Wednesday, December 29, 2010

पुणे - नाईलाजाने राहण्याचे शहर

'पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर' या आपल्या लेखात पुण्याविषयी बोलताना पुलं म्हणतात की कुठल्याही संभाषणात ख-या पुणेकराच्या तोंडी 'आमच्यावेळी असं नव्हतं बुवा' हे विधान कमीत कमी दहावेळा यायलाच हवे! एवढंच काय, पुण्यात हे वाक्य म्हणण्यासाठी वयाचं बंधन नसतं अशी पुस्तीही पुलं पुढे जोडतात. पुलंचे निरीक्षण नेहमीप्रमाणे अचूक असलं तरी आज मात्र हे वाक्य खरं ठरण्यासारखी परिस्थिती पुण्यावर आली आहे हे केवढे दुर्दैव!

मी पुण्यात आलो साधारण ९५ साली आणि मला हे शहर प्रथमदर्शनीच आवडले. आवडले म्हणजे अगदी मनापासून. इथे यायचे आणि या शहराला, इथल्या लोकांना नावे ठेवत इथलेच होऊन जायचे असा कद्रूपणा मी कधी केला नाही. मला वाटते, प्रत्येक शहराचाही एक स्वभाव असतो. पुण्याचा स्वभाव माझ्यासारखाच आहे, स्पष्ट बोलण्याचा. हे बोलणे वेळप्रसंगी कटू असते, पण असते अगदी मनापासून. पोटात एक नि ओठांवर एक असा खोटेपणा त्यात नसतो. मला या शहराने, इथल्या लोकांनी अगदी सहज सामावून घेतले. मला अजून आठवतो बसमधे लोअर इंदिरानगर स्टॉपची आठवण करून देणारा तो माणूस आणि माझ्या सायकलची किल्ली हरवल्यावर आपल्या दुकानातील सगळ्या किल्ल्या लावून तिचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न करणारे ते काका. पुणे त्यावेळी खरोखरच एक टुमदार शहर होतं. त्याकाळी रस्त्यांवर तुरळक गर्दी असे, आजच्या सारखा माणसांचा गजबजाट त्यावेळी पुण्यात नव्हता. मला आठवतंय दुपारी कधीतरी रस्त्याने जायचा प्रसंग येई तेव्हा ते ओस पडलेले दिसत, एखाद्या गावातले रस्ते दुपारी ओस पडतात तसे. आणि शनिवारी सकाळी शाळा लवकर सुटत असल्यामुळे मी दहा वाजता घरी जाणारी बस पकडे तेव्हा तीही बहुतांश मोकळीच असे. पण साधारण २००० सालापासून पुण्यात आयटी उदयोगाला सुरूवात झाली आणि या शहराचा चेहरामोहराच बदलला. पुर्वी कात्रज, अप्पर इंदिरानगर, कोथरूड आणि विश्रांतवाडी इथपर्यंत असलेले पुणे नंतर आंबेगाव, पौड रोड, धानोरी असे पसरत गेले. काही वर्षांपुर्वी ज्या भागात फुकट रहायलाही लोक तयार झाले नसते तो भाग आज शहराच्या मध्यवस्तीत आला आहे. दुपारीच काय, रात्री अकरा वाजताही पुण्यातले रस्ते आता वाहत असतात आणि बसेस? त्या तर अशा भरलेल्या असतात जणू वाटावं जणू आत्ताच निर्वासितांचे लोंढे पुण्यात येऊन थडकले आहेत. पुण्यातल्या याच रस्त्यांवर मी तीन वर्षे सायकल चालवली आहे, यावर आता माझा स्वत:चाच विश्वास बसत नाही. आजकालची कुठल्याही वेळी पुण्यातल्या रस्त्यांवर दिसणारी वाहनांची प्रचंड गर्दी पाहिली की असे वाटते या शहरात माणसांपेक्षा वाहनेच जास्त असावीत. बरोबर आहे, रस्ते वाढलेत थोडेसे, पण वाहने वाढलीत किती तरी पटीने, दुसरे काय होणार?

एकेकाळी सुखद हवामान आणि गारव्यासाठी प्रसिद्ध असलेले पुणे आता उन्हाळ्यात चाळीस अंशांपर्यंत तापते आहे. प्रदूषणाच्या बाबतीत तर काय बोलावे? त्याबाबतीत तर पुणे नवनविन विक्रम करते आहे. माणसांचे पीक उदंड झाल्याने की काय, त्यांमधला संवाद हरवला आहे. पुण्यातल्या वातावरणात असलेली शांतता, संथपणा, निवांतपणा हरवून त्याची जागा घाई, कलकलाट आणि धकाधकीने घेतली आहे. एकूणच पेन्शनरांचे पुणे हळूहळू एक महानगर बनते आहे; एक असे महानगर ज्यात माणसे नव्हे तर यंत्रमानव राहतात, भावना नसलेले, घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे!

कुसुमाग्रज त्यांचे आवडते शहर - नाशिकबाबत बोलताना एकदा म्हणाले होते की 'नाशिकची वाढ होते आहे हे खरे, पण ती आता कुठेतरी थांबायला हवी. कारण वाढ एका मर्यादाबाहेर गेली की ती वाढ न राहता सूज वाटू लागते.' मला वाटते पुण्याची वाढ आता सूज न राहता गाठ बनू लागली आहे. ही गाठ थांबवायला हवी प्रखर राजकीय इच्छाशक्ती. आपल्या संधीसाधू, स्वार्थी नि आपमतलबी राजकारण्यांकडे ती आहे का? अनेक गंभीर समस्या समोर दिसत असूनही त्यांकडे कानाडोळा करणारे हे राजकारणी या संवेदनशील विषयावर काही ठळक भूमिका घेतील अशी अपेक्षाही करणे चूक आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार 'पुण्याची वाढ आता हाताबाहेर जात असल्याने पुण्यात येणा-या लोंढ्यांना मी विरोध करत आहे' असे म्हणत आहेत हे चित्र अजमल कसाब 'जय हिंद' म्हणतो आहे किंवा ए राजा 'आता मी कधीच भ्रष्टाचार करणार नाही' असे म्हणत आहेत या चित्रासारखेच अकल्पनीय आणि अचिंतनीय आहे. सबब, ते प्रत्यक्षात उतरणे कधीच शक्य नाही!

तात्पर्य काय, तर शांत, प्रदूषणविरहीत असलेले बिनगर्दीचे पुणे पुर्वी आवडीने राहण्याचे शहर होते, आता ते नाईलाजाने राहण्याचे शहर झाले आहे! आणि तूर्तास तरी पुण्याची दिवसेंदिवस होत असलेली दुर्दशा उघड्या डोळ्यांनी पाहणे आणि 'आमच्या वेळी असे नव्हते बरे' असे सुस्कारे टाकणे एवढेच आपणा पुणेकरांच्या हाती आहे!

Sunday, December 19, 2010

आमची अंदमान सहल - भाग २

या तक्त्यात प्रत्येक बर्थवर आमच्या नावाबरोबरच दुस-या एका व्यक्तीचेही नाव दिलेले होते! आमची तिकिटे नक्की झालेली असूनही असे का झाले असावे? मी तक्ता पुन्हा एकदा बारकाईने पाहिला नि मला क्षणात या घोटाळ्याचा उलगडा झाला. एका बर्थवर दोन आरक्षणे होती. दादर ते पुणे आणि पुणे ते चेन्नै. पुण्याला उतरणारे प्रवासी निघून गेले होते, म्हणजे त्या जागा आता चेन्नैपर्यंत फक्त आमच्याच होत्या. मी स्वत:शीच हसलो आणि गाडीत शिरलो.

रेल्वेच्या प्रवासात विशेष काहीच घडले नाही. खिडकीतून बाहर पहाणे, स्टेशन आले की उतरणे, गाडी चालू झाली की धावत्या गाडीत शिरणे आणि कंटाळा आला की वरच्या बर्थवर झोपणे हे सारे प्रकार आळीपाळीने करून झाले. आमच्या शेजारी असलेले पुण्याचे एक कुटुंब अंदमानलाच निघाले होते, त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या. असाच वेळ काढता काढता सकाळची दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली आणि शेवटी एकदाचे ७:४५ झाल्यावर १९तास ३५ मिनिटांचा प्रवास संपवून आम्ही चेन्नैच्या एथंबुरू (Egmore) स्थानकावर उतरलो.

आम्ही रेल्वेस्थानकावर उतरलो खरे, पण आमच्यापुढे आता एक मोठी अडचण होती. आमचे विमान होते दुस-या दिवशी सकाळी सहा वाजता. आणि विमानाची वेळ अशी अडचणीची होती की रात्रीपुरते एखाद्या हॉटेलात राहून दुस-या दिवशी सकाळी विमानतळावर जावे म्हटले तर तेही जमण्यासारखे नव्हते. तेव्हा रात्र अशीच ताटकळत काढण्याशिवाय आम्हाला गत्यंतर नव्हते. रेल्वे स्थानकावरची जत्रा पाहता रात्र तिथल्यापेक्षा विमानतळावर काढणे उत्तम असे वाटल्याने आम्ही तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. सामान उचलले आणि रात्री ११:१५ वाजताची तांबरमला जाणारी लोकल पकडली. साधारण अर्ध्या तासात विमानतळाशेजारीच असलेल्या तिरुसुलम स्थानकावर आम्ही उतरलो. इथून विमानतळ अगदी जवळच आहे; जवळ म्हणजे किती, तर अगदी हाकेच्या अंतरावर.

आम्ही विमानतळावर पोचलो असलो तरी अजून सहा तास कसे काढायचे हा प्रश्न होताच. तिथे अचानक मला आपण आज सकाळी आंघोळ केली नसल्याची आठवण झाली आणि अस्मादिकांनी तिथल्या बाथरूमात चक्क रात्री बारा वाजता शाही स्नान केले. आयुष्यात मी हजारो वेळा आंघोळ केली असेल, पण चेन्नै विमानतळावर भर रात्री गार पाण्याने केलेली ती आंघोळ मी आयुष्यभर विसरणार नाही!

शेवटी घड्याळाचे काटे सहावर पोचले आणि आमचे विमान ’उडानके लिये तैयार’ असल्याची घोषणा झाली. चेन्नै विमानतळावरून आमचे विमान पोर्टब्लेअरसाठी आकाशात झेपावले तेव्हा घड्याळात साडेसहा होत होते. इकीकडे दिवसाला सुरूवात होत होती तर दुसरीकडे आमच्या रोमहर्षक अंदमान सहलीलाही!

Friday, December 17, 2010

कलावंतीण किल्ल्यावर कब्जा

हिवाळा सुरू होऊन दोन महिने झाले तरी एकही गडसहल न झाल्याने मी बेचैन झालो होतो. हे सगळे वर्षच तसे सुनेसुने गेले होते. आमच्या मित्रमंडळींची कहाणी काय सांगावी? आधीच उल्हास त्यात फाल्गून मास अशी त्यांची स्थिती. यावेळी हा यायला तयार तर दुस-याला काहीतरी काम, पुढच्या आठवड्यात तो यायला तयार तर पहिल्याचा नकार! माझ्या सात आकडी पगार मिळवणा-या एका मित्राचे बहाणे ऐकून तर मनमोहनसिंग साहेबांसोबत एखाद्यावेळी किल्ल्यावर जाणे होईल पण याच्याबरोबर नाही असे मला पक्के वाटू लागले होते. तेव्हा मित्रांचा नाद सोडला आणि मामेभावाला पकडले. १२ डिसेंबरची तारीख नक्की केली आणि किल्लाही - पनवेलजवळचा देखणा 'कलावंतीण'.

पहाटे सहा वाजता घराबाहेर पडायचे असे आम्ही ठरवले होते खरे, पण एवढी कडाक्याची थंडी असल्यावर ते जमणार कसे? पाण्याची बाटली, कॅमेरा, जॅम आणि ब्रेड मोठ्या सॅकमधे टाकून आम्ही घराबाहेर पडलो तेव्हा घड्याळात बरोबर ०६:४० होत होते. डोक्याला हेल्मेट, अंगात स्वेटर, जाड जीन्स, हातमोजे आणि पायात बूट असा जामानिमा असूनही थंडी सुयांसारखी शरीराला अगदी टोचत होती. त्यातच सकाळी रस्ता मोकळा असल्यामुळे आम्ही गाडी भरधाव सोडलेली. तळेगाव, लोणावळा, खोपोली गावं पटापटा मागे पडली. गाडी शंभरने मारल्यामुळे पनवेल टोलनाक्यापुढच्या शेदुंग फाट्याला (अंतर ११५ कि.मी.) आम्ही पोचलो तेव्हा आम्हाला घरातून निघून फक्त एक तास पंचेचाळीस मिनिटं झाली होती. बहुतेक वाहने मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचा वापर करत असल्याने जुन्या पुणे मुंबई रस्त्याला आता फारशी गर्दी नसते. त्यामुळे या रस्त्यावर गाडी चालवण्याचा आनंद अगदी वारेमाप घेता येतो. अर्थात रस्त्याची स्थिती फारशी चांगली नाही हे मात्र खरे.

शेदुंग फाट्यावरून आम्ही आत शिरलो आणि एका छोट्या डांबरी रस्त्याने आत जात ठाकूरवाडीला पोचलो. सदरचा रस्ता खाजगी आहे अशी माहिती एक फलक देत असला तरी आत जाताना आम्हाला कुणीच अडवले नाही. साधारण ५ कि.मी आत गेल्यावर आम्ही एका मोठ्या वडाच्या झाडाखाली गाडी लावली. आता प्रश्न आला हेल्मेटचा! हे एवढे जड शिरस्त्राण आख्ख्या गडचढाईत हातात बाळगायला काहीच अर्थ नव्हता; तेव्हा आजूबाजूला कोणी नाही हे पाहून आम्ही ते शेजारील गवतात दडवले आणि गडाच्या दिशेने कूच केले. [पहा, आयटीत काम केले की अशा कल्पना सुचतात - उगाच नाही लोक आम्हाला हुशार समजत!] गड सोपा दिसत असला तरी तो तसा नाही हे चढायला सुरुवात केल्यावर थोड्याच वेळात आम्हाला कळले. किंबहुना हे सोपे दिसणारे गडच प्रत्यक्षात जास्त त्रास देतात!

नऊला आम्ही गड चढायला सुरुवात केली आणि साधारण दीड तासात वरच्या ठाकूरवाडीला पोचलो. २०/२५ घरांचे हे एक लहानसे गाव आहे. इथल्याच एका घरात जेवणाची सोय आहे. जाताना इथे जेवण बनवायला सांगून जावे आणि किल्ला पाहून खाली आलो की त्याचा आस्वाद घ्यावा अशी चांगली सोय गडप्रेमींसाठी आहे. पण आमचे जेवण बरोबर असल्याने आम्ही काही इथे जेवणार नव्हतो. ठाकूरवाडीतील काही लोकांना कलावंतीणचा रस्ता विचारून आम्ही पुढे निघालो आणि साधारण अर्ध्या तासात गडाच्या पाय-या जिथे सुरू होतात तिथे येऊन पोचलो.

कलावंतीण किल्ल्याच्या या पाय-यांचे फोटो मी आंतरजालावर आधीच पाहिले होते, प्रत्यक्षात मात्र त्या अधिकच भितीदायक दिसत होत्या. काही तर चक्क दोन फुट उंचीच्या होत्या. पण ज्या कुणी या पाय-या बनवल्या त्यांचे धन्यवाद द्यायला हवेत; त्यांच्याशिवाय या सरळसोट गडावर चढणे अशक्य बनले असते. थांबत चालत आम्ही या पाय-या पार केल्या नि एकदाचे वर पोचलो. एवढा अवघड किल्ला चढून वर आलो तेव्हा काहीतरी सुंदर पहायला मिळेल असे आम्हाला वाटत होते खास, पण इथे आल्यावर आमची निराशा झाली. किल्यावर पहायला काहीच नाही, अगदी पडके टाके किंवा मोडकळीस आलेली तटबंदीदेखील. किल्ल्याचा विस्तार तसा फार छोटा आहे. किल्ल्याच्या मध्यभागी एक भलामोठा दगडी सुळका आहे. थोडी कसरत करून आम्ही इथे चढलो, तेव्हा मात्र एवढ्या श्रमांचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

कडेचा प्रबळगड सोडला तर आजूबाजूची सगळी शिखरे आमच्यापेक्षा उंचीने कमी होती; त्यामुळे अगदी लांबलांबपर्यंतचा परिसर वरून स्पष्ट दिसत होता. गडावर फारसे बांधकाम का नाही या प्रश्नाचे उत्तर आत्ता आम्हाला मिळाले; फक्त टेहेळणीच्या कामासाठीच या किल्ल्याचा वापर होत असावा. वर असाच थोडा वेळ घालवल्यावर आम्ही काही फोटो काढले. (माउंट एवरेस्टवर गेलेले गिर्यारोहक जसे आपल्या दाव्याच्या पुष्टतेसाठी काढतात तसे. काय करणार? आमच्या मित्रमंडळींमधे काही खवट लोक आहेत हो...) वर पहायला काही नव्हते आणि जेवणासाठी सावलीही. तेव्हा आम्ही ठाकूरवाडीतच जेवण करायचा निर्णय घेतला आणि खाली उतरायला सुरूवात केली. ठाकूरवाडीत एका घराच्या पडवीत आम्ही ब्रेड-जॅम फस्त केला आणि थोडा वेळ विश्रांती घेऊन मग पुन्हा रपेट सुरू केली. उतरणे एकदम सोपे होते, पाऊण तासात आम्ही खाली पोचलोही. नशिबाने आमचे शिरस्त्राण आम्ही सोडले तिथेच होते. घरी परतताना गाड्यांची प्रचंड गर्दी हा आमचा नेहमीचा अनुभव, पण यावेळी आम्ही अडीचलाच परतीचा रस्ता धरल्याने ती अडचण नव्हती. थकून भागून आम्ही घरी पोचलो तेव्हा घड्याळात फक्त सव्वाचार होत होते!

गड सर करून घरी पोचल्यावर सोफ्यावर बसून आल्याचा गरमागरम चहा घेण्याचा आनंद काय वर्णावा? चहाचे घुटके घेताना यावेळी तर दुहेरी समाधान आमच्या मनात होते; खूप दिवस हुलकावण्या देणारा कलावंतीण पाहिल्याचे एक आणि हा रविवार वांझ गेला नाही हे दुसरे!