मराठीतील ज्येष्ठ कवी ग्रेस अर्थात माणिक गोडघाटे यांचे गेल्या सोमवारी निधन झाले. या मनस्वी कलाकाराने कर्करोगाशी दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि काळाने त्यांना आपल्या क्रूर विक्राळ जबड्यात ओढून नेले. सन १९६७ मध्ये 'संध्याकाळच्या कविता' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर आपल्या लेखणाने ग्रेस त्यांच्या वाचकांना निरंतर आनंद देत गेले. आपल्या गूढ, गहि-या पाण्यासारख्या भासणा-या कवितांनी हा कवी आयुष्यभर रसिकांना मंत्रमुग्ध करत राहिला. ग्रेस यांच्या तरल, अर्थाचे अनेक पापुद्रे असलेल्या कविता आता वाचायला मिळणार नाहीत हे कळून चुकल्यावर जे लाखो रसिक हळहळले त्यात मीही आलोच.
आता मुद्दा ग्रेस यांच्यावर होणा-या दुर्बोधतेच्या आरोपाचा. दुर्बोधता म्हणजे काय? तर ज्याचा बोध होत नाही ते दुर्बोध. पण एका कलाकारावर दुर्बोधतेचा शिक्का मारताना आपण ही महत्वाची गोष्ट विसरतो की कलाकृती आणि संकल्पना यात एक मुलभूत फरक आहे. संकल्पना हे वास्तव असते, आपल्या आजूबाजूच्या एखाद्या वस्तूतून तिची सत्यता पटवून देता येऊ शकते. अशी एखादी संकल्पना जर दुर्बोध असेल तर ती संकल्पना समजून देणा-याचा तो दोष मानायला हवा. पण कलाकृती ही संकल्पना नव्हे, ते वास्तव नव्हे, तो असते एका कलाकाराचा कलाविष्कार, त्याची अभिव्यक्ती! एका कलाकाराला जे सांगायचे आहे ते तो कागद-रंग-ब्रश, दगड-हातोडी किंवा कागद-पेन अशा विविध माध्यमांमधून व्यक्त करतो आणि एका कलाकृतीला जन्म देतो. त्याचे हे म्हणणे जर दुस-याला समजले नाही तर त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काहीच नाही, ना ती कलाकृती बनवणा-याला ना ती समजून घेणा-याला. एक उदाहरणच द्यायचे झाले तर मी एखादे दगडी शिल्प बनवून त्याला एका आईचा आपल्या लहानग्यावरच्या प्रेमाचा आविष्कार म्हणू शकतो तर कुणाला तो फक्त एक चित्रविचित्र आकाराचा दगड वाटू शकतो. इथे कुणीच चुकीचा नाही किंवा बरोबर नाही. आपापल्या नजरेतून मी आणि तुम्ही या कलाकृतीकडे पाहू शकतो आणि तिचे आपल्याला भासतील ते अर्थही काढू शकतो. त्यामुळेच एडवर्ड मंचचे 'द स्क्रीम' आणि साल्वादोर दालीचे 'द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी' ही जगप्रसिद्ध चित्रे कुणाला अगदी सामान्य वाटू शकतात. कलाकृती म्हणजे गणित नव्हे, तिथे दोन अधिक दोन चार होणे गरजेचे नाही, तिथे ते पाच तर कधी तीनही होउ शकतात!
पण मग कोणी विचारेल - असे असेल तर मग सगळेच दुर्बोध कलाकार उत्तम कलाकार म्हणायला हवेत का? या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे, ते म्हणजे नाही. प्रत्येक दुर्बोध कलाकार उत्तम कलाकार नसतो, तसे असते तर उत्तम कलाकार होणे फारच सोपे झाले असते. मराठी काव्यसृष्टीतलेच उदाहरण द्यायचे झाले तर दुर्बोधतेचा आरोप झालेले कवी लाखो होऊन गेले पण त्यातल्या प्रत्येकालाच मर्ढेकर किंवा ग्रेस बनता आले नाही. गारगोटी आणि हिरा हे वरवर सारखे दिसत असले तरी त्यात फरक असतोच की!
तात्पर्य हे - ग्रेस तुम्हाला कळत नाहीत का, मग मुळीच उदास होऊ नका. ग्रेस पुन्हा एकदा वाचा, तरीही कळले नाहीत तर सोडून द्या. असे झाले तर वाईट वाटून घेण्याची गरज नाही आणि 'शब्दबंबाळ, अर्थहीन कविता लिहिणारा कवी' अशी ग्रेस यांच्यावर टीका करण्याचीही गरज नाही. गेस यांच्या कविता आवडत नाहीत, मग बालकवींची 'औंदुंबर' वाचा किंवा कुसुमाग्रजांची 'कोलंबसाचे गर्वगीत' वाचा. इतरांना काय वाटते ते पहाण्यापेक्षा आपल्याला जे आवडते त्याचा आस्वाद घेणे महत्वाचे, खरे की नाही?
लेखाचा शेवट करतो माझ्या अतिशय आवडत्या ग्रेस यांच्याच एका कवितेने!
भय इथले संपत नाही…मज तुझी आठवण येते…
मी संध्याकाळी गातो…तू मला शिकविली गीते…
हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment