Tuesday, November 30, 2010

बॅचलर पार्टी - एक चावट चित्रपट

बॅचलर पार्टी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर ज्या ज्या गोष्टी येतात त्या सगळ्या (नि आणखी ब-याच) गोष्टी ’बॅचलर पार्टी’ चित्रपटात ठासून भरलेल्या आहेत. टॉम हॅन्क्सचा हा चित्रपट मी पुर्वी अर्धामुर्धा पाहिला होता, नुकताच तो संपूर्ण पाहिला आणि पुन्हा एकदा हसून हसून अक्षरश: लोळायची पाळी आली.

ही कथा आहे ’रिक’ची. हा आहे एका शाळेचा बसड्रायव्हर. सरळ मनाचा, आपल्या मैत्रिणीवर मनापासून प्रेम करणारा, आपल्या मस्तीखोर मित्रांमधे रमणारा. थोडक्यात आयुष्य मजेत जगणारा एक स्वच्छंदी जीव. एके दिवशी रिक डेबीशी लग्न करण्याचा आपला निर्णय मित्रांना जाहीर करतो आणि त्यांना मोठाच धक्का बसतो. मित्र रिकच्या निर्णयावर नापसंती व्यक्त करतात पण त्याचे अभिनंदनही करतात. आता रिक एवढा आवडता मित्र म्हटल्यावर त्याच्या लग्नाआधी एक झक्कास बॅचलर पार्टी नको? (रिकला लग्नाआधी मजा करायची शेवटची संधी म्हणून) लगेच एका बॅचलर पार्टीचे आयोजन होते. डेबी रिकला पार्टीसाठी परवानगी देते खरी, पण त्याच्याकडून तिच्याशी प्रामणिक राहण्याचे वचन घेऊनच. आता पार्टी सुरळीत पार पडायला काही अडचण नाही, पण इथे एक गोची आहे. ’कोल’ - डेबीच्या वडिलांनी तिच्यासाठी पाहून ठेवलेला मुलगा (जो डेबीला अजिबात आवडत नाही) रिक डेबीच्या नजरेतून उतरावा ह्या हेतूने ह्या पार्टीचे खरे रूप उघड करू पाहतो आहे.

चित्रपटात यानंतर जे काही होते त्या सगळ्यासाठी एकच शब्द आहे - ’अशक्य’. पुढचे एक तास रिक नि त्याचे मित्र चित्रपटात अक्षरश: गोंधळ घातलात, पण या सर्वांवर कडी करतो चित्रपटाचा शेवट. आजपर्यंत कुठल्याही चित्रपटाच्या शेवटाला मी एवढा हसलो नव्हतो.(’ईट्स अ मॅड मॅड मॅड मॅड वर्ल्ड’ चा अपवाद वगळता.) पण त्याबाबत लिहून मी वाचकांचा ’मजा’ किरकिरा करणार नाही, तो स्वत: पाहण्यातच मजा आहे.

काही चित्रपट खत्रूड नशीब घेऊन जन्माला येतात हेच खरे. तसे नसते तर ते बघताना ’अरे, हा चित्रपट एवढा सुंदर असूनही लोकांना का बरं आवडला नसेल?’ असे राहूनराहून वाटले नसते. ’बॅचलर पार्टी’ देखील असाच आहे. ज्यावेळी तो प्रदर्शित झाला त्यावेळी तो विशेष चालला नाही. त्यातला विनोद इतर चित्रपटांशी तुलना करता हटकून हशा वसूल करणारा आहे आणि त्याला अश्लील म्हणावे तर त्यापेक्षा अधिक अश्लील (आणि क्वचित बीभत्सदेखील) चित्रपटांनी भरपूर गल्ला जमवलेला आहे. पण जग हे असेच चालत असते, विशेषत: चित्रपटांचे जग. त्याचे स्वत:चे काही खास नियम असतात. ते आपण सोडा, ब्रह्मदेवालाही उमगणे कठीण!

पण ते असो, आपण त्याची चिंता का करा? शेकडो चित्रपट पाहिल्यानंतर, एखादा चित्रपट किती चालला हा निकष तो चांगला आहे की नाही हे ठरवण्यासाठी फारसा उपयोगी पडत नाही असे माझे स्पष्ट मत बनले आहे. तेव्हा माझे तरी तुम्हाला हेच सांगणे आहे - तुम्ही ब्रह्मचारी असाल किंवा नसाल, ही ’बॅचलर पार्टी’ अजिबात चुकवू नका!

चित्रपटाचा विकिपिडीया दुवा इथे आहे.

Sunday, November 28, 2010

आमची अंदमान सहल - भाग १

प्रत्येक माणसाची काही स्वप्ने असतात, माझीही आहेत. ’होंडा अ‍ॅकॉर्ड’ गाडी विकत घेणे, ऑस्ट्रेलियात जाऊन ’सिडने’ ते ’पर्थ’ असा मोटारप्रवास करणे आणि ’अंदमान आणि निकोबार बेटे’ पाहणे ही त्यापैकी काही निवडक स्वप्ने. त्यापैकी ’अंदमान आणि निकोबार बेटे’ पाहण्याचे माझे स्वप्न नुकतेच पूर्ण झाले, त्याच स्वप्नप्रवासाची ही कथा आहे.

या प्रवासाची तयारी सुरू झाली ती जून/जुलै मधेच. मे मधे ’बदामी’ नि ’हंपी’ अशी सहल केल्यावर ’आता पुढची सहल कुठे’ अशी चर्चा झाली नि अंदमान आणि निकोबार बेटांचे नाव नक्की झाले. पुणे ते चेन्नै असा प्रवास रेल्वेने नि चेन्नै ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास विमानाने करण्याचे ठरले. चेन्नै ते पोर्ट ब्लेअर हा प्रवास बोटीनेही करता येतो असे आम्हाला कुणीसे सांगितले खरे, पण सावरकरांना ज्या बोटीने नेले तीच बोट आजही वापरली जाते आणि चैन्नैला बसलेल्या लोकांपैकी अंदाजे निम्मेच लोक पोर्ट ब्लेअरला पोचतात असे कळल्यावर तो बेत रद्द झाला. एअर इंडियाच्या सेवेविषयी (नि हवाई सुंद-यांविषयी) फारसे चांगले ऐकले नसले तरी हा अनुभव बोटीपेक्षा नक्कीच सुखकारक असेल असे वाटल्याने शेवटी एयर इंडियाच्या महाराजालाच संधी देण्याचे ठरले.

विमानाची तिकीटे नक्की झाली, तेव्हा मी रेल्वे तिकिटांच्या मागे लागलो. पूर्वी रेल्वेच्या प्रवासात रेल्वेची तिकीटे काढणे नि प्रत्यक्ष रेल्वे प्रवास अशी दोन साहसे असत, रेल्वेने इंटरनेटवरही तिकिटे काढण्याची सोय केल्यापासून मात्र रेल्वेप्रवासाचे एकच साहस ते काय आता बाकी राहिले आहे. मी माझ्या वातानुकुलित कार्यालयात आरामदायी खुर्चीवर बसून रेल्वेची तिकिटे काढू शकेन असे मला काही वर्षांपुर्वी कुणी सांगितले असते तर मी त्याला वेड्यातच काढले असते, सध्या मात्र महाजालाच्या कृपेने हे शक्य झाले आहे. ’टिम बर्नर्स ली’ साहेबाचे आभार मानावे तेवढे कमीच, बहुत काय लिहणे? सिनेमाची तिकिटे ब्लॅकने विकणा-या दादा लोकांसारखीच रेल्वे एजंट ही जमातदेखील काही वर्षांत नामशेष होईल की काय अशी मला आताशा भीती वाटते. असो, कालाय तस्मै नम: हेच खरे!

रेल्वेची तिकीटे मिळाली खरी, पण इथेही एक गोची होतीच. आमची रेल्वे सुटत होती रात्री (की पहाटे?) ००:१० वाजता. अनेकवेळा खात्री करूनच तिकिटे काढूनही ही तारीख चुकलेली आहे अशी भिती मला अगदी शेवटपर्यंत वाटत होती. माझे हे असेच आहे. अभियांत्रिकीचे पेपर देतानाही आपण अभ्यास करून आलोत तो पेपर आज नाहीच अशी भिती नेहमी मला वाटत असे. सुदैवाने तसे काही झाले नसले (माझे गुण पाहून काही लोक यावर विश्वास ठेवणार नाहीत) तरी हा बागुलबुवा मला अजूनही त्रास देतोच.

असो, रेल्वेची तिकीटे मिळाली आणि मी थोडासा निर्धास्त झालो. यानंतर सुरू झाले माहिती मिळवण्याचे काम. गुगल साहेबांच्या कृपेने हेही आता खूपच सोपे झाले आहे. महाजालावर मी काही हॉटेले निवडली नि त्यांचे पैसे भरून टाकले. निदान पहिल्या दिवशी तरी हॉटेल आरक्षित केलेले असावे असा आमचा सहलीचा नियम आहे, जो आम्ही इथेही पाळला.

हा हा म्हणता दिवस गेले नि जाण्याचा दिवस उजाडला. शुक्रवार कामाचा शेवटचा दिवस असल्याने सगळ्यांचा तेव्हाच निरोप घेतला होता आणि पूर्ण दिवाळी आम्ही सुट्टीवर असल्याने दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाणही तेव्हाच झाली होती. सोमवारी पहाटे ००:१० वाजता आमची रेल्वे असल्याने रविवारी रात्री दहालाच निघणे क्रमप्राप्त होते, त्याप्रमाणे निघालो. मनाला आनंद होत असला तरी आत कुठेतरी थोडीशी धाकधूक होतीच. पुढचे १४ दिवस कसे जातील हा विचार सारखा मनाला त्रास देत होता. त्यात या सगळ्या सहलीचे नियोजन मीच केले असल्याने मला थोडी अधिकच चिंता होती. पण ’आता होईल ते होईल’ असे मी मनाशी म्हटले आणि आम्ही पुणे रेल्वेस्थानकात शिरलो.

जर गलिच्छ रेल्वे स्थानकांची स्पर्धा घेतली तर पुणे रेल्वे स्थानक त्यात नक्कीच पहिला नंबर पटकावेल असे माझे तरी स्पष्ट मत आहे. दिवाळी असल्याने लोकांची झालेली प्रचंड गर्दी, त्यांनी प्लॅटफॉर्मवरच पसरलेल्या पथा-या, सा-या स्थानकभर पसरलेला लघवीचा वास हे सगळे सहन करताना फलाटावर साधे चालणेही मुश्किल झाले होते. प्रवाशांसाठी बांधलेल्या उड्डाणपुलावर तर कुठल्याही क्षणी चेंगराचेंगरी सुरू होईल इतकी गर्दी होती. तरीही आम्ही त्या गर्दीत उडी घेतली नि आपल्या सामानासहित एकदाचे फलाट क्र. ३ वर पोचलो!

रेल्वे अस्वच्छ असली तरीही तिने प्रवास करणे मला आवडते. रेल्वेने प्रवास करताना ख-या भारताचे दर्शन घडते असे कुणीसे म्हटले आहे, आणि मला वाटते ते खरेच आहे. फलाटावरचे भिकारी, मोठी बोचकी घेऊन निघालेले मजूर, वातानुकुलित डब्यातून प्रवास करणारे शिष्ट श्रीमंत लोक आणि या सा-यांपासून स्वत:ला वेगळे ठेवणारे मध्यमवर्गीय असा एक अनोखा संगम तिथे दिसतो. असेच इकडेतिकडे पहाता पहाता वेळ कसा गेला ते कळलेही नाही नि एकदाचे १२:१० झाले. रेल्वे चक्क वेळेवर आलीही. तिकीटे नक्की झाली असल्याने डबा क्रमांक आणि बर्थ क्रमांक आमच्याकडे होतेच. आम्ही आमच्या S१ डब्याजवळ पोचलो आणि बाहेर लावलेल्या तक्त्यावर आमची नावे शोधू लागलो. तक्ता वाचताना मी एके ठिकाणी थबकलो, तिथला तो मजकूर पाहून मला आश्चर्याचा असा मोठा धक्का बसला म्हणता!

Friday, November 26, 2010

पुलंचे एक रटाळ पुस्तक

'पुलंचे एक रटाळ पुस्तक' हे शीर्षक वाचून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल (कदाचित चिडलाही असाल) यात काही शंका नाही. पुलं आणि रटाळ या दोन गोष्टी एका वाक्यात एकत्र येणे कदापि शक्य नाही असे त्यांच्या चाहत्यांचे मत आहे, आणि ते योग्यच आहे. पुलंचे जवळपास सगळेच लिखाण सकस आणि दर्जेदार आहे. पाट्या टाकणे हे काम पुलंनी आपल्या आयुष्यात कधीही केले नाही आणि त्यांची पुस्तके वाचतानाच काय, त्यांची भाषणे ऐकताना आणि त्यांचे एकपात्री प्रयोग पाहतानाही याची खात्री पटते. त्यामुळेच मी पुलंचा मोठा पंखा आहे आणि त्यांच्या अनेक पुस्तकांची मी पारायणे केली आहेत.

असे असले तरी पुलंचे अगदी झाडून सगळे लिखाण उत्तम आहे असे म्हणणे म्हणजे सत्याशी प्रतारणा करण्यासारखे ठरेल. कुठल्याही साहित्यकृतीचे मूल्यमापन करताना ते वस्तुनिष्ठ पद्धतीनेच केले जायला हवे. ते करताना त्या साहित्यकृतीचा जनक कोण, त्याचे साहित्यातील योगदान काय या बाबी विचारात घेतल्या जाता कामा नयेत. पुलंचे सुरुवातीचे लेखन पाहिले की माझ्या विधानाची खात्री पटावी. पुलंच्या नंतरच्या लिखाणात दिसणारा सफाईदारपणा, सहजता, सराईतपणा त्यात नाही. अर्थात, हे साहजिकच आहे. लेखक हा शेवटी एक माणूसच, तोही प्रत्येक दिवसागणिक घडत, शिकत असतो. पण असे असले तरी त्यांच्या चाहत्यांनी नाराज होण्याचे कारण नाही. एखादी साहित्यकृती सामान्य दर्जाची म्हटली म्हणून तिचा लेखक सामान्य ठरला असे नाही. (आणि लेखक महान असला म्हणजे त्याची प्रत्येक साहित्यकृती महान असलीच पाहिजे असेही नाही!)

आता पुन्हा एकदा वळूयात या लेखाच्या विषयाकडे - तो म्हणजे पुलंचे 'खोगीरभरती' हे पुस्तक. 'खोगीरभरती' हे पुलंचे दुसरे पुस्तक. 'तुका म्हणे आता' या नाटकानंतर आलेले हे पुस्तक त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात अगदी सुरुवातीला लिहिलेले आहे. पुस्तकात एकूण १७ लेख आहेत, त्यातली ४ भाषणे आहेत. वर म्हटल्याप्रमाणे पुलंचे हे लिखाण त्यांचे सुरुवातीचे लिखाण आहे. एका नव्या लेखकाचा अननुभवीपणा त्यात अगदी स्पष्ट दिसतो. पुलं ज्या विनोदासाठी ओळखले जातात तो सहज नि स्वाभाविक विनोद या पुस्तकात जवळपास नाहीच असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. या पुस्तकातले सगळेच विनोद हे अगदी ओढूनताणून केल्यासारखे वाटतात. एका होतकरू लेखकाची छाप या पुस्तकातल्या प्रत्येक लेखावर अगदी स्पष्ट दिसते. 'नाटक कसे बसवतात' आणि 'पानवाला' हे लेख सोडले तर बाकीचे सगळे लेख हे काही सांगण्यासारखे किंवा लिहिण्यासारखे आहे या कारणापेक्षा एक विनोदी लेख लिहायचा म्हणूनच लिहिल्यासारखे वाटतात.

तसे असेल तर असो! पण या लेखाचा उद्देश काय हा प्रश्न उरतोच – 'पुलंच्या एका पुस्तकातले दोष दाखवणे' हा? नाही, उद्देश आहे 'अपयशाने खचून न जाता नेटाने पुढे जात रहावे' हा संदेश वाचकांना देणे. मला वाटते हा संदेश आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे. काम कुठलेही असो, दर वेळी त्यात यश मिळेलच असे नाही, आपण प्रयत्न करीत राहणे महत्वाचे. एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही, तरीही निराश न होता 'कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' या उक्तीनुसार फळाची चिंता न करता आपण आपले कर्तव्य करीत रहायला हवे. आपल्या भाईकाकांनी हेच केले. आपले पहिले नाटक पडले आणि दुसरे पुस्तकही लोकांना फारसे आवडले नाही हे दिसूत असूनही त्यांनी नेटाने आपले काम सुरुच ठेवले. 'कुणी निंदा, कुणी वंदा, आमचा मात्र लोकांना हसवण्याचा धंदा' हे पुलंच्या जगण्याचे सूत्र होते नि त्यांनी ते आयुष्यभर कसोशीने पाळले. अर्थात विनोदी लेखक एवढीच पुलंची ओळख नाही, जीवन म्हणजे काय आणि ते त्याची गोडी चाखत कसे जगावे हे त्यांनीच आपल्याला सांगितले. आपल्याला खाण्यावर, गाण्यावर, सुंदर साहित्यावर प्रेम करायला शिकवलं ते त्यांनीच. एकूणच आयुष्य रसिकतेने कसं जगावं हे आपल्याला दाखवून दिलं ते त्यांनीच.

'खोगीरभरती'सारखे पुस्तक लिहिणा-या या पुलंनीच पुढे 'बटाट्याची चाळ', 'खिल्ली', 'उरलंसुरलं', 'व्यक्ती आणि वल्ली' अशी अजरामर पुस्तके आणि 'तुझे आहे तुजपाशी','ती फुलराणी' यांसारखी नाटके लिहून मराठीजनांना वेडे केले हे लक्षात घेतले तर आपल्याला त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे!

Thursday, November 25, 2010

भारतीय लोकशाही अमर रहे!

नुकतेच बिहारमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. सर्वसामान्य जनता काय, भल्याभल्या निवडणूक तज्ञांनाही या निकालाने तोंडात बोटे घालायला लावली. १/२ नव्हे, २/३ नव्हे, ३/४ही नव्हे तर तब्बल ५/६ बहुमत नितीशकुमारांनी मिळवले, आपल्याला एवढा मोठा विजय मिळेल असे खुद्द त्यांनाही वाटले नसेल! स्वातंत्र्यापासून खितपत पडलेला बिहार आज ख-या अर्थाने स्वातंत्र्याची वाट चालू लागला आहे असे म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये!

नितीशकुमारांचा हा विजय विकासाच्या आणि सुधारलेल्या कायदा सुव्यवस्था स्थितीच्या मुद्द्यांवर आहे आणि यासाठी आपण बिहारी जनतेचे अभिनंदन करायला हवे. बिहारी जनतेला आपण दोष देत असलो तरी वस्तुस्थिती तशी नाही; आत्तापर्यंत परिस्थितीच अशी होती की त्यांच्या हाती करण्यासारखे काही नव्हते. इकडे आड नि तिकडे विहीर अशी दर निवडणुकीत त्यांची स्थिती होत असताना त्यांना दोष कसा देणार? पण जर कुणी काम करीत असेल तर जातीपातीचे राजकारण विसरून आम्ही त्याला पाठिंबा देऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आणि यासाठी खरोखरच त्यांची पाठ थोपटायला हवी.


याचबरोबर हेही स्पष्ट आहे की हा लालूंचा नि गांधी द्विकुटाचाही पराभव आहे. जातीपातीचे किळसवाणे राजकारण करणारे आणि बिहारला ५० वर्षे मागे नेणारे लालूं यादव यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. तीच गोष्ट राहुल गांधींची. काँग्रेसने कितीही नाकारले तरी हा त्यांचा सरळसरळ पराभव आहे यात काय शंका? अनेक महत्वाच्या मुद्यांवर बिहारचा लक्षणीय विकास झालेला दिसत असूनही राहुल गांधीनी ही बाब मान्य केली नाही; याउलट बिहारमधे जो काही थोडाफार विकास झाला आहे तो केंद्रामुळेच अशी खोटी बतावणी त्यांनी केली. अरे वा रे वा! विकास झाला नाही की तो स्थानिक राजकारण्यांमुळे नि तो झाला की केंद्रामुळे? हा कुठला न्याय? आपण केवळ आपल्या करिष्याच्या जोरावर लोकांना जास्त वेळ गुंतवून ठेवू शकत नाही हे राहुल गांधींनी मान्य करावे आणि नुस्ती भाषणे करण्यापेक्षा विकासकामांकडे जास्त लक्ष द्यावे.

आता महत्वाचा प्रश्न! महाराष्ट्रात असे घडेल काय? याचे उत्तर सोपे आहे, अर्थातच नाही! आपण कितीही म्हटले तरी जातींचे राजकारण अजूनही महाराष्ट्रात चालू आहेच; मराठी माणूस बोलतो बराच, पण वेळ आली की आपल्या जातीतल्या माणसालाच मत देतो हे पुन्हापुन्हा सिद्ध झाले आहे. नितीशकुमारांसारखा कुठलाही जाती-आधार नसलेला नेता मुख्यमंत्री होणे ही बाब महाराष्ट्रात तरी अशक्य आहे. याशिवाय नितीशकुमारांसारखा कर्तबगार कुणी नेताही विरोधी पक्षाकडे नसणे हाही मुद्दा आहेच. म्हणजे सत्ता काँग्रेस आघाडीकडून काढायची, पण द्यायची कुणाला? गोपीनाथ मुंडे आणि उद्धव ठाकरे यांना? या कारणामुळे बिचारा मराठी मतदार 'दगडापेक्षा वीट मऊ' असे म्हणत पुन्हा आघाडीलाच संधी देतो हे आपण मागे पाहिले आहेच.

ते असेल ते असो, पण बिहारमधल्या या निवडणुक निकालाने सगळ्या जगाला भारतातल्या लोकशाहीची एक चु़णूक दाखवली आहे आणि माझ्या मते हेच सगळ्यात महत्वाचे आहे! भारतीय लोकशाही अमर रहे!