Monday, May 31, 2010

दिवाकरांच्या नाट्यछटा - १ (’पंत मेले, राव चढले’)

’पंत मेले, राव चढले’ हा वाक्प्रचार लहानपणी जेव्हा मी पहिल्यांदा ऐकला तेव्हा हा एक विनोदी वाक्प्रचार असावा ही जी माझी समजूत झाली ती आत्ता काही वर्षांपुर्वीपर्यंत कायम होती. अर्थात याचे कारण सोपे होते, या वाक्प्रचाराचा आगापिछा, त्याविषयी ईतर काहीच माहिती मला नव्हती. नंतर, हा वाक्प्रचार ज्या गोष्टीवरून आला ती मूळ गोष्ट मला वाचायला मिळाली आणि नाट्यछटा हा नवा साहित्यप्रकार नि तिचे जनक दिवाकर यांच्याशी माझी ओळख झाली. एखाद्या साहित्यकृतीवरून एखादा वाक्प्रचार रूढ व्हावा असे दुसरे कुठलेच उदाहरण मराठी भाषेत नाही, दिवाकरांचा थोरपणा दाखवून देण्यासाठी ही एकच गोष्ट पुरेशी आहे, नाही का?

दिवाकर उर्फ शंकर काशिनाथ गर्गे यांचा जन्म १८ जानेवारी १८८९ या दिवशी आणि मृत्यु १ ऑक्टोबर १९३१ या दिवशी झाला, अर्थात फक्त ४१ वर्षांचे आयुष्य त्यांना मिळाले. ४१ वर्षे जगून नि फक्त ५१ नाट्यछटा लिहून दिवाकर मराठी साहित्यात अमर झाले आहेत ही खरोखरच आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे. या सगळ्या नाट्यछटा एकत्र केल्या तर त्यांनी फक्त काही पाने भरतील, तरीही मराठी साहित्याचा मागोवा घेणारा ग्रंथ जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा दिवाकर आणि नाट्यछटांचे नाव त्यात असणार यात काय शंका?

दिवाकरांच्या चार नाट्यछटांविषयी आपण या लेखमालिकेत बोलणार आहोत. यातल्या पहिल्या दोन नाट्यछटा दिवाकरांच्या अतिशय गाजलेल्या नाट्यछटा आहेत तर ईतर दोन नाट्यछटा दिवाकरांच्या सर्वोत्कृष्ट नाट्यछटांमधे गणल्या जात नसल्या तरी वैयक्तिकरित्या मला आवडणा-या आहेत.

पहिली नाट्यछटा आहे, अर्थातच, ’पंत मेले, राव चढले’!

’पंत मेले, राव चढले’ ही एकमेकाविरोधी दोन प्रसंगांचे चित्रण करणारी एक उत्कृष्ट नाट्यछटा आहे. जेव्हा कुठेतरी सुर्योदय होत असतो तेव्हा दुसरीकडे कुठेतरी सूर्यास्त होत असतो हा निसर्गनियम सिद्ध करणारी ही छटा आहे दोन भागांतली. पहिला प्रसंग आहे दिवाकरपंतांच्या घरातला. पंतांचे नुकतेच निधन झाले आहे नि त्यामुळे त्यांच्यानंतर त्यांच्याघरची स्थिती हलाखीची झालेली आहे. पंतांचे घरची परिस्थिती गरीब नि पंत हे घरातले एकमेव कमावते सदस्य, त्यामुळे ते गेल्यावर कुटुंबाचा आधारच हरवल्यासारखा झाला आहे. बरोबर आहे, जेमतेम उत्पन्न असलेले घर ते, घरातला कर्ता माणूस गेल्यावर घरचा गाडा चालणार कसा? पण अशा परिस्थितीतही पंतांच्या पत्नींनी धीर सोडलेला नाही, आपल्या तीन मुलांची जबाबदारी आता आपल्या एकट्यावर आहे हे पक्के माहिती असल्यामुळे त्या लोकांची भांडी घासणे, दळण दळणे, धुणी धुणे अशी कामे करून आपला संसारगाडा ओढण्याचा नेटाने प्रयत्न करीत आहेत. त्यांचा मोठा मुलगा सगळी लाज बाजूला सोडून माधुकरी मागून त्यांना मदत करतो आहे. ह्या मोठ्या मुलाचे मनोगत हाच या नाट्यछटेचा पहिला भाग आहे. साधे पण परिणामकारक संवाद लिहून सगळा प्रसंग आपल्यासमोर उभा करण्याचे दिवाकरांचे सामर्थ्य ह्या नाट्यछटेत विशेषत्वाने दिसते. "असें काय? सोड मला! चिमणे, असे वेड्यासारखें काय करावें! रडतेस काय? जा! दार लावून घे - घरांत आपला गोपूबाळ निजला आहे ना? त्याच्याजवळ जाऊन बैस हं! रडूं नकोस, जा!" हे वाक्य किंवा "आई! आई!! कां ग अशी एकदम मोठमोठ्यानें रडायला लागलीस? मी माधुकरी मागायला जातों म्हणून? होय? - पण आई? तूं नाही का ग लोकांची भांडी घाशीत - दळण दळीत - धुणें धुवीत? तसेंच मी." हे वाक्य ही दोन त्याचीच उदाहरणे.

पंतांचे घर इथे दु:खाने भरून गेले असताना इकडे रावांच्या घरी मात्र आनंद अगदी ओसंडून वाहतो आहे. त्याला कारणही तसेच आहे. रावांना नुकतीच कार्यालयात बढती मिळून त्यांचा पगार तब्बल पाच रूपयांनी वाढला आहे! त्यातच ही बढती सहा वर्षांनी मिळाल्यामुळे तिचा विशेष आनंद रावांना आहे, इतका की त्यांनी तब्बल तीन रुपयांचे पेढे कार्यालयात वाटले आहेत. अर्थात रावांना बढती मिळण्यामागचे कारण सोपे आहे, त्यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, "नुकतेच आमचे दिवाकरपंत मेले, आणि त्यांची ही जागा मला मिळाली, बरें! - असो, ईश्वराची कृपा होती म्हणून हे दिवस तरी दिसले!" दिवाकरपंत मेले हे रावांच्या तोंडचे शब्द पहा. रावांचा अप्पलपोटेपणा आणि निर्लज्जपणा त्यातून स्पष्ट दिसतो. अर्थात एवढेच म्हणून थांबतील ते राव कसले, ते पुढे म्हणतात, "मी परवांच्या दिवशी श्रीसत्यनारायणाची पूजा करण्याचें योजिलें आहे! अहो, परमेश्वराची कृपा असली तर उत्तरोत्तर आपल्याला आणखीहि असेच सुखाचे दिवस येतील! काय? म्हणतों तें खरे आहे कीं नाहीं?" रावांचा हा स्वार्थी स्वभाव पाहून आपण चिडतो खरे, पण आपल्या आजूबाजूला जीवनात रोज असेच काहीतरी घडत असते हेही खरेच आहे, नाही का? ’सरवायवल ऑफ द फिटेस्ट’ हा नियम दररोज अवलंबला जात असलेला आपण बघतोच ना? रावांचा कितीही तिरस्कार केला तरी त्यांचा एक अंश आपल्यातही असतोच हे कुणी नाकारू शकणार आहे?

दिवाकरांनी ही नाट्यछटा लिहिली १७ मे १९१२ रोजी, म्हणजे ह्या १७ मेला या नाट्यछटेने ९८ वर्षे पूर्ण केली, तब्बल ९८ वर्षे! काम, क्रोध, ईर्षा, मत्सर, प्रेम, द्वेष अशा माणसाच्या मूळ भावनांचे ओबडधोबड पण सच्चे चित्रण करणारे साहित्य ते उत्कृष्ट साहित्य अशी उत्कृष्ट साहित्याची साधीसोपी व्याख्या करता येईल आणि माझ्यामते दिवाकरांची ही नाट्यछटा हा निकष अगदी १००% पूर्ण करते. खरे साहित्य कधीही शिळे होत नाही, कारण ते असते अस्सल, मानवी स्वभावाचे अगदी खरेखुरे चित्रण करणारे! दिवाकरांची ही नाट्यछटाही तशीच आहे, ९८ वर्षांची होऊनही तिच्यातला सच्चेपणा अगदी थोडासाही कमी झालेली नाही आणि त्यामुळेच ती आजही तितकीच अस्वस्थ करणारी आहे!


मूळ नाट्यछटा इथे वाचा - दिवाकरांच्या नाट्यछटा


Sunday, May 16, 2010

गडकरी, कुत्रे नि वाकडे शेपूट!

’मुलायमसिंग नि लालूप्रसाद हे सोनिया गांधी यांचे तळवे चाटणारे कुत्रे आहेत’ असे उदगार नुकतेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काढले, ते ऐकून हसावे की रडावे हेच कळेनासे झाले आहे. दुस-याला कुत्रा म्हणणे हा शुद्ध गाढवपणा आहे अशी कोटी इथे करता येईल, पण तसे करण्याचा मोह टाळून हेच म्हणतो की गडकरींसारख्या मोठ्या पदावरच्या माणसाकडून माझी ही अपेक्षा नव्हती. गडकरी हे भाजपसारख्या एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत, तेव्हा असे उदगार काढणे योग्य नव्हे हे ज्ञान त्यांना असणार हे नक्की, पण समोर मोठा जनसमुदाय पाहिला की मोठमोठ्या धुरिणांचा पाय घसरतो, तिथे गडकरींची काय कथा?

अर्थात भाजप या पक्षाच्या नेत्यांच्या तोंडातून त्या पक्षाला त्रासदायक ठरणारी नि अडचणीत आणणारी वक्तव्ये बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. आठवा वरूण गांधीचे ते मुस्लिमांविषयीचे उदगार किंवा अडवाणींनी केलेली महंमद अली जीनांची प्रशंसा. पण एवढे होऊनही भाजप नेते यातून काहीही शिकले नाहीत, त्यांचे वागणे अजूनही कुत्र्याच्या वाकड्या शेपटीसारखेच आहे! यादव बंधू आक्रमक झालेले दिसताच गडकरी यांनी ’आपण असे म्हटलोच नाही, आपण फक्त एका म्हणीचा संदर्भ दिला होता, पण आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला.’ अशी नेहेमीची टेप वाजविली, पण तोपर्यंत व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते. यादवद्वयींविषयी गडकरींना प्रेम नसणे मी समजू शकतो पण ते दोघेही दोन मोठ्या नि महत्वाच्या पक्षांचे सर्वेसर्वा आहेत हे विसरून कसे चालेल? गडकरींनी वापरलेली भाषा ही घरात खाजगीत बोलायची भाषा झाली, एका पक्षाध्यक्षाने हजारो लोकांसमोर व्यासपीठावर बोलायची ती भाषा नव्हे! गडकरींचे हे वक्तव्य त्यांच्या पक्षाचे मोठे नुकसान करणार यात कसलीच शंका नाही, त्याचे परिणाम आत्ता लगेच दिसणार नसले तरी ते होणार हे नक्की. या एका वक्तव्याने भाजप कुठली निवडणुका हरणार नसला तरी क्रिकेटमधे जशी एक एक धाव जास्त दिल्याने कधीकधी सामना गमवायची पाळी येते तशीच राजकारणात अशा एकेक चुका गोळा होत गेल्याने निवडणुका हरण्याची पाळी येऊ शकते हे भाजपने ध्यानात ठेवायला हवे. ज्या पक्षाचे अध्यक्ष अशी बेजबाबदार वक्त्यव्ये करतात त्या पक्षाकडून आमचे प्रश्न गांभीर्याने सोडवण्याची नि सरकार जबाबदारीने चालवण्याची अपेक्षा आम्ही कशी करणार हा प्रश्न जनतेने विचारल्यास भाजपकडे त्याचे काय उत्तर असणार आहे?

आपल्या या वाक्याने नितीन गडकरी आज प्रकाशझोतात आले असले तरी अशी धक्कादायक विधाने करून खळबळ उडवून देणे ही त्यांची जुनी खोड आहे. महाराष्ट्रात असतानाही सत्ताधीशांवर बेछूट आरोप करून मोठा धुरळा उडवून देणे हा त्यांचा एक आवडता कार्यक्रम होता, पण हे आरोप विधानसभेत होत असल्याने त्यावेळी त्यांना कायद्याचे संरक्षण होते, जे आत्ता त्यांच्याकडे नाही. एक मराठी माणूस भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यामुळे मराठी जनता आनंदली असली तरी हा आनंद फारकाळ टिकणार नाही ही काळजी गडकरी यांनी घेतल्याचे दिसते. अशी वक्तव्ये करून आपण शूर असल्याचा आव आणता येत असला आणि समाजातल्या एका विशिष्ठ वर्गाला खूश करता येत असले तरी त्याचा परिणाम उलटा होतो हे इतिहासाने अनेक वेळा सिद्ध केले आहे. सध्या भाजपची स्थिती नाजूक आहे. या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे पूर्ण पानिपत झाले, पक्षाला केमोथेरेपी नि शस्त्रक्रियेची गरज आहे हे सरसंघचालक दस्तुरखुद्द मोहन भागवत यांनी मान्य केलेले आहे. पक्षाला पुन्हा उभे करायचे असेल तर दूरदृष्टीने आखलेल्या धोरणांची, कडक शिस्तीची, प्रचंड कष्टांची नि सा-यांना बरोबर घेऊन जाणा-या नेतृत्वाची गरज आहे. प्रमुख विरोधी पक्ष या नात्याने पक्षाचे आरोग्य सुधारणे हे पक्षाइतकेच भारतीय लोकशाहीसाठीही आवश्यक आहे हे गडकरी यांना कुणी सांगेल काय?

वाढती महागाई, वाढता भ्रष्टाचार, दिवसेंदिवस जास्त भेसूर होत असलेला दहशतवाद, माओवाद्यांचे वाढते बळ, शेतक-यांची ढासळत चाललेली स्थिती असे अनेक प्रश्न आज देशासमोर असताना राजकारणी मात्र बेताल वक्तव्ये करून नवनविन वाद उत्पन्न करत आहेत यापेक्षा लज्जास्पद बाब दुसरी कुठली असू शकते?

Tuesday, May 11, 2010

पुणे पारपत्र कार्यालयातला सुखद अनुभव!

नुकतेच पारपत्र(पासपोर्ट) काढण्यासाठी पुणे पारपत्र कार्यालयात जाण्याचा योग आला. माझ्या अनेक मित्रांचे पासपोर्ट आता (न वापरताच) संपत आले असले तरी माझ्याकडे अजून पासपोर्ट नाही ही गोष्ट मला दिवसेंदिवस सलत होती, त्यामुळे पासपोर्ट काढायचा निर्णय झाला. हे एक सरकारी कार्यालय, त्यातच पारपत्र काढणे हे एक खूप किचकट काम अशी माहिती अनेकांकडून मिळाल्यामुळे तिथे जाताना मनात थोडीशी धाकधूकच होती, पण प्रत्यक्षात तिथे गेल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. ९ वाजता तिथे पोचलेला मी १२:३० वाजता पारपत्राची पावती घेऊन बाहेर पडलोही, अर्थात याचे श्रेय तिथल्या चांगल्या व्यवस्थेला नि कार्यक्षम कर्मचा-यांनाच.

माझ्या अनुभवावरून पारपत्र काढणा-यांना या सूचना उपयोगी पडाव्यात.

१) पारपत्र कार्यालयात जेवढे लवकर जाल, तेवढे उत्तम. मी सकाळी नऊ वाजता तिथे पोचलो तरी जवळजवळ १५० लोक तिथे आधीच आलेले होते. १०:३० वाजता त्यांचे पारपत्राचे काम आटपून बाहेर पडत असलेल्या काही लोकांशी मी बोललो असता ते सकाळी ७ वाजताच तिथे आल्याचे कळले. तेव्हा सकाळी ८ वाजता तिथे जाण्यास हरकत नाही, अर्थात वेळ घालवण्यासाठी सोबत पेपर/पुस्तक/गाणी ऐकण्यासाठी काहीतरी ठेवणे उत्तम. (जमल्यास पाण्याची एक बाटलीही!)

२)पारपत्राचा फॉर्म इंटरनेटवर भरावा. पारपत्र फॉर्म इंटरनेटवर/हाताने भरणे असे दोन पर्याय उपलब्ध आहेत, त्यापैकी पहिला पर्याय उत्तम. त्यामुळे तुम्हाला नि पारपत्र कार्यालयाला होणारा त्रास दोन्ही वाचतात नि चुकाही टाळता येतात. इंटरनेटवर ह्या संकेतस्थळावर (https://passport.gov.in/pms/OnlineRegistration.jsp) प्रथम सगळी माहिती भरावी, त्यानंतर एक पीडीएफ फाईल (६ पृष्टे असलेली) तयार होईल, ती छापून घ्यावी. त्याचवेळी आपल्याला भेटीचा दिनांक नि वेळ दाखवली जाईल, ती लक्षात ठेवून त्या दिवशी पारपत्र कार्यालयात जावे. आपले पासपोर्ट आकाराचे ३ फोटो ह्या छापील अर्जावर चिकटवावेत व राहिलेली इतर माहिती हाताने भरावी. (लागू न होणा-या कलमांसमोर NOT APPLICABLE असे लिहावे.)

पारपत्रासाठी हे तीन पुरावे लागतात.

१) वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला/वाहन परवाना ई.)
२) शिक्षणाचा पुरावा (पदवी प्रमाणपत्र, दहावी/बारावी पास झाल्याचे प्रमाणपत्र ई.)
३) निवासाचा पुरावा (आपल्या कंपनीचे पत्र/आपल्या बॅंकेचे खातेनोंद पत्र/विजेचे बील/टेलिफोनचे बील ई. कंपनीचे पत्र नेल्यास कंपनीच्या ओळखपत्राच्या छायांकित प्रती आवश्यक)

ही सगळी मूळ कागदपत्रे अधिक प्रत्येक कागदपत्राच्या दोन प्रती(ज्यांवर स्वत: सही करावी) असे सगळे बरोबर न्यावे. तसेच आयत्यावेळी कुठलीही कागदपत्रे जोडण्यासाठी/पाहण्यासाठी मागितली जात असल्याने तीही बरोबर ठेवणे उत्तम. (आश्चर्याची गोष्ट म्हणजे पारपत्र काढताना आयकर परतावा भरल्याची पावती/फॉर्म १६ लागतो अशी माझी खूप जुनी समजूत होती ती चुकीची ठरली. सध्या हा नियम बदलण्यात आला आहे का?)

३)पारपत्रासाठीची रांग मोठी असली तरी घाबरू नये, ती झटझट पुढे सरकते. दारातच एक व्यक्ती तुमची जुजबी माहिती विचारते नि तुमच्या अर्जावर एक शिक्का मारून कुठल्या खिडकीवर जायचे ते सांगते. मग त्या खिडकीसमोर काही खुर्च्या असतील तिथे बसा किंवा गर्दी असेल तर खुर्च्या संपल्यावर त्यामागे लोक उभे असतील त्या रांगेत उभे रहा. हळूहळू खुर्च्यांवरील लोक पुढे सरकतात नि उभे लोक खुर्च्यांवर बसतात. तुमचा क्रमांक आला की अर्ज द्या, मूळ कागदपत्रे तयार ठेवा. ती पाहिली नि सगळी कागदपत्रे व्यवस्थित असतील तर लगेच १००० रू मागितले जातील, ते द्या, तुमचे पासपोर्टचे अर्धे काम झालेच म्हणून समजा! ३ आठवड्यांनी तुमच्या स्थानिक पोलिस स्टेशनात जा, तिथे तुमची ओळख पटवा, की २ आठवड्यात पासपोर्ट घरी!

ता.क. पुणे पासपोर्ट कार्यालयात दुचाकी गाडी लावण्यासाठी एका तासाला पाच रू असा भरभक्कम दर आहे, पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही जवळच इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या आवारात कमी दराने गाडी लावू शकता!

कुठल्याही एजंटाच्या मदतीशिवाय पारपत्र काढण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!

Thursday, May 6, 2010

अजमल कसाबला फाशी, पण पुढे काय?

अखेर ’अजमल कसाब’ विरुद्ध ’भारत सरकार’ या खटल्याचा निकाल लागला नि कसाबला फाशीची शिक्षा झाली. २६ नोव्हेंबर २००८ रोजी आठ अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला, त्यांपैकी कसाब या एकमेव अतिरेक्यास जिवंत पकडण्यात आले नि त्याविरुद्ध हा खटला चालविण्यात आला. खटल्याचा निकाल आज लागला असला तरी या खटल्याला दीड वर्षे लागावी याची ठसठस मनात आहेच, अर्थात भारतीय न्यायव्यवस्थेच्या गजचालीचा वेग पाहता हा वेळ कमीच म्हणायला हवा! या महत्वाच्या खटल्यातही आपल्या गचाळ नि भोंगळ कारभाराचे दर्शन सरकारने केले, कसाबचे वकील पुन्हापुन्हा बदलले जाणे नि या हल्ल्यात मरण पावलेले वरिष्ठ पोलिस अधिकारी करकरे यांचे बुलेटप्रुफ जाकेट गहाळ होणे ही याची दोन प्रातिनिधिक उदाहरणे!

कसाबला फाशीची शिक्षा झाली असली तरी या हल्ल्यात मरण पावलेल्या १७३ भारतीयांचे प्राण काही परत येणार नाहीत हे नक्की. तुकाराम ओंबाळेंच्या कुटुंबाला ते पुन्हा कधीच दिसणार नाहीत, संदीप उन्नीकृष्ननच्या आईवडिलांच्या डोळ्यांमधला तारा हरवला तो कायमचा, करकरे, साळस्कर, कामटे यांच्या अकस्मात जाण्याने महाराष्ट्राची झालेली हानी भरून येणार नाही, हल्ल्यात मृत्यु पावलेल्या निष्पाप नागरिकांच्या नातलगांचे भावविश्व उध्वस्त झाले ते कायमचे नि महासत्ता म्हणवून घेणा-या भारताला दोन दिवस मुठभर अतिरेक्यांनी वेठीस धरले ही सामान्यांच्या मनातली बोचणीही कायमचीच.

कसाबला पकडले गेले, त्याला फाशी झाली हे खरे, पण महत्वाचा मुद्दा तो नाही, महत्वाचा मुद्दा आहे पुढे काय? भारतात अनेक शहरांमधून अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत, होत आहेत नि नंतरही होतील, ते थांबतील याची खात्री सरकार देऊ शकते काय? मुंबईवरचा हा हल्ला तिच्यावरचा शेवटचा हल्ला होता असे कोणी छातीठोकपणे सांगू शकते का? ’रोज मरे त्याला कोण रडे’ या म्हणीनुसार भारतात कुठेतरी बॉम्बस्फोट होतात, गृहमंत्री तातडीने त्या ठिकाणाला भेट देतात, मृत व्यक्तींना, जखमींना मदत जाहीर करतात नि ’ह्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो’ असे आपले नेहमीचे वाक्य टाकतात. तिकडे केंद्रातले गृहमंत्री पाकिस्तानला कडक शब्दांत ईशारा देवून आपले कर्तव्य पार पाडतात. किडामुंगीसारखी माणसे मारली जात आहेत याचे कुणालाच काहीच वाटत नाही? ह्या खटल्यात कसाबला फाशीची शिक्षा झाली असली तरी पाकिस्तानात असे अनेक कसाब भारतात घुसखोरी करण्यासाठी तयार आहेत, त्यांचे काय? भारतात होणा-या जवळपास प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार आहे हे माहीत असूनही आपले सरकार मात्र हातावर हात ठेवून बसून आहे याचे कारण काय? दहशतवादी हल्ले होतच राहतील, नागरिकांनी त्याची सवय करून घ्यावी असे तर सरकारचे म्हणणे नाही ना?

कसाबच्या खटल्याचा निकाल लागला, पण त्यातून या प्रश्नांची उत्तरे मिळण्यापेक्षा असे अनेक नविन प्रश्न तयार झाले आहेत. पण सरकारकडेच मुळी त्यांची उत्तरे नाहीत तर ती जनतेला देणार कशी!