबाबत मी आजपर्यंत जे काही ऐकले होते ते कमी वाटावे असाच हा प्रवास होता. कोकणरेल्वे हा स्थापत्यशास्त्राचा एक चमत्कार आहे असे अनेक लोक म्हणतात आणि माझ्या मते ते १००% खरे आहे. आता या मार्गावरचे बोगदेच घ्या. कोकण रेल्वेचे अनेक बोगदे काही किलोमीटर लांब आहेत. या मार्गावरचा एक बोगदा तर जवळजवळ ७ किमी लांब आहे. एक अजस्त्र डोंगर फोडून एवढा बोगदा बनवणे सोपे का काम आहे? तीच गोष्ट पुलांची, खाली पाहिले तर डोळे फिरतील असे हे पूल पाहिले की थक्क व्हायला होते. लांबलचक बोगदे, प्रचंड उंच पूल, चारी बाजूंना दिसणारी हिरवाई, अचानक प्रकट होणारे धबधबे, दूरवरच्या भातखेचरांमधे चाललेली भातलागवडीची गडबड हे सारे स्वतः अनुभवावे असे आहे. किंबहुना कुठे जायचे नसले तरी फक्त हे सौंदर्य अनुभवण्यासाठी कोकण रेल्वेने एकदा प्रवास करायलाच हवा. विशेषतः रत्नागिरीच्या अलीकडचा उक्शीचा धबधबा तर अक्षरशः 'कत्ल-ए-आम' करणारा आहे.

सुमारे सात तासांचा हा अविस्मरणीय प्रवास संपून आम्ही रत्नागिरीला पोचलो तेव्हा घड्याळात सव्वासात होत होते. बाहेर येताच रत्नागिरी शहरात पोचवणा-या एसटी सेवेचा वापर करून आम्ही रत्नागिरीत पोचलो आणि तिथल्याच एका साध्या पण स्वच्छ हॉटेलात आमच्या पथा-या टाकल्या. तिथला ४०० रुपये हा दर पाहून आम्हाला आनंदाचे भरते आले असले (या पैशात पुण्यात नुसताच संडास मिळाला असता!) तरी वरवर तसे न दाखवता आम्ही आमच्या पुणेकरगिरीला जागून त्यात घासाघीस करण्याचा प्रयत्न केलाच. पण पूर्वी, 'घोडनवरा झालेला हा वर आता दुसरीकडे कुठे जात नाही' हे पाहून काही वधुपिते जसे हुंडा वाढवायला नकार देत तसेच पूर्ण रत्नागिरी फिरलेले हे प्रवासी आता पावसात कुठे जात नाहीत हे पाहून तसे करण्यास हॉटेलमालकाने सपशेल नकार दिल्याने आमचे प्रयत्न अर्थातच असफल झाले. जवळच्याच एका शुद्ध मांसाहारी हॉटेलात जेवून आम्ही परतलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. दिवसभर उभे असल्याने आम्ही अगदी लगेच झोपेच्या अधीन झालो. उद्याचा दिवस महत्वाचा होता, त्यादिवशी आम्हाला सगळी रत्नागिरी पहायची होती.

टीप १: या सहलीचे फोटो आपणास येथे पहाता येतील.

टीप २: मागे आमच्या अंदमान निकोबार सहलीचे प्रवासवर्णन लिहिण्याचा एक प्रयत्न मी केला होता, मात्र त्याला काहीच प्रतिसाद न आल्याने तो बारगळला. वाचकांना आवडल्यास या प्रवासवर्णनाचे पुढील भाग लिहिण्याचा मानस आहे.

5 comments:

  1. भारीच.. मस्त झालीये पोस्ट.. जाऊन याव म्हणतो कोकणात...

    ReplyDelete
  2. आपला लेख वाचला . कोकण रेल्वे हा माझा ही विक पॉईंट आहे. जेव्हा रेल्वे नुकतीच सुरु झाली होती तेंव्हा तो लांलचक बोगदा बघ्ण्यासाठी पहाटे ५ ला उठून मुंबई पॅसेंजर पकडुन चिपळून पर्यंत गेलो होतो तर लगेच दुसर्‍या दिवशी सगळ्यात मोठा पुल बघण्यासाठी कोकण कन्या पक्दून विरुध्द बाजूला म्हणजे कणकवली कडे मी आणि माझा एक मित्र गेलो होतो.

    अमोल केळकर

    ReplyDelete
  3. सर्वप्रथम अतितीव्र शब्दात निषेध !!!
    कोकण रेल्वे ने रत्नागिरीपर्यंत जायचे माझे स्वप्न आहे. ते अद्यापही पूर्ण झालेले नसताना आपण असे गेलातच कसे?
    दुसरे म्हणजे परत फोटो ची लिंक देऊन जखमेवर मीठ नव्हे तर आख्खा टाटा सॉल्ट चा पुडा उपडा केलेला आहे.
    ’कोकण’ आणि ’कोकण रेल्वे’ म्हणजे आमचा वीकेस्ट पॉंईंट !!
    आता आज रात्रभर तो काबुर्डेचा बोगदा, पनवेल नदीवरील पूल आणि मांडोवी किंवा नेत्रावतीची ती डौलदार चाल छळत राहणार !!!
    बाकी लिहीलंत एकदम झ्याक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क !

    ReplyDelete
  4. आणि नकोस रे असे फोटो टाकू !!!!!!!
    कुठं फेडशील हे पाप? एक तर इथे सुट्ट्या मिळत नाही आणि असे फोटो बघितल्यावर तिकडे न जाता रूक्ष अश्या ओरॅकल मध्ये डोकेफोड करत बसणार मी?
    श्या.......................

    ReplyDelete
  5. मस्त लिहितोस रे ब्लॉग!!!

    ReplyDelete