Monday, April 26, 2010

भारत - एक दुतोंडी लोकांचा देश!

’माझा भारत महान’ हे वाक्य आपण रोज हजारदा वाचत नि ऐकत असलो तरी ह्या वाक्यात सत्याचा अंश किती हे आपण सगळे जाणतोच! भारताच्या ’सत्यमेव जयते’ ह्या बोधवाक्याइतकाच या वाक्यालाही आता काही अर्थ उरलेला नाही. अर्थात कुठल्याही गोष्टीची जबाबदारी आपण स्वतःवर घेत नसल्याने या गोष्टींचे खापर आपण नालायक नेते, सडलेली यंत्रणा नि ’ईतर’ भ्रष्ट भारतीय यांच्यावर कधीच फोडून टाकले आहे. पण भारत देश हा भारतीयांनी बनलेला आहे नि भारतीयच तो चालवत आहेत हे आपण सोयीस्कररित्या विसरलो आहोत, त्यामुळे स्वत:ला सोडून इतरांना मोजणा-या चोरांसारखी आपली स्थिती झालेली आहे. स्वत: वागायचे एक नि दुस-यांकडून अपेक्षा भलतीच असे आपले वागणे आहे, नुकत्याच घटलेल्या दोन गोष्टींमधून ही गोष्ट चांगलीच स्पष्ट होते.

पहिली घटना आहे साता-याची. इथे नुकतेच कुठल्याशा हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले नि तिथे अभिनेता ’सलमान खान’ला पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली. कोण हा सलमान खान, तर तोच ज्याच्यावर सद्ध्या काळवीटाची शिकार करणे नि आपल्या बेफाम गाडीने लोकांना चिरडणे असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. सलमानने आपल्या गाडीखाली चिरडलेल्या व्यक्ती जर या लोकांच्या नातेवाईक असत्या तर त्याला पहायला त्यांनी अशीच गर्दी केली असती काय? किंवा जर सलमानच्या जागी अजमल कसाब असता तर त्याला पहायला हे लोक कौतुकाने असेच जमा झाले असते काय? सलमान नि कसाब यांची तुलना इथे अप्रस्तुत नि चुकीची वाटू शकते पण ती अगदी योग्य अशीच आहे. कुणाच्याही प्राणांची पर्वा न करणारे नि निरपराध लोकांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेले हे दोन खलनायक वृत्तीने अगदी सारखे आहेत, त्यांमधे मुळीच फरक नाही. सलमानच्या खटल्यांचा निकाल अजून लागला नाही अशी पळवाट काही जण काढू शकतात, पण मग ही पळवाट एकट्या सलमानसाठीच का? तसा तर कसाबच्या खटल्याचा निकालही अजून लागला नाही, मग त्याला खूनी का मानावे? पण भारतात तिथे सिनेमातल्या फालतू नटनट्यांनाही देवदूत मानले जाते, तिथे सलमान हा एक ’सुपरस्टार’ आहे. लाखो लोक त्याचे चाहते आहेत, अनेक जण प्रत्यक्ष देवाप्रमाणे त्याची भक्ती करतात, त्यामुळे त्याला शंभर गुन्हे माफ आहेत. ह्या लोकांचे म्हणणे अगदी स्पष्ट आहे, "सलमान आमचा आवडता आहे, त्याला पहायला आम्ही जाणारच. निष्पाप लोकांना मारल्याचे आरोप त्याच्यावर असले म्हणून काय झाले? अर्थात, नंतर, भारतातल्या वाढत्या गुन्हेगारीवर नि गुन्हेगारांच्या समाजात राजेरोसपणे वावरण्यावर आम्ही टिकाटिप्पणी करू, ती मात्र तुम्ही शांतपणाने ऐकून घ्या!"

दुसरी घटना आहे लोकसभेतली. इथे, शशी थरूर आयपीएल घोटाळ्यातल्या आपल्या सहभागाविषयी निवेदन करत असताना त्यांनी आपले राज्य केरळचा उल्लेख केला. तेव्हा केरळातल्या लोकसभा सदस्यांनी त्यांना बाके वाजवून पाठिंबा दिला. शशी थरूर आपण निरपराध आहोत असा कितीही दावा करत असले तरी तो दावा किती हास्यास्पद आहे ते एक लहान मुलगाही सहज सांगू शकेल. त्यांची मैत्रिण ’सुनंदा पुष्कर’ यांना कोची संघातली अठरा टक्के मालकी कशी मिळाली? आणि तीही फुकट? आणि जर यात गैर काही नव्हते तर मग त्यांनी त्या हिस्स्यावर पाणी का सोडले? ललित मोदी यांची आवडती (आता नावडती?) ललना "गॅब्रिएला दिमित्रिअदेस" हिला भारताचा विसा मिळू नये अशी त्यांची इच्छा नसतानाही परराष्ट्र मंत्रालयाने तिला विसा दिलाच आणि याचा बदला म्हणून ललित मोदी यांनी कोची संघांच्या मालकांमधे सुनंदा पुष्कर यांचाही समावेश आहे असा गौप्यस्फोट केला. शशी थरूर हे काही इतर खासदारांपेक्षा वेगळे नव्हेत, फक्त घोटाळे करण्यात नि ते दाबण्यात जो सराईतपणा लागतो तो त्यांच्याकडे नाही इतकेच. पण मुद्दा तो नव्हे, मुद्दा आहे केरळी सदस्यांच्या बाके वाजवण्याचा. निवेदन करणार जर लालूप्रसाद असते तर त्यांनी अशीच बाके वाजविली असती काय? आपला तो बाब्या नि दुस-याचे ते कार्टे? म्हणजे लालूप्रसाद करतात तो भ्रष्टाचार नि शशी थरूर करतात तो शिष्टाचार? केरळसारख्या राज्यातून आलेल्या सुशिक्षित नि सुसंस्कृत खासदारांकडून माझी ही अपेक्षा नव्हती!

एकूणच काय, भारत हा एक दुतोंडी लोकांचा देश आहे. आणि जोपर्यंत ही परिस्थिती बदलत नाही, तोपर्यंत विकसित देशांच्या यादीत भारत पोचतो आहे अशी कुणी कितीही दवंडी पिटली तरी प्रत्यक्षात तसे होणे हे एक दिवास्वप्नच ठरणार हे मात्र खरे!

4 comments:

  1. खरं आहे. योग्य तेच लिहिले आहे.

    ReplyDelete
  2. Charity should begin at home. स्वतः पासूनच सुरवात करावी लागेल.

    ReplyDelete
  3. शंभर टक्के खरं आहे.

    ReplyDelete