Wednesday, April 28, 2010

गुलमोहोर नि कोकिळकूजन!

या वर्षीचा उन्हाळा मागच्या वर्षीच्या उन्हाळ्यापेक्षा तीव्र आहे असे आपल्याला दर वर्षी वाटते. हा उन्हाळाही अर्थात त्याला अपवाद नाही! तापमानवाढ होत आहे की नाही ह्याबाबत अनेक चर्चा घडत आहेत, त्यांचे निष्कर्ष काहीही निघोत, उन्हाळे अधिकाधिक असह्य होत आहेत (की वाटत आहेत?) हे नक्की. पण उन्हाळा काही सगळाच्या सगळा वाईट असतो असे नाही. वाळा, मोग-याचे फूल टाकलेले पाणी, खरबुज, टरबुज, द्राक्षे यांसारखी फळे, पन्हं, लिंबू अशी सरबते, दुपारच्या झोपा, आंब्याच्या रसाची जेवणे नि पत्त्यांचे डाव ह्यांसारख्या गोष्टीही तो आणतोच की. आपल्या आजुबाजुचा निसर्गही आपल्यासाठी हा उन्हाळा सुसह्य करायचा प्रयत्न करत असतो, पुरावा म्हणून उन्हाळ्यातला गुलमोहोर नि कोकिळकुजन ही दोनच उदाहरणे पुरेशी नाहीत का?

गुलमोहोर म्हटले की मला आठवतात सासवडच्या वाघिरे विद्यालयातले माझे प्राथमिक शाळेचे दिवस. आमच्या परिक्षा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात असत. शाळेत गुलमोहोराची खूप झाडे होती नि पेपरआआधीचा थोडा वेळ आम्ही त्यांखाली अभ्यास करत बसत असू. झाडे तेव्हा अगदी फुलुन आलेली असत आणि त्यांखाली लाल फुलांचा खच पडलेला असे. मधूनच एखादे फूल स्वत:भोवती गिरकी घेत खाली येई. गुलमोहोराच्या फुलाला पाच तुरे असतात, चार लाल तुरे नि एक लाल पांढरा तुरा. या लालपांढ-या तु-याला मुले कोंबडा म्हणत नि तो खातही. त्याची तुरट चव मला मात्र कधीच आवडली नाही. बारामतीजवळ पणद-याला माझ्या आत्याकडे तर अंगणातच गुलमोहोराचे झाड होते. ते झाड चढायलाही सोपे होते, दुपारी घरात सगळे झोपले की मी हळूच त्या झाडावर चढून बसत असे. त्या शांत वेळी झाडावर चढून आजुबाजुला पहात राहण्यात केवढी गंमत होती!

नंतर पुण्यात आल्यावर आम्ही ज्या सोसायटीत रहात होतो तिथेही बरेच गुलमोहोर होते. एक मजेची गोष्ट म्हणजे ही झाडे दोन तीन वेगवेगळ्या रंगांमधे होती. अगदी लालभडक, फिकट लाल, शेंदरी(भगवा) असे रंग त्या झाडांमधे होते. हे गुलमोहोर फुलतही वेगवेगळ्या काळात. दुपारी सारे कसे शांत शांत आहे, खोलीत फक्त पंख्याचा आवाज घुमतो आहे, अशा वेळी मी हळूच उठे नि खिडकीतून गुलमोहोराच्या झाडाकडे पाहून येई, मन कसे ताजेतवाने होई! आजही लाल फुले, हिरवी पाने नि पार्श्वभुमीला निळे आकाश असा एखादा गुलमोहोर पाहिला की मला वाटते आपण तैलरंगातले एखादे भडक पण मन मोहवणारे एखादे चित्रच पहातो आहोत!

उन्हाळ्यातला दुसरा आनंददायी प्रकार म्हणजे कोकिळकुजन. सासवडला हडकोमधे आमच्या घरासमोरच एक मोठे आंब्याचे झाड होते. मार्च महिना आला की दोन गोष्टी घडत. हे झाड मोहोराने फुलुन येई नि त्यावर कोकिळेचे मधुर कुजन सुरू होई, दोन्ही गोष्टी माझ्या तितक्याच आवडत्या होत्या. उन्हाळा नि कोकिळकुजन यांची जी सांगड माझ्या मनात घातली गेली आहे ती तेव्हापासूनच. आज पुणे सातारा रस्त्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर रहात असूनही आमच्या घरात कोकिळकुजन ऐकू येते हे विशेषच नाही का? सकाळ हा कोकिळेचा आवडता काळ दिसतो. सकाळी कोकिळेचा तो गोड आवाज ऐकला की कसे प्रसन्न वाटते, तो दिवस छान जाणार खात्रीच पटते! कोकिळेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती फक्त झाडावर बसूनच गाते. सिमेंटच्या कट्ट्यावर बसून कूजन करत असलेली कोकिळ मी तरी अजून पाहिलेली नाही, तुम्ही?

दिवसेंदिवस आपली शहरे अधिकाधिक प्रदूषित होत आहेत, झाडे कमीकमी होत आहेत, कचरा वाढतो आहे नि तापमानवाढ होत आहे. तरीही कोकिळ थांबलेली नाही, आपल्यावर ती नाराजही झालेली नाही. ती आपली गातेच आहे! आपण निसर्गाकडे पाठ फिरवली आहे, पण निसर्गाने आपल्याकडे पाठ फिरवली नाही, हे वागणे दोघांच्याही स्वभावानुसारच आहे, नाही का?

उन्हाने होणारी काहिली तर आहेच, पण नकारात्मक बातम्यांच्या गरम हवेने हा उन्हाळा आणखी त्रासदायक ठरला आहे. कुठे बलात्कार, कुठे खून, कुठे दरोडे तर कुठे भ्रष्टाचार! ह्या सगळ्या बातम्या ऐकून जीव अगदी त्रस्त होऊन गेलेला असताना हे कोकिळकूजन ऐकले की वाटते, ही कोकिळ जणू म्हणते आहे, ’अरे जरा थांब, हेही दिवस जातील. थोडी कळ काढ, धीर धर, आशा सोडू नकोस. काही दिवसांतच या गरम हवेच्या झळा थांबतील, हवेत थंडावा येईल नि सगळ्या जीवांना होणारा त्रास ओसरेल. पावसाळा येईल नि त्या पाण्याबरोबर तुझ्या सा-या चिंताही चुटकीसरशी वाहून जातील!’

Monday, April 26, 2010

भारत - एक दुतोंडी लोकांचा देश!

’माझा भारत महान’ हे वाक्य आपण रोज हजारदा वाचत नि ऐकत असलो तरी ह्या वाक्यात सत्याचा अंश किती हे आपण सगळे जाणतोच! भारताच्या ’सत्यमेव जयते’ ह्या बोधवाक्याइतकाच या वाक्यालाही आता काही अर्थ उरलेला नाही. अर्थात कुठल्याही गोष्टीची जबाबदारी आपण स्वतःवर घेत नसल्याने या गोष्टींचे खापर आपण नालायक नेते, सडलेली यंत्रणा नि ’ईतर’ भ्रष्ट भारतीय यांच्यावर कधीच फोडून टाकले आहे. पण भारत देश हा भारतीयांनी बनलेला आहे नि भारतीयच तो चालवत आहेत हे आपण सोयीस्कररित्या विसरलो आहोत, त्यामुळे स्वत:ला सोडून इतरांना मोजणा-या चोरांसारखी आपली स्थिती झालेली आहे. स्वत: वागायचे एक नि दुस-यांकडून अपेक्षा भलतीच असे आपले वागणे आहे, नुकत्याच घटलेल्या दोन गोष्टींमधून ही गोष्ट चांगलीच स्पष्ट होते.

पहिली घटना आहे साता-याची. इथे नुकतेच कुठल्याशा हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले नि तिथे अभिनेता ’सलमान खान’ला पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली. कोण हा सलमान खान, तर तोच ज्याच्यावर सद्ध्या काळवीटाची शिकार करणे नि आपल्या बेफाम गाडीने लोकांना चिरडणे असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. सलमानने आपल्या गाडीखाली चिरडलेल्या व्यक्ती जर या लोकांच्या नातेवाईक असत्या तर त्याला पहायला त्यांनी अशीच गर्दी केली असती काय? किंवा जर सलमानच्या जागी अजमल कसाब असता तर त्याला पहायला हे लोक कौतुकाने असेच जमा झाले असते काय? सलमान नि कसाब यांची तुलना इथे अप्रस्तुत नि चुकीची वाटू शकते पण ती अगदी योग्य अशीच आहे. कुणाच्याही प्राणांची पर्वा न करणारे नि निरपराध लोकांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेले हे दोन खलनायक वृत्तीने अगदी सारखे आहेत, त्यांमधे मुळीच फरक नाही. सलमानच्या खटल्यांचा निकाल अजून लागला नाही अशी पळवाट काही जण काढू शकतात, पण मग ही पळवाट एकट्या सलमानसाठीच का? तसा तर कसाबच्या खटल्याचा निकालही अजून लागला नाही, मग त्याला खूनी का मानावे? पण भारतात तिथे सिनेमातल्या फालतू नटनट्यांनाही देवदूत मानले जाते, तिथे सलमान हा एक ’सुपरस्टार’ आहे. लाखो लोक त्याचे चाहते आहेत, अनेक जण प्रत्यक्ष देवाप्रमाणे त्याची भक्ती करतात, त्यामुळे त्याला शंभर गुन्हे माफ आहेत. ह्या लोकांचे म्हणणे अगदी स्पष्ट आहे, "सलमान आमचा आवडता आहे, त्याला पहायला आम्ही जाणारच. निष्पाप लोकांना मारल्याचे आरोप त्याच्यावर असले म्हणून काय झाले? अर्थात, नंतर, भारतातल्या वाढत्या गुन्हेगारीवर नि गुन्हेगारांच्या समाजात राजेरोसपणे वावरण्यावर आम्ही टिकाटिप्पणी करू, ती मात्र तुम्ही शांतपणाने ऐकून घ्या!"

दुसरी घटना आहे लोकसभेतली. इथे, शशी थरूर आयपीएल घोटाळ्यातल्या आपल्या सहभागाविषयी निवेदन करत असताना त्यांनी आपले राज्य केरळचा उल्लेख केला. तेव्हा केरळातल्या लोकसभा सदस्यांनी त्यांना बाके वाजवून पाठिंबा दिला. शशी थरूर आपण निरपराध आहोत असा कितीही दावा करत असले तरी तो दावा किती हास्यास्पद आहे ते एक लहान मुलगाही सहज सांगू शकेल. त्यांची मैत्रिण ’सुनंदा पुष्कर’ यांना कोची संघातली अठरा टक्के मालकी कशी मिळाली? आणि तीही फुकट? आणि जर यात गैर काही नव्हते तर मग त्यांनी त्या हिस्स्यावर पाणी का सोडले? ललित मोदी यांची आवडती (आता नावडती?) ललना "गॅब्रिएला दिमित्रिअदेस" हिला भारताचा विसा मिळू नये अशी त्यांची इच्छा नसतानाही परराष्ट्र मंत्रालयाने तिला विसा दिलाच आणि याचा बदला म्हणून ललित मोदी यांनी कोची संघांच्या मालकांमधे सुनंदा पुष्कर यांचाही समावेश आहे असा गौप्यस्फोट केला. शशी थरूर हे काही इतर खासदारांपेक्षा वेगळे नव्हेत, फक्त घोटाळे करण्यात नि ते दाबण्यात जो सराईतपणा लागतो तो त्यांच्याकडे नाही इतकेच. पण मुद्दा तो नव्हे, मुद्दा आहे केरळी सदस्यांच्या बाके वाजवण्याचा. निवेदन करणार जर लालूप्रसाद असते तर त्यांनी अशीच बाके वाजविली असती काय? आपला तो बाब्या नि दुस-याचे ते कार्टे? म्हणजे लालूप्रसाद करतात तो भ्रष्टाचार नि शशी थरूर करतात तो शिष्टाचार? केरळसारख्या राज्यातून आलेल्या सुशिक्षित नि सुसंस्कृत खासदारांकडून माझी ही अपेक्षा नव्हती!

एकूणच काय, भारत हा एक दुतोंडी लोकांचा देश आहे. आणि जोपर्यंत ही परिस्थिती बदलत नाही, तोपर्यंत विकसित देशांच्या यादीत भारत पोचतो आहे अशी कुणी कितीही दवंडी पिटली तरी प्रत्यक्षात तसे होणे हे एक दिवास्वप्नच ठरणार हे मात्र खरे!

Wednesday, April 21, 2010

औदुंबर

मराठी भाषेत आत्तापर्यंत लिहिल्या गेलेल्या कवितांची संख्या जर कुणी काढली तर ती नक्कीच काही लाखांचा आकडा पार करेल. 'कविंची वीण मोठी!' तेव्हा त्यांच्या अपत्यांची संख्या इतर काव्यप्रकारांपेक्षा जास्त असावी हे ओघानेच आले. पण 'काळ हा सर्वोत्तम समीक्षक आहे!' हे गंगाधर गाडगीळांचे म्हणणे खरे मानले तर काळाच्या तडाख्यातून वाचलेल्या नि आजही काव्यरसिकांच्या तोंडात खेळणार्‍या कविता काही मोजक्याच. त्यात ज्ञानेश्वर, रामदास नि तुकाराम अशा काही मातब्बर मंडळीच्या रचना सोडल्या तर आधुनिक कविता अजूनच थोड्या. मराठी साहित्यक्षेत्रातली अशीच एक अजरामर कविता आजच्या आपल्या लेखाचा विषय आहे, ती म्हणजे बालकवींची "औदुंबर".

औदुंबर ही कविता फक्त आठ ओळींची आहे, पण तिच्याबाबत जेवढे आजपर्यंत लिहिले गेले आहे तेवढे दुसर्‍या कुठल्याच कवितेविषयी लिहिले गेले नसेल. उत्तम कलाकृती तुम्हाला समाधान देतात, पण अजरामर कलाकृती एवढंच करुन थांबत नाहीत, त्या तुम्हाला एक हुरहुर लावतात, एक वेगळीच अनामिक हुरहुर. बालकवींची औदुंबर कविता अशीच आहे. ती पुन्हा पुन्हा वाचली तरी वाचकाचे समाधान होत नाही. तो पुन्हा पुन्हा ती वाचतो, तिचा अर्थ लावू पहातो, पण दवबिंदुंचे मोती जसे बोटात पकडता येत नाहीत तसाच या कवितेचा अर्थही त्याला चिमटीत पकडता येत नाही!

रूढार्थाने औदुंबर ही एक निसर्गकविता आहे. अगदी साधी निसर्गकविता. एका चिमुकल्या गावाशेजारून वाहणारा एक झरा नि त्याच्या आजुबाजुच्या निसर्गाचे वर्णन करणारी एक कविता. किंबहुना चित्रदर्शी निसर्गकवितेचे हे अगदी उत्तम उदाहरण आहे. पण हे प्रकरण एवढे सोपे नाही, ते तेवढे सोपे असते तर मग आणखी काय हवे होते! ही कविता वाचली की अनेक चित्रे माझ्या अगदी डोळ्यासमोर उभी राहतात. लहानसा झरा, त्याच्याकाठची ती हिरवळ, ती पांढरी पायवाट, तो काळा डोह नि तो औदुंबर. पण हे सगळे फसवे आहे, मला तर वाटते की हा सगळा भास आहे, जे आहे ते या चित्रापलीकडेच आहे. 'काय बोंचते तें समजेना, ह्दयाच्या अंतर्हदयाला' असे काहीसे.

दिवसा आपला वाटणारा रस्ता रात्री एकदम परका वाटावा तसे काहीसे ह्या कवितेतील शब्दांबाबत आहे. निळासावळा, चिमुकलें, अडवीतिडवी, गरदी, गोड, काळिमा असे आपले नेहमीचे शब्द ह्या कवितेत काही वेगळेच भासतात. ’ऐल तटावर पैल तटावर’ या शब्दांनी जी कवितेची लयबद्ध सुरूवात झाली आहे ती लय अगदी कवितेच्या शेवटपर्यंत टिकून रहाते. निळासावळा हा शब्द खरे तर एका झ-याचे वर्णन करण्यासाठी योग्य शब्द नव्हे, पण इथे तो चपखल बसतो. त्यानंतर चार घरांचे चिमुकले गाव आपल्याला दिसते. त्यापलीकडे आहे शेतमळ्यांची गरदी, पण ती कशी? अगदी हिरवी! शेतमळ्यांमधे एक पायवाट आहे, पण ती सरळ नव्हे, ती त्यांमधे अगदी अडवीतिडवी पडली आहे. ही पायवाट कुठे चालली आहे, तर हिरव्या कुरणांमधून काळ्या डोहाकडे. बालकवी हे निसर्गकवी असले अन फुलत्या, देखण्या, प्रसन्न निसर्गाचे वर्णन असणा-या अनेक कविता त्यांनी केल्या असल्या तरी त्यांची मूळप्रवृत्ती निराशावादी होती. तरुण नि प्रसिद्धीच्या ऐन शिखरावर असताना त्यांनी केलेली आत्महत्या हे एकच उदाहरण त्यांची ही प्रवृत्ती स्पष्ट करण्यासाठी पुरेसे आहे. हिरवे कुरण ते काळा डोह हा पायवाटेचा प्रवास त्यांच्या जीवनप्रवासाशी सार्ध्यम्य साधणाराच नाही का? त्यानंतर कसलासा एक गोड काळिमा पाणी झाकूनसा टाकत असलेला आपल्याला दिसतो नि त्यानंतर येतो तो औदुंबर. आपले पाय पाण्यात सोडून बसलेला हा ’असला’ औदुंबर नेमका कसला आहे? एखाद्या कसलेल्या वादकाने आपल्या हातांची नजाकतपुर्ण, अशक्य, अविस्मरणीय हालचाल करून एखादा अवघड तुकडा वाजवावा नि मैफिलीची सांगता करावी तसा हा औदुंबर आपल्याला भासतो. प्रत्येक वाक्यागणीक कवितेतली गूढता चढत्या भाजणीने वाढत जाते नि ह्या ’असल्या’ औदुंबराने तिचा शेवट होतो. कविता संपते पण हा ’असला’ औदुंबर म्हणजे कसला ते काही वाचकाला शेवटपर्यंत समजत नाही! मला वाटते हेच या कवितेचे यश आहे. खूप काही सांगुनही बरेच काही न सांगणारी ही कविता आहे!

आजही मी 'औदुंबर' पुन्हा पुन्हा वाचतो, प्रत्येकवेळी तिचा अर्थ शोधायचा प्रयत्न करतो नि दरवेळी एक हरवलेपणाची भावना घेऊन परततो. ते चिमुकले गाव, ती हिरवळ, तो झरा नि तो 'तसला' औदुंबर मला दिसतात, पण मला त्यांच्यापर्यंत पोचता येत नाही. मधे काहीतरी आहे, जे मला पार करता येत नाही. एक दिवस या कवितेचा अर्थ मला सापडेल, पानावरचे दवबिंदू मी हातात घेईन याची मला खात्री आहे, तोपर्यंत प्रयत्न करत राहणे एवढेच माझ्या हाती!


ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेउन

निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटांतुन.

चार घरांचे गांव चिमुकलें पैल टेकडीकडे;

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढें.

पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे

हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.

झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर,

पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर

Sunday, April 11, 2010

सकाळ नि रीडर्स डायजेस्ट

जगभरात सध्या छपाईमाध्यमांची वेगाने पीछेहाट होत असली तरी भारतात मात्र याच्या अगदी उलट चित्र आहे. इथे वर्तमानपत्रे/मासिके वाचणार्‍या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. हा भारतीयांच्या वाढत्या क्रयशक्तीचा परिणाम आहे की त्यांच्या वाढत्या साक्षरतेचा हे स्पष्ट नसले तरी ही बातमी सुखावणारी आहे हे नक्की. रेडिओ, त्यानंतर दूरचित्रवाणी नि सध्या महाजाल अशी अनेक आक्रमणे या माध्यमांनी झेलली, पण ती अजूनही तग धरून आहेत. छपाई माध्यमांची विश्वासार्हता इतर कुठल्याही माध्यमामधे नाही, छापून आले म्हणजे ते खरेच असणार असे माननारा एक मोठा वर्ग आजही आपल्याकडे आहे. इतर माध्यमे दिवसेंदिवस उथळ, बटबटीत नि थिल्लर होत असली तरी वृत्तपत्रांनी त्यांचा दर्जा टिकवून ठेवलेला आहे असे वाचकांचे मत आहे. अर्थात, सर्वसाधारण मत असे असले तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती अगदी वेगळी आहे असे मला वाटते. दूरचित्रवाणी माध्यमांइतकी परिस्थिती हाताबाहेर गेली नसली तरी सवंगपणा, थिल्लरपणा, व्यापारी वृत्ती, बेजबाबदारपणा या गोष्टींचा छपाईमाध्यमांमधेही शिरकाव झालेला आहे हे नक्की. सकाळ नि रीडर्स डायजेस्ट या दोन अशाच प्रकाशनांविषयी आज आपण बोलणार आहोत.

'सकाळ'ची माझी सगळ्यात जुनी आठवण म्हणजे भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली त्याच्या दुसर्‍या दिवसाची. सासवडच्या हडको कॉलनीत आम्ही, आमचे शेजारी सगळे आमच्या घरासमोरच्या मोकळ्या जागेत जमलो आहोत नि हातात सकाळ घेऊन राजीव गांधीच्या हत्येविषयी चर्चा करतो आहोत असे दृष्य मला आजही आठवते. टीव्ही तेव्हा एवढे पसरले नव्हते नि सकाळी रेडिओ लावण्याची आमच्या घरी पद्धत नव्हती. आजकाल जशा बातम्या चारीबाजुंनी येऊन तुमच्यावर आदळतात तसा प्रकार त्यावेळी नव्हता. सकाळशी आमचे जे नाते जुळले ते तेव्हापासून. सकाळमधल्या नि:पक्ष बातम्या, साधी सोपी (किंचीत पुणेरी) भाषा, सुटीचे पान, वाचकांचा पत्रव्यवहार सारखी सदरे यांची नंतर अगदी सवय झाल्यासारखी झाली. नंतर पुण्यात आल्यावर तर काय, सकाळशिवाय दिवसाची सुरुवात झाली असे वाटतच नसे. परिस्थिती अशी की एखाद्या दुसर्‍या गावी गेल्यावर किंवा वर्तमानपत्रांना सुटी असल्यावर चुकल्याचुकल्यासारखे वाटे. सकाळ मधला चिंटू तर दोस्तच झाल्यासारखा झाला. इतकी वर्षे आमच्या घरी सकाळ सोडून दुसरे कुठलेही वर्तमानपत्र आल्याचे मलातरी आठवत नाही. पण 'सगळ्या चांगल्या गोष्टींचा अंत एका दिवशी होतोच' अशा अर्थाची इंग्रजीत एक म्हण आहे. सकाळच्या बाबतीतही तेच झाले.

इतर वर्तमानपत्रांपेक्षा वेगळा असणारा सकाळ हळूहळू त्यांच्याच वाटेने जायला लागला. प्रतापराव पवार हे सकाळचे मालक झाल्यावर ह्या प्रक्रियेला वेग आला असे माझे स्पष्ट मत आहे. सकाळ हे पुर्वी एक वृत्तपत्र होते, नंतर ते पैसा मिळवायचे साधन झाले. बातम्यांचा दर्जा खालावला, त्यांमधल्या भाषेचा दर्जा खालावला. पुर्वी उत्पन्नाचा एक स्त्रोत म्हणून जाहिराती छापणारा सकाळ आता जाहिरातींबरोबर काही मजकूर हवा म्हणून नाईलाजाने बातम्या छापायला लागला! ज्या पुण्यात जगातील सगळ्यात शुद्ध मराठी बोलली व लिहिली जाते असे काही लोक (पुणेकरच!) कौतुकाने म्हणत, तिथल्या अस्सल पुणेरी सकाळमधे पहिल्या पानावरचे मथळेही इंग्रजीत यायला लागले. पहिल्या पानाची ही कथा, तर आतल्या पानांचे काय? तिथे तर वाक्यात इंग्रजी शब्द जास्त नि मराठी शब्द कमी अशी परिस्थिती दिसू लागली. सगळ्यात दु:खदायक बदल म्हणजे सकाळने आपली नि:पक्षपाती भुमिका सोडली. पुर्वी कुठल्याही पक्षाची भलावण न करणारा सकाळ आता चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुखपत्र झाला की काय अशी शंका लोकांना यायला लागली. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे या लोकांचे फोटो, त्यांच्या बातम्या पुन्हा पुन्हा दिसायला लागल्या. त्यांच्याविषयीच्या नकारात्मक बातम्या मात्र गाढवाच्या शिंगासारख्या गायब झाल्या. आपण सुरू केलेल्या सकाळचे हे स्वरूप पाहून स्वर्गात नानासाहेब परूळेकरांचा आत्मा अगदी तळतळत असेल यात काडीमात्र शंका नाही. सकाळचा हा आजचा अवतार पाहून आपल्यापश्चात हे वृत्तपत्र बंद पडले असते तर बरे झाले असते असे त्यांना न वाटले तर नवलच!

मात्र एवढे सगळे असूनही लोक सकाळ वाचतच आहेत (मी देखील!), याचे कारण काय असावे? मला वाटते याचे मुख्य कारण म्हणजे पर्यायाचा अभाव. आज लोकांकडे सकाळला पर्याय आहे कुठे? लोकसत्ता, लोकमत, मटा ही काय वृत्तपत्रे आहेत? ती इतकी गचाळ, ओंगळवाणी नि घाणेरडी आहेत की बंबात ती टाकली तर त्यांवर पाणीही नीट तापू नये. त्यांमुळे 'दगडापेक्षा वीट मऊ' या नात्याने लोक अजूनही सकाळच घेत आहेत. त्यांच्या या नाविलाजावर काहीतरी उपाय निघो नि त्यांना सकाळसाठी एक उत्तम पर्याय लवकरात लवकर उपलब्ध होवो अशी प्रार्थना करणे एवढेच तूर्त आपल्या हाती आहे!

सकाळसारखीच गत आज इंग्रजी भाषेत सर्वाधिक विकल्या नि वाचल्या जाणार्‍या रीडर्स डायजेस्ट या मासिकाचीही झाली आहे, पण त्याबाबत नंतर कधीतरी!

ता.क. सकाळचा दर्जा आताशा खालावला आहे असे आम्ही म्हणत असलो तरी आमचे साहेब श्री. आचार्य अत्रे यांचे मत सकाळविषयी कधीच चांगले नव्हते. सकाळसारख्या वृत्तपत्रांना नि तिथल्या पत्रकारांना झोडपून काढताना साहेब म्हणतात, 'पुण्याचे दैनिक सकाळ किंवा मुंबईचा दैनिक लोकसत्ता ही काही पत्रे नव्हेत. गिर्‍हाईकाच्या पदरात वाटेल तो सडका किडका माल अव्वाच्या सव्वा किंमतीने टाकण्यासाठी पोटभरू काळा बाजारवाल्यांनी उघडलेली ती किराणा मालाची दुकाने होत. जुलमाशी नि अन्यायाशी झुंजण्यासाठी एक पाय तुरुंगात टाकून लेखणी धरणार्‍या विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा शूर वारसा आम्ही मराठी पत्रकारांना मिळालेला आहे. तो वारसा गेल्या पाऊणशे वर्षात ज्यांनी चालविलेला आहे त्यांनाच मराठी पत्रकार असे संबोधता येईल. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी स्वबांधवांशी द्रोह करून आमच्या लेखणीचा गुजराती, मारवाडी नि मद्रासी भांडवलदारांना वेश्याविक्रय करणारे आमचे मुंबईमधले जे काही मराठी पत्रकार आहेत, त्यांना पत्रकार या पदवीन संबोधणे म्हणजे त्या थोर पदवीची विटंबना करण्यासारखे आहे.' साहेबांची ही टिप्पणी म्हणजे त्यांच्या दुरदृष्टीपणाचे एक उत्तम उदाहरण आहे, नाही का?