अखेर तो दु:खद दिवस उजाडला आहे आणि आपल्या आवडत्या बाप्पांना निरोप देण्याची वेळ झाली आहे. गणेशोत्सवाचे हे असेच असते. हा हा म्हणता विसर्जनाचा दिवस उजाडतो आणि ‘अरे, आत्ताच तर बसले होते गणपती, जायची वेळ आली पण!’ असे उद्गार आपसूक ओठांवर येतात. माणूस कितीही कठोर असो, ठार नास्तिक असो(माझ्यासारखा), पण बाप्पांना निरोप देताना गलबलल्यासारखे वाटत नसेल तर तो माणूस नव्हेच. पण गणपती आपल्याला एवढा का आवडत असेल? मला वाटते याचे कारण म्हणजे तो आपल्याला जवळचा वाटतो, एखाद्या मित्रासारखा. हे थोडेसे शाळेतल्या शिक्षकांसारखे आहे. आपल्याला शिकवणारे अनेक शिक्षक शाळेत असतात, पण आपल्याला जवळचे वाटतात ते आपल्याला मराठी शिकवणारे शिक्षक - सुंदर सुंदर कविता ऐकवणारे. शंकर, हनुमान, कृष्ण ही मंडळी मातब्बर खरी, पण ती शाळेतल्या हेडमास्तरांसारखी वाटतात. ती थोर आहेत, पण त्यामुळेच ती आपल्याला जवळची वाटत नाहीत, आपल्या गणपतीइतकी.
आमच्याकडे गणपती बसत नाहीत आणि या गोष्टीचे मला नेहमीच वाईट वाटत आलेले आहे. त्यामुळेच गणपतीत माझ्या मामाकडे गेलो की मी आत जाऊन पहिला त्याच्या घरातला गणपती पहात असे. तेव्हा पुण्याला गणपती पहायला यायचेही मोठे आकर्षण असे. सासवड आणि नंतर खेडला रहात असताना आम्ही संध्याकाळी एसटीने पुण्यात येत असू आणि रात्रभर गणपती पाहून रात्री ४/५ वाजता पुन्हा गावी जात असू. त्या रात्री पहिल्यांदा खूप उत्साह असे पण काही गणपती पाहिले की मी चालल्यामुळे थकून जाई नि डोळ्यांवर झोप अनावर होई. ‘आता बास!’ असे मी म्हटले की घरचे हसत. ‘इतक्यात थकलास?’ असे म्हणून माझी थोडी थट्टा केली जाई. आम्ही असे थांबलो की मग साहजिकच माझा मोर्चा एखाद्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे वळे. काही चटरभटर पोटात गेली की मला उर्जा मिळे आणि मी मोठ्या उत्साहाने पुढचे देखावे पाहण्यासाठी सज्ज होई. गमतीची गोष्ट म्हणजे पुण्यात आल्यानंतर मात्र पहिल्या एक दोन वर्षांचा अपवाद सोडला तर नंतर एकदाही मी गणपती पहायला गेलेलो नाही. ‘खरा पुणेकर कधीच गणपती पहायला जात नाही’ हे कुठेतरी वाचलेले वाक्य माझ्याबाबतीत तरी मी खरे करतो आहे.
असो. बाप्पा आता चालले आहेत. चौकाचौकात दिसणारी ती तेजस्वी, हसरी, आनंददायी मूर्ती आता वर्षभर दिसणार नाही हे खरे, पण त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. बाप्पा आत्ता चालले असले तरी ते पुन्हा पुढच्या वर्षी येतील. किंबहुना यावर्षीपेक्षाही आधीच. कारण त्यांना निरोप देतानाच आपण त्यांना गळ घालतो आहोत, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’
वि.सू. आम्ही हंपी(कर्नाटक) येथ गेलो असताना तिथे असलेल्या एका मोठ्या सुंदर गणेशमुर्तीचे छायाचित्र इथे डकवतो आहे, वाचकांना ते आवडेल अशी अपेक्षा करतो!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment