दूरदर्शन पडद्यावर एक काळ गाजवलेल्या, आपल्या वेळी प्रचंड यशस्वी ठरलेल्या आणि प्रेक्षकसंख्येचे नवनविन विक्रम करणा-या एका कार्यक्रमाचा गेल्या सोमवारी तडकाफडकी मृत्यु झाला, ईश्वर मृतात्म्यास शांती देवो. बरोबर! 'कौन बनेगा करोडपती' हाच तो कार्यक्रम. सध्या सुरू असलेला कार्यक्रम हा मूळ कार्यक्रमाचे भूत आहे नि त्याचे उथळ स्वरूप पहाता त्याला 'कौन बनेगा मेरा पती' असे एखादे सवंग नावच शोभून दिसेल असे माझे तरी प्रामाणिक मत आहे, तुम्ही काय म्हणता?
केबीसीची सुरूवात झाली २००० सालापासून. तेव्हापासून मी आणि माझ्या घरचे सगळे ह्या कार्यक्रमाचे चाहते बनलो ते आजतागायत. मला आठवते, त्यावेळी सोमवार ते गुरूवार हा कार्यक्रम प्रसारित होत असल्याने कुठेही असलो तरी मी नवाच्या आत घरी पोहोचत असे. अमिताभचे ते सुरुवातीला ऐटीत उभे राहणे, त्यानंतर निवड झालेल्या स्पर्धकाला दिलेले ते अलिंगण किंवा हस्तांदोलन, ते स्पर्धकाला प्रेमाने खुर्चीत बसवणे, नंतर त्याची मजेदार छोटीशी ओळख करून देणे आणि खेळ खेळतानाही स्पर्धकांना नकळत मदत करणे, सगळेच कसे हवेहवेसे नि पहात रहावे असे वाटणारे होते. मला चांगले आठवते, या कार्यक्रमाचा हर्षवर्धन नवाथेने एक कोटी रुपये कमावले तो भाग ज्या दिवशी प्रसारित होणार होता त्या दिवशी रस्त्यांवर अगदी शुकशुकाट होता, अगदी रस्त्यांवर संचारबंदी आहे असे वाटावे इतपत!
पण हाय रे दैवा, काहीतरी अघटित घडले नि आमच्या आवडत्या कार्यक्रमाला ग्रहण लागले. याची सुरुवात झाली कार्यक्रमाच्या दुसर्या पर्वात शाहरूख खानच्या प्रवेशाने. आता अमिताभ तो अमिताभ नि शाहरूख तो शाहरूख! हे म्हणजे किशोर कुमार नाही म्हणून अमित कुमारकडून गाणी म्हणवून घेण्यासारखे झाले! अमिताभचे ते संभाषणकौशल्य, ती आदब, ती नर्मविनोदबुद्धी शाहरूख खानकडे कशी असणार? अर्थातच कार्यक्रमाची प्रेक्षकसंख्या वेगाने घसरली. काय होते आहे हे वाहिनीला कळेपर्यंत बहुसंख्य प्रेक्षकांनी हा कार्यक्रम पाहणे सोडूनही दिले होते.
या नंतर आली कार्यक्रमाची चौथी आवृत्ती. या कार्यक्रमात अमिताभला पुन्हा एकदा सूत्रसंचालक म्हणून पाहण्यासाठी मी बराच उत्सुक होतो. या कार्यक्रमाच्या जाहिरातीही विनोदी नि तिच्याविषयी उत्कंठा निर्माण करणार्या होत्या. जाहिराती सोनी वाहिनीवर पाहून लहानसा धक्का बसला खरा, पण मी म्हटले, 'वाहिनी बदलली तरी हरकत नाही, कार्यक्रमाचा दर्जा चांगला असला म्हणजे बास.' पुन्हा एकदा जुने दिवस अनुभवायला मिळतील म्हणून मी सोमवारी अधीर होऊन टीव्ही सुरू केला आणि हाय रे दुर्दैवा! सुरुवात झाली तीच अमिताभच्या गाण्याने, आणि तेही कोणते? तर 'पग घुंगरू बांध मीरा नाची थी' हे! आणि मूळ गाणे नव्हे तर त्याची आधुनिक कर्णकटू आवृत्ती! कॉलेजात आपल्याला आवडणारी 'खवा' पोरगी नंतर एकदम चारपाच वर्षांनी दिसावी आणि तिची 'यंत्रणा' झालेली पाहून ह्दयात एक हलकीशी कळ उठावी तसेच माझे झाले. ही सुरुवात पाहून 'हे लक्षण काही ठीक दिसत नाही गड्या' असे मी मनाशी म्हटले नि पुढे हे अनुमान खरेच ठरले. कुठलाही कार्यक्रम लोकप्रिय करण्यासाठी त्याला भावनिक हेलकाव्यांची फोडणी देण्याची एक वाईट सवय आपल्या दूरदर्शन निर्मात्यांना लागली आहे, पण ती बरी नव्ह! ही क्लृप्ती वापरून एखादा दुसरा कार्यक्रम चालेलही, पण केबीसीला हे रसायन वापरून कसे चालेल? हे म्हणजे मटनाचा मसाला चांगला लागतो म्हणून तो सगळ्या भाज्यांनाही वापरण्यासारखे झाले; भेंडीच्या भाजीला हा मसाला कसा चालणार, तिला शाकाहारीच मसाला वापरायला हवा! हा कार्यक्रम स्पर्धकांचे सामान्यज्ञान तपासणारा एका प्रश्नमंजुषा कार्यक्रम आहे, असला सवंगपणा करायला तो काही 'इंडियन आयडॉल' नव्हे हे या कार्यक्रमाचे निर्माते विसरले नि तिथेच मोठा घोळ झाला!
अमिताभला 'एक्स्पर्ट'शी बोलताना, स्पर्धकांच्या गावात घेतलेल्या त्या भावनाभडकाऊ चित्रफिती पाहताना आणि 'आपण ऐकत आहात तो आवाज कुठल्या नटाचा आहे' असे तद्दन फालतू प्रश्न विचारताना पाहून मला तर गलबलून आले! हे सगळे पाहून 'मुझे तुमसे ये उम्मीद नहीं थी विजय' असा त्याच्याच कुठल्यातरी चित्रपटातला संवाद त्याला मारावा असेही वाटले. अमितजी, आम्हाला तुमच्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती, आणि तीही या वयात?
भारतीय वाहिन्यांवर दाखवल्या जाणार्या एकमेव चांगल्या कार्यक्रमाची दारेदेखील आता माझ्यासाठी कायमची बंद झाली आहेत, हाय अल्ला, अब मै क्या करूं?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment