'पुणेकर, मुंबईकर की नागपूरकर' या आपल्या लेखात पुण्याविषयी बोलताना पुलं म्हणतात की कुठल्याही संभाषणात ख-या पुणेकराच्या तोंडी 'आमच्यावेळी असं नव्हतं बुवा' हे विधान कमीत कमी दहावेळा यायलाच हवे! एवढंच काय, पुण्यात हे वाक्य म्हणण्यासाठी वयाचं बंधन नसतं अशी पुस्तीही पुलं पुढे जोडतात. पुलंचे निरीक्षण नेहमीप्रमाणे अचूक असलं तरी आज मात्र हे वाक्य खरं ठरण्यासारखी परिस्थिती पुण्यावर आली आहे हे केवढे दुर्दैव!
मी पुण्यात आलो साधारण ९५ साली आणि मला हे शहर प्रथमदर्शनीच आवडले. आवडले म्हणजे अगदी मनापासून. इथे यायचे आणि या शहराला, इथल्या लोकांना नावे ठेवत इथलेच होऊन जायचे असा कद्रूपणा मी कधी केला नाही. मला वाटते, प्रत्येक शहराचाही एक स्वभाव असतो. पुण्याचा स्वभाव माझ्यासारखाच आहे, स्पष्ट बोलण्याचा. हे बोलणे वेळप्रसंगी कटू असते, पण असते अगदी मनापासून. पोटात एक नि ओठांवर एक असा खोटेपणा त्यात नसतो. मला या शहराने, इथल्या लोकांनी अगदी सहज सामावून घेतले. मला अजून आठवतो बसमधे लोअर इंदिरानगर स्टॉपची आठवण करून देणारा तो माणूस आणि माझ्या सायकलची किल्ली हरवल्यावर आपल्या दुकानातील सगळ्या किल्ल्या लावून तिचे कुलूप उघडण्याचा प्रयत्न करणारे ते काका. पुणे त्यावेळी खरोखरच एक टुमदार शहर होतं. त्याकाळी रस्त्यांवर तुरळक गर्दी असे, आजच्या सारखा माणसांचा गजबजाट त्यावेळी पुण्यात नव्हता. मला आठवतंय दुपारी कधीतरी रस्त्याने जायचा प्रसंग येई तेव्हा ते ओस पडलेले दिसत, एखाद्या गावातले रस्ते दुपारी ओस पडतात तसे. आणि शनिवारी सकाळी शाळा लवकर सुटत असल्यामुळे मी दहा वाजता घरी जाणारी बस पकडे तेव्हा तीही बहुतांश मोकळीच असे. पण साधारण २००० सालापासून पुण्यात आयटी उदयोगाला सुरूवात झाली आणि या शहराचा चेहरामोहराच बदलला. पुर्वी कात्रज, अप्पर इंदिरानगर, कोथरूड आणि विश्रांतवाडी इथपर्यंत असलेले पुणे नंतर आंबेगाव, पौड रोड, धानोरी असे पसरत गेले. काही वर्षांपुर्वी ज्या भागात फुकट रहायलाही लोक तयार झाले नसते तो भाग आज शहराच्या मध्यवस्तीत आला आहे. दुपारीच काय, रात्री अकरा वाजताही पुण्यातले रस्ते आता वाहत असतात आणि बसेस? त्या तर अशा भरलेल्या असतात जणू वाटावं जणू आत्ताच निर्वासितांचे लोंढे पुण्यात येऊन थडकले आहेत. पुण्यातल्या याच रस्त्यांवर मी तीन वर्षे सायकल चालवली आहे, यावर आता माझा स्वत:चाच विश्वास बसत नाही. आजकालची कुठल्याही वेळी पुण्यातल्या रस्त्यांवर दिसणारी वाहनांची प्रचंड गर्दी पाहिली की असे वाटते या शहरात माणसांपेक्षा वाहनेच जास्त असावीत. बरोबर आहे, रस्ते वाढलेत थोडेसे, पण वाहने वाढलीत किती तरी पटीने, दुसरे काय होणार?
एकेकाळी सुखद हवामान आणि गारव्यासाठी प्रसिद्ध असलेले पुणे आता उन्हाळ्यात चाळीस अंशांपर्यंत तापते आहे. प्रदूषणाच्या बाबतीत तर काय बोलावे? त्याबाबतीत तर पुणे नवनविन विक्रम करते आहे. माणसांचे पीक उदंड झाल्याने की काय, त्यांमधला संवाद हरवला आहे. पुण्यातल्या वातावरणात असलेली शांतता, संथपणा, निवांतपणा हरवून त्याची जागा घाई, कलकलाट आणि धकाधकीने घेतली आहे. एकूणच पेन्शनरांचे पुणे हळूहळू एक महानगर बनते आहे; एक असे महानगर ज्यात माणसे नव्हे तर यंत्रमानव राहतात, भावना नसलेले, घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे!
कुसुमाग्रज त्यांचे आवडते शहर - नाशिकबाबत बोलताना एकदा म्हणाले होते की 'नाशिकची वाढ होते आहे हे खरे, पण ती आता कुठेतरी थांबायला हवी. कारण वाढ एका मर्यादाबाहेर गेली की ती वाढ न राहता सूज वाटू लागते.' मला वाटते पुण्याची वाढ आता सूज न राहता गाठ बनू लागली आहे. ही गाठ थांबवायला हवी प्रखर राजकीय इच्छाशक्ती. आपल्या संधीसाधू, स्वार्थी नि आपमतलबी राजकारण्यांकडे ती आहे का? अनेक गंभीर समस्या समोर दिसत असूनही त्यांकडे कानाडोळा करणारे हे राजकारणी या संवेदनशील विषयावर काही ठळक भूमिका घेतील अशी अपेक्षाही करणे चूक आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार 'पुण्याची वाढ आता हाताबाहेर जात असल्याने पुण्यात येणा-या लोंढ्यांना मी विरोध करत आहे' असे म्हणत आहेत हे चित्र अजमल कसाब 'जय हिंद' म्हणतो आहे किंवा ए राजा 'आता मी कधीच भ्रष्टाचार करणार नाही' असे म्हणत आहेत या चित्रासारखेच अकल्पनीय आणि अचिंतनीय आहे. सबब, ते प्रत्यक्षात उतरणे कधीच शक्य नाही!
तात्पर्य काय, तर शांत, प्रदूषणविरहीत असलेले बिनगर्दीचे पुणे पुर्वी आवडीने राहण्याचे शहर होते, आता ते नाईलाजाने राहण्याचे शहर झाले आहे! आणि तूर्तास तरी पुण्याची दिवसेंदिवस होत असलेली दुर्दशा उघड्या डोळ्यांनी पाहणे आणि 'आमच्या वेळी असे नव्हते बरे' असे सुस्कारे टाकणे एवढेच आपणा पुणेकरांच्या हाती आहे!
Subscribe to:
Post Comments (Atom)
संपूर्ण सहमत आहे. हि सत्यपरिस्थिती आहे पुण्याची.
ReplyDeleteछान आहे लेख. काही गोष्टी खूप आवडल्या जसे
"इथे यायचे आणि या शहराला, इथल्या लोकांना नावे ठेवत इथलेच होऊन जायचे असा कद्रूपणा मी कधी केला नाही"
"पुण्याचा स्वभाव माझ्यासारखाच आहे, स्पष्ट बोलण्याचा. हे बोलणे वेळप्रसंगी कटू असते, पण असते अगदी मनापासून. पोटात एक नि ओठांवर एक असा खोटेपणा त्यात नसतो. "
खूपच छान!पुण्याची दुर्दशा झाली आहे खरे.पण बरायची अंशी व्यवस्था जबाबदार आहे.ती सुधारायला हवी.त्याशिवाय काहीही होणार नाही!
ReplyDeleteपण अस असला तरी पुण्याच पुणेरीपण टिकून आहे.पुण्याचे गणपती असोत,सवाई गंधर्व महोत्सव असो,पुलोत्सव असो,नाहीतर एकांकिका स्पर्धा असोत,अस एक न अनेक......
पुण्याचा खोचक पुणेरीपणा कधीही संपणार नाही हे मात्र नक्की!!!
आम्ही तसेच आहोत आणि आमच्या पुढच्या पिढीला पण हेच शिकवू .....
one of my loved ones went to pune and is totally changed [negatively] is it bcoz of the city wat do u think
ReplyDeleteमला नाही वाटत पुणे बदलले आहे. तुम्हाला जो बदल दिसतो आहे तो बहुतांशी बाहेरगावातुन आलेल्या लोकांमुळे जाणवणारा बदल आहे. उगाच पुण्याला कश्याला नावं ठेवता?
ReplyDeleteतुम्हाला जे यंत्रमानव, भावना नसलेले दिसत आहेत ते खरंच पुणेकर आहेत की बाहेर गावातुन येऊन पुण्यात स्थाईक झालेले आहेत ते तपासा.
चितळे आणि इतर दुकानं आजही दुपारी बंद रहातात. घेणार असाल तर माल दाखवतो म्हणणारे दुकानदार आजही आहेत.
अनिकेत
@manatale : मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी पुण्याला किंवा पुणेकरांना मुळीच नावे ठेवलेली नाहीत. किंबहुना पुण्याची बिघडत जाणारी स्थिती पाहून एक सच्चा पुणेकर म्हणून मला दु:खच होते आहे. आणि पुण्याचे महानगरात रुपांतर होत असताना एका सामान्य पुणेकराच्या वागण्यात थोडा फरक पडू लागला आहे हे मात्र नक्की.(जे तुम्हीही मान्य कराल.) पुणे बदलते आहे हे नक्की आणि सगळेच (किंबहुना बरेचसे) बदल सुखकारक नाहीत.
ReplyDelete**तुम्हाला जे यंत्रमानव, भावना नसलेले दिसत आहेत ते खरंच पुणेकर आहेत की बाहेर गावातुन येऊन पुण्यात स्थाईक झालेले आहेत ते तपासा.**
ही पुणेकरांची नव्हे तर महानगराची वैशिष्ट्ये आहेत असे मी म्हटले आहे.
**चितळे आणि इतर दुकानं आजही दुपारी बंद रहातात. घेणार असाल तर माल दाखवतो म्हणणारे दुकानदार आजही आहेत.**
हा विनोद म्हणून ठीक आहे. पण याचा अर्थ पुण्यात काहीच बदल होत नाही असा होतो? ज्या चांगल्या गोष्टींसाठी पुणे नावाजलेले होते त्या हळूहळू नष्ट होत आहेत हे तर खरे ना?
@इतर लोक : धन्यवाद.
अभिजित,
ReplyDeleteपुणेकर म्हणून फक्त तुझी आत्ता तरी घाईत असल्याने फक्त हीच पोस्ट वाचून काढली आहे बाकीच्या नंतर वाचेन म्हणतोय. असो.तरी हि आतला पुणेकर काही स्वस्थ बसू देत नाहीये.
मुळात ९५ चे म्हणून सुद्धा जे पुणे तू बघतोयस ते सुद्धा खूप अलीकडचे आहे.मित्र मंडळ म्हणजेच आत्ताची सारस बाग,नळ stop , अगदी स्वारगेटचे मुकुंदनगर,दांडेकर पूल हा सुद्धा जेव्हा पुण्या बाहेरचा भाग वाटायचा,नव्हे होता नि कोथरूड हे पुण्याचे उपनगर नव्हे तर दुसरे खेडे होते तो काळ उगीचच डोळ्या पुढे येऊन गेला.म्हणजे साधारण १९६७-६८चा. संध्याकाळी ७ नंतर शहरात होणारी सामसूम,रात्री १० वाजताच नेपाळी गुरख्याची शिट्टी नि रस्त्यात आपटलेला दंडुका कानात घुमून गेला.अरे इतक सगळ निवांत असायचं कि संध्याकाळी ७ नंतर अगदी वाड्याच्या संडासात साधं लघवीला जायची सुद्धा भीती वाटायची तो काळ डोळ्या पुढे येऊन गेला नि आठवणीत क्षणभर रमलो.त्याही आधीचे म्हणजे माझ्या वडिलांच्या वेळच्या म्हणजेच १९४०-४५ मधल्या पुण्या बद्दल सुद्धा मी माझ्या ब्लॉग वर कधी तरी लिहेन तेव्हा तुला मी आवर्जून येथे सांगायला येईल.
आणि आत्ता........ जेव्हा अलका थिएटरच्या सारख्या मोठ्या चौकातून अगदी शिकले सवरलेले तरुण सुद्धा माठया सारखे जेव्हा रस्ता डायगोनली क्रॉस करतांना बघतो तेव्हा काळां बरोबर माणसं सुद्धा किती तिरकस झाली असावीत ह्याचा अंदाज येतो.
लेखा बद्दल धन्यवाद.