Tuesday, May 31, 2011

चितचोर - एक नितांतसुंदर, अस्सल भारतीय चित्रपट

या शनिवारी 'चितचोर' पाहिला. या चित्रपटाविषयी बरेच ऐकून होतो, शेवटी परवा तो पहायचा योग आला. बहुत काय लिहिणे, एवढेच म्हणतो की या चित्रपटाची जेवढी स्तुती करण्यात आली होती ती कमीच ठरावी असा हा चित्रपट आहे!

'चितचोर' ही कथा आहे गीता ह्या एका लहानशा गावात राहणा-या तरूणीची. गीता 'अल्लड' या शब्दाचे मुर्तिमंत उदाहरण आहे. नुकत्याच मॅट्रिकची परीक्षा दिलेल्या गीताचा बहुतांश वेळ शेजारचा राजू नि त्याच्या मित्रांबरोबर खेळण्यात जातो. गीताचे वडील गावात हेडमास्टर आहेत आणि तिची आई वरून थोडी कटकटी दिसत असली तरी आतून खूपच प्रेमळ आहे. गीता हे या दाम्पत्याचे शेंडेफळ, तेव्हा तिला अगदी श्रीमंत मुलगा मिळावा आणि तिचे जन्माचे भले व्हावे अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. अचानक त्यांची ही इच्छा फळाला येण्याची चिन्हे दिसतात, गीताच्या मोठ्या बहिणीचे - मीराचे एक पत्र घरी येते. त्यात तिने तिच्याच नात्यातल्या 'सुनील'विषयी लिहिलेले असते. सुनील नुकताच परदेशातून परतलेला आणि लठ्ठ पगार घेणारा एक इंजिनियर असतो. मजेची गोष्ट म्हणजे एका कामावर देखरेख करण्यासाठी तो काही दिवसात हेडमास्तरांच्याच गावी येणार असतो. पुढे काय होते? नाही, ते मी सांगणार नाही, ह्या प्रश्नाचे उत्तर चित्रपट पाहून मिळवण्यातच मजा आहे!

चितचोर मला आवडण्याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे त्यातली अहिंसा. चितचोर मला ख-या अर्थाने एक अहिंसात्मक चित्रपट वाटला. शारिरीक तर सोडा, भावनिक किंवा मानसिक हिंसेपासूनही तो संपूर्णपणे अलिप्त आहे. एक उदाहरण - सुनील हे पात्र नकारात्मक दाखवून प्रेक्षकांची सहानुभूती मिळवण्याची नामी संधी दिग्दर्शकाकडे होती, पण त्याने तो मोह टाळला आहे. विनोद चांगला आहे, पण सुनील वाईट नाही; तोही तितकाच चांगला आहे. मी तर म्हणेन, विनोद नव्हे तर सुनीलच या चित्रपटाचा खरा नायक आहे. साध्या मनाच्या साध्या लोकांचे चित्रण असे चितचोरचे स्वरूप आहे. चित्रपटात काहीही अवास्तव नाही, त्यातल्या संवादांना चुरचुरीत फोडणी नाही की त्यात विनाकारण घुसडलेले विनोदी प्रसंग किंवा गाणी नाहीत. मोठे कलाकार आपल्या भुमिकांमधे अगदी आतपर्यंत शिरले की चित्रपटाचे कसे सोने होते याचे चितचोर उत्तम उदाहरण आहे. दीना पाठक नि ए के हंगल तर अभिनयाचे वटवृक्ष, त्यांच्याबाबत काय बोलावे? अमोल पालेकर आणि विजयेंद्र घाटगे दोघेही उत्तम. पण खरी कमाल केली आहे झरीना वहाबने. गीताचे काम केलेली ही मुलगी मुस्लिम आहे हे जेव्हा मला कळले तेव्हा मी फक्त तोंडात बोट घालायचेच बाकी ठेवले होते. चिंचा पाडणारी गीता आणि ‘मी फक्त सुनीलशीच लग्न करणार‘ असे आईला बाणेदारपणे सांगणारी गीता ह्या दोन्ही एकच आहेत ह्यावर विश्वास ठेवणे कठीण असा अभिनय झरिनाने इथे केला आहे.

कथा, अभिनय, दिग्दर्शन, संगीत ह्या सगळ्या आघाड्यांवर चितचोर उत्कृष्ट असला तरी मला तो भावला त्याच्या अस्सल भारतीयपणामुळे. एक भारतीय चित्रपट कसा असावा याचा चितचोर आदर्श वस्तुपाठ आहे. मोठ्या शहरांत राहणा-या किंवा परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांसाठी बनवले जाणारे आजचे चित्रपट पाहिल्यावर तर चितचोर विशेष आवडावा यात नवल ते काय? चितचोर पाहिल्यावरही तो एका ठराविक चित्रपटासारखा वाटत नाही हे चितचोरचे मोठे यश आहे. गीता नि विनोद ही पात्रे नव्हेत तर ते आजही कुठेतरी एकत्र असावेत असे वाटण्याइतका चितचोर खराखुरा, या मातीतला बनला झाला आहे.

इथे चित्रपटाच्या संगीताचा विशेष उल्लेख इथे केला नाही तर त्यासारखे पाप दुसरे असणार नाही. चित्रपटातली गीते नि संगीत रविंद्र जैन यांचे आहे. डोळ्यांनी अंध असलेला हा कलाकार एवढी सुंदर गीते लिहितो काय नि त्यांना त्याहून सुंदर चाली देतो काय, सारेच अद्भुत आहे. अर्थात या गीतांना सुमधुर बनवण्याचे श्रेय येसुदास नि हेमलता या गायकांकडे जाते, ते त्यांना द्यायलाच हवे.

चितचोर पहायचा आहे असे फारसे कुणी असेल असे मला वाटत नाही, पण तरीही हा सुंदर चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर लवकरात लवकर तो पहा एवढेच माझे तुम्हाला सांगणे आहे!

Sunday, May 29, 2011

कॉलेजकाळातली ती घटना

मी आकुर्डीतल्या डी वाय पाटील अभियांत्रिकी कॉलेजात शिकत असताना घडलेली ही घटना आहे. डी वाय पाटील कॉलेजातला तो काळ आठवला की मला आजही मोठा अचंबा वाटतो, त्या दिवसांत अभ्यास सोडून मी बाकी सगळे काही केले. आयुष्यातल्या एवढ्या महत्वाच्या त्या काळात आपण असे का वागलो असू ह्या प्रश्नाचे उत्तर मला बराच विचार करूनही आजपर्यंत सापडलेले नाही. कॉलेजच्या त्या दिवसांवर लेख लिहायचा झाला तर तो 'अलिफ लैला' मालिकेच्या कुठल्याही भागापेक्षा जास्त रोमांचक होईल यात काय शंका? तूर्तास, अभियांत्रिकीची पहिल्या वर्षाची पहिली सहामाही सोडली तर नंतरच्या कुठल्याही सहामाहीत मी सगळ्या विषयांत पास झालो नाही आणि चार वर्षांचा हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास मी साडेपाच वर्षे घेतली एवढीच रंजक माहिती वाचकांना देऊन मूळ विषयाकडे वळतो.

ही घटना आहे शिवाजीनगर ते आकुर्डी लोकल प्रवासातली. पुर्वी पिंपरीला असलेले आमचे अभियांत्रिकी कॉलेज नंतर आकुर्डीला हलवले गेले आणि आम्हाला बस सोडून लोकलचा सहारा घ्यावा लागला. नेमके आठवत नाही, पण मी कॉलेजच्या दुस-या किंवा तिस-या वर्षाला असेन. नेहमीप्रमाणेच कॉलेजला उशिरा येऊन मी दुपारीच घरी परत चाललो होतो. लोकल्सना तेव्हा बरीच गर्दी असे. त्यातच पुण्याला जाणारी ही दुपारची लोकल दोन तासांनी असल्याने ब-यापैकी भरलेली असे. बसायला जागा नव्हतीच, तेव्हा आसनांशेजारी दाटीत उभे राहण्यापेक्षा बरे म्हणून मी उजव्या बाजूच्या दारात उभा राहिलो. असे उभे राहिल्यामुळे हवा लागे आणि बाहेरची दृश्येही पाहता येत. मी दारातल्या लोखंडी दांड्याला टेकलो आणि टंगळमंगळ करीत बाहेर पहायला सुरुवात केली. थोड्याच वेळात गाडीने चिंचवड स्टेशन मागे टेकले आणि ती पिंपरी स्टेशनात शिरली. काही लोक उतरले, बरेच लोक चढले. गाडी आता कुठल्याही क्षणी निघेल अशी स्थिती असताना अचानक मला समोरून एक माणूस येताना दिसला. तो जोरात पळत होता आणि त्याचे कारण सोपे होते, त्याला ही गाडी पकडायची होती. अशा वेळी पादचारी पुलाचा वापर कोण कशाला करेल? त्याने पटकन फलाटावरून खाली उडी टाकली आणि शेजारची रेल्वेलाईन पार करून तो माझ्या दाराजवळ आला. पण अडचण अशी होती की फलाट गाडीच्या डाव्या बाजूला होता आणि उजव्या बाजूने आत शिरायचे तर गाडीची उंची बरीच होती. इतक्यात गाडी सुरू झाली. 'आता काय करावे?' त्या माणसाच्या चेह-यावरचा हा प्रश्न मी स्पष्टपणे वाचला. अचानक त्याने आपला हात पुढे केला. मी त्याला उचलून वर घ्यावे यासाठी त्याने तसे केले होते हे साफ होते. मीही नैसर्गिक प्रतिक्रियेने त्याचा हात पकडला आणि त्याला वर खेचून घेऊ लागलो. पण एवढे सोपे का होते ते? त्याचा एक पाय गाडीच्या फूटबोर्डावर होता तर दुसरा पाय जमिनीवर, त्यात गाडी जोरात वेग पकडत असलेली. अशा परिस्थितीत जे होते तेच झाले आणि त्याचा गाडीच्या फूटबोर्डावरचा पाय घसरला. त्याचे दोन्ही पाय गाडीच्या चाकांकडे ढकलले गेले नि मी धरलेला त्याचा हात नि डोके सोडले तर तो मला पार दिसेनासा झाला. मी अक्षरश: हादरलो. आता कुठल्याही क्षणी एक किंकाळी आपल्या कानांवर येणार नि रक्ताच्या चिळकांड्या आपल्याला पहायला लागणार हे विचार सरसर माझ्या मनात धावले. आणि ह्या परिस्थितीत मी नेमके काय करावे हे मला कळेना! त्याचा हात सोडावा तर तो गाडीच्या चाकांखाली सापडणार आणि धरून ठेवावा तर तो गाडीसोबत फरफटणार हे नक्की. पण का कोण जाणे, मी त्याचा हात सोडण्याचा निर्णय घेतला. मी तसे करताच आपले हिरोसाहेब खाली आदळले आणि धडपडत, ठेचकाळत रुळांशेजारच्या खडीवर पडले. चित्त जरासे स्थिर होताच मी लगेच मागे वळून पाहिले आणि सुटकेचा मोठा निश्वास सोडला; आपले हिरोसाहेब अगदी धडधाकट होते, दुरूनतरी त्यांचे सगळे अवयव जागच्याजागी व्यवस्थित दिसत होते. मी आजूबाजूला पाहिले, एवढे रामायण घडले तरी कुणाला त्याचे विशेष वाटले नसावे. एकदोघांनी माझ्याकडे पाहून आपली भुवई उंचावली इतकेच. मी मात्र जाम हादरलो होतो, इतका की आपण शिवाजीनगरला कधी पोचलो आणि तिथे उतरून आपल्या बसथांब्यापर्यंत कसे गेलो हे मला कळलेच नाही!

आजही ती घटना आठवली की ह्दयाची धडधड थोडी वाढते आणि एक थंड शिरशिरी शरीरातून जाते. आपण केलेली ती हिरोगिरी त्या माणसाला आणि आपल्यालाही बरीच महागात पडली असती हा विचार मनात पुन्हा पुन्हा येत रहातो. आपण (अजाणतेपणे का होईना) कुणाच्या तरी मृत्युला कारणीभूत ठरलो असतो हा विचार कितीही म्हटले तरी भयंकरच, नाही का?

Friday, May 13, 2011

प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न!

एवढ्या मोठमोठ्या जाहिराती दाखवायला ह्या टेलिमॉल नि स्कायशॉपवाल्यांकडे
पैसा येतो कुठून? म्हणजे लोक खरंच त्यांच्या वस्तू खरेदी करतात? नजर
रक्षा कवच आणि इंग्लिश गुरू *पैसे देऊन* विकत घेणारे लोक ह्या जगात आहेत?

स्वत:चं पुन्हा पुन्हा कौतुक करताना आपण किती हास्यास्पद दिसतो हे सचिन
पिळगावकर साहेबांना कधी कळणार?

इतरांना सतत उपदेश करणारे बालाजी तांबे स्वतःच स्वत:चे आयुर्वेदिक उपचार
वापरून बारीक का होत नाहीत?

आपण हिरो म्हणून कधीच यशस्वी होणार नाही हे अभिषेक बच्चनला कधी समजणार?

स्कार्फ लावण्यात एवढा वेळ घालवणा-या दुचाकीस्वार मुली थेट हेल्मेटच का
वापरत नाहीत?

दरसाली 'यावर्षी पाऊस सरासरीइतकाच होण्याचा अंदाज' आणि 'उत्पादनात घट
झाल्याने हापूस आंब्याचे भाव चढे राहण्याची शक्यता' या बातम्या छापल्या
नाहीत तर वृत्तपत्रांचा परवाना रद्द करतात का?

आपले आर आर आबा नेहमी 'वाळूतस्करांची गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही','दहशतवादाचा धैर्याने सामना केला जाईल', 'काळाबाजारवाल्यांची गय केली
जाणार नाही' अशी भविष्यकाळातली वाक्येच का टाकतात? शाळेत  भूतकाळ
शिकवताना ते गैरहजर होते का?

लग्न जमवायच्या संकेतस्थळांवर मराठी मुली आपल्या जोडीदाराकडून 'फ्ल्युएंट
इंग्लिश' बोलता येण्याची अपेक्षा ठेवतात हे एकवेळ समजू शकतो, पण ती
अपेक्षा तरी अचूक इंग्लिशमधे व्यक्त करायला नको का?

अण्णा हजारे आपल्या 'मराठी' हिंदीत रोज वृत्तवाहिन्यांना मुलाखती देत,
त्या रोज ऐकत असल्यामुळेच केंद्राने झटपट त्यांच्या सगळ्या अटी मान्य
केल्या ही अफवा खरी का?

पुण्याच्या वाहतुकीची दिवसेंदिवस अवघड होत जाणारी स्थिती पहाता काही
वर्षांनी 'आम्ही स्वारगेटवरून शिवाजीनगरला एका तासात पोहोचत असू' असं
एखादे आजोबा आपल्या नातवाला सांगतील का?

आयपीएल स्पर्धा जर वर्षातून तीनदा भरवली तर सध्याच्या तीनपट पैसे गोळा
करता येतील हे आयपील आयोजकांच्या अजून लक्षात कसे आले नाही?

Wednesday, May 11, 2011

उघडी खिडकी

"मिस्टर नटेल, आत्या खाली येतेच आहे, तोपर्यंत मात्र तुम्हाला मलाच झेलावं लागणार आहे." पंधरा वर्षांची ती चुणचुणीत पोरगी बोलली. समोर असलेल्या पुतणीचं कौतुक करतानाच येणा-या आत्याचाही मान राखला जाईल असं काहीतरी बोलण्याचा फ्रॅम्टन नटेल यांनी प्रयत्न केला. खरंतर या खेड्यात येऊन अनोळखी लोकांना दिलेल्या औपचारिक भेटींमुळे आपल्या नसांच्या दुखण्याला आराम पडेल या गृहीतकाबाबत त्यांना अजूनही शंका वाटत होती.
"मला ओळखीच्या प्रत्येकाच्या नावाने एक पत्र मी तुला देते." त्यांची बहीण म्हटली होती. "नाहीतर तू तिथे स्वतःला एकटं कोंडून घेशील आणि कुणाशी बोलणार नाहीस. आणि तुझ्या नसा आत्ता आहेत त्यापेक्षा आणखी बिघडतील."
"तुम्हाला इथले खूप लोक माहितीयेत?" शांततेत बराच मोठा अवधी गेला आहे असं वाटल्यावर शेवटी मुलीनं विचारलं.
"क्वचित कुणीतरी." फ्रॅम्टन म्हणाले. "माझी बहीण चार वर्षांपुर्वी इथे रहायला होती, त्यामुळे तिने ओळखीसाठी मला काही पत्रे दिली आहेत."
"म्हणजे माझ्या आत्याविषयी तुम्हाला काहीच माहिती नाहीये तर!" मुलगी बोलली.
"त्यांचं नाव आणि पत्ता सोडून."
"तिच्या आयुष्यातली ती भयानक घटना तीन वर्षांपुर्वी घडली. तुमची बहीण तेव्हा इथे नसणार." मुलगी म्हणाली.
"भयानक घटना?" फ्रॅम्टनांनी तिला विचारलं. का कोण जाणे त्यांच्या सपक आयुष्यात भयानक घटनांना फारसं स्थान नव्हतं.
"तुम्हाला प्रश्न पडला असेल की वर्षातल्या या वेळीही आम्ही ती खिडकी उघडी का ठेवतो." हिरवळीवर उघडणा-या एका फ्रेंच पद्धतीच्या खिडकीकडे बोट दाखवत ती म्हणाली. "आज बरोबर तीन वर्षांपुर्वी ह्याच खिडकीतून माझ्या आत्याचे यजमान आणि तिचे दोन लहान भाऊ शिकारीसाठी गेले. मूर पार करत असताना त्यांना एका दलदलीनं गिळलं. त्यांची शरीरं शेवटपर्यंत मिळाली नाहीत."
इथे तिचा आवाज किंचीत कंपन पावला. "बिचा-या आत्याला अजूनही वाटतं की कधीतरी ते - आणि त्यांच्याबरोबर असणारा आमचा तपकिरी स्पॅनियल - याच खिडकीतून परत येतील. त्यामुळेच ती खिडकी संध्याकाळपासून अगदी दिवेलागणीपर्यंत उघडी असते. ती मला नेहमी सांगते ते कसे या खिडकीतून गेले ते - म्हणजे तिच्या यजमानांनी आपल्या हाताभोवती मेणकापडाचा कोट कसा गुंडाळला होता वगेरे वगेरे. तुम्हाला माहितीये, आजच्यासारख्या एखाद्या उदास संध्याकाळी मला खरंच असं वाटतं की ते लोक परत येतील - त्या खिडकीतूनच." असं म्हणताना तिनं खांदे उडवले. अर्थातच, तिच्या आत्याचं खोलीत आगमन होताच मिस्टर फ्रॅम्टनांचा अगदी हायसं वाटावं यात नवल ते काय! आत्या आली ती उशीर झाल्याबद्दल त्यांची माफी मागतच. "ही खिडकी उघडी ठेवल्याबद्दल तुमची काही तक्रार नाही ना? माझे यजमान नि माझे भाऊ शिकारीवरून इतक्यात येतीलच आणि ते नेहमी असेच आत येतात."
"हिवाळ्यात बदकांची शिकार" या विषयावर त्या पुढे मग बोलतच राहिल्या. मिस्टर फ्रॅम्टन यांनी थोड्या कमी भितीदायक विषयाकडे संभाषण वळवण्याचा एक प्रयत्न केला. पण त्यांना स्पष्ट दिसत होतं की यजमान बाईंचं लक्ष त्यांच्याकडे जवळपास नव्हतंच, त्या वारंवार त्यांच्यामागे असलेल्या त्या उघड्या खिडकीकडे पहात होत्या.
"डॉक्टरांनी मला मानसिक उत्तेजना आणि शारिरीक कसरतींपासून कटाक्षाने दूर रहायला सांगितलं आहे" अनोळखी माणसांनाही तुमच्या बारीकसारीक गोष्टींमधे रस असतो असा गैरसमज झाल्यासारखे फ्रॅम्टन म्हणाले.
"हो?" मिसेस सॅपलटन म्हटल्या. त्यानंतर त्या अचानक उत्तेजित झाल्या पण मिस्टर फ्रॅम्टनांचं वाक्य ऐकून नव्हे! "हां. आले शेवटी. बरोबर चहाच्या वेळेला." त्या म्हटल्या.
फ्रॅम्टन किंचित थरथरले आणि पुतणीकडे सहानुभुतीच्या दृष्टीने पाहू लागले. ती उघड्या खिडकीकडे डोळ्यात प्रचंड भितीचे भाव आणून पहात होती. फ्रॅम्टनांनी आपली मान वळवली आणि त्याच दिशेनं पाहिलं.
संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात तीन आकृत्या एका थकलेल्या स्पॅनियलसोबत किंचितही आवाज न करता हिरवळीवर चालत येत होत्या. त्या सगळ्यांकडे बंदुका होत्या आणि एकाच्या खांद्यावर एक पांढरा कोट.
मिस्टर फ्रॅम्टनांनी आपली चालायची काठी उचलली, दिवाणखान्याचे दार आणि खडीचा रस्ता हा बाहेर जायचा मार्ग आहे ह्याची अंधुकशी नोंद त्यांच्या मनाने केली होतीच.
"हा, पोचलो शेवटी!" पांढ-या कोटाचा मालक असलेला तो गृहस्थ खिडकीतून आत येत म्ह्टला. "आम्ही येताना घाईघाईने बाहेर पडले ते गृहस्थ कोण होते?"
"तुम्ही आल्यावर काहीच कारण न देता जे बाहेर पडले ते मिस्टर नटेल होते," मिसेस सॅपलटन म्हटल्या. "त्यांना बघून एखाद्याला वाटावं त्यांना भूत दिसलं."
"मला वाटतं त्यामागचं कारण आहे आपला स्पॅनियल," पुतणी म्हटली. "कुत्र्यांविषयी आपल्याला वाटणा-या भितीविषयी त्यांनी मला सांगितलं होतं. एकदा गंगेच्या किना-यावर कुत्र्यांनी त्यांचा स्मशानापर्यंत पाठलाग केला आणि त्यांना ती रात्र एका नुकत्याच खणलेल्या खड्ड्यात काढावी लागली. ते तिथे होते आणि वर ती कुत्री तोंडात फेस आणून रात्रभर त्यांच्या खड्ड्याभोवती घुटमळत होती. असं घडलं तर कुणालाही भिती वाटणारच."

धडाकेबाजपणा ही तिची खासियत होती.

एच. एच. मुन्रो (साकी) [http://en.wikipedia.org/wiki/Saki] यांच्या "द ओपन विन्डो" [http://www.eastoftheweb.com/short-stories/UBooks/OpeWin.shtml] या कथेचा स्वैर (आणि संक्षिप्त) अनुवाद.

Sunday, May 1, 2011

मॅक्डोनाल्डस् - आय एम नॉट लविन इट!

काल संध्याकाळी मॅक्डोनाल्डस् ला भेट देऊन आलो. www.FreeCharge.in या संकेतस्थळामार्फत तुम्ही तुमच्या भ्रमणध्वनी खात्यात पैसे ओतलेत की तुम्हाला (आणणावळ १० रू जास्त घेऊन) तेवढ्याच किमतीची कूपन्स घरपोच केली जातात. या संकेतस्थळावरून आलेली मॅक्डोनाल्डस् ची काही कूपन्स घरात पडून होती, ती वापरायचा आज शेवटचा दिवस आहे हे काल समजल्यावर मॅक्डोनाल्डस् मधे जावेच लागले. तिकडून परत आल्यानंतर फक्त एवढेच म्हणतो, 'आय एम नॉट लविन इट!'

मॅक्डोनाल्डस् मधल्या खाण्यावर माझा एकच आक्षेप आहे - ते खाणे खाण्यासारखे लागत नाही. तिथले चिकन नगेटस्, फिश-ओ-फिलेट आणि पनीर पफ हे पदार्थ खाल्ल्यावर ते अनुक्रमे धर्माकोल, वास न येणारे रबरी तुकडे आणि कागदाचा लगदा या घटक वस्तुंपासून बनलेले असतात असे माझे तरी पक्के मत झाले आहे. नाही म्हणजे, सगळ्यांच्या चवी सारख्याच; हा प्रकार तरी काय आहे? हे म्हणजे ताटातले पुरणपोळी, बटाट्याची भाजी आणि भजी हे पदार्थ चवीला सारखेच लागण्यासारखे झाले. काही लोकांना माझे म्हणणे खोटे वाटेल, पण यात काडीचीही अतिशयोक्ती नाही. तिथले जवळपास ५ते६ पदार्थ खाऊनही कोणता पदार्थ कुठला ते मला शेवटपर्यंत कळलेच नाही. कसे कळावे? ते कळायला त्यांच्या चवी वेगवेगळ्या नकोत? इतकेच काय, ट्रे मधे असलेले वेज पनीर पफ खाताना आपण ट्रेमधले दोन पेपर नॅपकिन्सही फस्त केल्याचे त्यांची शोधाशोध सुरू झाल्यावरच मला समजले. मूळ अमेरिकन असलेल्या ह्या कंपनीने हे पदार्थ अमेरिकेन लोकांना समोर ठेवून बनवल्याने ते असे सपक आणि बेचव लागत असावेत असा माझा तरी अंदाज आहे. हो, पण, आम्ही घेतलेल्यांपैकी फ्रेंच फ्राईज नि कोकाकोला हे पदार्थ मात्र मला आवडले. मॅक्डोनाल्डस् वाले हे पदार्थ कुणा दुस-याकडून बनवून घेतात काय?

परिस्थिती अशी असली तरी हॉटेलातली सगळी मंडळी मात्र हे पदार्थ चवीने खाताना दिसली. बहुतेक सगळी मंडळी तरूण होती. मला त्यांचे वाईट वाटले. मैत्रिणीवर किंवा मित्रावर छाप मारण्यासाठी लोकांना काय काय करावे लागते नाही? हॉटेलात भरपूर हिरवळ असल्याचा एक फायदा मात्र नक्की होता - इकडून तिकडे फिरवल्याने डोळ्यांना व्यायाम बराच झाला. (कोण म्हणतं मॅक्डोनाल्डस् आणि व्यायाम यांचा छत्तीसचा आकडा आहे?) ए़कूणच तुमचे पोट तृप्त झाले नाही तरी तुमचे डोळे मात्र तृप्त होतील याची बरोबर काळजी मॅक्डोनाल्डस् वाल्यांनी घेतलेली दिसते. कॉलेजकुमारांचे सोडा, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले माझे काही सहकारीही मॅक्डोनाल्डस् मधले हे खाणे नियमितपणे खातात असे मी ऐकतो. हे बेचव आणि सपक खाणे जे लोक पैसे देऊन मिटक्या मारत खातात, त्यांना मी सलाम करतो!

तात्पर्य : हे बर्गर, नगेटस् वगेरे एक दिवस खायला ठीक आहे, पण शेवटी, 'गड्या आपला (वडा)पाव बरा!'