Wednesday, August 17, 2011

कोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी - २

दुस-या दिवशी आम्ही लवकर उठलो आणि सगळे आवरून सकाळी साडेआठलाच बाहेर पडलो. आमचे पहिले लक्ष होते रत्नदुर्ग किल्ला. रत्नागिरीतली सगळी प्रेक्षणीय ठिकाणे पायी फिरण्यासारखी आहेत. रत्नदुर्ग किल्ल्यालाही पायी भेट देता येऊ शकते, पण आमच्याकडे वेळेची कमतरता असल्याने आम्ही रिक्षाने तिथे जाण्याचा निर्णय घेतला. रत्नदुर्ग किल्ला फारसा उंच नाही, गाडी त्याच्या अगदी टोकापर्यंत जाते. गाडीतून उतरून थोड्या पाय-या चढल्या की आपण भगवतीदेवीच्या मंदिराशी पोचतो. देवीच्या या मंदिरात काही खास नाही, प्रत्येक गावात असणा-या इतर मंदिरांसारखेच हे मंदिर आहे. पण हे मंदिर हे रत्नदुर्गभेटीचे आकर्षण नाहीच, या भेटीचे आकर्षण आहे या किल्ल्याच्या तटबंदीवरून दिसणारे अफाट सागराचे नयनरम्य दृश्य. हे खरे की आम्ही गेलो होतो ते दिवस पावसाचे असल्याने हे दृश्य नयनरम्य कमी आणि भितीदायक जास्त वाटत होते. दाटून आलेले काळे ढग, त्यांची सावली पडल्याने गडद दिसणारे पाणी, दूरवर पाऊस पडत असल्याने अस्पष्ट दिसणारे क्षितिज आणि वारा जोराने वहात असल्याने किना-यावर रोंरावत येणा-या लाटा हे सारे दृश्य एकाच वेळी पहात रहावेसे वाटणारे आणि मनात धडकी भरवणारे होते. आम्ही हे दृश्य पहात असतानाच अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि आम्ही तटबंदीच्या कमानींमधे लपलो. (बाकी अचानक येणारा जोराचा पाऊस हे कोकणाचे खास वैशिष्ट्य. कोसळायचे तर जोरदार नाहीतर नाहीच असा या पावसाचा खाक्या आहे. यामुळेच की काय, स्वच्छ सूर्यप्रकाश असला तरी खरा कोकणी पावसाळ्याच्या दिवसात छत्री काखोटीला मारूनच बाहेर पडतो.) लांबवर समुद्रात पडताना दिसणारे पावसाचे टपोरे थेंब, किल्ल्याच्या भिंतींवर सों... सों... असे पावसाचे नर्तन आणि हे सारे पहात अंग चोरून बसलेला मी! काही अनुभव आपल्या आठवणींच्या दगडी भिंतींवर कायमचे कोरले जातात, पावसात रत्नदुर्ग पहाण्याचा अनुभव हा असाच होता.

किल्ल्यानंतर आम्ही मोर्चा वळवला तो शेजारीच असलेल्या दीपगृहाकडे. बरेच अंतर चालून दीपगृहाजवळ पोचल्यावर मात्र आमची निराशा झाली. हे दीपगृह लोकांना पहाण्यासाठी खुले होते, पण संध्याकाळी मोजक्या वेळेतच. आणि तेव्हाही ते जवळून पहाता येत असले तरी प्रत्यक्ष दीपगृहात जाण्याची परवानगी नव्हती. तेव्हा लांबूनच ते पाहून आम्ही परतीचा रस्ता धरला आणि आमच्या पुढील लक्षाकडे - लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाकडे कूच केले.

लो. टिळकांचे जन्मस्थान रत्नागिरी हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझ्या भुवया थोड्या उंचावल्या हे नमूद करायलाच हवे. कारण हे वाक्य जर खरे मानले तर आम्ही लहानपणी निबंधात लिहिलेले 'लो. टिळकांचा जन्म रत्नागिरीजवळ चिखली येथे झाला' (जणू चिखलात कमळ उगवले) हे वाक्य आपोआप खोटे ठरते. गंमत म्हणजे, टिळकांच्या घराला भेट देऊनही माझ्या या शंकेचे निरसन शेवटपर्यंत झालेच नाही, ती शेवटपर्यंत तशीच राहिली. ते असो, पण टिळकांचा हा वाडा उत्तम स्थितीत राखल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करायला हवे. ज्या घरात लोकमान्यांचा जन्म झाला, ते खेळले, बागडले, तिथे फिरताना मन आनंदाने अगदी भरून येते. टिळकांचा जीवनप्रवास या घरात भित्तीफलकांच्या रुपात मांडला आहे. टिळकांचे 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' यांसारखे अग्रलेख, 'तुम्ही मला दोषी ठरवलेत, पण तुमच्याहून एक मोठी शक्ति आहे जिच्या न्यायालयात मी नक्कीच निर्दोष आहे' असे बाणेदार उदगार पाहून मन भारावते. भारतीय असंतोषाचा जनक, गीता, वेद, आर्यांचे मूळ अशा अवघड विषयांवर संशोधन करून ग्रंथ लिहिणारा लेखक, इंग्रजांविरुद्ध जनमत तयार करण्याची सुरुवात करणारा, आपल्या लेखनीने लोकमान्य बनून लोकांच्या मनांवर स्वार झालेला हा मनुष्य मराठी होता ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट नव्हे काय?

त्यानंतर आम्ही पाहिलेली दोन ठिकाणे म्हणजे मांडवी जेट्टी आणि पतितपावन मंदिर. रत्नागिरी पहायला आलेल्या लोकांनी ही दोन ठिकाणे टाळली तरी फारसे बिघडणार नाही. मांडवी जेट्टी पुण्यातल्या खडकवासला चौपाटीइतकीच प्रेक्षणीय आहे आणि सावरकरांनी खास दलितांसाठी उभारलेले पहिले मंदिर हे ऐतिहासिक महत्व सोडले तर पतितपावन मंदीरात पहाण्यासारखे विशेष काहीही नाही.

जेवण करून थोडी विश्रांती घेतल्यावर दुपारी आम्ही पुन्हा बाहेर पडलो ते थिबा पॅलेस पहाण्यासाठी. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात थिबा या राजासाठी बांधलेला हा राजवाडा आहे. थिबा ब्रह्मदेश अर्थात म्यामनार या देशाचा राजा होता. त्याची जीवनकहाणी सगळ्या राजघराण्यांच्या कहाणीइतकीच रोचक नि नाट्यपूर्ण घटनांनी ठासून भरलेली आहे. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी ब्रह्मदेशावर आक्रमण केले नि तिथल्या राजाला कैद केले. राजाला तिथेच ठेवणे धोकादायक होते, तसे केल्यास इंग्रजांविरुद्ध जनक्षोभ नि उठाव होण्याचा धोका होता. त्यामुळे इंग्रजांनी बोटीने त्यास हलवले आणि रत्नागिरीत आणून नजरकैदेत ठेवले. प्रारंभी भाड्याने घेतलेल्या जागा लहान पडू लागल्याने इंग्रजांनी थिबा राजाच्या पसंतीने हा नविन महाल बांधला. थिबा पॅलेस अगदी नावाप्रमाणेच राजेशाही आहे. ऐटबाज मांडणी, प्रमाणबद्धता, ऐसपैस विस्तार, उत्तम प्रतीच्या लाकडाचा सढळ हाताने केलेला वापर आणि सभोवताली असलेली भरपूर मोकळी जागा यामुळे हा राजवाडा प्रेक्षणीय झाला आहे. या राजमहालाचे आकर्षण आहे ते थिबा राज्याच्या मेज, सिंहासन, पलंग अशा काही वस्तु दाखवणारे दालन. या दालनाबरोबरच भारतीय पुरातत्व खात्याचे एक छोटेखानी वस्तुसंग्रहालयही राजवाड्यात आहे जे आवर्जून पहाण्यासारखे आहे. थिबा पॅलेस पाहिल्यावर एक प्रश्न मात्र मनात आल्याशिवाय रहात नाही, 'जर नजरकैदेत ठेवलेल्या राजाचा थाट हा असा असेल तर आपल्या राज्यांमधे राहणारे स्वतंत्र राजे किती थाटात रहात असतील?'

थिबा पॅलेस पाहून झाल्यावर आम्ही पोचलो जवळच असलेल्या थिबा पॉइंटला. समुद्रकिना-यावर बांधलेल्या या उंच जागेतून रत्नागिरी शहराचे (नयनरम्य वगेरे) दृश्य दिसते. गेले तर चांगले नि नाही गेले तर आणखी चांगले अशी ही जागा आहे, आवर्जून जावे असे तिथे काही नाही.

रत्नागिरी शहराची भ्रमंती आटपून आम्ही पुन्हा हॉटेलावर पोचलो तेव्हा संध्याकाळ होत होती. हलके जेवण करून आणि ब्यागा वगेरे भरून आम्ही लवकरच बिछान्यात शिरलो. दुस-या दिवशी पहाटे साडेपाचची दादर पॅसेंजर पकडायची असल्याने आम्हाला त्या दिवशी लवकर झोपणे गरजेचे होते.

Friday, August 12, 2011

कोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी

'मी वेगळा आहे म्हणून ते मला हसतात आणि ते सगळे एकसारखे आहेत म्हणून मी त्यांना हसतो.' या अर्थाचे एक इंग्रजी वाक्य आहे. आमचे थोडे असेच आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वेचा मार्ग हिरवागार झाला असताना तिने प्रवास करण्यास आम्ही उत्सुक तर एवढ्या दरडी कोसळत असताना तिने जाण्याचे कारण काय असा आमच्या विरोधकांचा सवाल. शेवटी 'ऐकावे जनाचे नि करावे मनाचे' असे आम्ही नेहमीप्रमाणे म्हटले नि कोकण रेल्वेने रत्नागिरीपर्यंत जायचे निश्चित केले. तसे केल्याने कोकण रेल्वेचा प्रवास नि रत्नागिरीदर्शन असे दोन्ही पक्षी आम्ही एकाच दगडात मारू शकत होतो. लगेच मित्रांना इ-पत्रे धाडली, पण नोकरी नि छोकरी यांच्यात दिवसेंदिवस गुरफटत चाललेल्या आमच्या मित्रांची त्यावरची प्रतिक्रिया अगदी अपेक्षित अशीच होती. काम घेऊन गेलो की ते टाळण्यासाठी सरकारी कर्मचारी जसे विविध बहाणे सांगतात अगदी तशीच कारणे आमच्या मित्रांनी दिली होती. किंबहुना माझी ही इ-पत्रे मला दिवसेंदिवस राष्ट्रपतींसाठी मंजुरीसाठी पाठविल्या जाणा-या बिलांसारखी वाटू लागली आहेत. राष्ट्रपतींची मंजुरी ही जशी एक औपचारिकता - ठरलेली गोष्ट असते तसाच ह्या मित्रांचा नकारही ठरलेलाच. पण ते असो, हो नाही करताकरता शेवटी एक मित्र तयार झाला नि दोघे तर दोघे असे म्हणत आम्ही रत्नागिरी सहलीसाठी २२ जुलै - शुक्रवारची तारीख निश्चित केली.

पुणे-ठाणे, ठाणे-रत्नागिरी आणि परतीची रेल्वे तिकिटे काढली नि मग सुरू झाली कंटाळवाणी प्रतिक्षा. या प्रतिक्षेतच सोमवार उजाडला तो कोकण रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळल्याची खबर घेऊन. त्यात गाड्या सुरू होण्यास गुरुवार उजाडेल असे कळल्याने आम्ही चिंतेत पडलो. पण आम्ही या सहलीला जावे अशी देवाचीच इच्छा असावी, त्यामुळे बुधवारीच गाड्या सुरू झाल्या नि आम्ही पुन्हा निश्चिंत झालो.

शुक्रवारी सकाळी शिवाजीनगर स्टेशनवर आम्ही सह्याद्रि 'एक्सप्रेस' पकडली खरी, पण तिच्यात बसल्यावर आपण मोठी चूक केल्याचे आमच्या लक्षात आले. आपले 'सह्याद्रि' एक्सप्रेस हे नाव या गाडीने खूपच गंभीरपणे घेतले असावे कारण मुंबई पुणे सपाट लोहमार्गावरही तिचे धावणे सह्याद्रिमधल्या डोंगररांगांमधून धावत असल्यासारखे दुडूदुडू होते. अखेर १४५ किलोमीटरचे 'विशाल' अंतर तिने ४ तासात कापले नि आम्ही ११ च्या सुमारास ठाण्याला उतरलो. तिथे काही वेळ वाट पाहिल्यावर आमच्या नेत्रावती एक्सप्रेसचे आगमन झाले आणि आमच्या रत्नागिरी सहलीला ख-या अर्थाने सुरूवात झाली. आधीची मांडवी एक्सप्रेस रद्द झाली असल्याने नेत्रावती आलेली पाहताच आम्हाला विशेष आनंद झाला हे मान्य करायलाच हवे!

कोकण रेल्वेची खरी मजा सुरू होते ती पनवेलनंतर. हळूहळू भोवतालचा सपाट प्रदेश डोंगरटेकड्यांचा बनायला लागतो आणि आपण कोकणात प्रवेश करत असल्याचे आपल्या लक्षात येते. या प्रवासाबाबत मी आजपर्यंत जे काही ऐकले होते ते कमी वाटावे असाच हा प्रवास होता. कोकणरेल्वे हा स्थापत्यशास्त्राचा एक चमत्कार आहे असे अनेक लोक म्हणतात आणि माझ्या मते ते १००% खरे आहे. आता या मार्गावरचे बोगदेच घ्या. कोकण रेल्वेचे अनेक बोगदे काही किलोमीटर लांब आहेत. या मार्गावरचा एक बोगदा तर जवळजवळ ७ किमी लांब आहे. एक अजस्त्र डोंगर फोडून एवढा बोगदा बनवणे सोपे का काम आहे? तीच गोष्ट पुलांची, खाली पाहिले तर डोळे फिरतील असे हे पूल पाहिले की थक्क व्हायला होते. लांबलचक बोगदे, प्रचंड उंच पूल, चारी बाजूंना दिसणारी हिरवाई, अचानक प्रकट होणारे धबधबे, दूरवरच्या भातखेचरांमधे चाललेली भातलागवडीची गडबड हे सारे स्वतः अनुभवावे असे आहे. किंबहुना कुठे जायचे नसले तरी फक्त हे सौंदर्य अनुभवण्यासाठी कोकण रेल्वेने एकदा प्रवास करायलाच हवा. विशेषतः रत्नागिरीच्या अलीकडचा उक्शीचा धबधबा तर अक्षरशः 'कत्ल-ए-आम' करणारा आहे.

सुमारे सात तासांचा हा अविस्मरणीय प्रवास संपून आम्ही रत्नागिरीला पोचलो तेव्हा घड्याळात सव्वासात होत होते. बाहेर येताच रत्नागिरी शहरात पोचवणा-या एसटी सेवेचा वापर करून आम्ही रत्नागिरीत पोचलो आणि तिथल्याच एका साध्या पण स्वच्छ हॉटेलात आमच्या पथा-या टाकल्या. तिथला ४०० रुपये हा दर पाहून आम्हाला आनंदाचे भरते आले असले (या पैशात पुण्यात नुसताच संडास मिळाला असता!) तरी वरवर तसे न दाखवता आम्ही आमच्या पुणेकरगिरीला जागून त्यात घासाघीस करण्याचा प्रयत्न केलाच. पण पूर्वी, 'घोडनवरा झालेला हा वर आता दुसरीकडे कुठे जात नाही' हे पाहून काही वधुपिते जसे हुंडा वाढवायला नकार देत तसेच पूर्ण रत्नागिरी फिरलेले हे प्रवासी आता पावसात कुठे जात नाहीत हे पाहून तसे करण्यास हॉटेलमालकाने सपशेल नकार दिल्याने आमचे प्रयत्न अर्थातच असफल झाले. जवळच्याच एका शुद्ध मांसाहारी हॉटेलात जेवून आम्ही परतलो तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. दिवसभर उभे असल्याने आम्ही अगदी लगेच झोपेच्या अधीन झालो. उद्याचा दिवस महत्वाचा होता, त्यादिवशी आम्हाला सगळी रत्नागिरी पहायची होती.

टीप १: या सहलीचे फोटो आपणास येथे पहाता येतील.

टीप २: मागे आमच्या अंदमान निकोबार सहलीचे प्रवासवर्णन लिहिण्याचा एक प्रयत्न मी केला होता, मात्र त्याला काहीच प्रतिसाद न आल्याने तो बारगळला. वाचकांना आवडल्यास या प्रवासवर्णनाचे पुढील भाग लिहिण्याचा मानस आहे.

Wednesday, August 10, 2011

अदेन सलाद आणि आपण

'A picture is worth a thousand words.' असे काहीसे एक वाक्य इंग्रजी भाषेत आहे. ते खरे असले तरी आपल्याला भावणारे छायाचित्र हजारात एखादेच. ते कधी आपल्याला हसवते, कधी रडवते तर कधी पूर्णपणे अस्वस्थ करून सोडते. असंच एक छायाचित्र मी नुकतंच पाहिलं, ते पाहून मी अक्षरशः हादरून गेलो.



हे चित्र आहे केनियामधले. http://www.boston.com/bigpicture/ आणि http://www.theatlantic.com/infocus/ ही जगभरातली छायाचित्रे दाखवणारी संकेतस्थळे मी नेहमी पहात असतो, त्यातल्या पहिल्या संकेतस्थळावरचे हे चित्र आहे. दुष्काळ नि यादवी या दोन संकटांच्या कचाट्यात सापडलेल्या सोमालियातील अनेक नागरिकांनी तिथून केनियात पलायन केले आहे, अशाच एका निर्वासितांच्या छावणीमधल्या एका लहानग्याचे हे चित्र आहे.

या चित्रातल्या अदेनला पाहून मी स्तब्ध झालो. खायला नसल्याने खपाटीला गेलेले पोट, कृश झालेले हात नि मोठे दिसणारे डोकं हे सारं भयंकर, पण मी अस्वस्थ झालो ते त्याचे डोळे पाहून. मला वाटले की तो आपल्या मोठ्ठाल्या डोळ्यांनी आपल्या आईला विचारतो आहे, 'आई, माझं असं का झालं गं?' पण या प्रश्नाचे उत्तर त्याच्या आईकडे नाही, कुणाकडेच नाही. माणूस या पृथ्वीवर येऊन दोन लाख वर्षांपेक्षाही जास्त वेळ झाला असताना अजूनही काही लोकांना खायला पुरेसं अन्न मिळत नाही ही वस्तुस्थिती लाजिरवाणीच नाही का? आता आपलंच पहा, आपल्या सगळ्यांमधे बाकी काही सामाईक नसेल पण एक गोष्ट नक्की सामाईक असते, ती म्हणजे तक्रार करण्याची वृत्ती. आपण सगळेच नेहमी कुरकुरत असतो. म्हणजे सायकल असेल तर दुचाकी नाही म्हणून नि दुचाकी असेल तर चारचाकी नाही म्हणून. स्वतःचे घर नसेल तर ते नाही म्हणून आणि असेल तर ते छोटे पडते म्हणून. पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण सगळेच नशीबवान आहोत, खूप नशीबवान. आणि हे सिद्ध करण्यासाठी असे एखादे छायाचित्रच पुरेसे आहे.

केनियातल्या अदेन सालेदसाठी आपण इथे बसून काहीच करू शकत नाही. पण त्याचे ते डोळे पाहून आपल्या डोळ्यांच्या कडा किंचीत पाणवाव्यात, एवढे झाले, तरी माझ्या मते ते पुरेसे आहे.