Sunday, February 27, 2011

जागतिक मराठी दिन की अगतिक मराठी दिन?

आज जागतिक मराठी दिन. कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर अर्थात तात्या शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा जागतिक मराठी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यातच कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीस या वर्षीपासून सुरूवात होत असल्याने या वर्षीचा जागतिक मराठी दिन विशेष महत्वाचा आहे. पण जागतिक मराठी दिन साजरा होत असताना आज मराठीची नेमकी स्थिती कशी दिसते?

सोनेरी मुकुट परिधान केलेली मराठी अंगावर लक्तरे घालून मंत्रालयाच्या दारात उभी आहे असे वक्तव्य कुसुमाग्रजांनी एकेकाळी केले होते, पण त्यांचे ते म्हणणे शासनाला उद्देशून होते. त्यावेळी मराठीला लोकाश्रय तरी होता; आज मात्र दुर्दैवाने तसे म्हणता येणार नाही. आजच्या मराठी भाषेच्या अंगावर लक्तरे काय, लज्जारक्षणासाठीही पुरेसे कपडे नाहीत असेच खेदाने म्हणावे लागेल आणि तिच्या या अवस्थेसाठी मराठी माणूस नि फक्त मराठी माणूसच जबाबदार आहे हे कटू सत्य मान्य करून घ्यावेच लागेल. मराठी शाळा ओस पडत आहेत, मराठी पुस्तकांचे वाचन घटत आहे. दारांवरच्या नावाच्या पट्ट्यांवरून, दुकानांच्या नामफलकांवरून मराठी हद्दपार होते आहे. इंग्रजी शब्द जास्त नि मराठी शब्द कमी अशी धेडगुजरी "मराठी" वाक्ये आजचा मराठी माणूस बोलत आहे. किंबहुना त्याला मराठीची लाज वाटते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरू नये. जन्माला आलेला प्रत्येक जीव एकेदिवशी मृत्यु पावतो, भाषेचेही असेच असते. जगात पहिल्या क्रमांकावर असलेली मॅंडेरीन, स्वत:ला जागतिक भाषा म्हणवणारी इंग्रजी या भाषाही एके दिवशी अस्तंगत होणार, मग मराठी त्याला अपवाद कशी असेल? पण मराठीचे हाल असेच चालू राहिले तर तिचे मरण नैसर्गिक म्हणता येणार नाही, तो एक खून असेल, मराठीचा मराठी भाषिकांनी केलेला खून!

सर्वप्रथम, मराठी नष्ट झाली तर होणारे नुकसान हे आपले असेल हे मराठी भाषिकांनी ध्यानात घ्यायला हवे. मराठी नष्ट झाली तर जगातले भाषातज्ञ काही वेळ हळहळतील पण सगळ्यात मोठा तोटा होईल तो आपला, हे मराठी भाषिकांना का कळत नाही? आपण ओळखले जातो ते आपल्या भाषेमुळे. मराठी, गुजराथी, पंजाबी, मल्याळी हे मानवसमुह या नावांनी का ओळखले जातात? त्यांच्या भाषेमुळे. जर मराठी नष्ट झाली तर आपली ओळखच आपण गमावून बसू हे मराठी भाषकांना का समजत नाही?

इंग्रजी अर्थार्जनासाठी आवश्यक आहे हे मान्य, पण ती मातृभाषा कशी होईल? लहान मुलाला झोपताना "निंबोणीच्या झाडामागे" हीच कविता हवी, संकटांचे काळे ढग दाटून आलेले असताना धीर येण्यासाठी कुसुमाग्रजांची "कणा" कविताच हवी आणि श्रावण महिन्यात उनपावसाचा खेळ पाहून झालेला आनंद वाटून घेण्यासाठी बालकवींची "श्रावणमासी, हर्ष मानसी" हीच कविता हवी. आयुष्याच्या सुखदु:खाच्या खेळात फक्त आपली मातृभाषाच साथ देऊ शकते हे मराठी माणसाच्या ध्यानात का येत नाही?

पण आणि हा पणच खूप महत्वाचा आहे. स्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही. आपण आजही मराठी वाचवू शकतो आणि वाढवूही शकतो. यासाठी मी स्वत: वापरत असलेले काही उपाय मी इथे सांगतो आहे. मराठी संवर्धनासाठीचे काही उपाय जर आपल्याकडेही असतील तर त्यांचे इथे स्वागतच आहे.

१) मराठीचा वापर करा. पण कुठे? शक्य असेल तिथे तिथे! दुकानात, रस्त्यावर, दूरध्वनीवर बोलताना, पत्रे लिहिताना, याद्या करताना, आपले नाव लिहिताना जिथे जिथे मराठी वापरता येईल तिथे ती वापरा. आपली मातृभाषा मराठी आहे नि इंग्रजी ही आपण फक्त अर्थार्जनासाठी स्विकारलेली परकीय भाषा आहे हे नेहमी लक्षात ठेवा. इंग्रजी नि मराठी हे पर्याय उपलब्ध असतील तर नक्की मराठीचाच पर्याय निवडा. (एटीएम सोयीचा वापर करताना मी नेहमी मराठीचाच पर्याय निवडतो.) कायद्याचे कागद मराठीतच करा.(नुकताच आम्ही केलेला जमिनखरेदीचा व्यवहार आम्ही मराठीतच नोंदवला.) बॅंका, विविधवस्तूभांडारे, उंची हॉटेले इत्यादी ठिकाणी आवर्जून मराठी बोला. जर मराठी भाषेचा पर्याय ह्या संस्था तुम्हाला उपलब्ध करून देत नसतील तर त्यांच्याशी भांडा, पण मराठीचाच आग्रह धरा.

२) इतरांकडूनही मराठीचा आग्रह धरा. जर तुमचे मित्र इंग्रजी वापरत असतील तर त्यांना तसे न करण्याबाबत सांगा. जर वाहिन्यांवर, रेडिओवर, वर्तमानपत्रांमधील मराठीबाबत आपण समाधानी नसाल तर त्यांना तसे नक्की कळवा. आपण महाराष्ट्रात राहतो आणि या राज्याची अधिकृत भाषा असलेल्या मराठी भाषेचा आग्रह धरण्यात काहीही चुकीचे नाही हे नेहमी ध्यानात ठेवा.

३) मराठीच्या शुद्धतेचा आग्रह धरा. फक्त सर्वनामे नि क्रियापदे मराठीत वापरणे म्हणजे मराठी बोलणे नव्हे. अंक, वारांची नावे मराठीच वापरा. (मी नेहमी माझा भ्रमणध्वनी क्रमांक मराठीतच सांगतो.) रुळलेल्या मराठी शब्दांच्या जागी जर कुणी इंग्रजी शब्द वापरत असेल तर ती चूक त्यांच्या लक्षात आणून द्या. मराठी लिहिताना तुम्ही ती शुद्ध लिहाल याची काळजी घ्या आणि इतरांकडूनही मराठीच्या शुद्धतेबाबत आग्रही धरा. मराठी अशुद्ध लिहिणा-या नि वर त्याचे समर्थन करणा-यांना मी एकच प्रश्न विचारून निरूत्तर करतो. जर तुम्ही तुमचे नाव लिहिताना ते अचूक लिहिण्याची काळजी घेत असाल तर इतर मराठी शब्द लिहिताना निष्काळजीपणा का दाखवता? इंग्रजी शब्द लिहिताना त्यांमधे चुका न होण्याबाबत तुम्ही खबरदारी घेता, मग मराठीबाबतच ही बेपर्वाई का?

४) अमराठी सहका-यांना मराठी शिकवा, त्यांना मराठीची ओळख करून द्या. अमराठी लोक मराठी शिकण्यासाठी नेहमीच तयार असतात असा माझा तरी अनुभव आहे. त्यांच्याशी शक्य असेल तिथे मराठी बोला. त्यांना मराठी शिकवा, साधीसोपी वाक्ये त्यांना ऐकवा, त्यांचा अर्थ त्यांना समजावून द्या.

चला तर मग! भाषिकांच्या संख्येनुसार जगातल्या पहिल्या पंचवीस भाषांमधे मोडणारी, भारतात भाषिकांच्या संख्येनुसार प्रादेशिक भाषांमधे पहिल्या क्रमाकांवर असणारी, एकाचवेळी राकट, कणखर आणि नाजूक, कोमल, फुलांसारखी मृदु असणारी अमृताहूनी गोड अशी ही आपली मातृभाषा - मराठी टिकवूया आणि वाढवूया!

Saturday, February 19, 2011

कवडी गावाला भेट

मागच्या महिन्यात तेवीस तारखेला कवडीला जाऊन आलो, पण वेळ न मिळाल्याने त्यावर लिहिणे किंवा फोटो टाकणे जमले नव्हते. आता किंचीत सवड मिळाल्यावर हे काम करतो आहे.

कवडी अर्थात् कवडीपाट हे पुणे सोलापूर रस्त्यावर पुण्यापासून साधारण १५ किमी दूर असे एक लहानसे गाव आहे. सोलापूर रस्त्यावर पहिला टोलनाका पार केला की अगदी लगेच डावीकडे एक रस्ता जातो तो पकडावा, साधारण ३/४ किमी पुढे जावे (इथे एक रेल्वे फाटकही लागते) की कवडी गाव आलेच. गावातून वाहणारी नदी नि त्यावरचा बंधारा ही अनेक प्रकारच्या पक्षांची आवडती जागा दिसते. स्थानिक आणि स्थलांतरित अशा सुमारे १५ जातींचे पक्षी आम्हाला इथे पहाता आले.

अनेक पक्षांचा वावर असला तरी कवडीची स्थिती अतिशय वेदनादायक आहे हे नक्की. पाण्यातून वाहत येणारी प्रचंड घाण (पुणेकरांनो, आपण कधी सुधारणार?), पाण्यावर तरंगणारी जलपर्णी, त्यावर पसरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या हे दृश्य मन अक्षरश: सुन्न करते. त्यातच अस्वच्छता फैलावण्याच्या कामात आम्ही मुळीच मागे नाही असे म्हणत कवडीवासीही थर्माकोलची ताटे, कचरा टाकून या कामात आपला हातभार लावताना दिसतात. पण असे असूनही या अस्वच्छतेतच जलक्रीडा करणा-या पक्षांना पाहिल्यावर एक प्रजाती म्हणून आपली लाज वाटल्याशिवाय रहात नाही!

असो, तर कवडीला दिसलेल्या पक्ष्यांचे हे फोटो. हे सारे कॅनॉन १०००डी आणि कॅनॉन ४०० एम एम ५.६ लेन्स या जोडीने काढले आहेत.

Tuesday, February 15, 2011

डीएसेलार कॅमेरे - काही गैरसमज

डिजीटल कॅमे-यांचे कमी झालेले भाव, त्यांमधे आलेला सुटसुटीतपणा आणि त्यांच्याभोवती असलेले वलय यामुळे आजकाल अनेक जण त्याची खरेदी करताना दिसतात. हे कॅमेरे - जी काही वर्षांपुर्वीपर्यंत फक्त व्यावसायिक छायाचित्रकारांची ओळख होती - आज सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्याने हौशी छायाचित्रकारांनाही आपले कौशल्य दाखवण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. ह्याच कॅमे-यांची एक ओळख करून देण्यासाठी आणि त्यांबाबतचे काही गैरसमज दूर करण्यासाठी हा लेख!

डीएसेलार कॅमे-यांबाबत लोकांमधे असलेल्या समजुती थक्क करणा-या आहेत. फक्त व्यावसायिक लोकांनी वापरायचा हा एक भयंकर अवघड प्रकार आहे, हा वापरला की कुठलाही फोटो हमखास 'भारी' येतो ते हा उशाखाली घेऊन झोपला की अमावस्येच्या रात्री गुप्तधन पुरलेली जागा दिसते अशा अनेक समजुती लोकांच्या मनात आहेत. दुर्दैवाने (की सुदैवाने) त्या सा-या चुकीच्या आहेत.

पाहूया काही प्रमुख गैरसमजुतींकडे.

१) डीएसेलार कॅमेरा जेवढा महाग, त्यातून येणारी छायाचित्रे तेवढी भारी!

चूक. डीएसेलार कॅमेरा ही काही जादूची कांडी नव्हे की जी फिरवली की तुम्ही अंशुल अडुमसेचे अॅन्सल अॅडम्स [http://en.wikipedia.org/wiki/Ansel_Adams] व्हाल. कॅनन ५ डी मार्क दोन + कॅनन १६-३५ एम एम ही जोडी वापरून तुम्ही खराब फोटो काढू शकता आणि कॅननचाच ए ४९५ हा चिमुकला कॅमेरा वापरून अप्रतिम फोटो! फोटो कसा निघणार हे कॅमे-यापेक्षा त्यामागे कोण आहे यावर जास्त अवलंबून असतं. यावरून मी कुठेतरी वाचलेल्या इंग्रजी ओळी आठवतात, त्यांचा साधारण तजुर्मा असा.

उत्तम निबंध, कुठला टाईपरायटर वापरलात तुम्ही?
उत्तम पदार्थ, कुठला तवा वापरलात तुम्ही?
उत्तम फोटो, कुठला कॅमेरा वापरलात तुम्ही?

२) डीएसेलार कॅमेरे वापरायला अवघड आहेत.

चूक. डीएसेलार कॅमेरे वापरणे दिवसेंदिवस सोपे होत आहे, याचे महत्वाचे कारण म्हणजे एखादी वस्तू खपण्यासाठी ती वस्तू वापरण्यास सोपी असावी या मुद्द्याला आलेले महत्व आणि सर्वसामान्य जनताही डीएसेलार कॅमेरे वापरू लागली आहे ही निर्मात्या कंपन्यांना झालेली जाणीव. आजचे डीएसेलार कॅमेरे पुर्वीच्या डीएसेलार कॅमे-यांपेक्षा खूप सोपे आहेत. किंबहुना ते वापरणे, बाजारात आलेला एखादा नविन भ्रमणध्वनी वापरण्याइतकेच सोपे आहे.

३) डीएसेलार कॅमेरा छायाचित्रण स्वस्त होत आहे.

चूक. डीएसेलार कॅमेरे आज जरी स्वस्त झाले असले तरी त्यांबरोबर वापरायच्या लेन्सेसचे भाव मात्र कमी झालेले नाहीत. विशेषतः चांगल्या दर्जाच्या लेन्सेसचे. डीएसेलार कॅमेरा वापरून होणा-या छायाचित्रणात कॅमेरा ही एक प्राथमिक गुंतवणूक असते, मोठा खर्च होतो तो लेन्सेसवर. आणि लेन्सेसचे व्यसन वाईट, एकवेळ गर्दचे व्यसन सुटेल पण लेन्सेसचे व्यसन सुटणे महाकठीण. माझेच उदाहरण सांगतो, मी आज सहज हिशोब केला तेव्हा असे दिसले की माझ्या एकूण छायाचित्रण संचाची किंमत चक्क दीड लाख आहे आणि यातला कॅमेरा आहे फक्त १४ हजारांचा.

४) डीएसेलार कॅमेरा माझ्यासाठी आहे.

चूक. स्पष्ट सांगायचे झाले तर, आपल्या 'बंटी'चे 'फॅन्सी ड्रेस स्पर्धे'तले फोटो काढण्यासाठी, आपल्या कुटुंबाचे सारसबागेत फोटो काढण्यासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमात (कार्यक्रमाकडे लक्ष न देता) कचाकचा फ्लॅश मारून लोकांना वैताग देण्यासाठी जर तुम्ही तुमच्या कॅमे-याचा वापर करत असाल तर डीएसेलार कॅमेरा तुमच्यासाठी नव्हे. पण जर तुम्हाला छायाचित्रण कलेची आवड असेल, ती शिकण्याची इच्छा असेल, चांगला फोटो कशाला म्हणावे हे जर तुम्हाला कळत असेल तर मात्र छायाचित्रणासाठी डीएसेलार कॅमे-यासारखा दुसरा पर्याय नाही!

तुमची छायाचित्रण कलेची आवड जोपासण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा!

Monday, February 14, 2011

रामगणेशगडकरी.कॉम - एक नवे सुंदर मराठी संकेतस्थळ

राम गणेश गडकरी यांचे समग्र साहित्य महाजालावर उपलब्ध करून देणा-या रामगणेशगडकरी.कॉम या संकेतस्थळाविषयी नुकतेच मनोगतावर [http://www.manogat.com/node/21505] वाचले आणि एखाद्या तहानलेल्या माणसाला अचानक शीतल, नितळ पाण्याचा झरा समोर दिसावा तसे वाटले. गडक-यांची नाटके आणि (त्याहून अधिक) त्यांचे विनोदी लेखन मी गेले कित्येक दिवस शोधत होतो; ते असे अचानक पुढे आल्यावर झालेला आनंद कसा सांगावा! मराठी संकेतस्थळांमधील उत्कृष्ट संकेतस्थळांमधे या संकेतस्थळाची गणना करता येईल यात काय शंका?

ऐरोळी, नवी मुंबई येथील संगणक प्रकाशनाने तयार केलेल्या या संकेतस्थळावर गडकरींचे सारे साहित्य आहे. एकच प्याला, पुण्यप्रभाव, भावबंधन यांसारखी गडक-यांची गाजलेली नाटके, त्यांच्या कविता, रिकामपणाची कामगिरी, लग्नाच्या मोहिमेची पूर्वतयारी, स्वयंपाक घरातील गोष्टी असे त्यांचे गाजलेले विनोदी लेख असे सगळे लेखन इथे आहे. महत्वाचे म्हणजे हे लेखन युनिकोडमधे आहे, त्यामुळे ते इतरत्र डकवणे किंवा त्यामधील नेमकी माहिती शोधणे अतिशय सोपे झाले आहे.

इंग्रजी भाषेत Project Gutenberg (www.gutenberg.org) या नावाचा एक उपक्रम गेले कित्येक वर्षे सुरु आहे. इंग्रजी भाषेतील स्वामित्वहक्क संपलेली सगळी पुस्तके या ठिकाणी मोफत उपलब्ध आहेत. या उपक्रमामुळे इंग्रजी भाषेतले हे ज्ञानभांडार आज इंटरनेट जोडणी असलेल्या प्रत्येकासाठी खुले झाले आहे. मराठीत असे संकेतस्थळ नसले तरी हा त्या दिशेने झालेला एक उत्तम प्रयत्न आहे हे नक्की. इलेक्ट्रॉनिक पुस्तकांचा हा पर्याय छापील पुस्तकांपेक्षा स्वस्त आहे आणि पर्यावरणाला अधिक अनूकुलही.

महाजालावर असणा-या प्रत्येक मराठी माणसाने एकदा तरी या अनमोल खजिन्याला भेट द्यायलाच हवी!

संकेतस्थळाचा पत्ता : http://ramganeshgadkari.com/egadlari/

Wednesday, February 9, 2011

काही(च्या काही) कविता

पाकिस्तानातून आलेला कांदा पाहून
एक मुळा गाजराला म्हटला,
'च्यायला ह्या पाकिस्तान्यांना
मानलं पाहिजे बुवा.
आपल्याला रडवायची एकही संधी
सोडत नाहीत साले.'

'माझा मित्र बनशील का?'
असं एका सुंदर मुलीनं
मला विचारल्यावर
सूट अन टाय घालून,
सिनेमाची महागडी तिकीटे घेऊन,
लाल गुलाबांच्या बुकेसहित
मी तिचा दरवाजा ठोठावला.
दार उघडल्यावर ती
मला म्हणते कशी,
'अरे फेसबुकवर...'

ए राजानं केलेल्या घोटाळ्याचा
भलामोठा आकडा पाहून
आश्चर्यचकित झालेला बंडू
बाबांना म्हटला,
'बाबा, हे सगळे पैसे जर
सगळ्या भारतीयांमधे वाटले
तर प्रत्येकाला किती येतील?'
बाबा म्हणाले,
'उद्या ऑफिसात कॉम्प्युटरवर
पाहून सांगतो हं बाळ!
आपल्या घरच्या गणकयंत्रात
फक्त आठच आकडे आहेत रे!'

नव-याच्या मागे
लागून लागून लागून
पमीनं त्याला शेवटी
नोकरी बदलायला लावलीच.
आता तो आयटीत मरतो,
आणि ती ऐटीत जगते.

हाडं गोठवणार्‍या त्या थंडीत
त्याचा नि तिचा
असे दोन स्वेटर
नकळत एकमेकांच्या जवळ आले.
स्वेटर असले म्हणून काय,
त्यांना उबेची गरज नसते?
काही महिन्यांनी त्यांना
एक स्वेटर झाला.
त्यांनी त्याचं नाव बंडी ठेवलं,
'थंडी'वरून!

या वर्षीचा
आदर्श खासदार पुरस्कार
१०० कोटी लाटणा-या
एका मंत्रीमहोदयांना
'सन्मानपूर्वक' जाहीर झालाय.
त्यांच्या भ्रष्टाचाराचा आकडा
सगळ्यात कमी होता.

परवा सवाईमधे
'कानडाऊ विठ्ठलू' गाणं
एका गायकाने चक्क
'कॅनडाऊ विठ्ठलू' असं गायलं.
गाणं सुरू असताना
माझ्या शेजारची मुलगी
माझ्या कानात म्हटली,
'विट्ठल...
कॅनडाचा होता का?'
मला आताशा पुण्याची
काळजी वाटू लागलीये.