Thursday, September 30, 2010

कोसला - मराठीतली माझी सगळ्यात आवडती कादंबरी

'औदुंबर'कवितेविषयी लिहिताना मी मागे असे म्हटले होते की या कवितेविषयी जेवढे आजपर्यंत लिहिले गेले आहे, तेवढे दुस-या कुठल्याच कवितेविषयी लिहिले गेले नसेल. हाच निकष जर कादंब-यांना लावला तर हा मान नक्कीच 'भालचंद्र नेमाडे'यांच्या कोसलाला जाईल. कोसलावर आजपर्यंत लिहिले गेलेले सारे लिखाण एकत्र केले तर ते नक्कीच कोसलाच्या शंभर प्रतींइतके भरेल. अर्थात या कादंबरीचे तोंड भरून कौतुक करणा-यांबरोबरच तिला मोडीत काढणा-यांची संख्याही लक्षणीय आहे हे विशेष. कोसलाबाबत आणखी एक गंमतीची गोष्ट म्हणजे तुम्ही एक तर तिच्या बाजूने असता किंवा तिच्या विरूद्ध तरी. म्हणजे देवावरच्या श्रद्धेसारखं, आस्तिक किंवा नास्तिक, मधलं काही नाही. आमच्या साहेबांच्याच शब्दांत सांगायचे तर ह्या कादंबरीविषयी तुमची दोनच मते असू शकतात. 'गेल्या दहा हजार वर्षांत अशी कादंबरी झाली नाही!' असे किंवा 'ही कादंबरी महाभिकार आहे!' असे तरी. ही कादंबरी ठीकठाक वाटली असे म्हणणारा मनुष्य मला अजूनतरी भेटायचा आहे!

लेखाचे कारण म्हणजे नुकतीच कोसलावर एका मराठी संकेतस्थळावर झालेली चर्चा. ही कादंबरी मला अतिसामान्य वाटली असे मत या चर्चेच्या निवेदिकेने नोंदवले. माझ्या मते, सगळ्यात प्रथम, कुणाचाही मुलाहिजा न ठेवता आपले मत मांडल्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. हा खरेपणा महत्वाचा, इतरांचा विचार करून दिलेले मत, मग ते कसेही का असेना, काय कामाचे? म्हणजे, कोसला कादंबरी मोठी असेलही, पण मी म्हणतो, 'ती महाभिकार आहे' असे म्हणण्याचे स्वातंत्र्य त्यापेक्षा मोठे आहे. या स्वातंत्र्याचा आपण सगळ्यांनीच आदर केला पाहिजे, अगदी माझ्यासारख्या कोसलाच्या चाहत्यांनीदेखील.

मला विचाराल तर, कोसला ही मराठीतील सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे असे माझे मत आहे. मला असे का वाटते? माझ्या मते याचे कारण सोपे आहे, ही कादंबरी मला आपली वाटते, ती माझ्या मनाच्या तळापर्यंत जाऊन भिडते, कोसलातला पांडुरंग सांगवीकर मला अगदी जवळचा वाटतो. असे का वाटत असेल? हा पांडुरंग अगदी ख-या पांडुरंगासारखाच निरागस नि निष्पाप आहे म्हणून कदाचित. 'मी पांडुरंग सांगवीकर. आज उदाहरणार्थ पंचवीस वर्षांचा आहे.' अशी त्याच्या आत्मकथनाची सुरुवात तो करतो नि एका क्षणात तुम्हाला आपलेसे करतो. तो आपल्याला सारं काही सांगतो, त्याच्या कॉलेजाविषयी, तिथल्या त्याच्या फजितींविषयी, वडिलांशी झालेल्या त्याच्या वादांविषयी, आईवरच्या त्याच्या प्रेमाविषयी, त्याच्या बहिणींविषयी, त्याच्या एकूण अयशस्वी आयुष्याविषयी. अगदी जवळच्या मित्राला सांगावे तसे. आणि मग त्याचे हे आयुष्य त्याचे रहातच नाही, ते आपले बनते. तुम्ही स्वत:ला पांडुरग सांगवीकरमधे शोधू लागता. पुण्यासारख्या मोठ्या शहरात आल्यावर गडबडलेला पांडुरंग, मित्रांना स्वखर्चाने चहा पाजणारा पांडुरंग, मेसच्या भानगडीत सापडणारा पांडुरंग, आजूबाजूचे 'थोर' लोक पाहून आपणही त्यांच्यासारखे व्हावे अशी इच्छा धरणारा पांडुरंग आणि आपल्या बहिणीच्या अकाली जाण्याने व्यथित झालेला पांडुरंग. पुण्यात सहा वर्षे काढून नि वडीलांचे दहा बारा हजार वर्षे खर्चूनही हा घरी परततो तो पदवीशिवायच. त्याच्या वडिलांच्या शब्दांत, 'तुला बारा हजारांनी गुणलं तरी सहासात वर्षांचा गुणाकार शून्यच'. आयुष्याची लढाई यशस्वी झालेल्या नायकांची अनेक चरित्रे वाचलेली असली तरी का कोण जाणे, रुढार्थाने आयुष्यात अपयशी झालेल्या पांडुरंग सांगवीकरशी तुम्ही जास्त जवळीक साधता. मजेची गोष्ट आहे नाही ही?

कोसलाचे आणखी एक आकर्षण म्हणजे भालचंद्र नेमाड्यांची भाषा. किंबहुना मराठी भाषेला असा सहज वळवणारा लेखक मी जी ए कुलकर्ण्यांनंतर अजूनतरी दुसरा पाहिलेला नाही. एखाद्या रंगाधळ्या माणसाला अचानक रंग दिसू लागल्यानंतर जसे वाटेल अगदी तसेच नेमाड्यांची ही मराठी वाचताना वाटते. कोसल्यातल्या प्रत्येक वाक्याला हा 'नेमाडे' स्पर्श आहे. 'पण मी अगदी सगळंच सांगणार नाही. कारण ते तर माझ्या सद-यांनासुद्धा ठाऊक आहे.' 'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारून टाकून तिच्या कातड्याचा डफ करून त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.' 'पण ज्या अर्थी बापानं आपल्याला विकत घेतलं त्या अर्थी हा गृहस्थ आता आपला बाप लागत नाही. हा आपला मालक, आपण ह्याच्या खानावळीत जेवतो.' 'आपापली वर्षं पुढे अचूक शिल्लक असतातच. ती वगैरे काही कमावता येत नाहीत. तेव्हा गमावली ही भाषा मात्र उदाहरणार्थ इतकी बरोबर नाही. किंवा वर्षं अत्यंत वाया गेली, असं म्हणणं उदाहरणार्थ चूक आहे. म्हणजे बरोबरच' ही काही उदाहरणे.

समीक्षकांनी पांडुरंग सांगवीकर या व्यक्तीरेखेचे अनेक अर्थ काढले. कुणाला त्याचे जगणे 'सारे काही मिथ्या आहे' या अंतिम सत्याचे एक उदाहरण वाटले तर कुणाला तो गौतम बुद्धासारखा वाटला. कुणाला त्याच्या गरीब मित्रांचे जगणे चटका लावून गेले तर कुणाला त्याच्या बहिण मनूचे जाणे. मला मात्र पांडुरंग सांगवीकर असामान्य वाटला तो आधी सामान्य आहे म्हणूनच. नेमाड्यांनी स्वतः अर्पणपत्रिकेत म्हटल्याप्रमाणे 'शंभरातल्या नव्याण्णवांसारखा' - खूप काही करायला जाणारा, सगळ्यांपासून वेगळं बनू पाहणारा नि शेवटी सर्वसामान्यांसारखंच जगणारा. तुमच्या आमच्यासारखा!

तर अशी आहे ही कोसला. ती तुम्हाला आवडो, न आवडो, पण तिला टाळून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही हे मात्र खरे!

Wednesday, September 29, 2010

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली माझी पाच वर्षे आणि काही अनुभवाचे बोल

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मी नुकतीच पाच वर्षे पूर्ण केली. पाच वर्षे हा काही फार मोठा काळ नव्हे असे काही लोक म्हणतील, पण १९९० साली भारतात संगणक आले नि संगणक प्रणाली निर्माण [Software developement] या क्षेत्राला साधारण ९८ सालापासून सुरुवात झाली असे मानले तर उण्यापु-या १२ वर्षे जुन्या या क्षेत्रात मला एक 'अनुभवी माणूस' म्हणण्यास हरकत नसावी! (पण मी पुणेकर असल्याने तशीही या स्पष्टीकरणाची काही गरज नाही; सच्च्या पुणेकराला कुठल्याही गोष्टीवर अधिकारवाणीने मतप्रदर्शन करण्यासाठी कसल्याही पात्रतेची गरज नसते.)

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात माझी सुरूवात झाली एका लहानश्या कंपनीत. ह्या कंपनीत मी काय काम केले हे सांगणे मोठे अवघड आहे. (याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे या प्रश्नाचे उत्तर मला त्या कंपनीत असतानाही देता आले नसते.) इथे माझ्या साहेबांनाच काही काम नव्हते, तर मला कुठून मिळणार? तिथे मी संपूर्ण कालावधीत फक्त एक .html पान एका .aspx पानामधे बदलल्याचे आठवते. अर्थात ह्या कंपनीतला माझा पगारही मी करत असलेल्या कामाला साजेसाच होता. काही खोचक वाचक 'कमी म्हणजे नेमका किती?' असे विचारतील, त्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मी दर महिन्याला घरी नेत असलेला पगार पाच आकडे पार करत नसे.

सकाळी नऊ वाजता कार्यालयात येणे नि संध्याकाळी सहाला घरी जाणे या मधील वेळात नवनविन संकेतस्थळे शोधणे आणि ती वाचणे हा इथे माझा एककलमी कार्यक्रम होता. (ह्या माहितीचा मला पुढे फार उपयोग झाला!) इथे एक गोष्ट मात्र चांगली होती, माहिती संकलन [Content developement] हया विभागात ब-याच सुंदर कन्यका असल्याने मानेला चांगला व्यायाम होत असे. तरीही काही महिन्यांतच मी ह्या नोकरीला कंटाळलो नि रुजू झाल्यापासून दहा महिन्यांच्या आतच मी तिला रामराम ठोकला.

दुसरी कंपनीही छोटीशीच होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती जुन्या कंपनीच्या इमारतीतच, पण वरच्या मजल्यावर होती. (लोक रूढार्थाने जातात, मी ख-या अर्थाने नोकरीत वर वर जात होतो!) इथे मात्र माझा पार पिट्टा पडला. जुन्या कंपनीत जेवढे काम मी १० महिन्यात केले नसेन, तेवढे काम मी इथे एका आठवड्यात केले. इथे माझे साहेब होते 'सोर' सर. (आड)नाव विचित्र वाटत असले तरी हे साहेब मराठीच होते. वयाने तरूण असले तरी 'साहेब' हा शब्द उच्चारला असता जी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते अगदी तशाच वृत्तीचे हे सद्गृहस्थ होते. आम्हाला मानसिक त्रास देण्यात ह्या 'सोर' साहेबांना अगदी असूरी (की 'सौरी'?) आनंद होई. प्रामाणिकपणे सांगतो, आज इतकी वर्षे होऊनही ह्या साहेबांविषयी माझे मत जराही बदललेले नाही. ह्या साहेबांचा चेहरा समोर आला की त्यांचे ते बसके नाक एक ठोसा मारून int चे short बनवावे असे आजही मला वाटते! तीन महिन्यांतच या कंपनीलाही मी रामराम ठोकला नि सध्याच्या कंपनीत रुजू झालो. इथे मी चार वर्षे आहे. काम चांगले आहे, पगारही पोटापुरता आहे; एकंदर दिवस बरे चालले आहेत!

असो, ही कहाणी पुरे झाली, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पाच वर्षे घालवल्यानंतर काढलेले निष्कर्ष आता मी तुमच्यासमोर मांडतो. माझ्या आयुष्याचे सिंहावलोकन [भारी शब्द आहे नै हा?] करत असताना ठळकपणे आठवणारे रम्य रस्ते नि धोकादायक वळणे मी शब्दबद्ध करून वाचकांसमोर ठेवतो आहे, या क्षेत्रात येऊ इच्छिणा-या नवोदितांना या आठवणी सहाय्यकारी ठरतील अशी आशा करतो! [बापरे!]

माझ्या मते, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे या गोष्टी हव्यात.

१)आत्मविश्वास : सोप्या शब्दांत सांगायचे तर आत्मविश्वास म्हणजे आपण काहीही करू शकतो हा विश्वास. अगदी काहीही, म्हणजे नऊ बायका उपलब्ध असतील तर एका महिन्यात मूल जन्माला घालणे किंवा 'विन्डोज सेवन' सारखी संगणक प्रणाली दोन महिन्यात बनविणे इ. कामे. आत्मविश्वास असेल तर बाकीचे कुठलेही गुण नसले तरी चालतात एवढा महत्वाचा हा गुण आहे. आता माझेच पहा ना! पूर्वी मी साहेबांना अचूक माहिती देतानाही चाचरत असे, आज मी साहेबांना चुकीची माहितीही मोठ्या खात्रीने देऊ शकतो; हा आत्मविश्वासाचाच परिणाम नव्हे काय? तेव्हा, नेहमी आत्मविश्वासाने वावरावे आणि आपण काहीही करू शकतो हा विश्वास चेहे-यावर सतत दिसू द्यावा.

२)पुढेपुढे करण्याची सवय : मा.तं. क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी हा गुणही फारच महत्वाचा आहे. दिलेल्या कामाव्यतिरिक्त इतर ज्यादा जबाबदारी घेण्यास तुम्ही उत्सुक आहोत हे तुम्हाला वरिष्ठांना सतत दाखवून देता यायला हवे. त्यासाठी नेहमी पुढेपुढे करत रहावे, विशेषत: बडे साहेब उपस्थित असतील तेव्हा. 'केक कुणीकुणी खाल्ला नाही?' असे विचारल्यावर वाढदिवसाला आलेली मुले जशी 'मी! मी!' ओरडतात अगदी तसेच तुमच्या साहेबांनी कामाची यादी वाचून दाखवल्यावर 'मी! मी!' असे ओरडावे. फिकर करू नये, त्यातली निम्मी कामे रद्द होतात. राहिलेल्या कामांमधली सोपी कामे ठेवून बाकीची कामे तुमच्या हाताखालच्या लोकांकडे सोपवावीत. स्वत:कडे फक्त बड्या साहेबांसमोर सादरीकरण, त्यांना दैनंदिन प्रगती रिपोर्ट पाठवणे इत्यादी कामे ठेवावीत. सादरीकरण करताना 'हे काम किती अवघड होते.' हे प्रत्येक कामाबाबत न चुकता सांगावे.

३)सकारात्मक दृष्टीकोन : कुठल्याही घटनेतून चांगलाच अर्थ काढण्याची सवय म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन. म्हणजे जर कुठे भूकंप झाला नि सारे गाव उध्वस्त झाले तर 'अरे वा! बरे झाले, आता पुन्हा नव्याने सुरूवात करता येतील, जुन्या चुका टाळता येतील' असे तुम्हाला म्हणता यायला हवे. कुठलीही नविन कल्पना मांडली की ती कशी चुकीची आहे नि प्रत्यक्षात उतरवण्यास कशी अडचणीची आहे हे सांगणा-या लोकांचा एक गट असतो, या गटात आपण येणार नाही याची काळजी घ्यावी. [विशेषत: ती कल्पना तुमच्या साहेबांची असेल तर.] कुठल्याच कामाला नाही म्हणू नये. [त्याचा काहीही उपयोग नसतो हे तसेही तुम्हाला काही दिवसातच कळतेच.] जे काम दिले ते करत रहावे, जर काम बनले तर साहेबांची स्तुतिगीते गावीत आणि जर बिनसले तर साहेबांना डोके कसे नाही अशी बोंब मारावी, दोन्ही वेळा जीत तुमचीच!

४)नविन गोष्टी वेगाने शिकण्याची क्षमता : माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे एक वेगाने बदलणारे क्षेत्र आहे; इथे टिकायचे असेल तर तुम्हास स्वत:ला अद्यावत ठेवता यायला हवे. पण स्वत:ला अद्यावत ठेवण्य़ासाठी ज्ञान मिळवण्याची आवश्यकता नसते हा महत्वाचा मुद्दा ध्यानात ठेवावा. जुजबी माहितीने काम होत असताना ज्ञान मिळवण्यासाठी धडपडणे म्हणजे घरात उजेड पाडण्यासाठी १० रुपयात १०० वॅटचा दिवा मिळत असतानाही त्यासाठी सूर्याच्या गोळ्यामागे धावण्यासारखे आहे. हा गाढवपणा करू नये. कुठलेही नविन तंत्रज्ञान आले की त्यासंबंधी संकेतस्थळे धुंडाळावीत, त्यातले मोजून १० शब्द पाठ करावेत. या नविन तंत्रज्ञानाचा उल्लेख कुठेही झाला की हे १० शब्द फेकावेत नि समोरच्याला गार करावे.

५)संभाषणकौशल्य : इंग्रजीत संभाषण करण्यासाठी तुमचे इंग्रजी चांगले हवे हा गैरसमज मनातून आधी काढून टाकावा. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली इंग्रजी भाषा इंग्लंडमधल्या इंग्रजी भाषेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, त्यांचा परस्परसंबंध काही नाही. इथल्या भाषेचे व्याकरण नि त्यांतले शब्द पूर्णपणे वेगळे आहेत. आता Prepone हा शब्दच पहा. इंग्रजी भाषेत तो अस्तित्वात नाही, पण मातं क्षेत्रात तो प्रत्येकाकडून रोज कमीतकमी तीनदा वापरला जातो!

लिखित संभाषण : लिहिताना गोष्टी मुद्दाम अवघड करून लिहाव्यात. म्हणजे वाक्ये अशी लिहावीत की ती तीनतीनदा वाचूनही लोकांना काही समजता कामा नये. यामुळे वाचकांच्या मनात येणारे नि त्यातून पुढे निर्माण होणारे सगळे गंभीर प्रश्न टाळता येतात. म्हणजे काही कळालेच नाही तर प्रश्न विचारणार कसे? हा डाव विशेषत: SRS documents लिहिताना फार उपयोगी पडतो. पण काहीही झाले तरी 'Thanks and regards', 'Please review the same', 'One of the main reason' असे घाटी शब्दप्रयोग करण्याची गफलत करू नये, अनुभवी साहेब लगेच तुमचे पाणी ओळखतात!

मौखिक संभाषण : बोलताना याच्या अगदी उलट नीती वापरावी. कुठलीही गोष्ट समजून सांगण्याची वेळ आली की ती समजायला किती सोप्पी आहे हे पहिल्यांदाच सांगून टाकावे. त्यामुळे काहीही समजले नाही तरी कुणीही ते पुन्हा विचारण्याच्या फंदात पडत नाही. तरीही एखाद्या खमक्या माणसाने एखादा अवघड प्रश्न विचारलाच तर त्याचे उत्तर दहा मिनिटे मोठ्या विस्ताराने द्यावे. पहिले अर्धा मिनिट त्याच्या प्रश्नाविषयी बोलल्यावर नंतर गाडी सुसाट सोडावी नि भाषणाचा शेवट 'असे असल्यामुळेच आपल्या कंपनीचे भवितव्य उज्ज्वल आहे'असा करावा.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आपले स्वागत!

Monday, September 27, 2010

'दबंग' आणि आपण

सलमान खानचा 'दबंग' काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला. चित्रपट चांगला तर चाललाच पण त्याने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जास्तीत गल्ला जमवण्याचा 'थ्री इडियटस' या चित्रपटाचा विक्रमही मोडला. काहींना तर हा चित्रपट एवढा आवडला की त्यांनी तो दोनदा-तीनदा पाहिला. कुणी काहीही म्हणो, पण हे यश सलमान खानचेच आहे हे नक्की, आणि माझ्या मते हीच चिंतेची गोष्ट आहे. सलमान खानविषयी अधिक माहिती देण्याची गरज नसावी. 'मैने प्यार किया'तला निरागस नायक ते ख-या जगातला खलनायक हा सलमान खानचा प्रवास आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे. चिंकारा जातीच्या हरणांची शिकार करणे आणि मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून एका मनुष्यास यमसदनी पाठवणे असे गुन्हे करूनही सलमान आज मोकळाच आहे. आपल्या न्यायव्यवस्थेची आजपर्यंतची कामगिरी पहाता ती भविष्यातही सलमानचे काही वाकडे करू शकेल असे दिसत नाही. पण न्यायव्यवस्थेचे सोडा, ती गाढव आहे, मला आश्चर्य वाटते ते लोकांचे. सलमान खानला डोक्यावर घेऊन नाचताना तो एक गुन्हेगार आहे हे लोक कसे विसरतात? पडद्यावर त्याला नायक म्हणून पाहताना नि त्याच्या करामतींना शिट्ट्या मारताना तो वास्तवात एक खलनायक आहे हे लोक दृष्टीआड कसे करू शकतात? आपण एवढे संवेदनाहीन झालो आहोत काय? कुणा उपटसुंभ्याने काहीतरी लिहिले म्हणून जाळपोळ करणारे आपण एका माणसाचा जीव घेणा-या सलमानला मात्र वेगळा न्याय का लावतो? तेव्हा कुठे जाते आपली संवेदनशीलता, तेव्हा कुठे जातात आपल्या भावना?

अपघातात मृत पावलेली व्यक्ती जर आपली जवळची नातेवाईक असती तर ते याच निर्विकारपणे हा चित्रपट पहायला गेले असते का या प्रश्नाचे उत्तर सलमानच्या या चाहत्यांनी द्यायला हवे. अर्थात 'आम्ही सलमानचे चाहते आहोत, आम्हाला इतर गोष्टींशी घेणेदेणे नाही' असा बचाव हे लोक करू शकतात, पण तो लंगडा आहे. हाच न्याय जर लोकप्रतिनिधिंना लावला तर तेही 'आमची गुंडगिरी नजरेआड करा, जनतेची सेवा करता यावी म्हणून आम्हालाच पुन्हा निवडून द्या' असा युक्तिवाद करू शकतातच की! सलमानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकल्यामुळे त्याचे खटले वेगात चालणार नाहीत हे मान्य, पण आपण काहीही गैरकाम केले तरी जनतेचे आपल्यावर प्रेम आहे, त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे असा या गुन्हेगारांचा समज होण्यापासून तरी आपण त्यांना रोखू शकतो. असा बहिष्कार टाकून बळी पडलेल्यांना सहानूभुती दाखवण्याचा आणि न्यायव्यवस्थेच्या हळू चालीबद्दल आपण असमाधानी आहोत हे सरकारला दाखवण्याचा मुद्दाही महत्वाचा आहेच.

सलमान खान म्हटले की मला आठवतो तो त्याच्या गाडीखाली आलेल्या माणसाच्या नातेवाईकांचा तो आक्रोश. ते छायाचित्र माझ्या स्मरणात कायमचे कोरले गेले आहे. कुठे असतील ते लोक आज? आजही ते असेच कुठेतरी जनावरासारखे जगत असतील आणि एवढे होऊनही कदाचित एखाद्या फुटपाथवरच झोपत असतील. काही दिवसांनी असाच एखादा सलमान खान त्यापैकी कुणालातरी उडवेल, माध्यमे चवीने बातम्या देतील, पोलिस कारवाईचे देखावे करतील नि न्यायालये निर्णय नि त्यांना स्थगिती हा खेळ खेळत राहतील. थोडक्यात, 'मेरा भारत महान' हे वाक्य पुन्हा एकदा खोटे ठरेल आणि कितीही अमान्य केले तरी त्यासाठी आपणच जबाबदार असू!

Friday, September 17, 2010

अमेरिकेला दमवले ढेकणांनी!

'चिरकूट बांगलादेशला ढेकणासारखे चिरडू!' अशी घोषणा काही वर्षांपुर्वी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाक-यांनी केल्याचे सगळ्यांनाच आठवत असेल. बांगलादेशने भारताची काही कुरापत काढल्याने संतप्त होऊन ठाकरेंनी ही महागर्जना केली होती. पण नुसत्याच गर्जना करायच्या नि काहीच कृती करायची नाही ही बाळासाहेबांची नि कसल्या गर्जनाही करायच्या नाहीत नि कसली कृतीही करायची नाही ही आपल्या सरकारची सवय लक्षात घेता बांगलादेशच्या केसालाही धक्का लावायची हिम्मत भारताला झाली नाही हे सांगायलाच हवे का?

या गर्जनेचे अचानक स्मरण होण्याचे कारण म्हणजे याच छोट्याश्या ढेकणांनी सध्या अमेरिकेत घातलेला मोठा गोंधळ. 'या ढेकणांना ढेकणासारखे चिरडू' असे उद्गार अमेरिकन लष्करप्रमुखांनी अजून काढले नसले तरी त्यांनी 'अमेरिका बाहेर दोन नि दस्तुरखुद्द अमेरिकेत ढेकणांविरुद्ध एक अशी तीन युद्धे लढत असल्याचे (खाजगीत) मान्य केल्याचे आमचा वार्ताहर (खाजगीत) कळवतो. न्यूयॉर्क टाईम्स [http://www.nytimes.com/2010/08/31/science/31bedbug.html], लॉस ऍंजलिस टाईम्स [http://www.latimes.com/sns-health-bed-bugs,0,4665398.story], टाईम [http://www.time.com/time/travel/article/0,31542,1955180,00.html] अशा मुख्य वृत्तपत्रांमधे रोज प्रसिद्ध होणारे याबाबतचे लेख यावरून या समस्येची व्याप्ती लक्षात यावी. ढेकूण हे कीटक नेमके कसे आहेत, ते लपतात कुठे, ते रक्त पिल्याशिवायही किती दिवस जगू शकतात यासारख्या माहितीने वृत्तपत्रांमधले रकानेच्या रकाने भरले जात आहेत. हॉटेले, हॉस्पिटले, घरे यांसारख्या ठिकाणी ढेकणांच्या झुंडीच्या झुंडी आक्रमणे करत आहेत आणि त्यांच्याशी लढतालढता अमेरिकन्स अक्षरश: हतबल झाले आहेत. (खरं तर हा विषय एखाद्या होलिवूडपटासाठी किती साजेसा आहे, यावर 'स्लीपिंग विथ द एनिमी', 'द वॅम्पायर' असा एखादा झकास ऍक्शनपट बनू शकतो; एखादा हॉलिवूडनिर्माता इकडे लक्ष देईल काय?)

माझ्या मते, ढेकणांमुळे अमेरिकेच्या झालेल्या या दयनीय स्थितीचा भारत सरकारने अगदी पुरेपूर फायदा उचलायला हवा. भारतीयांना सतत घाणेरडे घाणेरडे म्हणून चिडवणा-या अमेरिकनांचा सूड घेण्याची चांगली संधी सध्या आपल्याकडे आहे. अमेरिकन कपडे/बूट यांवर बंदी, अमेरिकेतून येणा-या प्रवाशांना (त्यांच्या अध्यक्षांसह) रॉकेलचे फवारे मारल्यावरच भारतात प्रवेश आणि अमेरिकेतील ढेकूण समस्या सुटेपर्यंत अमेरिकेच्या सा-या अधिकृत सरकारी निमंत्रणांना नकार असे काही उपाय करून भारत सरकार अमेरिकेची नालस्ती करू शकते. माननीय परराष्ट्रमंत्री इकडे लक्ष देतील काय?

कोणी काहीही म्हणो, पण माझ्या मते, जगातील एकमेव महासत्ता असे स्वत:चे गोडवे गाणा-या अमेरिकेला साधा ढेकणांचा नि:पात करता येऊ नये ही मोठ्या शरमेची गोष्ट आहे. संपूर्ण जगाचा अनेकवेळा विध्वंस करता येण्याइतकी विघातक अस्त्रे असूनही अमेरिकेला साध्या ढेकणांशी लढता येऊ नये? की हा ढेकणांचा बदला आहे? 'अमक्याला सहज चिरडू, तमक्याला सहज चिरडू' असे म्हणणा-या अमेरिकनांना 'आता आम्हाला चिरडून दाखवा' असे तर ते म्हणत नसतील? का हे अमेरिकेच्या दिवसेंदिवस घटत्या सामर्थ्याचे लक्षण मानावे? एकेकाळी मोठमोठ्या राष्ट्रांना घाम फोडणारी अमेरिका आता साध्या ढेकणांपासून स्वत:ला वाचवू शकत नाही यावरून कसले अर्थ काढावेत?

कुणी काहीही म्हणो, पण ढेकणांनी सध्या अमेरिकेची झोप उडवलेली आहे हे मात्र खरे!

ता.क. अमेरिकेत ढेकणांनी घातलेल्या हैदोसावरची मजेदार व्यंगचित्रे इथे पहा. [http://cagle.msnbc.com/news/Bedbugs/main.asp]

Sunday, September 12, 2010

जातीनिहाय जनगणना - सरकारचा एक योग्य निर्णय!

अखेर सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आणि पुढील वर्षी जून ते सप्टेंबर या काळात ही जनगणना पूर्ण केली जाईल असे जाहीर केले. ‘देर आये, मगर दुरूस्त आये‘ असे म्हणावेसे वाटावे असाच सरकारचा हा निर्णय आहे. १९३१ साली शेवटची जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती; २०११ साली, म्हणजेच सुमारे ८० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अशी जनगणना पुन्हा एकदा केली जाईल आणि भारतात राहणा-या अठरापगड जातींचे बलाबल ती जगासमोर ठेवेल.

जातीनिहाय जणगनणेच्या बाजूने नि तिच्या विरुद्ध अशा दोन्ही पक्षांनी या विषयावर बरेच चर्वितचर्वण केले, आपापली बाजू मोठ्या हिरिरीने मांडली; शेवटी जातीनिहाय जणगनणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. सरकारचा हा निर्णय पूर्णपणे योग्य नि दूरगामी परिणाम करणारा आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे जातीजातींमधली तेढ वाढेल नि त्यांमधे पुन्हा वैतुष्ट्य येईल असा प्रचार विरोधी लोकांकडून केला जात होत होता, मात्र त्याला काहीही अर्थ नाही. लोकसंख्येत प्रत्येक जातीचे प्रमाण किती हे आकडे समोर आल्यामुळे जातीजातींमधले वैर अचानक का वाढेल या प्रश्नाचे उत्तर या त्यांच्याकडे नाही. या गणनेत सगळ्या जातींची नोंद होणार असली तरी तिचा निष्कर्ष सवर्णांपेक्षा मागासवर्गीयांसाठी अतिशय महत्वाचा आहे हे नक्की. कुठलीही समस्येचे निराकरण करण्याचे दोन उपाय असतात; ती एक समस्या आहे हे मुळातच अमान्य करून तिचे अस्तित्वच स्वीकारण्यास नकार देणे हा एक मार्ग आणि ती समस्या आहे हे मान्य करून, तिचा सांगोपांग, व्यवस्थित अभ्यास करून ती नष्ट करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते उपाय करणे हा दुसरा मार्ग. भारताच्या ‘जातिव्यवस्था‘ ह्या जटील समस्येवर जातीनिहाय जणगनणा हा असाच एक उपाय आहे.

मोठमोठ्या शहरांमधे जातीव्यवस्थेचे चटके फारसे जाणवत नसले तरी खेड्यात अजूनही ‘जात नाही ती जात‘ अशीच परिस्थिती आहे. तिथे आजही दलित सरपंचांना फक्त ते दलित असल्याने मारहाण होत आहे, दलित स्त्रीला नग्न करून तिची भर गावातून धिंड काढली जात आहे आणि खैरलांजीसारख्या हत्याकांडात दलितांच्या सामूहिक हत्या होत आहेत. महाराष्ट्रासारख्या सामाजिक सुधारणांचे वारे लागलेल्या राज्याची ही स्थिती तर उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांची स्थिती काय वर्णावी? तिथे आजही दलितांची स्थिती जनावरांसारखी आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे या सा-या दुर्बलांना एक आवाज मिळणार आहे. आम्ही दलित आहोत नि या एकाच कारणामुळे आम्ही या देशाचे नागरिक असूनही आज विस्थापितांसारखे जगत आहोत हा आक्रोश सारे दलित या जनगणनेतून व्यक्त करणार आहेत. दलितांची नेमकी संख्या किती, त्यांची सांपत्तिक स्थिती काय, शहरातील, खेड्यातील दलित यांचे गुणोत्तर काय हे कळून आल्यामुळे सरकारला त्यांच्या कल्याणासाठी योग्य योजना राबविणे सोपे जाणार आहे. सवर्णांचा या प्रक्रियेला विरोध अनाकलनीय आहे; ही प्रक्रिया त्यांच्यासाठीही फायदेशीर असणार आहे हे नक्की. आरक्षणामुळे दलितांचे (किंवा त्यांमधल्या एखाद्या विशिष्ट जातीचे) जीवनमान सुधारले आहे असे दिसून आले तर त्यांना दिलेल्या ह्या सुविधेचा पुनर्विचार करण्याचा हक्क सरकारला असणार आहे. याबरोबरच अनेक सवर्णही आज विपन्नावस्थेत जीवन जगत आहेत हे दिसून आल्यास त्यांच्यासाठीही आर्थिक निकषांवर आरक्षण ठेवण्याची मागणी होऊ शकते आणि ती मुळीच चुकीची असणार नाही.

जातीनिहाय जनगणनेचा फायदा सवर्ण आणि दलित, दोघांनाही होणार आहे हे नक्की. यामुळेच या निर्णयाचे स्वागत करण्यात नि त्यासाठी सरकारला सहकार्य करण्यातच दोघांचे हित आहे!