Wednesday, August 17, 2011

कोकण रेल्वेमार्गे रत्नागिरी - २

दुस-या दिवशी आम्ही लवकर उठलो आणि सगळे आवरून सकाळी साडेआठलाच बाहेर पडलो. आमचे पहिले लक्ष होते रत्नदुर्ग किल्ला. रत्नागिरीतली सगळी प्रेक्षणीय ठिकाणे पायी फिरण्यासारखी आहेत. रत्नदुर्ग किल्ल्यालाही पायी भेट देता येऊ शकते, पण आमच्याकडे वेळेची कमतरता असल्याने आम्ही रिक्षाने तिथे जाण्याचा निर्णय घेतला. रत्नदुर्ग किल्ला फारसा उंच नाही, गाडी त्याच्या अगदी टोकापर्यंत जाते. गाडीतून उतरून थोड्या पाय-या चढल्या की आपण भगवतीदेवीच्या मंदिराशी पोचतो. देवीच्या या मंदिरात काही खास नाही, प्रत्येक गावात असणा-या इतर मंदिरांसारखेच हे मंदिर आहे. पण हे मंदिर हे रत्नदुर्गभेटीचे आकर्षण नाहीच, या भेटीचे आकर्षण आहे या किल्ल्याच्या तटबंदीवरून दिसणारे अफाट सागराचे नयनरम्य दृश्य. हे खरे की आम्ही गेलो होतो ते दिवस पावसाचे असल्याने हे दृश्य नयनरम्य कमी आणि भितीदायक जास्त वाटत होते. दाटून आलेले काळे ढग, त्यांची सावली पडल्याने गडद दिसणारे पाणी, दूरवर पाऊस पडत असल्याने अस्पष्ट दिसणारे क्षितिज आणि वारा जोराने वहात असल्याने किना-यावर रोंरावत येणा-या लाटा हे सारे दृश्य एकाच वेळी पहात रहावेसे वाटणारे आणि मनात धडकी भरवणारे होते. आम्ही हे दृश्य पहात असतानाच अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि आम्ही तटबंदीच्या कमानींमधे लपलो. (बाकी अचानक येणारा जोराचा पाऊस हे कोकणाचे खास वैशिष्ट्य. कोसळायचे तर जोरदार नाहीतर नाहीच असा या पावसाचा खाक्या आहे. यामुळेच की काय, स्वच्छ सूर्यप्रकाश असला तरी खरा कोकणी पावसाळ्याच्या दिवसात छत्री काखोटीला मारूनच बाहेर पडतो.) लांबवर समुद्रात पडताना दिसणारे पावसाचे टपोरे थेंब, किल्ल्याच्या भिंतींवर सों... सों... असे पावसाचे नर्तन आणि हे सारे पहात अंग चोरून बसलेला मी! काही अनुभव आपल्या आठवणींच्या दगडी भिंतींवर कायमचे कोरले जातात, पावसात रत्नदुर्ग पहाण्याचा अनुभव हा असाच होता.

किल्ल्यानंतर आम्ही मोर्चा वळवला तो शेजारीच असलेल्या दीपगृहाकडे. बरेच अंतर चालून दीपगृहाजवळ पोचल्यावर मात्र आमची निराशा झाली. हे दीपगृह लोकांना पहाण्यासाठी खुले होते, पण संध्याकाळी मोजक्या वेळेतच. आणि तेव्हाही ते जवळून पहाता येत असले तरी प्रत्यक्ष दीपगृहात जाण्याची परवानगी नव्हती. तेव्हा लांबूनच ते पाहून आम्ही परतीचा रस्ता धरला आणि आमच्या पुढील लक्षाकडे - लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाकडे कूच केले.

लो. टिळकांचे जन्मस्थान रत्नागिरी हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा माझ्या भुवया थोड्या उंचावल्या हे नमूद करायलाच हवे. कारण हे वाक्य जर खरे मानले तर आम्ही लहानपणी निबंधात लिहिलेले 'लो. टिळकांचा जन्म रत्नागिरीजवळ चिखली येथे झाला' (जणू चिखलात कमळ उगवले) हे वाक्य आपोआप खोटे ठरते. गंमत म्हणजे, टिळकांच्या घराला भेट देऊनही माझ्या या शंकेचे निरसन शेवटपर्यंत झालेच नाही, ती शेवटपर्यंत तशीच राहिली. ते असो, पण टिळकांचा हा वाडा उत्तम स्थितीत राखल्याबद्दल सरकारचे अभिनंदन करायला हवे. ज्या घरात लोकमान्यांचा जन्म झाला, ते खेळले, बागडले, तिथे फिरताना मन आनंदाने अगदी भरून येते. टिळकांचा जीवनप्रवास या घरात भित्तीफलकांच्या रुपात मांडला आहे. टिळकांचे 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' यांसारखे अग्रलेख, 'तुम्ही मला दोषी ठरवलेत, पण तुमच्याहून एक मोठी शक्ति आहे जिच्या न्यायालयात मी नक्कीच निर्दोष आहे' असे बाणेदार उदगार पाहून मन भारावते. भारतीय असंतोषाचा जनक, गीता, वेद, आर्यांचे मूळ अशा अवघड विषयांवर संशोधन करून ग्रंथ लिहिणारा लेखक, इंग्रजांविरुद्ध जनमत तयार करण्याची सुरुवात करणारा, आपल्या लेखनीने लोकमान्य बनून लोकांच्या मनांवर स्वार झालेला हा मनुष्य मराठी होता ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट नव्हे काय?

त्यानंतर आम्ही पाहिलेली दोन ठिकाणे म्हणजे मांडवी जेट्टी आणि पतितपावन मंदिर. रत्नागिरी पहायला आलेल्या लोकांनी ही दोन ठिकाणे टाळली तरी फारसे बिघडणार नाही. मांडवी जेट्टी पुण्यातल्या खडकवासला चौपाटीइतकीच प्रेक्षणीय आहे आणि सावरकरांनी खास दलितांसाठी उभारलेले पहिले मंदिर हे ऐतिहासिक महत्व सोडले तर पतितपावन मंदीरात पहाण्यासारखे विशेष काहीही नाही.

जेवण करून थोडी विश्रांती घेतल्यावर दुपारी आम्ही पुन्हा बाहेर पडलो ते थिबा पॅलेस पहाण्यासाठी. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात थिबा या राजासाठी बांधलेला हा राजवाडा आहे. थिबा ब्रह्मदेश अर्थात म्यामनार या देशाचा राजा होता. त्याची जीवनकहाणी सगळ्या राजघराण्यांच्या कहाणीइतकीच रोचक नि नाट्यपूर्ण घटनांनी ठासून भरलेली आहे. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांनी ब्रह्मदेशावर आक्रमण केले नि तिथल्या राजाला कैद केले. राजाला तिथेच ठेवणे धोकादायक होते, तसे केल्यास इंग्रजांविरुद्ध जनक्षोभ नि उठाव होण्याचा धोका होता. त्यामुळे इंग्रजांनी बोटीने त्यास हलवले आणि रत्नागिरीत आणून नजरकैदेत ठेवले. प्रारंभी भाड्याने घेतलेल्या जागा लहान पडू लागल्याने इंग्रजांनी थिबा राजाच्या पसंतीने हा नविन महाल बांधला. थिबा पॅलेस अगदी नावाप्रमाणेच राजेशाही आहे. ऐटबाज मांडणी, प्रमाणबद्धता, ऐसपैस विस्तार, उत्तम प्रतीच्या लाकडाचा सढळ हाताने केलेला वापर आणि सभोवताली असलेली भरपूर मोकळी जागा यामुळे हा राजवाडा प्रेक्षणीय झाला आहे. या राजमहालाचे आकर्षण आहे ते थिबा राज्याच्या मेज, सिंहासन, पलंग अशा काही वस्तु दाखवणारे दालन. या दालनाबरोबरच भारतीय पुरातत्व खात्याचे एक छोटेखानी वस्तुसंग्रहालयही राजवाड्यात आहे जे आवर्जून पहाण्यासारखे आहे. थिबा पॅलेस पाहिल्यावर एक प्रश्न मात्र मनात आल्याशिवाय रहात नाही, 'जर नजरकैदेत ठेवलेल्या राजाचा थाट हा असा असेल तर आपल्या राज्यांमधे राहणारे स्वतंत्र राजे किती थाटात रहात असतील?'

थिबा पॅलेस पाहून झाल्यावर आम्ही पोचलो जवळच असलेल्या थिबा पॉइंटला. समुद्रकिना-यावर बांधलेल्या या उंच जागेतून रत्नागिरी शहराचे (नयनरम्य वगेरे) दृश्य दिसते. गेले तर चांगले नि नाही गेले तर आणखी चांगले अशी ही जागा आहे, आवर्जून जावे असे तिथे काही नाही.

रत्नागिरी शहराची भ्रमंती आटपून आम्ही पुन्हा हॉटेलावर पोचलो तेव्हा संध्याकाळ होत होती. हलके जेवण करून आणि ब्यागा वगेरे भरून आम्ही लवकरच बिछान्यात शिरलो. दुस-या दिवशी पहाटे साडेपाचची दादर पॅसेंजर पकडायची असल्याने आम्हाला त्या दिवशी लवकर झोपणे गरजेचे होते.

1 comment: