Thursday, September 29, 2011

ईश्वरा, त्यांना माफ कर, त्यांना कळत नाहीये ते काय करताहेत ते...

रविवारी मटात "हृदयनाथ मंगेशकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचं निमित्त साधून 'हृदयेश आर्टस्' तर्फे दरवर्षी एक लाखाचा 'हृदयनाथ पुरस्कार' संगीतक्षेत्रातील कलावंतांना देण्यात येणार आहे आणि या माळेतला पहिला पुरस्कार लता मंगेशकर यांना जाहीर झाला आहे" ही बातमी वाचली आणि हसावे की रडावे हेच कळेनासे झाले.

हृदयनाथ मंगेशकरांच्या नावाचा हा पुरस्कार लतादिदींना देऊन आता काय साध्य होणार आहे? पुरस्कार हे नेहमी एखाद्या व्यक्तीच्या कामाची दखल घेण्यासाठी, तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी दिले जातात. लतादिदींबाबत यातली कुठलीच गोष्ट लागू होत असताना त्यांना हा पुरस्कार देण्याचे कारण काय? आपल्या कुटुंबियांच्या नावे पुरस्कार सुरू करणे आणि ते घरातच एकमेकांना वाटणे हे किती हास्यास्पद दिसते हे मंगेशकर कुटुंबियांना का समजत नाही? किंबहुना काही दिवसांनी हृदयनाथ, लता, आशा, मीना हे कुटुंबीय एक गोल करून उभे आहेत आणि आपल्या नावाचा पुरस्कार शेजारच्याला देत आहेत असे चित्र दिसले तरी मुळीच आश्चर्य वाटणार नाही! त्यात हे प्रकार कुण्या पुढारी घराण्याने केले तर ते समजण्यासारखे आहे, पण मंगेशकर कुटुंबियांकडून अशा वागण्याची अपेक्षा नक्कीच महाराष्ट्राला नाही.

आता मंगेशकर कुटुंबियांना मिळालेल्या पुरस्कारांबाबत थोडेसे. लता मंगेशकर यांना भारत सरकारचा 'भारतरत्न' पुरस्कार मिळालेला आहे. लता भोसले यांना हा पुरस्कार मिळाला नसला तरी त्यांच्या लाखो चाहत्यांनी त्यांना मनोमन तो देऊनच टाकला आहे. (आणि तसाही त्यांना पद्मविभूषण आहेच.) आणि हृदयनाथांबद्दल काय बोलावे? त्यांना कुठल्याही पुरस्काराची गरजच नाही. (तरी 'पद्मश्री'ची चटणी त्यांना तोंडी लावायला आहेच.) हे सगळे असे असतानाही एकमेकांना ही पुरस्कारांची खिरापत वाटण्याची आवश्यकता काय? किंबहुना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यावर, लता मंगेशकर यांनी इतर पुरस्कार नाकारणेच योग्य नव्हे काय?

असो. कितीही पोटतिडकीने लिहिले तरी एकूण रागरंग पहाता रविवारी हृदयनाथ लतादिदींना हा पुरस्कार देतील आणि त्याही तो स्वीकारतील याबाबत मला तरी मुळीच शंका वाटत नाही. तेव्हा सध्यातरी देवाकडे इवढीच प्रार्थना करतो, 'ईश्वरा, त्यांना माफ कर, त्यांना कळत नाहीये ते काय करताहेत ते...'

Sunday, September 25, 2011

कोकण रेल्वेने रत्नागिरी पर्यंत - ३ (शेवट)

तिस-या दिवशी आम्ही उठलो ते पहाटे साडेतीनलाच. लोकांना साडेपाचची पॅसेंजर गाडी पकडता यावी यासाठी प्रेमळ एस. टी. महामंडळाने पहाटे साडेचारला एका बसची सोय केली होती आणि ती मिळवायची असेल तर आम्हाला इतक्या लवकर उठणे क्रमप्राप्तच होते. तस्मात् आम्ही लवकर उठलो आणि सगळे आवरून तयार झालो. बॅगा काल भरल्या होत्याच. कितीही नीट आवरले असले तरी हॉटेलच्या खोलीबाहेर पडताना आपले काहीतरी विसरले आहे अशी भिती मला नेहमी वाटते आणि मी (खात्री करण्यासाठी म्हणून) एकदा पुन्हा आत फेरी मारून येतोच, यावेळीही हा प्रकार झालाच. आपल्या बॅगा घेऊन आम्ही हॉटेलबाहेर पडलो तेव्हा घड्याळात चार वीस होत होते. आम्ही बाहेर पडलो नि बसस्थानकाच्या दिशेने चालू लागलो. किंचीत भुरभुरणारा पाऊस सुरू होता आणि त्यापासून अनभिज्ञ रत्नागिरी अजून साखरझोपेत होती. पहाटेची वेळ असल्याने रस्ते पुर्ण निर्मनुष्य होते. काल रात्री गर्दीने गजबजलेले हेच रस्ते किती वेगळे दिसत होते!

त्यानंतर संपूर्ण दिवसात काहीही विशेष घडले नाही. साडेसहाची पॅसेंजर अर्थातच आम्ही पकडली आणि ती आपल्या ‘निर्धारीत‘ वेळेपेक्षा साधारण पाऊण तास ‘उशिराने धावत असल्याने‘ साधारण दोनच्या सुमारास ठाण्याला पोचलो. माझ्या बरोबरीचा मित्र मुंबईचा असल्याने तो तिथूनच घरी गेला, अर्थात ठाणे-पुणे प्रवास मला एकट्यालाच करावा लागला. परतीचे प्रवास कंटाळवाणे असतात, हा प्रवासही त्याला अपवाद नव्हता.

आज रत्नागिरीचा विचार करताना मला जाणवतं की हे शहर सुंदर आहेच, पण मला ते विशेष आवडले ते त्याने मला पुण्याची आठवण करून दिली म्हणून. पंधरा वर्षांपुर्वीच्या पुण्याची. तेव्हा पुणंही एक टुमदार शहर होतं. आजच्यासारखं ते अस्ताव्यस्त पसरलं नव्हतं, आजच्यासारखा गर्दीचा महापूर तिथं नव्हता. रत्नागिरी आज अगदी तसंच आहे. खेडं ते शहर या स्थित्यंतरातून जात असणारं. खेड्यातला जिव्हाळा, आपलेपणा, अनौपचारिकपणा टिकवून ठेवलेलं आणि तरीही एका मोठ्या शहरातल्या सगळ्या सुखसोयी पुरवणारं. पण रत्नागिरी जोराने बदलते आहे, हे सारं किती दिवस टिकेल याबाबत मी साशंक आहे. मी तर म्हणेन रत्नागिरी असं असताना आत्ताच तिथं जाऊन यायला हवं, कारण काही वर्षांत रत्नागिरीचं पुणं झालेलं असणार हे नक्की!

Thursday, September 15, 2011

वाह ताज!

असं ब-याचवेळा होतं की एखाद्या गोष्टीविषयी आपण खूप काही ऐकलेलं असतं, पण प्रत्यक्षात ती गोष्ट पाहिली की आपली घोर निराशा होते. म्हणजे त्या गोष्टीची अगदी कान किटेपर्यंत स्तुती ऐकून ऐकून फुगलेला अपेक्षांचा फुगा ती वस्तू अनुभवली की फुटतो आणि आपला भ्रमनिरास होतो. ताजमहालाविषयी मी असंच खूपकाही ऐकलं होतं. सुदैवाने, प्रत्यक्षात तो पाहिल्यावर भ्रमनिरास तर झाला नाहीच, उलट त्याच्याविषयी आजपर्यंत जे काही ऐकलं ते कमीच अशी खात्री पटली.

मी इथं ताजमहालविषयी माहिती सांगत बसणार नाही. तो बांधायला २०००० मजूर नि १००० हत्ती लागले, तो बांधायला २० वर्षे लागली आणि त्यासाठी त्याकाळी ४ कोटी रुपये खर्च आला (जेव्हा सोन्याचा भाव १५ रुपये तोळा होता!) ह्या नि इतर गोष्टी सगळ्यांना माहिती असतातच. आपल्या राज्यात दुष्काळ पडला असतानाही शाहजहानने आपली मृत बायको - मुमताजच्या स्मरणार्थ तिचं स्मारक बांधावं यासाठी त्याच्यावर टीकाही होते. पण मी मात्र त्याला माफ करतो, ही देखणी, स्वर्गीय वास्तू बनवल्याबद्दल.

उत्तराखंड मधल्या 'फुलोंकी घाटी' अर्थात 'वॅली ऑफ फ्लॉवर्स'ची सहल नुकतीच आम्ही केली. आमचा परत येण्याचा रस्ता आग्र्यामार्गे असल्याने येताना ह्या जगातल्या आठव्या आश्चर्याला भेट देता आली. ताजमहाल पहाण्यासाठी आम्ही निवडलेला वार होता गुरुवार. शुक्रवारी ताजमहालाला सुट्टी असल्याने गुरुवारी तो पहाण्यासाठी बरीच गर्दी असते; त्यामुळे आम्ही सकाळी साडेसहालाच तिथे पोचलो असलो तरी आमच्या आधी बरीच मंडळी तिथे हजर होती. ताजमहालला ३ प्रवेशद्वारे आहेत. पण पूर्व, पश्चिम किंवा दक्षिण अशा कुठल्याही प्रवेशद्वारातून तुम्ही आत शिरलात तरी तुम्हाला लगेच ताजमहालचं दर्शन होत नाही. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला पार करावा लागतो, 'दरवाजा-ए-रौझा'. आतूर मनाने तुम्ही हा दरवाजा पार करता आणि अचानक ताजमहाल तुमच्या समोर येऊन उभा ठाकतो. ताजमहाल पाहिला की पहिल्यांदा जाणवतो तो त्याचा पांढराशुभ्र रंग. त्याचा तो मोठ्ठा चबुतरा, त्याचे ते सुंदर मिनार, त्याचा तो गोलाकार घुमट, कुठल्या गोष्टीचं कौतुक करावं? त्या सगळ्याच अप्रतिम आहेत. ताजमहालचा जो चबुतरा लांबून लहानसा दिसतो त्याचा आकार जाणवतो तो जवळ गेल्यावर. ह्या चबुत-याची उंची जवळपास अडीच पुरूष आहे हे कळल्यावर मी तर उडालोच. ताजमहालची एक खासियत म्हणजे तो लांबून तर सुरेख वाटतोच, पण जवळ गेल्यावर दिसतं की त्याच्यावरचं सूक्ष्म कामही तितक्याच उत्तम प्रतीचं आहे. लाल नि हिरव्या रंगाच्या अर्ध-मौल्यवान दगडांची पांढ-याशुभ्र संगमरवरावरची सजावट डोळ्यांचं अक्षरश: पारणं फेडते. ताजमहालचं आणखी एक पटकन न जाणवणारं वैशिष्ट्य म्हणजे चारपैकी कुठल्याही दिशेने पहा, तो अगदी एकसारखाच दिसतो. ताजमहालच्या स्थापत्यविशारदांची ही कामगिरी अलौकिकच म्हणायला हवी, नाही का?

पण काही गोष्टी शब्दांत मांडता येत नाहीत, त्या प्रत्यक्षच अनुभवायच्या असतात. ताजमहालचं सौंदर्य हे असंच. त्यामुळेच मी म्हणेन की तुम्ही ताजमहालला एकदा तरी भेट द्याच. तो अजून पाहिला नसेल तर त्याचं अलौकिक सौंदर्य अनुभवण्यासाठी आणि तो पाहिला असेल तर त्याचं अलौकिक सौंदर्य पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी. त्याला भेट द्या आणि त्याचं ते अनुपम, कालातीत सौंदर्य आपल्या डोळ्यात साठवा. मला खात्री आहे, तुम्हाला तिथून निघावंसं वाटणार नाही आणि नाईलाजाने तुम्ही निघालात तरी जाताना एकदा तरी तुम्ही मागे वळून पहालच! आणि तो पहात असताना तुमच्या तोंडातून आपसूक उद्गार निघतील, 'वाह ताज!'

[ही आहेत या सहलीमधे काढलेली ताजमहालची काही छायाचित्रे, आपल्याला ती आवडतील अशी अपेक्षा करतो. यापैकी पहिली दोन ताजमहालसमोरून, तर शेवटची दोन यमुनेपलीकडून मेहताब बागेतून काढलेली आहेत.]
Sunday, September 11, 2011

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

अखेर तो दु:खद दिवस उजाडला आहे आणि आपल्या आवडत्या बाप्पांना निरोप देण्याची वेळ झाली आहे. गणेशोत्सवाचे हे असेच असते. हा हा म्हणता विसर्जनाचा दिवस उजाडतो आणि ‘अरे, आत्ताच तर बसले होते गणपती, जायची वेळ आली पण!’ असे उद्गार आपसूक ओठांवर येतात. माणूस कितीही कठोर असो, ठार नास्तिक असो(माझ्यासारखा), पण बाप्पांना निरोप देताना गलबलल्यासारखे वाटत नसेल तर तो माणूस नव्हेच. पण गणपती आपल्याला एवढा का आवडत असेल? मला वाटते याचे कारण म्हणजे तो आपल्याला जवळचा वाटतो, एखाद्या मित्रासारखा. हे थोडेसे शाळेतल्या शिक्षकांसारखे आहे. आपल्याला शिकवणारे अनेक शिक्षक शाळेत असतात, पण आपल्याला जवळचे वाटतात ते आपल्याला मराठी शिकवणारे शिक्षक - सुंदर सुंदर कविता ऐकवणारे. शंकर, हनुमान, कृष्ण ही मंडळी मातब्बर खरी, पण ती शाळेतल्या हेडमास्तरांसारखी वाटतात. ती थोर आहेत, पण त्यामुळेच ती आपल्याला जवळची वाटत नाहीत, आपल्या गणपतीइतकी.

आमच्याकडे गणपती बसत नाहीत आणि या गोष्टीचे मला नेहमीच वाईट वाटत आलेले आहे. त्यामुळेच गणपतीत माझ्या मामाकडे गेलो की मी आत जाऊन पहिला त्याच्या घरातला गणपती पहात असे. तेव्हा पुण्याला गणपती पहायला यायचेही मोठे आकर्षण असे. सासवड आणि नंतर खेडला रहात असताना आम्ही संध्याकाळी एसटीने पुण्यात येत असू आणि रात्रभर गणपती पाहून रात्री ४/५ वाजता पुन्हा गावी जात असू. त्या रात्री पहिल्यांदा खूप उत्साह असे पण काही गणपती पाहिले की मी चालल्यामुळे थकून जाई नि डोळ्यांवर झोप अनावर होई. ‘आता बास!’ असे मी म्हटले की घरचे हसत. ‘इतक्यात थकलास?’ असे म्हणून माझी थोडी थट्टा केली जाई. आम्ही असे थांबलो की मग साहजिकच माझा मोर्चा एखाद्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलकडे वळे. काही चटरभटर पोटात गेली की मला उर्जा मिळे आणि मी मोठ्या उत्साहाने पुढचे देखावे पाहण्यासाठी सज्ज होई. गमतीची गोष्ट म्हणजे पुण्यात आल्यानंतर मात्र पहिल्या एक दोन वर्षांचा अपवाद सोडला तर नंतर एकदाही मी गणपती पहायला गेलेलो नाही. ‘खरा पुणेकर कधीच गणपती पहायला जात नाही’ हे कुठेतरी वाचलेले वाक्य माझ्याबाबतीत तरी मी खरे करतो आहे.

असो. बाप्पा आता चालले आहेत. चौकाचौकात दिसणारी ती तेजस्वी, हसरी, आनंददायी मूर्ती आता वर्षभर दिसणार नाही हे खरे, पण त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. बाप्पा आत्ता चालले असले तरी ते पुन्हा पुढच्या वर्षी येतील. किंबहुना यावर्षीपेक्षाही आधीच. कारण त्यांना निरोप देतानाच आपण त्यांना गळ घालतो आहोत, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’

वि.सू. आम्ही हंपी(कर्नाटक) येथ गेलो असताना तिथे असलेल्या एका मोठ्या सुंदर गणेशमुर्तीचे छायाचित्र इथे डकवतो आहे, वाचकांना ते आवडेल अशी अपेक्षा करतो!