Tuesday, December 27, 2011

छोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला?

सध्या आमच्या घराचं काम चालू आहे. घराचं काम म्हणजे पाणी खेचणारी मोटार लागणारच. पण परवा अचानक ही मोटार बंद पडली आणि आमची फे फे उडाली. (आमच्या तोंडाचं पाणी पळालं हा फालतू विनोद इथे करता येईल, पण ते असो.) आता पाणी नाही म्हणजे काम नाही, मग करायचं काय? त्यामुळे झक मारत मोटार दुरुस्त करणे आले. जवळच्या दुकानदाराने मोटार दुरुस्त करायचे १४०० रुपये सांगितले तेव्हा वाटलं 'अरे मंडईत खूप दुकानं आहेत, तिथे स्वस्तात होईल काम.' पण मंडईत गेल्यावर मात्र आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी अवस्था झाली. ह्या महाशयांनी आधीच्या दुकानदाराइतके पैसे घेतले ते घेतलेच, वर दुस-या दिवशी सकाळी मोटार द्यायचा वायदा करून मोटार दिली ती संध्याकाळी. शिवाय दुपारी आई नि भाऊ गेले असताना 'पावती नाही, मग मोटार नाही' असा नियम ऐकवून त्यांच्याशी उद्धटपणे बोलायलाही हे कमी पडले नाहीत. किरकोळ विक्री क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीविरुद्ध व्यापा-यांनी केलेले आंदोलन ताजे असतानाच ही घटना घडली आणि वाटलं 'छोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला?'

कुठल्याही क्षेत्रात सेवेची गुणवत्ता सुधारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्पर्धेला उत्तेजन. आठवा पुर्वीचे ते दिवस. फोनसाठी तेव्हा बीएसएनएल आणि केबलसाठी स्थानिक केबलवाला हेच पर्याय होते. फोनसाठी तेव्हा बरेच थांबावे लागे आणि त्यासाठी चिरीमिरी द्यावी लागे ती वेगळीच. केबलचे दर तर एकेकाळी सहाशेपर्यंत पोचले होते. (ही आठ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे, जेव्हा पेट्रोल ३५ रुपये लिटर होते!) तेव्हा टेलिफोन क्षेत्रात खाजगी कंपन्या नव्हत्या आणि केबलचे क्षेत्र प्रत्येक भाईने वाटून घेतल्यामुळे तिथेही स्पर्धा नव्हती. पण या दोन क्षेत्रांमधे स्पर्धा वाढली आणि तिथल्या सेवेचा दर्जा सुधारला. आ़ज पुण्यासारख्या शहरात जवळजवळ १० टेलिफोन कंपन्या आहेत तर सगळ्या देशात मिळून आज जवळजवळ तेवढेच डीटीएच सेवा पुरवठादार आहेत. परिणाम? आज कुठल्याही फोन कंपनीची किंवा डीटीएच कंपनीची मनमानी सहन करून घेण्याची गरज तुम्हाला नाही. 'सेवा आवडत नाही? बदला कंपनी!' एवढे हे सारे सोपे झाले आहे.

छोट्या व्यापा-यांचा माझा अनुभव तर मुळीच चांगला नाही. वस्तू दाखवण्यात हयगय करणे, नको त्या कंपनीचा माल गि-हाइकांच्या माथी मारणे, खराब झालेला/वापरण्याची तारीख उलटून गेलेला माल खपवणे, उद्धटपणे बोलणे असे प्रकार या दुकानांमधे नेहमीचेच. किंबहुना मला तर अशा दुकानांमधे खरेदी करताना एखादी लढाई लढत असल्यासारखे वाटते. म्हणजे दुकानदार आपली सगळी अस्त्रे वापरून मला फसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी माझ्याजवळच्या सगळ्या ढाली वापरून ती परतवून लावत असतो. 'ग्राहक देवो भव:' हे फक्त म्हणायलाच, वास्तविक या लोकांना गि-हाईकाची कस्पटासमानही किंमत नसते. तुम्ही निवडीला वाव देणार नाही, पैसे कमी करणार नाही आणि वर अपमान करणार तो वेगळाच! अरे काय चाललंय काय हे? पण मोठ्या दुकानांमधे असे नसते. एकतर गि-हाइकांना फसवा असे आदेश कंपन्या देऊ शकत नाहीत आणि गि-हाइकांना फसवून स्वतःचा फायदा होणार नसल्याने तिथले कामगारही असे करत नाहीत. प्रत्येक गोष्टीची किंमत तिथे ठरलेली असते आणि ती बदलून आणावी लागली तरी त्यासाठीची प्रकियाही.

आजचा काळ खुल्या अर्थव्यवस्थेचा आहे. जो उत्तम सेवा पुरवेल तोच टिकेल हे इथले सूत्र आहे. छोट्या व्यापा-यांना शेतक-यांचा आलेला पुळका म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. आपल्याला स्पर्धा आली की आपली कंबक्ती ओढवणार हे त्यांना पक्के माहिती आहे. जे जातील त्यांना जाऊ देणे नि जे तरतील त्यांचे कौतुक करणे हा आजचा नियम आहे. सरकारने हे समजून घ्यावे आणि छोट्या व्यापा-यांना मुळीच सहानुभूती न दाखवता किरकोळ विक्रीक्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी द्यावी. मनमोहनसिंगजी, आप हमारी बात सुन रहे हैं या नहीं?

Thursday, December 22, 2011

नात्यातली लग्नं - एक अघोरी प्रथा

काही गोष्टी मला नेहमीच आश्चर्यचकित करत आल्या आहेत. नात्यात होणारी लग्नं हा असाच एक प्रकार. आपल्या चुलत/मामेभावंडांशी लग्न केलेल्या अनेक व्यक्ती मला माहीत आहेत. जुनी गोष्ट सोडा, आजही (चक्क शहरातदेखील) अशी लग्नं होतात. कधीतरी अशाच एखाद्या लग्नाची पत्रिका येते आणि मी पुन्हा एकदा विचारात पडतो.

नात्यातल्या लग्नांची प्रथा कधी सुरू झाली हे मला माहीत नाही, पण ती खूप जुनी आहे हे निश्चित. आपल्या घराण्याचं रक्त 'शुद्ध' असावं, त्यात 'संकर' होऊ नये या कारणांनी पुर्वी राजघराण्यात अशी लग्न सर्रास होत. बोललं तर असंही जातं की अशा लग्नांमुळेच इजिप्तच्या राजांची पिढी अधिकाधिक अशक्त बनत गेली नि त्यात त्यांचा अंत झाला. [http://news.nationalgeographic.com/news/2010/02/100216-king-tut-malaria-bones-inbred-tutankhamun/] जुन्या काळातल्या अनेक प्रथा हद्दपार झाल्या असल्या तरी ही प्रथा मात्र अजूनही आपली लोकप्रियता टिकवून आहे हे नक्की. यात एक विनोदी गोष्ट म्हणजे स्वतःच्या धर्मात ह्या गोष्टी सर्रास होत असूनही लोक ह्याच मुद्यावर इतर धर्मांना नावं ठेवतात. म्हणजे मुसलमानांमधे मावशीच्या मुलीशी लग्न करतात म्हणून त्यांना नावं ठेवणा-या हिंदुंना त्यांच्या धर्मात मामाच्या मुलीशी लग्नं करणारी मुलं दिसत नाहीत का? आता मामा आणि मावशी ह्यांच्यात फरक काय? म्हणजे मामाच्या मुलाशी लग्न केलं तर चालेल पण मावशीच्या मुलीशी नको, असं का?

नात्यातली लग्नं टाळण्यासाठी अनेक कारणं आहेत. पहिलं आहे भावनिक कारण. म्हणजे ज्या मुलाला/मुलीला आपण आयुष्यभर भाऊ/बहीण मानलं तिच्याशी अचानक एक दिवस लग्न करायचं हे विचित्रच नाही का? (पण अशी लग्न करणा-या लोकांना असं वाटत नसावं, नाहीतर त्यांनी ते केलंच नसतं.) दुसरं आहे शास्त्रीय. http://news.bbc.co.uk/2/hi/programmes/newsnight/4442010.stm या दुव्यावर दिलेल्या माहितीनुसार अशी लग्न करणा-या जोडप्याच्या मुलांमधे काही दुर्मिळ पण गंभीर जनुकीय आजारांचं प्रमाण जास्त आढळतं. पण ही कारणं लोकांना पटत नाहीत. 'आपली घरात कुणी बाहेरची मुलगी आणण्यापेक्षा आपल्या डोळ्यांसमोर मोठी झालेली मुलगी बरी' असा विचार होतो आणि अशी लग्नं केली जातात. पण असं करून आपण होणा-या पिढीला संकंटांच्या मोठ्या दरीत ढकलतो आहोत हे या लोकांनी समजून घ्यायला हवे.

भारताची लोकसंख्या ११० कोटी आहे. त्यातल्या निम्म्या स्त्रिया पकडल्या तर त्यांची संख्या येते ५५ कोटी. त्यातल्या १० टक्के स्त्रिया २४ ते ३० या वयोगटातल्या म्हणजेच लग्नाळू आहेत असं मानलं तरी अशा मुलींची संख्या साधारण पाच कोटी येते. या पाच कोटी मुलींचा पर्याय उपलब्ध असतानाही आपल्या स्वतःच्या बहिणीशी लग्न करण्याचं कारण या महाभागांपैकी कोणी मला सांगू शकेल का?