Wednesday, October 20, 2010

एका कार्यक्रमाचा मृत्यु!

दूरदर्शन पडद्यावर एक काळ गाजवलेल्या, आपल्या वेळी प्रचंड यशस्वी ठरलेल्या आणि प्रेक्षकसंख्येचे नवनविन विक्रम करणा-या एका कार्यक्रमाचा गेल्या सोमवारी तडकाफडकी मृत्यु झाला, ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. बरोबर! 'कौन बनेगा करोडपती' हाच तो कार्यक्रम. सध्या सुरू असलेला कार्यक्रम हा मूळ कार्यक्रमाचे भूत आहे नि त्याचे उथळ स्वरूप पहाता त्याला 'कौन बनेगा मेरा पती' असे एखादे सवंग नावच शोभून दिसेल असे माझे तरी प्रामाणिक मत आहे, तुम्ही काय म्हणता?

केबीसीची सुरूवात झाली २००० सालापासून. तेव्हापासून मी आणि माझ्या घरचे सगळे ह्या कार्यक्रमाचे चाहते बनलो ते आजतागायत. मला आठवते, त्यावेळी सोमवार ते गुरूवार हा कार्यक्रम प्रसारित होत असल्याने कुठेही असलो तरी मी नवाच्या आत घरी पोहोचत असे. अमिताभचे ते सुरुवातीला ऐटीत उभे राहणे, त्यानंतर निवड झालेल्या स्पर्धकाला दिलेले ते अलिंगण किंवा हस्तांदोलन, ते स्पर्धकाला प्रेमाने खुर्चीत बसवणे, नंतर त्याची मजेदार छोटीशी ओळख करून देणे आणि खेळ खेळतानाही स्पर्धकांना नकळत मदत करणे, सगळेच कसे हवेहवेसे नि पहात रहावे असे वाटणारे होते. मला चांगले आठवते, या कार्यक्रमाचा हर्षवर्धन नवाथेने एक कोटी रुपये कमावले तो भाग ज्या दिवशी प्रसारित होणार होता त्या दिवशी रस्त्यांवर अगदी शुकशुकाट होता, अगदी रस्त्यांवर संचारबंदी आहे असे वाटावे इतपत!

पण हाय रे दैवा, काहीतरी अघटित घडले नि आमच्या आवडत्या कार्यक्रमाला ग्रहण लागले. याची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या दुसर्‍या पर्वात शाहरूख खानच्या प्रवेशाने. आता अमिताभ तो अमिताभ नि शाहरूख तो शाहरूख! हे म्हणजे किशोर कुमार नाही म्हणून अमित कुमारकडून गाणी म्हणवून घेण्यासारखे झाले! अमिताभचे ते संभाषणकौशल्य, ती आदब, ती नर्मविनोदबुद्धी शाहरूख खानकडे कशी असणार? अर्थातच कार्यक्रमाची प्रेक्षकसंख्या वेगाने घसरली. काय होते आहे हे वाहिनीला कळेपर्यंत बहुसंख्य प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहणे सोडूनही दिले होते.

या नंतर आली कार्यक्रमाची चौथी आवृत्ती. या कार्यक्रमात अमिताभला पुन्हा एकदा सूत्रसंचालक म्हणून पाहण्यासाठी मी बराच उत्सुक होतो. या कार्यक्रमाच्या जाहिरातीही विनोदी नि तिच्याविषयी उत्कंठा निर्माण करणार्‍या होत्या. जाहिराती सोनी वाहिनीवर पाहून लहानसा धक्का बसला खरा, पण मी म्हटले, 'वाहिनी बदलली तरी हरकत नाही, कार्यक्रमाचा दर्जा चांगला असला म्हणजे बास.' पुन्हा एकदा जुने दिवस अनुभवायला मिळतील म्हणून मी सोमवारी अधीर होऊन टीव्ही सुरू केला आणि हाय रे दुर्दैवा! सुरुवात झाली तीच अमिताभच्या गाण्याने, आणि तेही कोणते? तर 'पग घुंगरू बांध मीरा नाची थी' हे! आणि मूळ गाणे नव्हे तर त्याची आधुनिक कर्णकटू आवृत्ती! कॉलेजात आपल्याला आवडणारी 'खवा' पोरगी नंतर एकदम चारपाच वर्षांनी दिसावी आणि तिची 'यंत्रणा' झालेली पाहून ह्दयात एक हलकीशी कळ उठावी तसेच माझे झाले. ही सुरुवात पाहून 'हे लक्षण काही ठीक दिसत नाही गड्या' असे मी मनाशी म्हटले नि पुढे हे अनुमान खरेच ठरले. कुठलाही कार्यक्रम लोकप्रिय करण्यासाठी त्याला भावनिक हेलकाव्यांची फोडणी देण्याची एक वाईट सवय आपल्या दूरदर्शन निर्मात्यांना लागली आहे, पण ती बरी नव्ह! ही क्लृप्ती वापरून एखादा दुसरा कार्यक्रम चालेलही, पण केबीसीला हे रसायन वापरून कसे चालेल? हे म्हणजे मटनाचा मसाला चांगला लागतो म्हणून तो सगळ्या भाज्यांनाही वापरण्यासारखे झाले; भेंडीच्या भाजीला हा मसाला कसा चालणार, तिला शाकाहारीच मसाला वापरायला हवा! हा कार्यक्रम स्पर्धकांचे सामान्यज्ञान तपासणारा एका प्रश्नमंजुषा कार्यक्रम आहे, असला सवंगपणा करायला तो काही 'इंडियन आयडॉल' नव्हे हे या कार्यक्रमाचे निर्माते विसरले नि तिथेच मोठा घोळ झाला!

अमिताभला 'एक्स्पर्ट'शी बोलताना, स्पर्धकांच्या गावात घेतलेल्या त्या भावनाभडकाऊ चित्रफिती पाहताना आणि 'आपण ऐकत आहात तो आवाज कुठल्या नटाचा आहे' असे तद्दन फालतू प्रश्न विचारताना पाहून मला तर गलबलून आले! हे सगळे पाहून 'मुझे तुमसे ये उम्मीद नहीं थी विजय' असा त्याच्याच कुठल्यातरी चित्रपटातला संवाद त्याला मारावा असेही वाटले. अमितजी, आम्हाला तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती, आणि तीही या वयात?

भारतीय वाहिन्यांवर दाखवल्या जाणार्‍या एकमेव चांगल्या कार्यक्रमाची दारेदेखील आता माझ्यासाठी कायमची बंद झाली आहेत, हाय अल्ला, अब मै क्या करूं?

Thursday, October 14, 2010

या ’बडे खॉं’ना कुणीतरी आवरा...

आजकाल प्रदर्शित होणारे चित्रपट नि विविध वाहिन्यांवर दिसणा-या जाहिराती पाहून या देशात १९६५ नंतर कुणी नविन बाळ जन्मालाच आले नाही असे एखाद्याला वाटले तर मी त्याला दोष देणार नाही. मला तरी असेच वाटते बुवा! आपली मुलगी शोभेल अशा वयाच्या तरूणीला चिठ्ठ्या पाठवणारा शाहरूख, आपल्या मित्राची धाकटी मुलगी शोभेल अशा दिपिकासोबत गाणी गाणारा सैफ आणि आपल्या तरूण मेव्हणीसारख्या दिसणा-या असीनबरोबर इष्कबाजी करणारा अमीर पाहून आणखी काय वाटावे?

म्हणजे मी या खानांच्या विरोधात नाही, एक शाहरूख खान सोडला तर बाकीच्या दोन खानांविषयी माझे मत चांगलेच आहे. अमीर खान एक चांगला, चोखंदळ अभिनेता आहे आणि सैफ अली खानचा तर मी काही वर्षांपुर्वी चक्क एक चाहता होतो. (आठवा ते 'नीला दुपट्टा पीला सूट...' गाणे) पण मला वाटते आता खरेच 'बास!' असे म्हणायची वेळ आली आहे. ह्यांना अजून किती सहन करायचे? आणि का? म्हणजे ह्या खानांचे वय वाढले याबाबत माझी तक्रार नाही. तुम्ही जन्माला आलात त्याअर्थी तुमचे वय हे वाढणारच. माझा आक्षेप आहे ह्या खानांनी तरूण दिसण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यावर. शाहरूख खानची 'फौजी'ही मालिका आल्याला आता जवळजवळ दोन दशके होऊन गेली. तेव्हाचा नि आजचा शाहरूख यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे त्याचे चाहतेही मान्य करतील. कुठे तो रसरशीत चेहे-याचा शाहरूख आणि कुठे आजचा थकलेला नि डोळ्यातली चमक हरवलेला शाहरूख. त्या जाहिरातीत झोपलेल्या टिनाच्या खोलीत कागदाचे बोळे फेकताना पाहून त्याला विचारावेसे वाटते, 'काय लिहिलेयेस त्यात? टिना, उद्या माझी मुलगी तुझ्याबरोबर येणार आहे, तिला न घेता कॉलेजला जाउ नकोस हो!' हेच ना? आमीरचीही तीच गत. आठवा तो 'अंदाज अपना अपना' मधला 'आयला...' म्हणणारा कोवळा आमीर नि त्या तुलनेत आजचा 'थ्री इडियटस्'मधला निबर आमीर. आणि सैफबाबत काय म्हणावे? 'मै खिलाडी तू अनाडी'मधल्या सैफला कोवळी काकडी म्हटले तर आजच्या सैफला दुधी भोपळा म्हणावे लागेल! एका नविन जाहिरातीत दाढी वाढवलेला सैफ करिनाच्या मागे पळताना पाहून मला तर असे वाटते की एखादा गुंडच तिच्या मागे लागला आहे!

या अभिनेत्यांनी सिनेमासृष्टीत रहावे, वेगवेगळ्या भूमिकाही कराव्यात, पण आपले वाढते वय लक्षात घेता त्यांमधे बदल करण्याचा प्रयत्न त्यांनी करायला नको का? जीवननदी पुढेपुढे जात असताना हे अभिनेते मात्र आजही नदीकाठच्या झाडाची मुळे पकडून एकाच जागी उभे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत, हे हास्यास्पदच नाही का? अर्थात् आपण आता तरूण राहिलो नाही हे मान्य करायला नि आपल्या भुमिकांमधे बदल करायला विलक्षण धैर्य लागते, या अभिनेत्यांकडे ते आहे का?

हे झाले या अभिनेत्यांचे वागणे, पण मी म्हणतो ह्या जाहिराती नि हे चित्रपट बनवण-यांनी तरी डोके वापरावे की नाही! हे नट काय, पैसे मिळवायलाच बसले आहेत, पण या लोकांनी त्यांना का घ्यावे? यांच्याकडे पर्याय कमी आहेत का? इम्रान हाश्मी आहे, रणबीर कपूर आहे, शाहिद कपूर आहे आणि यांपैकी कुणी तयार नसेल तर सगळ्यांचा आवडता हिमेश रेशमिया आहे, त्याला घ्या नि करा की हव्या तेवढ्या जाहिराती नि सिनेमे! पण जनतेला म्हातारचाळे आवडतात असा गैरसमज करून घेतलेल्या या लोकांना कोण समजवणार?

अरे कुणी आहे का तिकडे? जमल्यास या 'बडे खॉं'ना आवर घाला रे!

Wednesday, October 13, 2010

’महाराष्ट्र देशा’ - उद्धव ठाकरेंचे देखणे पुस्तक

या शनिवारी आचार्य अत्रे सभागृहावरून जाताना एका पुस्तक प्रदर्शनाची जाहिरात नि त्यांचा 'सरसकट २०% सूट' असा फलक पाहिला नि क्षणभर थबकलो. हाताशी थोडा वेळ होता, तेव्हा आत गेलोही. खरेतर या पुस्तक प्रदर्शनांमधे वेगळे काही नसते. आचार्य अत्रे सभागृहात होणारी ही प्रदर्शने तर आता मला पाठ झाल्यासारखी झाली आहेत. बाहेर दिवाळी अंक नि फुटकळ पुस्तके, आत गेल्यावर पहिल्यांदा इंग्रजीतून अनुवादित झालेली मराठी पुस्तके, नंतर आचार्य अत्रे नि पु ल देशपांडे ह्यांची पुस्तके, त्यापुढे कथासंग्रह, परचुरे प्रकाशनवाल्यांचे एक टेबल, मधे काही बालपुस्तके नि मग शेवटी इंग्रजी पुस्तके असे या प्रदर्शनांचे साधारण स्वरूप असते. पण असे असले तरी मी इथे आवर्जून जातो आणि नाही म्हटले तरी ३००/४०० रुपयांची खरेदी होतेच.
 
यावेळीही असाच आत गेलो नि आत शिरताक्षणीच माझे लक्ष वेधून घेतले एका लंब्याचवड्या पुस्तकाने. 'पाहूया तरी खरे' असे म्हणत ते पुस्तक मी हातात घेतले नि क्षणार्धात त्यात गुंतून गेलो. पुस्तक होतेच तसे. महाराष्ट्रातले गड, धार्मिक स्थळे आणि इतर प्रसिद्ध वास्तू यांची आकाशातून घेतलेली छायाचित्रे असे त्याचे स्वरूप होते. या सा-या छायाचित्रांचे छायाचित्रक होते शिवसेना नेते उद्धव ठाकरे. महाराष्ट्राचे हवाई चित्रण करणारे असे पुस्तक मी मराठीत काय, इंग्रजीतही कधी पाहिले नव्हते. पुस्तकाची किंमतही फारच माफक म्हणजे फक्त १०० रुपये होती, तेव्हा ते लगेच विकत घेतलेही.
 
सुमारे १०० पानांच्या ह्या सुंदर पुस्तकाचे वाचन पूर्ण करूनच आता हा लेख लिहितो आहे. प्रत्येक पानावर एक छायाचित्र नि त्याशेजारी त्यावरची छोटी टिप्पणी अशी पुस्तकाची साधारण मांडणी आहे. पुस्तकातली काही (७ ते ८) चित्रे आपल्याला ओळखीची वाटतात कारण आपण ती पुर्वी पाहिलेली आहेत. बरोबर, काही वर्षांपुर्वी महाजालावर ढकलपत्रांच्या स्वरूपात फिरत असलेली गडचित्रे ती हीच. पण अशी चित्रे फारच थोडी; पुस्तकातली बहुसंख्य चित्रे नविन (निदान मला तरी) आहेत. पुस्तकाचे लगेचच जाणवणारे एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा दर्जा; तो खरोखरच उत्कृष्ट आहे. गुळगुळीत पाने आणि त्यावरची प्रत्येक बारकावा जिवंत करणारी सुबक छपाई यामुळे पुस्तक अतिशय आकर्षक झाले आहे. मी तर म्हणेन, मी पाहिलेल्या अशा परदेशी पुस्तकांपेक्षा या पुस्तकाचा दर्जा तसूभरही कमी नाही. मराठी पुस्तकांचा तांत्रिक दर्जा चांगला नसल्याचे रडगाणे गाणा-यांना निदान हे पुस्तक न वाचण्यासाठी तरी हे कारण पुढे करता येणार नाही!
 
आता थोडेसे पुस्तकाचे मुख्य आकर्षण असलेल्या त्यातल्या छायचित्रांविषयी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील कार्यपद्धतीबद्दल अनेकांची वेगवेगळी मते असली तरी सदर छायाचित्रांवरून ते एक उत्कृष्ट छायाचित्रणकार आहेत याबाबत एकवाक्यता होण्यास हरकत नसावी. छायाचित्रे आकाशातून काढल्यावर ती चांगली येणारच असे काही जण म्हणतील, मी मात्र त्यांच्याशी सहमत होणार नाही. प्रत्येक छायाचित्राचा कोन(Framing), चौकट निवडण्याची पद्धत(Composition), त्याची स्पष्टता(Sharpness), त्यातली रंगसंगती(Combination of colors) या सा-या मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी काढलेली छायाचित्रे पैकीच्यापैकी गुण मिळवतात. अर्थात् ही छायाचित्रे आपल्या आपुलकीचा विषय असलेले किल्ले नि आपल्या परिचयाची प्रसिद्ध स्थळे यांचे एका वेगळ्या दृष्टीने चित्रण करणारी असल्याने आपल्याला अधिक जवळची वाटतात हेही खरे. पण या पुस्तकात फक्त प्रसिद्ध जागांचीच चित्रे नाहीत, नांगर धरणारे शेतकरी, भातलागवड करणारे मजूर, तलावात डुंबणा-या गाई आणि घाटाघाटांमधले रस्ते अशी काही चित्रेही त्यात आहेत. पेंटिंग नि छायाचित्र यातील सीमारेषा धूसर करणारे छायाचित्र ते सर्वोत्तम छायाचित्र असे मानले तर या पुस्तकातली बरीचशी छायाचित्रे ही अट नेमकेपणाने पूर्ण करताना दिसतात. किना-यावर विश्रांती घेणा-या बोटींचं किंवा नाना रंगांची खाचरं दाखवणारं चित्र ही याची उत्तम उदाहरणे.
 
महाराष्ट्रातले डोंगर, नद्या, मंदिरे नि दर्ये यांवर प्रेम करणा-यांबरोबरच छायाचित्रणाचा छंद असलेल्या व्यक्तींनाही आवडेल असे हे पुस्तक आहे. महाराष्ट्राचे चित्ररूप दर्शन आपल्या वाचकांना घडवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी या पुस्तकातून केला आहे आणि माझ्या मते ते त्यात १००% टक्के यशस्वी झाले आहेत. खिशाला परवडणारे असल्यामुळे, ते विकत घेण्यासही काही अडचण नाही. मी तर म्हणेन, चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी घरात हे पुस्तक असायलाच हवे!
 
महाराष्ट्र देशा
उद्धव ठाकरे
प्रबोधन प्रकाशन
सहावी आवृत्ती (१६ ऑगस्ट २०१०)
मूल्य : रू. १०० फक्त
 
ता.क. 'सरसकट २०% सूट'असा फलक 'शुभम साहित्य'ने या प्रदर्शनात लावला असला तरी या पुस्तकावर मात्र त्यांनी फक्त १० टक्केच सूट दिली. हा प्रकार लक्षात घेता पैसे देताना आपले बील व्यवस्थित तपासून घेणे उत्तम!

Wednesday, October 6, 2010

भारतातल्या दोन आनंददायी घटना

गेल्या काही दिवसात भारतात दोन आनंददायी घटना घडल्या. देशातली सध्याची परिस्थिती पाहून त्याचे काही खरे नाही असे वाटण्यासारखी वेळ आली होती खरी; सदर घटना मात्र मनाला आनंद देणा-या नि चला 'होत असलेले सगळेच काही निराशाजनक नाही' असा दिलासा देणा-या ठरल्या!

पहिली घटना म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी आपला निकाल दिल्यावर दोन्ही बाजूंनी व्यक्त केलेली संयत प्रतिक्रिया नि करोडो भारतीयांनी त्यांना दिलेली साथ. हा निकाल देण्याआधी सरकारने मोठमोठ्या जाहिराती देऊन नि नागरिकांना भावनिक आवाहने करून असे काही वातावरण तयार केले होते की वाटावे त्या दिवशी जणु जगबुडीच होणार आहे! मला तर असे वाटत होते की क्रिकेटच्या अंतिम सामन्याचा निकाल लागला की आनंद साजरा करण्यासाठी आतूर झालेले नागरिक जसे घराबाहेर पळतात नि फटाके फोडतात अगदी तसेच न्यायालयात न्यायाधीशांनी निकाल वाचताक्षणीच लोक बाहेर पडतील नि गोळीबार सुरू करतील. पण सुदैवाने असे काही घडले नाही! १९९२ सालच्या नि आजच्या भारतात पडलेला मोठा फरक हे असे होण्यामागचे महत्वाचे कारण. धर्माच्या छत्रीखाली भारतीय तरूणांना गोळा करणे सोपे नाही हे सा-याच चतुर राजकरण्यांना नि धार्मिक नेत्यांना आता कळून चुकलेले आहे. लोक आता ह्दयाऐवजी डोक्याने विचार करू लागले आहेत हे त्यांना समजले आहे. भारत एक महासत्ता होण्याच्या वाटेवर आहे नि अशा घटनांमधे आपली उर्जा वाया घालवणे आपल्याला परवडणारे नाही हे भारतीयांना (विशेषतः तरूणांना) पटते आहे. आमचा तिरस्कार नि द्वेषापेक्षा प्रेम नि बंधुभावावर अधिक विश्वास आहे हे भारतीय तरूणांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून दाखवून दिले आहे नि मला वाटते याबद्दल आपण त्यांचे कौतुक करायला हवे.


दुसरी घटना म्हणजे नवी दिल्ली येथे झालेले 'राष्ट्रकुल स्पर्धांचे' दिमाखदार उद्घाटन. ही स्पर्धा भारताकडे यजमानपद आल्यापासून फक्त नकारात्मक कारणांसाठीच चर्चेत राहिलेली होती. स्पर्धेसाठीची स्टेडीयम्स वेळेत तयार होतील की नाही हा प्रश्न, त्यांच्या दर्जाबाबतचा प्रश्न, खेळाडू राहणार आहेत त्या इमारतींच्या दर्जाचा प्रश्न, त्यांच्या स्वच्छतेबाबतचा प्रश्न असे सारे प्रश्न पुन्हापुन्हा विचारले जात होते. त्यातच या स्पर्धेतून काही नामवंत खेळाडूंनी माघार घेणे, स्पर्धेसाठीचा पादचारी पूल पडणे, खेळाडूनिवासात साप सापडणे अशा घटना घडल्या नि स्पर्धेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. परदेशी माध्यमे तर या स्पर्धा रद्दच होणार आहेत (किंवा व्हाव्यात) असेच चित्र जगासमोर मांडत होती, पण तसे काही घडले नाही. डोळ्यांचे पारणे फेडील अशा दिलखेचक नि चित्ताकर्षक सोहळ्याने या स्पर्धेचे उद्घाटन झाले नि 'ज्याचा शेवट गोड ते सारे गोड' या उक्तीची पुन्हा एकदा प्रचिती आली. या सोहळ्यात मला व्यक्तिश: आवडलेल्या दोन गोष्टी म्हणजे बॉलीवूडचा कमीत कमी सहभाग नि कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचा झालेला प्रयत्न. अर्थात हा सोहळा यशस्वी झाला म्हणून आपले सारे गुन्हे माफ या भ्रमात कलमाडी व कंपनी यांनी राहू नये. त्यांच्या वागण्याचा हिशोब त्यांना द्यावाच लागेल नि जर तो मिळाला नाही तर जनतेने तो त्यांच्याकडून मागून घ्यायला हवा.

ता.क. : बाबरी मस्जिद पाडण्याच्या घटनेकडे वळून पाहताना एका माजी कारसेवकाच्या मनात आलेले विचार येथे [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6654038.cms] वाचता येतील.