Friday, July 29, 2011

गुगल, बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि वाचनवेड

लेखाचे निमित्त आहे 'गुगल आपल्या बुद्धिमत्तेवर परिणाम करत आहे' अशी बीबीसी वर नुकतीच वाचलेली बातमी. या विषयावरचा निकोलस कार यांचा http://en.wikipedia.org/wiki/Is_Google_Making_Us_Stupid हा लेखही रोचक नि प्रसिद्ध आहे. तर प्रश्न असा, खरेच असे घडते आहे का? की हा फक्त शास्त्रज्ञांचा एका सनसनाटी दावा आहे?

मला वाटते या प्रश्नाचे उत्तर होय असेच आहे. गुगल हे एक प्रातिनिधीक उदाहरण, माझ्या मते सा-या इंटरनेटचाच मानवी बुद्धिमत्तेवर बरावाईट परिणाम होतो आहे. जरी आपल्याला जाणवत नसले तरी बारकाईने पाहिले तर हे सहज दिसते की कुठलीही गोष्ट करण्यासाठी आज आपल्याकडे थांबण्यास वेळ नाही. यात माहिती किंवा ज्ञान मिळवणेही आलेच. आपल्या सगळ्या प्रश्नांना आज आपल्याला झटपट उत्तरे हवी आहेत. त्यामुळेच एखादी गोष्ट शोधण्यासाठी गुगलची मदत घेतली तरी येणा-या संकेतस्थळांवर जास्त वेळ थांबण्याची आपली तयारी नसते. 'तुमच्याकडे आमच्या प्रश्नाचे उत्तर नाही, हे आम्ही चाललो!' आपले आयुष्य अतिशय वेगवान होत आहे याचेच हे द्योतक आहे. पण याचा एक मोठा तोटा असा की यामुळे आपली एकाग्रता किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वेगाने कमी होते आहे. एखादी संकल्पना वाचून, तिचा सखोल अभ्यास करून ती समजून घेण्याऐवजी तिच्यातला फक्त आपल्याला आवश्यक तो भाग थोडक्या वेळात वाचून ती आत्मसात करण्याकडे आपला कला वाढला आहे. एक उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या विषयावरची पुस्तके वाचून त्याची माहिती मिळवण्यापेक्षा त्या विषयावरचा विकिपीडिया लेख वाचून तो विषय समजावून घेणे आज आपल्याला सोपे वाटते आहे.

साहजिक आहे, हवी ती माहिती इंटरनेटवर सहज, आयती मिळत असताना ती शोधणे, नको ती माहिती गाळणे आणि हवी ती माहिती वेगळी करणे एवढे कष्ट कोण घेणार? मला वाटते आज पुस्तकांचा वापर कमी होण्यामागे हेच कारण असावे. आता माझेच उदाहरण. एकेकाळी दिवसात अनेक पुस्तकांचा फडशा पाडणारा मी आता पुस्तकांना टाळू लागलो आहे हे पाहून माझे मलाच आश्चर्य वाटते. आजकाल वेळेची असलेली कमतरता आणि वयानुसार पुस्तकांवरचे कमी होत जाणारे प्रेम ही कारणे असली तरी एकूणच पुस्तके वाचण्यामागचा माझा ओढा आता कमी झाला आहे हे नक्की. किंबहुना १८ वर्षे वयाच्या माझे पुस्तकवेड आठवून आजचा मी थोडा खट्टू होतो हे मान्य करायलाच हवे! असे का झाले असावे? माझ्या मते हा इंटरनेटयुगाचाच परिणाम आहे. पुस्तक वाचून त्याचा अर्थ लावून त्यातली मजा घेण्यापेक्षा आज मला थेट त्यावरचा चित्रपट पाहणे सोपे वाटते. हॅरी पॉटरचेच उदाहरण घ्या. हॅरी मुळापासून वाचायचा असे अनेकदा ठरवूनही ते करणे मला जमलेले नाही, पण त्याचे सगळे चित्रपट मात्र मी आवर्जून पाहिलेले आहेत. 'वॉर अ‍ॅन्ड पीस' सारख्या विशाल कादंबरीसाठी वाचक मिळणे ही आज अशक्य गोष्ट आहे असे कुणीतरी म्हटले आहे आणि मी त्याच्याशी १००% सहमत आहे. (चिंता करू नका, मीही ती वाचलेली नाही!)

हे सारे असले तरी इंटरनेटचा वापर टाळणे किंवा कमी करणे ही मोठी अवघड गोष्ट आहे. काम, मनोरंजन, ज्ञानार्जन, वस्तूंची खरेदी विक्री, प्रियाजणांशी संपर्क या दैनंदिन गोष्टी करताना आपल्याला त्याची गरज पडत असताना, ते दिवसेंदिवस आपल्या आयुष्यात अधिकाधिक जागा व्यापू लागले असताना त्याचा वापर थांबवणार कसा? मात्र हा वापर थांबवता येणार नसला तरी आपण तो आटोक्यात नक्कीच ठेवू शकतो. त्यासाठी इंटरनेटचा वापर हवा तेव्हाच नि हवा तेवढाच करणे, तो करतानाही कृत्रिम बुद्धिमत्तेवर जास्त अवलंबून न राहणे, कमी श्रमात मिळणा-या फळाचा मोह कटाक्षाने टाळणे, पुस्तकांचे वाचन नियमितपणे करणे आणि छंद किंवा इतर एखाद्या कलेच्या माध्यमातून नवनिर्मिती करत राहणे असे काही उपाय आपल्याला करता येतील.

सगळ्यात मजेची गोष्ट अशी, हा लेख संपवताना मला जाणवते आहे की ह्या लेखासाठी लागलेले सारे संदर्भ मी गुगलवरूनच शोधले आहेत आणि त्यातही is google making us stuipid? हा माझा शोध गुगलने is google making us stupid? असा सुधारून दाखवला आहे. लेखातले माझे म्हणणे पटवून देण्यासाठी हे एकाच उदाहरण पुरेसे नाही काय?

Friday, July 15, 2011

मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट

बुधवारी मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोट झाले आणि या शहरात मृत्युने पुन्हा एकदा भीषण थैमान घातले. तीन ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमधे १७ लोकांचा मृत्यु झाला तर जवळपास १३१ लोक जखमी झाले. बॉम्बस्फोट भयंकर खरे पण माझ्यामते त्यानंतरची देशातली प्रतिक्रिया जास्त धक्कादायक होती. हा बॉम्बस्फोट झाल्यावर ना कुणाला धक्का बसला ना कुणाला आश्चर्य वाटले, भारतातल्या सामान्य जनतेला आता बॉम्बस्फोटांची सवय झाल्यामुळे तर असे घडले नसेल? आणि खोटे का बोलावे, यात मीही आलोच. हा लेख लिहायचा म्हणून मला चढलेला चेव, खरे सांगायचे तर, लिहिणे सुरू केल्यावर ओसरल्यासारखा झाला आहे. काहीतरी ज्वलंत, जळजळीत लिहावे असे वाटत आहे खरे, पण हतबल, अगतिक झाल्याची भावना मनात असताना त्यासाठी लागणारे अवसान उसने आणणार कसे?

या बॉम्बस्फोटात १७ लोकांचा मृत्यु झाला, बळी पडलेले हे सारे लोक आपल्यासारखेच सामान्य होते. त्यापैकी कुणी गरीब असतील, कुणी श्रीमंत असतील, कुणी तरूण असतील, कुणी वृद्ध असतील पण ते सगळे निरपराध, निष्पाप होते. त्यापैकी कुणा तरूणाचा लहान मुलगा त्याची वाट पहात असेल, कुणा मुलीच्या काळजीने तिची आई व्याकूळ झाली असेल, पण क्रूरकर्म्या अतिरेक्यांना त्याचे काय! त्यांनी त्या सा-यांचा थंड डोक्याने जीव घेतला. १७ हा फक्त आकडा नव्हे, जी मेली ती माणसे होती, माणसाच्या जीवाची किंमत करणे आपण कधी शिकणार? अमेरिकेत दहशतवादी हल्ला झाल्यावर पुन्हा तिथे तसा प्रकार घडला नाही, भारतात असे कधी होणार? नाही, भारतात असे कधीच होणार नाही. नव्या अतिरेक्यांना पकडणे सोडा, पकडलेल्या नि मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या अतिरेक्यांना फाशी देणे ज्याला जमत नाही ते मुर्दाड सरकार जनतेचे संरक्षण काय करणार?

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच भारतात दहशतवाद फोफावण्याचे सर्वात मोठे कारण आहे ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. पोलिसांवरचा ताण, त्या खात्यात वाढलेला भ्रष्टाचार आणि ढळलेली कर्तव्यनिष्ठा, सामान्य नागरिक नि कायदारक्षकांमधे वाढलेली दरी, केंद्रीय नि स्थानिक तपाससंस्थामधे असलेला समन्वयाचा अभाव, या संस्था वापरत असलेली कालबाह्य यंत्रणा ही दहशतवाद फोफावण्यामागची कारणे वाटू शकतात, पण ती कारणे नव्हेत, ती लक्षणे आहेत. खरे कारण आहे दहशतवाद थाबवण्यासाठी हव्या असलेल्या मनोवृत्तीचा अभाव. जर सरकारने ठरवले तर ते नक्कीच दहशतवादाविरुद्ध कठोर पावले उचलू शकते, पण त्यासाठी त्याबाबत गंभीर असायला हवे ना? पण सरकार त्याबाबत गंभीर का असेल? मरणारे लोक सामान्य असतात, मरणा-यांमधे कधीही कुणा मंत्र्याचा समावेश नसतो; त्यामुळे तर असे होत नसेल? दहशतवादी नियमितपणे बॉम्बस्फोट घडवतात, निष्पाप नागरिकांना किडामुंगीसारखे मारतात, संपूर्ण देशाला भीतीच्या छायेत नेतात, आणि तरीही राज्यकर्ते या देशाला महासत्ता म्हणवून घेतात यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो?

पण आहे हे असे आहे; सध्यातरी आपल्याजवळ करण्यासारखे काहीही नाही. राज्यकर्त्यांचा नि सरकारचा बेशरमपणा पहात रहाणे आणि अवतीभोवती वावरताना चौकस राहून दहशतवाद्यांना थांबवण्याचा आपल्यापरीने प्रयत्न करत रहाणे एवढेच आपण तूर्तास करू शकतो.

Thursday, July 7, 2011

हे सारे अद्भुत आहे!

'नेमेचि येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा!' असे म्हणून एका कवीने आपले सृष्टीविषयीचे कौतुक व्यक्त केले असले तरी बहुतेकांना यात काही 'विशेष' आहे असे वाटत नाही. मला मात्र हे सारे अद्भुत वाटते. हे काळे ढग, हा पाऊस, हे पाणी हे सारे पाहिले की 'हे सगळे घडते कसे!' असे वाटून मी आजही अचंबित होतो.

उदाहरणार्थ, पाण्याची वाफ होण्याची प्रक्रिया. वास्तविक ही चालू असते बाराही महिने, पण या विविक्षित दिवसात ही वाफ ढगांमधे जाऊन बसते. नंतर हे ढग वा-यावर स्वार होतात आणि तो त्यांना हजारो किलोमीटर दूर ओढून नेतो. मग हे ढग आपल्याला नेमून दिलेल्या ठिकाणी नेमके तेवढेच बरसतात (काहीवेळा अतिवृष्टी नि ढगफुटीचे प्रसंग घडतात, पण तो अपवाद.) आणि बरसून झाले की गुमान पुढे चालू लागतात - पुढच्या वर्षी हेच चक्र चालू ठेवण्यासाठी. हे सारेच आश्चर्यचकित करणारे आहे, नाही? हे सगळे कसे होत असेल? आणि तेही लाखो वर्षे सलग, अगदी नियमितपणे. म्हणजे त्या ढगांना कुठे सोडायचे हे त्या वा-याला कसे समजत असेल? इथेच बरसायचे नि एवढेच हे त्या ढगांना कसे समजत असेल? दरवर्षी यात्रेत देवाला जायचे म्हटले तर आपल्याला जमत नाही, पण हे नाजूक चक्र गेली लाखो वर्षे सलग कसे चालू असेल? मेक्सिकोमधे फुलपाखराने पंख फडफडवले तर न्युयॉर्कमधे चक्रीवादळ येऊ शकतं असं म्हणतात, असं असतानाही हवामानाचा हा पत्त्यांचा नाजूक मनोरा अजून कसा उभा असेल?

पण असे घडते खरे. दरवर्षी काळे ढग येतात, पाणी बरसतात आणि जमिनीला जणू नवं आयुष्य देतात. त्यांची आतुरतेने वाट पाहणारा शेतकरी सुखावतो आणि जमिनीत धान्याची पेरणी करतो. ही पिके पुढे मोठी होतात आणि नंतर करोडो लोकांच्या पोटात शिरून त्यांची भूक भागवतात. दुसरीकडे गवत नि झाडंझुडपं तरारतात नि सारे सजीव प्रत्यक्षपणे तर काही वेळेस अप्रत्यक्षपणे त्यावर जगतात. जगाच्या सुरुवातीपासून हे रहाटगाडगे चालू आहे, किंबहुना हे चक्र आहे म्हणूनच ह्या पृथ्वीवर जीव जन्मले आणि टिकले असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आणि हे कोडे आहे इतके अवघड की ते उलगडणे सोडा, त्याचे संपूर्ण स्वरूप समजले आहे असेही आपल्याला म्हणता येणार नाही.

सध्या पाऊस थोडा विश्रांती घेतो आहे, पण तो पुन्हा लवकरच हजेरी लावेल. वीजा चमकतील, नद्या वाहतील, दरडी कोसळतील, फुलं फुलतील. मी पृथ्वीवर येण्याआधी लाखो वर्षे चालू असलेले हे चक्र मी गेल्यानंतरही लाखो वर्षे असेच पुढे चालू राहील. आणि ते तसे चालायलाच हवे. कारण मुंगीपासून वाघापर्यंत आणि बेडकापासून माणसापर्यंत पृथ्वीवरच्या लाखो जीवजातींचे जगणे ह्या चक्रावरच अवलंबून आहे!