या शनिवारी 'चितचोर' पाहिला. या चित्रपटाविषयी बरेच ऐकून होतो, शेवटी परवा तो पहायचा योग आला. बहुत काय लिहिणे, एवढेच म्हणतो की या चित्रपटाची जेवढी स्तुती करण्यात आली होती ती कमीच ठरावी असा हा चित्रपट आहे!
'चितचोर' ही कथा आहे गीता ह्या एका लहानशा गावात राहणा-या तरूणीची. गीता 'अल्लड' या शब्दाचे मुर्तिमंत उदाहरण आहे. नुकत्याच मॅट्रिकची परीक्षा दिलेल्या गीताचा बहुतांश वेळ शेजारचा राजू नि त्याच्या मित्रांबरोबर खेळण्यात जातो. गीताचे वडील गावात हेडमास्टर आहेत आणि तिची आई वरून थोडी कटकटी दिसत असली तरी आतून खूपच प्रेमळ आहे. गीता हे या दाम्पत्याचे शेंडेफळ, तेव्हा तिला अगदी श्रीमंत मुलगा मिळावा आणि तिचे जन्माचे भले व्हावे अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. अचानक त्यांची ही इच्छा फळाला येण्याची चिन्हे दिसतात, गीताच्या मोठ्या बहिणीचे - मीराचे एक पत्र घरी येते. त्यात तिने तिच्याच नात्यातल्या 'सुनील'विषयी लिहिलेले असते. सुनील नुकताच परदेशातून परतलेला आणि लठ्ठ पगार घेणारा एक इंजिनियर असतो. मजेची गोष्ट म्हणजे एका कामावर देखरेख करण्यासाठी तो काही दिवसात हेडमास्तरांच्याच गावी येणार असतो. पुढे काय होते? नाही, ते मी सांगणार नाही, ह्या प्रश्नाचे उत्तर चित्रपट पाहून मिळवण्यातच मजा आहे!
चितचोर मला आवडण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे त्यातली अहिंसा. चितचोर मला ख-या अर्थाने एक अहिंसात्मक चित्रपट वाटला. शारिरीक तर सोडा, भावनिक किंवा मानसिक हिंसेपासूनही तो संपूर्णपणे अलिप्त आहे. एक उदाहरण - सुनील हे पात्र नकारात्मक दाखवून प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्याची नामी संधी दिग्दर्शकाकडे होती, पण त्याने तो मोह टाळला आहे. विनोद चांगला आहे, पण सुनील वाईट नाही; तोही तितकाच चांगला आहे. मी तर म्हणेन, विनोद नव्हे तर सुनीलच या चित्रपटाचा खरा नायक आहे. साध्या मनाच्या साध्या लोकांचे चित्रण असे चितचोरचे स्वरूप आहे. चित्रपटात काहीही अवास्तव नाही, त्यातल्या संवादांना चुरचुरीत फोडणी नाही की त्यात विनाकारण घुसडलेले विनोदी प्रसंग किंवा गाणी नाहीत. मोठे कलाकार आपल्या भुमिकांमधे अगदी आतपर्यंत शिरले की चित्रपटाचे कसे सोने होते याचे चितचोर उत्तम उदाहरण आहे. दीना पाठक नि ए के हंगल तर अभिनयाचे वटवृक्ष, त्यांच्याबाबत काय बोलावे? अमोल पालेकर आणि विजयेंद्र घाटगे दोघेही उत्तम. पण खरी कमाल केली आहे झरीना वहाबने. गीताचे काम केलेली ही मुलगी मुस्लिम आहे हे जेव्हा मला कळले तेव्हा मी फक्त तोंडात बोट घालायचेच बाकी ठेवले होते. चिंचा पाडणारी गीता आणि ‘मी फक्त सुनीलशीच लग्न करणार‘ असे आईला बाणेदारपणे सांगणारी गीता ह्या दोन्ही एकच आहेत ह्यावर विश्वास ठेवणे कठीण असा अभिनय झरिनाने इथे केला आहे.
कथा, अभिनय, दिग्दर्शन, संगीत ह्या सगळ्या आघाड्यांवर चितचोर उत्कृष्ट असला तरी मला तो भावला त्याच्या अस्सल भारतीयपणामुळे. एक भारतीय चित्रपट कसा असावा याचा चितचोर आदर्श वस्तुपाठ आहे. मोठ्या शहरांत राहणा-या किंवा परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी बनवले जाणारे आजचे चित्रपट पाहिल्यावर तर चितचोर विशेष आवडावा यात नवल ते काय? चितचोर पाहिल्यावरही तो एका ठराविक चित्रपटासारखा वाटत नाही हे चितचोरचे मोठे यश आहे. गीता नि विनोद ही पात्रे नव्हेत तर ते आजही कुठेतरी एकत्र असावेत असे वाटण्याइतका चितचोर खराखुरा, या मातीतला बनला झाला आहे.
इथे चित्रपटाच्या संगीताचा विशेष उल्लेख इथे केला नाही तर त्यासारखे पाप दुसरे असणार नाही. चित्रपटातली गीते नि संगीत रविंद्र जैन यांचे आहे. डोळ्यांनी अंध असलेला हा कलाकार एवढी सुंदर गीते लिहितो काय नि त्यांना त्याहून सुंदर चाली देतो काय, सारेच अद्भुत आहे. अर्थात या गीतांना सुमधुर बनवण्याचे श्रेय येसुदास नि हेमलता या गायकांकडे जाते, ते त्यांना द्यायलाच हवे.
चितचोर पहायचा आहे असे फारसे कुणी असेल असे मला वाटत नाही, पण तरीही हा सुंदर चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर लवकरात लवकर तो पहा एवढेच माझे तुम्हाला सांगणे आहे!
Subscribe to:
Post Comments (Atom)
" गीताचे काम केलेली ही मुलगी मुस्लिम आहे हे जेव्हा मला कळले तेव्हा मी फक्त तोंडात बोट घालायचेच बाकी ठेवले होते "नि सध्या आदित्य पांचोली ..हो.. तोच देखणा, रुबाबदार ..वगैरे वगैरे ची बायको आहे हे ऐकल्यावर काय करणार? ..:)म्हणजे "कुठे तो इंद्राचा ऐरावत नि कुठे ही शाम भटाची तट्टाणी" असं अगदी वाटतं..नै? असो.ह्या चित्रपटातून मुळचा जन्माने मल्याळी,नि शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेला असा येसुदास हां गायक तेव्हा लोकांसमोर प्रथमच आला.त्या काळी अमिताभची सद्दी असून ही हां चित्रपट मॅटिनिला २५ आठवडे चालला होता.खूप मस्त सिनेमा आहे.लेखा बद्दल धन्यवाद.
ReplyDeleteहो, छान होता तो चित्रपट. घरातल्या सर्वांनी एकत्र मिळून पहाण्यासारखा.
ReplyDelete<<<<<<<>>>>>>>>
नको त्या गोष्टी आपण अंगिकारतो आणि चांगल्या गोष्टी दाखविण्याचे कष्ट घेववत नाहीत आपल्याला. मला तर बॉलिवूडचे चित्रपट हॉलिवूडला अंगप्रर्दशनाच्या बाबतीत आता मागे टाकत असतील असे वाटते.
जवळपास सर्वच चित्रपटप्रेमींनी हा चित्रपट पाहीला असावा. तेव्हा स्तुती करताना कंजूशी करु नका. आणखी लिहीले असते तर तेही आवडले असते. चितचोर प्रमाणेच चश्मेबद्दूर, बातोबातों में असे आणखीही चित्रपट आहेत त्यांना आम्ही क्लासिकल हिंदी चित्रपट म्हणतो.
ReplyDeleteचितचोरची आठवण .. छान.
आभारी आहे.
अभिजीत 'नदिया के पार' बघितला नसेल तर तो हि बघा. अस्सल ग्रामीण वातावरण, उत्तम अभिनय आणि कर्णमधुर संगीत.
ReplyDeleteचितचोर आणि नदिया के पार या दोन सुंदर चित्रपटांचे अनिवासी भारतीयांसाठी बनवलेले भ्रष्ट रूप म्हणजे ‘मै प्रेम कि दीवानि हू’ आणि ‘हम आपके है कौन’