Monday, July 2, 2012

एका दगडात तीन पक्षी

'काय बोचते मज समजेना ह्दयाच्या अंतर्हदयाला' अशी कालवाकालव ह्दयात सुरु झाली की किल्लेप्रेमीला समजून चुकतं की एखाद्या किल्ल्याला भेट देऊन त्याला बरेच दिवस झाले आहेत आणि दारू न मिळाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या दारूड्याला जशी फक्त दारूच स्वस्थता देऊ शकते तशीच त्याच्या जीवालाही सह्याद्रीची ती ताजी हवाच स्वस्थता देऊ शकते. आमची अवस्था अगदी अशीच होती. मागचा किल्ला पाहून बरेच दिवस झाले होते. (बरेच म्हणजे जरा जास्तच - मला तर वाटतं किल्ल्यावर जाऊन आलो त्याला निदान एक वर्षं तरी झालं असावं.) तेव्हा किल्ला पहावा आणि पावसात भिजता आलं तर तेही काम साधून घ्यावं असं ठरलं आणि किल्लेमोहिमेची आखणी सुरू झाली.

किल्ल्यावर जायचं ठरल्यावर किल्ल्याचा शोध सुरू झाला. अनेक किल्ले पहायचे राहिले असताना पाहिलेले किल्ले पुन्हा पाहण्यात काहीच हशील नसल्यामुळे मी ट्रेकक्षितिज उघडलं आणि जिल्ह्यानुसार किल्ल्यांची यादी पहायला सुरुवात केली. पुणे जिल्ह्यातले जवळपास किल्ले पाहून झाले असल्यानं मी सातारा, नगर अशा जवळपासच्या जिल्ह्यांकडे नजर टाकल्यावर सातारा जिल्ह्यात वर्धनगड आणि महिमानगड असे दोन किल्ले दिसले. हे दोन किल्ले एका दिवसात सहज करता येतात अशी उत्साहवर्धक माहिती लेखकाने स्वत: सांगितली असल्यावर मग काय? रविवारी हेच दोन किल्ले करायचे ठरले. चतुर्भुज झाल्यामुळे आमच्या कित्येक मित्रांनी 'एक व्यक्ती एक पद' या धोरणाला अनुसरून नवरा किंवा मित्र यापैकी नवरा हे पद स्वीकारून आमच्या मैत्रीचा राजीनामा दिला असल्याने मामेभावाला फोन लावला. तो तयार होताच, तेव्हा रविवारची मोहीम नक्की झाली.

रविवारी उठून आवरलं, पाण्याच्या बाटल्या, रेनकोट, कॅमेरा, खायच्या एकदोन वस्तू सॅकमधे टाकल्या आणि गाडीला किक मारून पुणे सातारा महामार्ग गाठला. हवा कुंद होती आणि रस्त्यावर तुरळक गाड्या होत्या. आकाशात ढगांची गर्दी, हवेत किंचित गारवा आणि समोर मोकळा रस्ता असे ते 'दुनिया गयी भाड मे' असं वाटायला लावणारे धुंद वातावरण होते. ८०, १०० तर कधी चक्क १२० च्या वेगाने वा-याशी स्पर्धा करत (का त्याला टक्कर देत) मी पुढेपुढे चाललो होतो. आयुष्यात मला भेटलेल्या सगळ्या खलनायकांना मी त्या दोन तासांत माफ करून टाकले. एवढेच काय, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मला थांबवून काश्मीर जरी मागितले असते तर तेही मी त्यांना (वर गुजरातची भर घालून) अगदी हसतहसत देऊन टाकले असते.

दोन तासात मी सातारला पोचलो आणि सातारा पंढरपूर रस्त्यावरच असलेल्या सातारा रेल्वे स्टेशनवरून भावाला उचलून त्याच रस्त्याने पुढे पंढरपूरकडे कूच केले. वर्धनगड किल्ला याच रस्त्यावर साधारण २५ किमी अंतरावर आहे. एके ठिकाणी गरमागरम चहा मारून अर्ध्या पाऊण तासात आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वर्धनगड गावात पोचलो. एका दुकानाशेजारी गाडी लावून आम्ही आमची शिरस्त्राणे दुकानदाराकडे दिली आणि गडावर निघालो. खालून तरी गड फारसा अवघड वाटत नव्हता. पण दिसते तसे नसते हे रोहिड्याच्या (विचित्रगड) अनुभवातून आम्हाला कळून चुकले होते. सुदैवाने वर्धनगडाबाबत तसे झाले नाही. फक्त अर्ध्याच तासात आम्ही वर पोचलो. प्रत्यक्ष किल्ल्यावर एका देवीचे मंदिर वगळता पहाण्यासारखे विशेष काही नाही. पण किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे ती त्याची तटबंदी. ती अजूनही उत्तम स्थितीत आहे. मजबूत भरपूर उंच असलेली ही तटबंदी एकावेळी चार माणसे चालतील एवढी रूंद आहे. आम्ही तिच्यावरूनच किल्ल्याला एक वेढा घातला आणि देवीच्या मंदिरात जाऊन थोडी क्षुधाशांती केली. गडावर वारा मोठा भन्नाट सुटला होता आणि त्या तुलनेत देवीच्या मंदिरातले वातावरण फारच उबदार वाटत होते. त्यामुळे तिथून पाय निघत नसतानाही (नाईलाजाने) आम्ही निघालो आणि गड उतरायला सुरूवात केली. सुमारे पंधरा मिनिटांतच आम्ही खाली पोचलो. आमच्या वस्तू घेतल्या, सगळा जामानिमा चढवला आणि आमच्या पुढच्या उद्दिष्टाकडे अर्थात महिमानगडाकडे प्रस्थान केले.

वर्धनगड हा अगदी सातारा-पंढरपूर रस्त्यावरच असला तरी महिमानगड मात्र रस्त्यापासून थोडासा आत आहे. रस्ता सोडून आपण डावीकडे वळलो की साधारण अर्धा किलोमीटरवर महिमानगड गाव आहे. आम्ही पोचलो तेव्हा रविवार, त्यात दुपारची वेळ असल्याने गावात अगदी सामसूम होती. महिमानगडही वर्धनगडासारखाच मध्यम उंचीचा गड आहे. गड चढायला सुरूवात केली आणि पंधरा मिनिटांत आम्ही वर पोचलोही. गडाचा महादरवाजा आता ढासळला असला तरी त्यात कातलेले दोन गजराज आजही पाहुण्यांचे स्वागत करायला हजर आहेत. गडावर एक मारूतीचे लहानसेच पण देखणे मंदिर आहे. (एका सुबक दगडी मुर्तीची प्रतिष्ठापणा करायची आणि मग पुन्हा तिला शेंदूर फासून तिचे सुंदर रूप नष्ट करायचे हा प्रकार मारूतीच्या बाबतीत का घडतो हा प्रश्न मला नेहमी पडतो!) मारूतीच्या देवळासमोर कुणी भाविकाने फरशी टाकली आहे, तिथे आम्ही बसलो. थोडे खाल्ले आणि चक्क आडवे झालो. (झोप हा कार्यक्रम आम्ही प्रत्येक किल्ल्यावर करतोच.) वर आकाशाकडे बघत असा झोपलो की मी एकदम तत्वज्ञाच्या भूमिकेत जातो. आत्तापर्यंत आयुष्यात आपण काय साध्य केले, आणि पुढे काय करणे बाकी आहे याचा हिशोब होतो. आपल्याला जे आवडते ते आपण करतो आहोत का, आयुष्य जसे जगायचे आहे तसे ते आपण जगतो आहोत का असे अवघड प्रश्न स्वत:ला विचारले जातात. (दुर्दैवाने या प्रश्नांची उत्तरे नेहमीच नकारार्थी येतात!) असे चिंतन झाले, थोडी झोप झाली आणि मग आम्ही खाली निघालो.

पायथ्याशी पोचलो तेव्हा फक्त अडीच वाजले होते. इतक्या लवकर परतीचा प्रवास सुरू करण्याची आमची दोघांचीही तयारी नव्हती. तेव्हा आता काय पहाता येईल याची चर्चा झाली आणि साता-याच्या अजिंक्यता-याचे नाव पुढे आले. सातारला अनेकदा येऊनही आम्ही हा किल्ला पाहिला नव्हता आणि तो फारसा अवघड (त्यामुळे वेळखाऊ) नाही ही ऐकीव माहिती आम्हाला होती. तेव्हा आम्ही साता-याच्या दिशेन गाडी वळवली आणि तिथे पोचल्यावर एकादोघांना विचारून अजिंक्याता-याची वाट पकडली. किल्ल्याच्या अगदी वरपर्यंत गाडी जात असल्यामुळे हा किल्ला अगदी कुणालाही सहज पाहता येऊ शकतो. अजिंक्यता-यावर दूरदर्शनचे सहक्षेपण केंद्र आहे, त्यामुळे त्यांचे उंचच उंच मनोरे गडावर दिसतात. अजिंक्यतारा ही अक्षरे, एका देवीचे मंदिर अशी काही पाहण्यासारखी ठिकाणे वर आहेत. काही पडक्या वास्तू, एक दोन बांधलेले तलावही किल्ल्यावर आहेत. किल्ल्यावरून खाली अस्ताव्यस्त पसरलेल्या साता-याचे दृश्य दिसते. किल्ला पाहून आम्ही निघालो तेव्हा पावसाला सुरूवात झाली होती. वातावरण असे होते की असे वाटावे हा पाऊस रात्रभर चालू राहील - पण तसे काही झाले नाही. आम्ही साता-यात येईतो पाऊस थांबला आणि तो पुढे पुण्यात पोचेपर्यंत मला पुन्हा भेटला नाही.

परत जाताना भावाला वाल्ह्याला सोडायचे असल्याने सातारा-लोणंद-वाल्हे असा रस्ता आम्ही धरला. भावाला वाल्ह्याला सोडून पुढे (जेजुरीत पालखी असल्याने) परिंचेमार्गे सासवड गाठून मी पुण्याला पोचलो तेव्हा साडेनऊ वाजले होते. घरी पोचेपर्यंत शरीराचा प्रत्येक अवयव अन् अवयव बोलू लागला होता. असे असले तरी मनात मात्र एक, दोन नव्हे तर तब्बल तीन नवे किल्ले पाहिल्याचे समाधान होते. 'मी सिंहगडावर एकच महिना राहतो, पण तिथली ताजी हवा मला वर्षभर पुरते.' असे लोकमान्य टिळकांचे एक वाक्य आहे. मलाही काहीसे तसेच वाटत होते. तीन गडांच्या या ताज्या हवेवर माझे पुढचे काही दिवस तरी नक्कीच समाधानाचे जाणार होते.

या सहलीचे फोटो आपणास येथे पहाता येतील.

Thursday, May 31, 2012

मुस्लिम आरक्षण आणि विरोधकांची कोल्हेकुई!

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सरकारने मुस्लिमांना इतर मागास वर्गीय कोट्यात दिलेले साडेचार टक्के आरक्षण रद्द केल्यानंतर मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुस्लिम आरक्षणाचा विषय निघाला की काही लोकांची मूळव्याध उपटते तशी ती (न्यायालयाचा निर्णय आरक्षण रद्द करणारा असला तरीही) यावेळीही उपटली आहे आणि मुस्लिमांना आरक्षण म्हणजे सरकारचे मुस्लिमांपुढे सपशेल लोटांगण कसे आहे आणि त्यामुळे या देशाचा सत्यानाश कसा होणार आहे हे त्यांनी मोठमोठ्याने ओरडून सांगायला सुरुवात केली आहे. या सा-यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे, या देशात हिंदूंना आरक्षण दिले तर तुम्हाला चालते, मग या देशात पिढ्यानपिढ्या राहिलेल्या, या देशावर तेवढेच प्रेम करणा-या, या देशाचा अविभाज्य घटक असलेल्या मुस्लिमांना आरक्षण दिले तर बिघडले कुठे?

मुस्लिम समाजाची सरासरी आर्थिक स्थिती पाहिली तर ती फारशी चांगली नाही हे समजण्यास तुम्ही कुणी आर्थिक तज्ञ असण्याची गरज नाही. या समाजातला बहुतेक वर्ग अशिक्षित नि गरीब आहे, शिक्षण आणि त्यामुळे येणारे फायदे अशा गोष्टींपासून तो पूर्णपणे अनभिज्ञ आहे. या समाजाला आरक्षणाची गरज आहे ती यामुळेच. आरक्षणामुळे गरीबीतून वर येण्याची संधी या समाजाला मिळणार आहे, त्याबरोबरच आपल्याला वेगळी वागणूक मिळते, समाजाच्या मुख्य धारेत येण्याची संधी आपल्याला मिळत नाही ही भावना नाहीशी होण्यासही त्यामुळे मदत होणार आहे.

एका बाजूला मुस्लिम स्वतःला या देशाचे नागरीक मानत नाहीत, ते समाजात मिसळत नाहीत, ते आपापले घोळके बनवून त्यातच जगतात असे आरोप करायचे आणि दुसरीकडे मुस्लिमांना शिक्षण, नोकरी अशा संधी उपलब्ध करून देणा-या मुस्लिम आरक्षणाला विरोध करायचा हा शुद्ध खोटेपणा आहे. आरक्षणाचा मूळ हेतू काय? विशिष्ट जातीमधे, मागास घरामधे, गरीब आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या एका मुलाला एक खास संधी उपलब्ध करून देणे जेणेकरून त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात येता येईल आणि स्वत:ला आणि आपल्या घराला प्रगतीच्या वाटेवर नेता येईल. मुस्लिम आरक्षणामुळे हे उद्देश साध्य होत असताना त्याला विरोध का? एक श्रीमंत हिंदू मुलगा त्याच्या जातीमुळे आरक्षण मिळवतो मात्र आपण गरीब असूनही फक्त मुस्लिम असल्यामुळे आपल्याला ते मिळत नाही हे पाहणारा मुस्लिम मुलगा जर सा-या व्यवस्थेला आपला शत्रू मानू लागला तर यात दोष कुणाचा?

आरक्षण सुरू झाले ते मागे राहिलेल्यांना पुढे येण्याची एक संधी म्हणून. असे असताना हा या धर्माचा, तो त्या धर्माचा हा भेदभाव कशाला? जे गरीब आहेत, जे अजून मागासलेले राहिले आहेत अशा सा-यांना आरक्षण मिळायला हवे. किंबहुना आरक्षण जातीच्या किंवा धर्माच्या आधारावर न देता ते आर्थिक परिस्थितीवर देण्याची वेळ आता आली आहे. त्यामुळेच मुस्लिम आरक्षणाला आंधळा विरोध न करता सारासार विचार करून त्याला पाठिंबा देणे यातच शहाणपणा आहे.

Monday, April 2, 2012

कवी ग्रेस यांचे निधन आणि काही प्रश्नांची उत्तरे

मराठीतील ज्येष्ठ कवी ग्रेस अर्थात माणिक गोडघाटे यांचे गेल्या सोमवारी निधन झाले. या मनस्वी कलाकाराने कर्करोगाशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि काळाने त्यांना आपल्या क्रूर विक्राळ जबड्यात ओढून नेले. सन १९६७ मध्ये 'संध्याकाळच्या कविता' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर आपल्या लेखणाने ग्रेस त्यांच्या वाचकांना निरंतर आनंद देत गेले. आपल्या गूढ, गहि-या पाण्यासारख्या भासणा-या कवितांनी हा कवी आयुष्यभर रसिकांना मंत्रमुग्ध करत राहिला. ग्रेस यांच्या तरल, अर्थाचे अनेक पापुद्रे असलेल्या कविता आता वाचायला मिळणार नाहीत हे कळून चुकल्यावर जे लाखो रसिक हळहळले त्यात मीही आलोच.

आता मुद्दा ग्रेस यांच्यावर होणा-या दुर्बोधतेच्या आरोपाचा. दुर्बोधता म्हणजे काय? तर ज्याचा बोध होत नाही ते दुर्बोध. पण एका कलाकारावर दुर्बोधतेचा शिक्का मारताना आपण ही महत्वाची गोष्ट विसरतो की कलाकृती आणि संकल्पना यात एक मुलभूत फरक आहे. संकल्पना हे वास्तव असते, आपल्या आजूबाजूच्या एखाद्या वस्तूतून तिची सत्यता पटवून देता येऊ शकते. अशी एखादी संकल्पना जर दुर्बोध असेल तर ती संकल्पना समजून देणा-याचा तो दोष मानायला हवा. पण कलाकृती ही संकल्पना नव्हे, ते वास्तव नव्हे, तो असते एका कलाकाराचा कलाविष्कार, त्याची अभिव्यक्ती! एका कलाकाराला जे सांगायचे आहे ते तो कागद-रंग-ब्रश, दगड-हातोडी किंवा कागद-पेन अशा विविध माध्यमांमधून व्यक्त करतो आणि एका कलाकृतीला जन्म देतो. त्याचे हे म्हणणे जर दुस-याला समजले नाही तर त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काहीच नाही, ना ती कलाकृती बनवणा-याला ना ती समजून घेणा-याला. एक उदाहरणच द्यायचे झाले तर मी एखादे दगडी शिल्प बनवून त्याला एका आईचा आपल्या लहानग्यावरच्या प्रेमाचा आविष्कार म्हणू शकतो तर कुणाला तो फक्त एक चित्रविचित्र आकाराचा दगड वाटू शकतो. इथे कुणीच चुकीचा नाही किंवा बरोबर नाही. आपापल्या नजरेतून मी आणि तुम्ही या कलाकृतीकडे पाहू शकतो आणि तिचे आपल्याला भासतील ते अर्थही काढू शकतो. त्यामुळेच एडवर्ड मंचचे 'द स्क्रीम' आणि साल्वादोर दालीचे 'द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी' ही जगप्रसिद्ध चित्रे कुणाला अगदी सामान्य वाटू शकतात. कलाकृती म्हणजे गणित नव्हे, तिथे दोन अधिक दोन चार होणे गरजेचे नाही, तिथे ते पाच तर कधी तीनही होउ शकतात!

पण मग कोणी विचारेल - असे असेल तर मग सगळेच दुर्बोध कलाकार उत्तम कलाकार म्हणायला हवेत का? या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे, ते म्हणजे नाही. प्रत्येक दुर्बोध कलाकार उत्तम कलाकार नसतो, तसे असते तर उत्तम कलाकार होणे फारच सोपे झाले असते. मराठी काव्यसृष्टीतलेच उदाहरण द्यायचे झाले तर दुर्बोधतेचा आरोप झालेले कवी लाखो होऊन गेले पण त्यातल्या प्रत्येकालाच मर्ढेकर किंवा ग्रेस बनता आले नाही. गारगोटी आणि हिरा हे वरवर सारखे दिसत असले तरी त्यात फरक असतोच की!

तात्पर्य हे - ग्रेस तुम्हाला कळत नाहीत का, मग मुळीच उदास होऊ नका. ग्रेस पुन्हा एकदा वाचा, तरीही कळले नाहीत तर सोडून द्या. असे झाले तर वाईट वाटून घेण्याची गरज नाही आणि 'शब्दबंबाळ, अर्थहीन कविता लिहिणारा कवी' अशी ग्रेस यांच्यावर टीका करण्याचीही गरज नाही. गेस यांच्या कविता आवडत नाहीत, मग बालकवींची 'औंदुंबर' वाचा किंवा कुसुमाग्रजांची 'कोलंबसाचे गर्वगीत' वाचा. इतरांना काय वाटते ते पहाण्यापेक्षा आपल्याला जे आवडते त्याचा आस्वाद घेणे महत्वाचे, खरे की नाही?

लेखाचा शेवट करतो माझ्या अतिशय आवडत्या ग्रेस यांच्याच एका कवितेने!

भय इथले संपत नाही…मज तुझी आठवण येते…
मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते…

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया

त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब

संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

Wednesday, February 29, 2012

किनारा तुला पामराला!

२७ फेब्रुवारी म्हणजे जागतिक मराठी दिन. कुसुमाग्रज अर्थात विष्णू वामन शिरवाडकर अर्थात तात्यांचा हा जन्मदिवस. तेव्हा या सोनेरी दिवसानिमित्त चला आज तात्यांच्याच एका काव्याचे रसग्रहण करूयात - त्यांच्या "कोलंबसाचे गर्वगीत" या कवितेचे.

"कोलंबसाचे गर्वगीत"ही कविता एका खलाशाचे मनोगत आहे. हे मनोगत खलाशाचे असले तरी ते सगळ्या मानवजातीचेच मनोगत आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. निसर्ग नि मानव यांमधला संघर्ष जुना आहे, अगदी माणूस जन्मला त्या दिवसापासूनचा. "तू मला थांबवू शकत नाहीस" असे निसर्गाला सांगणारा माणूस तर "तू माझ्यासमोर कस्पटासमान आहेस, या पृथ्वीवर सत्ता आहे ती फक्त माझीच" असे म्हणणारा निसर्ग यांमधला हा संघर्ष पुर्वी होता, आजही आहे आणि अजून लाखो वर्षांनीही असेलच. सागर अर्थात समुद्र ह्या निसर्गाच्या अशाच एका रौद्र रुपाला उद्देशून गायलेले हे मानवकाव्य माणसाची कधीही हार न मानणारी वृत्ती दाखवून देणारे आहे.

या काव्याचा प्रसंग आहे एका जहाजावरचा. हे जहाज भर समुद्रात एका वादळात सापडलेले आहे. वादळ आहे म्हटल्यावर पाऊस हवाच, आणि तो आहेही. पाऊस केवढा, तर माथ्यावरती नभ फुटले आहेत की काय असे वाटावे एवढा. या सगळ्या गोष्टींची परिणीती मोठाल्या लाटा तयार होण्यात झालेली आहे, लाटा केवढ्या तर पाण्याचे पर्वत वाटतील अशा.

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या
समुद्रा, डळमळु दे तारे!
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे
ढळु दे दिशाकोन सारे!

एकूणच सारी परिस्थिती अशी आहे की वाटावे कुणी सैतान वेताळांचा मेळा जमवून या दर्यावरती तांडवनृत्य करत आहे. पण असे असले तरी आपला हा शूर खलाशी अजिबात हिंमत हारलेला नाही. सागराला उद्देशून तो म्हणतो, "अशा, याहून कितीही भयंकर गोष्टी घडल्या तरी आम्ही घाबरणार नाही, अरे नाविकांना कसली भिती?" मृत्युचे हे थैमान पाहून बावरलेल्या आपल्या सहका-यांना तो म्हणतो, "सहका-यांनो खंत का करता? आपला जन्मच झगडण्यासाठी झाला आहे. पळ काढणे हा आपला बाणा आहे का? तसे जगायचे असेल तर मग त्यापरीस जलसमाधी घेतलेलीच चांगली नाही का?"

आपल्या सहका-यांना खडे बोल सुनावताना तो पुढे म्हणतो, "या जगात कोट्यावधी जिवाणू रोज जन्माला येतात नि मरतात. जर आपण असे लाजिरवाणे जिणे जगलो, तर त्यांच्यात नि आपल्यात फरक काय?"

पुढे समुद्राला तो म्हणतो, "पैसा किंवा घराची उब आम्हाला थांबवू शकत नाही, मानवतेचे निशाण महासागरात मिरवणे आणि नवनवीन खंड जिंकून घेणे हे आमचे ध्येय आहे आणि ते आम्ही पूर्ण करूच."

पण कवितेत सगळ्यात लक्षवेधे आहे ते तिचे शेवटचे कडवे.

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला"

"मित्रांनो, ती शिडे गर्वाने वरती उभारा आणि या खुळ्या सागराला सांगा - अरे आमची ध्येयासक्ती अनंत आहे, आमची आशा अनंत आहे, तिला थांग नाही अन मोजमाप नाही. किनारा असेल तर तो तुला खुळ्यालाच!"

हे पक्के माहीत असल्यामुळेच की काय, मानव पाणी अडवून मोठाली धरणे बांधतो आहे, डोंगर पोखरून त्यांच्या पार जातो आहे, हवेत उड्डाण करून आकाशाला गवसणी घालतो आहे आणि मोठमोठी जहाजे समुद्रात हाकारून तो आपल्या कवेत करून घेतो आहे. मानवाची ही दुर्दम्य इच्छाशक्ती थक्क करणारी आहे आणि ती कवितारुपात अजरामर करणा-या कुसुमाग्रजांची प्रतिभाही!

Monday, January 23, 2012

निवडणूक आयोग नावाचा विनोद

सध्या निवडणुकांचा मोसम आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत तर मुंबई महानगरपालिकेसाठी फेब्रुवारी महिन्यात मतदान घेतले जाणार आहे. उत्तर प्रदेश आणि इतर चार राज्यांमधल्या निवडणुकाही आहेतच. न केलेल्या कामांची यादी सादर करून आणि भलतेभलते वादे, आश्वासने देऊन उमेदवार मतदारांना हसवणार हे पक्के असले तरी यात आपल्यापरीने विनोद करून निवडणूक आयोगही भाग घेणार यात काय शंका?

पहिला मुद्दा उमेदवारांच्या खर्चाचा. निवडणूक आयोग उमेदवाराने खर्च केलेल्या पै नि पैचा खर्च ठेवतो खरा, पण कधीपासून? त्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज भरल्यापासून. आपली उमेदवारी जाहीर करण्यापुर्वी उमेदवार जे करोडो रुपये खर्च करतात त्यांचे काय? आपल्याला तिकीट मिळावे म्हणून केलेले शक्तीप्रदर्शन, मतदारांना खूश करण्यासाठी आयोजित केलेले कार्यक्रम, झोपडपट्ट्यांमधे फुकट वाटलेल्या वस्तू, प्रत्येक कार्यकर्त्यावर केलेला हजारो रुपयांचा खर्च यांचे काय? यावर एक सोपा उपाय आहे. निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवसापासून आपला खर्च दाखवणे आयोगाने प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक करावे. जे असे करणार नाहीत त्यांना आयोगाने उमेदवारी देऊ नये.

दुसरा मुद्दा आहे आयोग पाठवत असलेल्या नोटिशींचा. आचारसंहिता लागू झाली रे झाली की प्रत्येक दिवशी कुण्या नेत्याने तिचे उल्लंघन केल्याची नि आयोगाने त्याला नोटीस पाठवल्याची बातमी ऐकायला मिळते. या नोटिशींचे पुढे काय होते? अशा एखाद्या घटनेमुळे कुठल्या नेत्याला निवडणुकीत भाग घेता न आल्याची घटना घडलेली कुणी पाहिली आहे काय? आता याच निवडणुकीचे उदाहरण घ्या. पुण्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे थोर नेते, महापुरूष अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या असतानाही एका कामाचे भूमिपूजन (की उद्घाटन) केल्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन झाले आणि आयोगाने त्यांना नोटीस बजावली. गंमत अशी की पवारांनी केलेल्या नोटिशीने आयोगाचे ताबडतोब समाधान झाले आणि त्याने त्यांच्यावर कसलीही कारवाई केली नाही. हा काय पांचटपणा आहे? अरे जर असल्या खुलाशाने तुमचे समाधान होत असेल तर मग त्या नोटिसा पाठवण्याचे नाटक तरी कशाला?

तिसरा मुद्दा आयोगाच्या चंपक निर्णयांचा. आयोगाने उत्तर प्रदेशात नुकताच असाच एक निर्णय जाहीर केला. मायवतींनी उभारलेल्या उद्यानातले हत्तींचे पुतळे झाकण्याच. भारतातला शासकीय कारभार विनोदी असल्याचे मला माहिती असले तरी अजूनतरी एवढा प्रचंड विनोदी निर्णय कुठे घेतला गेल्याचे मला आठवत नाही. हे पुतळे झाकून काय होणार आहे? उलट ते झाकल्यामुळे लोकांची उत्सुकता चाळवणारच नाही का? आणि त्यासाठी होणा-या खर्चाचे काय? आणि मग एखादा हत्ती पाहूनही लोकांना मायावती आठवतील (हे वाक्य शब्दशः घेऊ नये!) म्हणून तुम्ही जंगलातल्या हत्तींनाही झुली चढवणार आहात का?

निवडणूक आयोगाने हा विनोदी प्रकार आता थांबवावा. दरवर्षी नवनवीन चित्रविचित्र नियम काढणारा निवडणूक आयोग आणि त्या नियमांचे कागदोपत्री तंतोतंत पालन करून दाखवणारे उमेदवार हे चित्र आता आयोगाने बदलावे. निवडणुका आल्या की वाहतुकीची कोंडी होते, चौक अडवले जातात, मटणाच्या जेवणावळींसाठी लाखो बोकडांची कत्तल होते, दारूचे पाट वहातात, परराज्यांतून गुंड आणले जातात, आणि 'साम, दाम, दंड, भेद' या सुत्राचा वापर करून मतदारांना आपल्याकडे ओढले जाते. प्रत्यक्ष निवडणुकांमधे होणारे बोगस मतदानाचे प्रकार वेगळेच. हे सारे प्रकार थांबवण्यासाठी आयोगाने कष्ट घ्यावेत, नुसत्या नोटिसा देऊन आणि रोज नवे नियम बनवून काय होणार आहे?

Tuesday, December 27, 2011

छोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला?

सध्या आमच्या घराचं काम चालू आहे. घराचं काम म्हणजे पाणी खेचणारी मोटार लागणारच. पण परवा अचानक ही मोटार बंद पडली आणि आमची फे फे उडाली. (आमच्या तोंडाचं पाणी पळालं हा फालतू विनोद इथे करता येईल, पण ते असो.) आता पाणी नाही म्हणजे काम नाही, मग करायचं काय? त्यामुळे झक मारत मोटार दुरुस्त करणे आले. जवळच्या दुकानदाराने मोटार दुरुस्त करायचे १४०० रुपये सांगितले तेव्हा वाटलं 'अरे मंडईत खूप दुकानं आहेत, तिथे स्वस्तात होईल काम.' पण मंडईत गेल्यावर मात्र आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी अवस्था झाली. ह्या महाशयांनी आधीच्या दुकानदाराइतके पैसे घेतले ते घेतलेच, वर दुस-या दिवशी सकाळी मोटार द्यायचा वायदा करून मोटार दिली ती संध्याकाळी. शिवाय दुपारी आई नि भाऊ गेले असताना 'पावती नाही, मग मोटार नाही' असा नियम ऐकवून त्यांच्याशी उद्धटपणे बोलायलाही हे कमी पडले नाहीत. किरकोळ विक्री क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूकीविरुद्ध व्यापा-यांनी केलेले आंदोलन ताजे असतानाच ही घटना घडली आणि वाटलं 'छोट्या व्यापा-यांना सहानुभूती कशाला?'

कुठल्याही क्षेत्रात सेवेची गुणवत्ता सुधारण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्पर्धेला उत्तेजन. आठवा पुर्वीचे ते दिवस. फोनसाठी तेव्हा बीएसएनएल आणि केबलसाठी स्थानिक केबलवाला हेच पर्याय होते. फोनसाठी तेव्हा बरेच थांबावे लागे आणि त्यासाठी चिरीमिरी द्यावी लागे ती वेगळीच. केबलचे दर तर एकेकाळी सहाशेपर्यंत पोचले होते. (ही आठ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे, जेव्हा पेट्रोल ३५ रुपये लिटर होते!) तेव्हा टेलिफोन क्षेत्रात खाजगी कंपन्या नव्हत्या आणि केबलचे क्षेत्र प्रत्येक भाईने वाटून घेतल्यामुळे तिथेही स्पर्धा नव्हती. पण या दोन क्षेत्रांमधे स्पर्धा वाढली आणि तिथल्या सेवेचा दर्जा सुधारला. आ़ज पुण्यासारख्या शहरात जवळजवळ १० टेलिफोन कंपन्या आहेत तर सगळ्या देशात मिळून आज जवळजवळ तेवढेच डीटीएच सेवा पुरवठादार आहेत. परिणाम? आज कुठल्याही फोन कंपनीची किंवा डीटीएच कंपनीची मनमानी सहन करून घेण्याची गरज तुम्हाला नाही. 'सेवा आवडत नाही? बदला कंपनी!' एवढे हे सारे सोपे झाले आहे.

छोट्या व्यापा-यांचा माझा अनुभव तर मुळीच चांगला नाही. वस्तू दाखवण्यात हयगय करणे, नको त्या कंपनीचा माल गि-हाइकांच्या माथी मारणे, खराब झालेला/वापरण्याची तारीख उलटून गेलेला माल खपवणे, उद्धटपणे बोलणे असे प्रकार या दुकानांमधे नेहमीचेच. किंबहुना मला तर अशा दुकानांमधे खरेदी करताना एखादी लढाई लढत असल्यासारखे वाटते. म्हणजे दुकानदार आपली सगळी अस्त्रे वापरून मला फसवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी माझ्याजवळच्या सगळ्या ढाली वापरून ती परतवून लावत असतो. 'ग्राहक देवो भव:' हे फक्त म्हणायलाच, वास्तविक या लोकांना गि-हाईकाची कस्पटासमानही किंमत नसते. तुम्ही निवडीला वाव देणार नाही, पैसे कमी करणार नाही आणि वर अपमान करणार तो वेगळाच! अरे काय चाललंय काय हे? पण मोठ्या दुकानांमधे असे नसते. एकतर गि-हाइकांना फसवा असे आदेश कंपन्या देऊ शकत नाहीत आणि गि-हाइकांना फसवून स्वतःचा फायदा होणार नसल्याने तिथले कामगारही असे करत नाहीत. प्रत्येक गोष्टीची किंमत तिथे ठरलेली असते आणि ती बदलून आणावी लागली तरी त्यासाठीची प्रकियाही.

आजचा काळ खुल्या अर्थव्यवस्थेचा आहे. जो उत्तम सेवा पुरवेल तोच टिकेल हे इथले सूत्र आहे. छोट्या व्यापा-यांना शेतक-यांचा आलेला पुळका म्हणजे मगरीचे अश्रू आहेत. आपल्याला स्पर्धा आली की आपली कंबक्ती ओढवणार हे त्यांना पक्के माहिती आहे. जे जातील त्यांना जाऊ देणे नि जे तरतील त्यांचे कौतुक करणे हा आजचा नियम आहे. सरकारने हे समजून घ्यावे आणि छोट्या व्यापा-यांना मुळीच सहानुभूती न दाखवता किरकोळ विक्रीक्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी द्यावी. मनमोहनसिंगजी, आप हमारी बात सुन रहे हैं या नहीं?

Thursday, December 22, 2011

नात्यातली लग्नं - एक अघोरी प्रथा

काही गोष्टी मला नेहमीच आश्चर्यचकित करत आल्या आहेत. नात्यात होणारी लग्नं हा असाच एक प्रकार. आपल्या चुलत/मामेभावंडांशी लग्न केलेल्या अनेक व्यक्ती मला माहीत आहेत. जुनी गोष्ट सोडा, आजही (चक्क शहरातदेखील) अशी लग्नं होतात. कधीतरी अशाच एखाद्या लग्नाची पत्रिका येते आणि मी पुन्हा एकदा विचारात पडतो.

नात्यातल्या लग्नांची प्रथा कधी सुरू झाली हे मला माहीत नाही, पण ती खूप जुनी आहे हे निश्चित. आपल्या घराण्याचं रक्त 'शुद्ध' असावं, त्यात 'संकर' होऊ नये या कारणांनी पुर्वी राजघराण्यात अशी लग्न सर्रास होत. बोललं तर असंही जातं की अशा लग्नांमुळेच इजिप्तच्या राजांची पिढी अधिकाधिक अशक्त बनत गेली नि त्यात त्यांचा अंत झाला. [http://news.nationalgeographic.com/news/2010/02/100216-king-tut-malaria-bones-inbred-tutankhamun/] जुन्या काळातल्या अनेक प्रथा हद्दपार झाल्या असल्या तरी ही प्रथा मात्र अजूनही आपली लोकप्रियता टिकवून आहे हे नक्की. यात एक विनोदी गोष्ट म्हणजे स्वतःच्या धर्मात ह्या गोष्टी सर्रास होत असूनही लोक ह्याच मुद्यावर इतर धर्मांना नावं ठेवतात. म्हणजे मुसलमानांमधे मावशीच्या मुलीशी लग्न करतात म्हणून त्यांना नावं ठेवणा-या हिंदुंना त्यांच्या धर्मात मामाच्या मुलीशी लग्नं करणारी मुलं दिसत नाहीत का? आता मामा आणि मावशी ह्यांच्यात फरक काय? म्हणजे मामाच्या मुलाशी लग्न केलं तर चालेल पण मावशीच्या मुलीशी नको, असं का?

नात्यातली लग्नं टाळण्यासाठी अनेक कारणं आहेत. पहिलं आहे भावनिक कारण. म्हणजे ज्या मुलाला/मुलीला आपण आयुष्यभर भाऊ/बहीण मानलं तिच्याशी अचानक एक दिवस लग्न करायचं हे विचित्रच नाही का? (पण अशी लग्न करणा-या लोकांना असं वाटत नसावं, नाहीतर त्यांनी ते केलंच नसतं.) दुसरं आहे शास्त्रीय. http://news.bbc.co.uk/2/hi/programmes/newsnight/4442010.stm या दुव्यावर दिलेल्या माहितीनुसार अशी लग्न करणा-या जोडप्याच्या मुलांमधे काही दुर्मिळ पण गंभीर जनुकीय आजारांचं प्रमाण जास्त आढळतं. पण ही कारणं लोकांना पटत नाहीत. 'आपली घरात कुणी बाहेरची मुलगी आणण्यापेक्षा आपल्या डोळ्यांसमोर मोठी झालेली मुलगी बरी' असा विचार होतो आणि अशी लग्नं केली जातात. पण असं करून आपण होणा-या पिढीला संकंटांच्या मोठ्या दरीत ढकलतो आहोत हे या लोकांनी समजून घ्यायला हवे.

भारताची लोकसंख्या ११० कोटी आहे. त्यातल्या निम्म्या स्त्रिया पकडल्या तर त्यांची संख्या येते ५५ कोटी. त्यातल्या १० टक्के स्त्रिया २४ ते ३० या वयोगटातल्या म्हणजेच लग्नाळू आहेत असं मानलं तरी अशा मुलींची संख्या साधारण पाच कोटी येते. या पाच कोटी मुलींचा पर्याय उपलब्ध असतानाही आपल्या स्वतःच्या बहिणीशी लग्न करण्याचं कारण या महाभागांपैकी कोणी मला सांगू शकेल का?