Thursday, November 25, 2010

भारतीय लोकशाही अमर रहे!

नुकतेच बिहारमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. सर्वसामान्य जनता काय, भल्याभल्या निवडणूक तज्ञांनाही या निकालाने तोंडात बोटे घालायला लावली. १/२ नव्हे, २/३ नव्हे, ३/४ही नव्हे तर तब्बल ५/६ बहुमत नितीशकुमारांनी मिळवले, आपल्याला एवढा मोठा विजय मिळेल असे खुद्द त्यांनाही वाटले नसेल! स्वातंत्र्यापासून खितपत पडलेला बिहार आज ख-या अर्थाने स्वातंत्र्याची वाट चालू लागला आहे असे म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये!

नितीशकुमारांचा हा विजय विकासाच्या आणि सुधारलेल्या कायदा सुव्यवस्था स्थितीच्या मुद्द्यांवर आहे आणि यासाठी आपण बिहारी जनतेचे अभिनंदन करायला हवे. बिहारी जनतेला आपण दोष देत असलो तरी वस्तुस्थिती तशी नाही; आत्तापर्यंत परिस्थितीच अशी होती की त्यांच्या हाती करण्यासारखे काही नव्हते. इकडे आड नि तिकडे विहीर अशी दर निवडणुकीत त्यांची स्थिती होत असताना त्यांना दोष कसा देणार? पण जर कुणी काम करीत असेल तर जातीपातीचे राजकारण विसरून आम्ही त्याला पाठिंबा देऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आणि यासाठी खरोखरच त्यांची पाठ थोपटायला हवी.


याचबरोबर हेही स्पष्ट आहे की हा लालूंचा नि गांधी द्विकुटाचाही पराभव आहे. जातीपातीचे किळसवाणे राजकारण करणारे आणि बिहारला ५० वर्षे मागे नेणारे लालूं यादव यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. तीच गोष्ट राहुल गांधींची. काँग्रेसने कितीही नाकारले तरी हा त्यांचा सरळसरळ पराभव आहे यात काय शंका? अनेक महत्वाच्या मुद्यांवर बिहारचा लक्षणीय विकास झालेला दिसत असूनही राहुल गांधीनी ही बाब मान्य केली नाही; याउलट बिहारमधे जो काही थोडाफार विकास झाला आहे तो केंद्रामुळेच अशी खोटी बतावणी त्यांनी केली. अरे वा रे वा! विकास झाला नाही की तो स्थानिक राजकारण्यांमुळे नि तो झाला की केंद्रामुळे? हा कुठला न्याय? आपण केवळ आपल्या करिष्याच्या जोरावर लोकांना जास्त वेळ गुंतवून ठेवू शकत नाही हे राहुल गांधींनी मान्य करावे आणि नुस्ती भाषणे करण्यापेक्षा विकासकामांकडे जास्त लक्ष द्यावे.

आता महत्वाचा प्रश्न! महाराष्ट्रात असे घडेल काय? याचे उत्तर सोपे आहे, अर्थातच नाही! आपण कितीही म्हटले तरी जातींचे राजकारण अजूनही महाराष्ट्रात चालू आहेच; मराठी माणूस बोलतो बराच, पण वेळ आली की आपल्या जातीतल्या माणसालाच मत देतो हे पुन्हापुन्हा सिद्ध झाले आहे. नितीशकुमारांसारखा कुठलाही जाती-आधार नसलेला नेता मुख्यमंत्री होणे ही बाब महाराष्ट्रात तरी अशक्य आहे. याशिवाय नितीशकुमारांसारखा कर्तबगार कुणी नेताही विरोधी पक्षाकडे नसणे हाही मुद्दा आहेच. म्हणजे सत्ता काँग्रेस आघाडीकडून काढायची, पण द्यायची कुणाला? गोपीनाथ मुंडे आणि उद्धव ठाकरे यांना? या कारणामुळे बिचारा मराठी मतदार 'दगडापेक्षा वीट मऊ' असे म्हणत पुन्हा आघाडीलाच संधी देतो हे आपण मागे पाहिले आहेच.

ते असेल ते असो, पण बिहारमधल्या या निवडणुक निकालाने सगळ्या जगाला भारतातल्या लोकशाहीची एक चु़णूक दाखवली आहे आणि माझ्या मते हेच सगळ्यात महत्वाचे आहे! भारतीय लोकशाही अमर रहे!

No comments:

Post a Comment