Wednesday, July 28, 2010

शादी डॉट कॉम आणि मी!

आम्ही सत्ताविशी पार करताक्षणीच ’या वर्षी तुझे लग्न झालेच पाहिजे’ असे आमच्या पालकांनी जाहीर केले आणि आम्हाला ’मुली पहाणे’ या कार्यक्रमाला नाईलाजाने सुरूवात करावी लागली. (बाकी सध्याचे स्त्रीमुक्तीचे दिवस आणि या कार्यक्रमाला आलेले स्वरूप पाहता त्याला मुलींचा ’मुले पहाणे’ कार्यक्रम असे म्हणणेच योग्य ठरेल, पण तो विषय वेगळा.) तेव्हा मुली पाहणे ठरल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आमच्या जातीतल्या लग्नाळू मुलींची यादी कुठूनतरी पैदा करण्यात आली आणि तिच्यातल्या सुंदर पोरींच्या नावांवर टीकमार्क करत त्यांना फोनाफोनी सुरू झाली. त्यातल्या एखाद्या मुलीचे लग्न ठरल्याची सुवार्ता मिळे, पण असा प्रसंग विरळाच, त्यापैकी बहुतेकींची लग्ने अजून व्हायचीच होती. अचानक, का कोण जाणे, पण लग्न जमवणा-या संकेतस्थळांवरच्याही मुली पहाव्यात अशी टूम निघाली आणि मला नाईलाजाने तिथेही नाव नोंदवावे लागले. हा लेख म्हणजे या संकेतस्थळांवर मला आलेल्या दुर्दैवी अनुभवांचीच शिदोरी आहे.

दोन महिने या संकेतस्थळांवर घालवल्यावर मी या निष्कर्षाप्रत आलो आहे की इथे मुलींचे फक्त दोनच प्रकार असतात. १) अशा मुली ज्यांमधे तुम्ही रस दाखवता पण ज्या तुमच्याकडे ढुंकुनही बघत नाहीत २) अशा मुली ज्या तुमच्यात रस दाखवतात पण ज्यांच्याकडे तुम्ही ढुंकुनही बघत नाही. (हा आता तुम्हाला ज्यांच्यात रस नाही नि त्यांनाही तुमच्यामधे रस नाही अशा मुलींचा एक तिसरा गट असतो, पण आपण तूर्त त्याकडे दुर्लक्ष करू!) मग पहिल्या गटात कोण येतात? तर अप्सरा मुली! या मुली (अर्थातच) दिसायला सुंदर असतात, चांगल्या शिकलेल्या असतात नि हटकून पुणे किंवा मुंबई अशाच शहरांमधल्या असतात. आयटीतल्या असल्यामुळे ह्यांना पगार चांगले असतात आणि ह्यांचे वडील/बंधूही(We live in a 'close knit' family...) एखाद्या मोठ्या कंपनीत लठ्ठ पगाराची नोकरी करणारे असतात. तर तुम्ही ह्यांना पाहून खूश होता, जरा चेकाळता नि नंतर मनातल्या मनात मिटक्या मारत ’एक्सप्रेस इंटरेस्ट’ बटन दाबता. बास, संपला विषय! तुम्ही एक दिवस वाट पहाता, दोन दिवस वाट पहाता नि मग एका आठवड्याने काय समजायचे ते समजून जाता. नेमके काय घडते इथे? ह्या सुंदर कन्यकेला दररोज ५ ते १० मजनू मागणी घालत असतात, त्यापैकी एक तुम्ही असता. ती मग तुमचे पान उघडते, एकदा तुमच्या (फोटो)कडे, एकदा तुमच्या पगाराकडे पहाते नि ’हं..हं..’ असे हसून पुढच्या मजनूकडे वळते. पण तुम्हाला नकार न देण्याइतका मुत्सद्दीपणा तिच्याकडे असतो. ह्याची दोन कारणे असतात - पहिले म्हणजे तुम्हाला लटकून ठेवण्याची मजा तिला घेता येते नि दुसरे म्हणजे भविष्यात जर काही अतर्क्य घडामोडी घडल्या (जसे की तुम्हाला अचानक ५० कोटींची लॉटरी लागली) तर तुमच्या मागणीला होकार देण्याचा पर्याय ती मोकळा ठेवू शकते!

दुसरा गट असतो तो तुमच्यामागे लागणा-या मुलींचा. ह्या मुलीही सुंदर असतात, पण असे तुमच्या आईचे मत असते. तुम्हाला काही त्या ’इतक्या’ सुंदर वाटत नाहीत. ह्या शिकलेल्याही कमीच असतात नि नोकरी करत असतील तर तीही असते एखादी साधीशीच. प्रोफाईलची सुरूवात करताना त्या नेहमी ’हॅलो, मायसेल्फ कल्पना...’ अशीच करतात (मायसेल्फ या शब्दावर कायद्याने बंदी आणली पाहिजे!) आणि त्यांच्या प्रोफाईलमधे ’होमली’ हा शब्द कमीतकमी तीनदा तरी असतोच. ’I like listening music/born and brought up in Sangli/looking for a sutaible person' ही यांच्या प्रोफाईलमधली काही नेहमीची वाक्ये. तुमच्यात एका मुलीने रस दाखवला आहे हा संदेश वाचून तुम्ही संकेतस्थळावर जाता आणि ही मुलगी पहाताच तुमचे विमान क्षणात ३० हजार फुटावरून १०० फुटावर येते. (अर्थात हे मात्र खरे, ह्या मुलींना कितीही नावे ठेवलीत तरी तुमचे लग्न अशाच एखाद्या मुलीशी होणार हे तुम्हाला एव्हाना पुरते कळून चुकलेले असते!)

तीन महिने संकेतस्थळांवर चिक्कार मुली पाहिल्यानंतर (आणि प्रचंड विचारमंथन केल्यावर) मी खालील निष्कर्षांप्रत पोचलेलो आहे.

१) लग्न जमवण्यासाठी संकेतस्थळांचा काडीचाही उपयोग नाही. त्यांचा वापर करून लग्न जमलेला/जमलेली एकही ईसम/स्त्री मी माझ्या आख्ख्या आयुष्यात पाहिला/ली नाही. किंबहुना या संकेतस्थळांच्या जाहिरातीत दिसत असलेली जोडपीही बनावट आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.
२) आयटीतला माणूस म्हणजे लग्नाच्या बाजारातला भारी माल, म्हणून त्याला गोरी/देखणी बायको मिळणारच हे समीकरण पूर्णपणे चुकीचे आहे. हे समीकरण ज्याने रूढ केले त्या माणसाला एका खोलीत बंद करून हिमेशची सगळी गाणी पुन्हापुन्हा ऐकण्याची शिक्षा द्यायला हवी.
३)एका संकेतस्थळावर नकार मिळाल्यावरही त्याच मुलीला पुन्हा दुस-या संकेतस्थळावर संदेश टाकल्यावर ती कंटाळून कदाचित तुम्हाला हो म्हणेल असा जर तुमचा समज असेल तर तो एक गोड गैरसमज होय.
४)आमच्यासारख्या रुपाने सामान्य मुलांसाठी सरकारने काही कठोर कायदे करायला हवेत. म्हणजे ह्या सुंदर मुली सुंदर मुलांशी लग्न करणार आणि आमच्यासारखी रुपाने सामान्य मुले राहिलेल्या मुलींशी. सुंदर जोडप्यांना सुंदर मुले होणार आणि सामान्य जोडप्यांना सामान्य. हे दुष्टचक्र थांबणार तरी कधी? असे चालू राहिले तर दिसायला एकदम सुंदर नि आमच्यासारखे सामान्य अशा दोनच प्रजाती जगात शिल्लक राहतील, सरकारला ही गोष्ट भितीदायक वाटत नाही का?

तेव्हा मित्रहो, ह्या संकेतस्थळांच्या नादी लागणे सोडा आणि आपल्या आजूबाजूला दिसणा-या पोरींपैकी एखादी सुबक ठेंगणी पटवायचा प्रयत्न करा. कसें?

Sunday, July 18, 2010

माझ्या लाडक्या सख्याहरी...

’कारूण्याचा विनोदी शाहीर’ असे अत्र्यांनी ज्यांना म्हटले त्या दत्तू बांदेकरांना मी जनसामान्यांचा विनोदवीर मानतो. इतके साधे, सोपे, सरळ, तरीही काळजाला चटका लावणारे लेखन करणारा विनोदी लेखक चि. वि. जोशींनंतर मी अजून पाहिलेला नाही. अर्थात चिवींचे लिखाण हे पांढरपेशा मध्यमवर्गीय जगाचे चित्रण करणारे होते, बांदेकरांचे लिखाण मात्र त्याहून वेगळे आहे. हे लिखाण गरीबांचे आहे, वेश्यांचे आहे, भिका-यांचे आहे, नायकिणींचे आहे, झोपडपट्टीत राहणा-या लोकांचे आहे, आणि वेगळ्या शब्दांत सांगायचे तर भारतातल्या शंभरातील नव्वदांचे आहे.

कारवारला राहणा-या नि कानडीतून शिक्षण झालेल्या बांदेकरांनी मराठी भाषेत विनोदाचे एक नवे युग निर्माण करावे हा एक चमत्कारच नव्हे तर काय! बहुजनसमाजाला पोट धरूनधरून हसायला लावणारा त्यांच्यासारखा विनोदी लेखक पुन्हा झाला नाही. विनोद ही उच्च अभिरूची असलेल्या लोकांनी आस्वाद घ्यायची एक खास गोष्ट आहे हा समज बांदेकरांनी खोटा ठरवला. किंबहुना अगदी साध्यासुध्या, रोजच्या प्रसंगातूनही उत्तम विनोदनिर्मिती होऊ शकते हे त्यांनी स्वत: आपल्या लेखनाने सिद्ध केले. उत्तम विनोदाला कारूण्याची झालर असते हे अनेक विनोदवीरांनी पुन्हापुन्हा दाखवून दिले आहे, बांदेकरांचा विनोदही असाच आहे. गरीबांची रोजची दु:खे, त्यांच्या समोरची संकटे, त्यांची जगण्याची लढाई यातून बांदेकरांचा विनोद फुलत असल्याने तो वाचताना एकाचवेळी हसूही येते नि ह्दयही गलबलते. त्यात बांदेकर पत्रकार, त्यांचे बरेचसे लेखन वर्तमानपत्रात झाले, तिथे लेखन करणे ही तर आणखीनच अवघड गोष्ट. कुठल्यातरी आयत्या विषयावर हे लेखन अचानक करावे लागते आणि तरीही ते दर्जेदार असावे लागते. मराठीत शिक्षणही न घेतलेल्या नि विनोदाचीच काय, इतर कुठलीही पुस्तके न वाचलेल्या बांदेकरांना हे कसे जमले असेल? आणि एवढे सगळे करूनही बांदेकर वृत्तीने अगदी अलिप्त होते हे विशेष. स्वस्तुती करणे, इतरांची हांजी हांजी करणे, पुरस्कारांवर डोळा ठेवणे, आदर/मानमरातब यांसाठी प्रयत्न करणे हे सगळे सोडाच, आपल्या लेखनाविषयी बोलणेही त्यांना मंजूर नव्हते. अशा या निगर्वी, साध्या नि एकलकोंड्या विनोदवीराचे वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी ४ ऑक्टोबर १९५९ रोजी निधन झाले. ज्या संयुक्त महाराष्ट्रासाठी बांदेकरांनी आपली लेखणी झिजवली तो संयुक्त महाराष्ट्र शेवटी बांदेकरांना पहायला मिळाला नाही ही नियतीची केवढी क्रूर थट्टा!

बांदेकरांचा सुप्रसिद्ध ’सख्या हरी’ जर आज असता तर काय झाले असते त्याची कल्पना करून मी हा लेख लिहिला आहे. मात्र वाचकांनी हे ध्यानात असू द्यावे की हा लेख माझा आहे, त्यामुळे त्यात आढळणारे दोष नि त्रुटी या माझ्याच आहेत. ह्या लेखावरून मूळ सख्या हरीची पात्रता जोखण्याचा प्रयत्न वाचकांनी करू नये. हा फक्त बांदेकरांच्या एका चाहत्याचा त्यांना साहित्यरूपी आदरांजली देण्याचा एक प्रयत्न आहे हे लक्षात असू द्यावे.


माझ्या लाडक्या सख्या हरी, ’पॉल’ ऑक्टोपसाचे प्रताप पाहून एक ऑक्टोपस पाळावयाचे नि त्याजकडून लोकांचे भविष्य ऐकवण्याचे तुझे इरादे ऐकून माझी हसून हसून मुरकुंडी वळली आहे. त्यातच हा ऑक्टोपस तारापोरवाला मत्स्यालयातून पळवण्याची तुझी मनिषा ऐकून तर हसावे की रडावे हेच मला कळेनासे झाले आहे. सख्याहरी, तुला वेड तर लागले नाही ना? अरे ऑक्टोपस काय मांजर आहे की कुत्रा आहे? आणि त्या ऑक्टोपसाला तू काय खायला घालणार आहेस? कांदे बटाटे? जेम्स बॉन्डचा ’ऑक्टोपसी’ पाहून तू मागे एकदा वेडा झाला होतास, आता खरोखरीचा ऑक्टोपस पाहून तू वेडा झाला आहेस! बाकी चित्रविचित्र प्राणी पाळायची ही तुझी सवय जुनीच. मागे एकदा ’कोणास ठाऊक कसा, पण सर्कशीत गेला ससा’ हे गाणे ऐकून तू एक ससा पाळला होतास हे तुला आठवते का? पण त्या सशाने पहिल्या दिवशी तुझ्या घरातली विजेची तार, दुस-या दिवशी तुझ्या पहिली पास ते दहावी नापास पर्यंतच्या सगळ्या गुणपत्रिका नि तिस-या दिवशी तुझी आतली चड्डी कुरतडली(नशिब तू ती तेव्हा घातली नव्हतीस!) तेव्हा कुठे तुझे डोके ठिकाणावर आले नि तू त्याला राणीच्या बागेत सोडून आलास. सख्याहारी तू हे धंदे का करतोस, तू आधीच तुझ्या घरात बक्कळ झुरळे नि ढेकणे पाळली आहेत हे काय कमी आहे का?

माझ्या लाडक्या प्रियकरा, माझे ऐक नि हे खूळ तुझ्या डोक्यातून काढून टाक. अरे ज्योतिषाच्या या धंद्याने आजपर्यंत कुणाचेही भले झाले नाही. पोपट जवळ ठेवून फुटपाथवर बसलेले ते कुडमुडे ज्योतिषी तू पाहिले नाहीस काय? अरे जर खरंच त्यांना ज्योतिष कळत असते तर ते जन्मभर असे फुटपाथवरच का राहिले असते? ज्योतिष वगेरे खरे होण्याचे दिवस वेगळे होते, तो काळ सत्ययुगातला होता. तप करून मेलेल्या माणसाला जिवंत करण्याचा तो काळ होता, सध्याचा काळ जिवंत माणसाला मृत बनविण्याचा आहे. तेव्हा माझे ऐक नि हा विचार मनातून अजिबात काढून टाक.

माझ्या प्रेमाच्या गुलकंदा, का कोण जाणे, पण मला तर अशी शंका येत आहे की तुझ्या रेसच्या नादामुळेच तू हा धंदा करायचे ठरवले आहेस. ह्या ऑक्टोपसाकडून रेसचे निकाल माहित करून घ्यायचे नि त्यावर बक्कळ पैसे कमवायचे असा एकंदर तुझा उद्योग दिसतो. सख्याहरी हे रेसचे खूळ तुझ्या डोक्यातून कधी जाणार आहे? ’तुम्ही घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकता, पण त्याला पाणी प्यायला लावू शकत नाही’ या उक्तीनुसार कितीही समजावले तरी तू पुन्हा घोड्यांवर पैसे लावतोसच! अरे मंत्र्यांच्या घोडेबाजारात सौदे करून तू एकवेळ करोडपती होऊ शकशील पण घोड्य़ांच्या शर्यतींवर पैसा लावून तुला कधी १०० रुपयेही मिळवता येणार नाहीत हे तुला का समजत नाही? त्यापेक्षा तू शेअरबाजारात पैसे लावत जा, तिथे सध्या ’इन्फोसिस’चा घोडा (नव्हे शेअर) जोरात आहे असे मी ऐकते, तू तिथे का प्रयत्न करत नाहीस?

जिवलगा, ऑक्टोपस पाळण्यात अजूनही अनेक धोके आहेत हे तू ध्यानात घे. पिटा संस्थेचे सभासद सध्या अशा गोष्टींकडे बारीक लक्ष ठेवून असतात हे लक्षात ठेव. माणूस सोडून इतर कुठल्याही प्राण्याचे शोषण केलेले या संस्थेला चालत नाही हे तू विसरू नकोस आणि त्या मेनका गांधी आत्ता सरकारात नसल्या तरी त्या काहीच करू शकत नाहीत असेही वाटून घेऊ नकोस. त्या शेवटी ’गांधी’ आहेत आणि आपल्या देशात त्या आडनावाला मोठे मोल आहे हे समजूनच पुढची पाऊले टाक. नाहीतर ऑक्टोपसाच्या आठ पायांसाठी त्या तुला आठ वर्षे जेलात टाकतील नि मला इथे तुझी वाट पहात एकटीनेच झुरत रहावे लागेल. त्याशिवाय आपल्या ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’लाही हे तुझे धंदे मुळीच आवडणार नाहीत हे मी खात्रीने सांगते. तिचे ते दाभोळकर ’ऑक्टोपस भविष्य वर्तावतो हे सिद्ध करा नाहीतर मुंडण करून घ्या’ असे आव्हान तुला देतील नि ते न पेलल्यामुळे तुझ्या डोक्याचे मुंडण त्यांनी केले तर नाक कापले गेलेल्या तुझ्याशी मी आयुष्यात कधीच लग्न करणार नाही हेही ध्यानात ठेव. म्हणूनच म्हणते सख्याहरी, हे नसते धंदे सोड नि दुसरा एखादा व्यवसाय शोध!

माझ्या गुलाबाच्या फुला, माझे ऐक नि हा विचार मनातून कायमचा काढून टाक. अरे ह्या धंद्यात काहीच राम नाही, किंबहुना ह्या धंद्याला काहीच भविष्य नाही असे म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये. आता ह्या अकरावीच्याच मुलांचे उदाहरण पहा. १२ वेगवेगळ्या राशींची ही मुले होती, पण ’बेस्ट ऑफ फाईव्ह’ने त्यांचे सगळ्यांचे भविष्य एकत्रच टांगणीला लावले की नाही? आणि तू पॉलची स्तुतीगीते गातोस, पण सिंगापूरमधल्या ’मणी’ ह्या पोपटाचा फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा अंदाज चुकलाच की! तेव्हा जरा डोक्याचा वापर कर नि भविष्य सांगण्याचा हा व्यवसाय तुझ्या डोक्यातून काढून टाक. ह्याऐवजी एखादा झनाना व्यवसाय तुला करू द्यायचीही माझी तयारी आहे. तू साड्या वीक, बांगड्या वीक, फुलांच्या वेण्या वीक, अत्तर, साबण, तेल, कुंकू, पाऊडर अशा बायकी वस्तू वीक, पण ऑक्टोपस घेऊन लोकांचे भविष्य सांगण्याचा (नि स्वत:चे भविष्य धोक्यात घालण्याचा) हा व्यवसाय तू करू नकोस!

प्राणनाथा, माझे बोलणे कठोर वाटले तरी तू रागावू नकोस, अरे तुझ्या भल्यासाठीच मी हे सांगते आहे. भविष्य सांगणे हा लोकांना उल्लू बनवण्याचा एक प्रकार आहे असे माझे स्पष्ट मत आहे. तू एक कर्तबगार तरूण आहेस, तू या धंद्याच्या नादी का लागतोस? मला सांग, भविष्य जर खरे होत असते तर जगात लाखो लग्ने रोज का मोडली असती? भविष्य जर खरे होत असते तर निवडणुकीला उभे असलेले सगळेच उमेदवार विजयी झाले नसते का? आणि भविष्य जर खरे होत असते तर जगातले प्रत्येक मूल डॉक्टर इंजिनियर किंवा कलेक्टर झाले नसते का? आता बेळगावचेच उदाहरण घे, बेळगाव महाराष्ट्रात येणार नाही असे कुठल्याही कुडमुड्या ज्योतिषाने हजार वेळा ओरडून सांगितले तरी तसे झाल्याशिवाय राहणार आहे का? तेव्हा सख्याहरी तो ऑक्टोपस चोरण्याचा विचार सोड, दुस-या कुठल्यातरी धंद्याचे सामान गोळा कर, वाटल्यास तुला मदत करायला मी तुझ्याबरोबर येते! सख्याहरी तू सुरूवात तर करून पहा, तुला साथ द्यायला ही मी मागून आलेच!

Wednesday, July 14, 2010

रीडर्स डायजेस्ट की जाहिरातदारांचे डायजेस्ट?

‘सकाळ‘ वृत्तपत्राचा घसरलेला दर्जा, तिथे पुरती मुरलेली व्यापारीवृत्ती नि तिथे बोकाळलेला सवंगपणा यावर आपण मागेच एका लेखात बोललो. मात्र मराठी भाषेतली वर्तमानपत्रे किंवा प्रकाशने यांपुरतीच ही कीड मर्यादित नाही, भारतातल्या जवळपास सगळ्याच प्रकाशनांना तिने ग्रासलेले आहे. मराठीत ’सकाळ’ची जी स्थिती झाली आहे नेमकी तशीच स्थिती इंग्रजीतल्या ‘रीडर्स डायजेस्ट‘ या मासिकाची झालेली दिसते. या मासिकाचे संस्थापक डीविट वॅलेस नि लीला वॅलेस यांच्या जीवाला आजचे हे मासिक पाहून किती त्रास होत असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो!

रीडर्स डायजेस्ट मासिकाची सुरुवात झाली अगदी लहान. सकस लिखाण असलेले एक लहानसे मासिक(जे लोकांना कुठेही नेता येईल व वजनाचा/आकाराचा त्रास न होता वाचता येईल) आपण सुरू करावे या भुमिकेतून वॅलेसने हे मासिक सुरू केले. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात फक्त पुर्वी इतरत्र प्रकाशित झालेले लेखच प्रकाशित होत. (वदंता अशीही आहे की आपल्याकडे आलेले चांगले लेख वॅलेस या अटीमुळेच एखाद्या फालतू प्रकाशनात प्रकाशित करे नि मग त्यांना आरडीत छापे!) हळूहळू मासिकाची लोकप्रियता वाढत गेली नि एक दिवस ते जगात सगळ्यात जास्त वाचले जाणारे मासिक बनले. पण सगळ्या चांगल्या गोष्टींचा अंत एक दिवशी होतोच, आरडीच्या बाबतीतही तेच झाले. एका साहित्यवेड्या माणसाने सुरु केलेले हे मासिक शेवटी भांडवलदारांच्या हातात पोचले, त्यांच्या भांडवलशाही वृत्तीचा परिणाम मासिकावर झाला नसता तरच नवल!

अगदी अलीकडे म्हणजे २००० सालापर्यंत आरडीचा दर्जा उत्तम होता. उत्तम लेख, गाजलेल्या पुस्तकांचे सारांश, ‘ऑल इन अ डेज वर्क‘,‘लाफ्टर - द बेस्ट मेडिसिन‘,‘ह्युमर इन युनिफोर्म‘, ’वर्ड पॉवर’ यांसारखी सदरे, पानापानांवर विखुरलेले चुटके, चटकदार वाक्ये यांमुळे आरडी वाचणे म्हणजे साहित्याची एखादी साग्रसंगीत मेजवाणी झोडण्यासारखे वाटे. किंबहुना भारतातच काय, ते सा-या जगात ते सर्वोत्कृष्ट इंग्रजी मासिक होते असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये. काही वर्षांपुर्वी अशाच कुणीतरी रद्दीत दिलेल्या १९९० ते २००० सालांतल्या आरडीच्या ऐंशी प्रती मी घरी आणल्याचे आठवते. दोन किंवा तीन रुपयांना एक अशा मिळाल्या असाव्यात, पुढे कितीतरी दिवस त्या मला वाचायला पुरल्या होत्या.

पण एकविसावे शतक सुरू झाले नि आरडीच्या दर्जात हळूहळू घसरण सुरू झाली. एक दर्जेदार मासिक प्रसिद्ध करणे या गोष्टीपेक्षा आरडीच्या प्रकाशनातून होणारा नफा कसा वाढवता येईल हा मुद्दा प्रकाशकांना अधिक महत्वाचा वाटू लागला. यात सगळ्यात पहिल्यांदा कात्री लागली ती मजकुरावर, तो कमी केला गेला नि जाहिराती वाढवण्यात आल्या. मजकुराच्या प्रमाणाबरोबर त्याचा दर्जाही खालावला, सकस, निर्भेळ, दर्जेदार असे लेख देण्यापेक्षा लोकांना आवडेल तो माल देण्याची प्रवृत्ती वाढली. मधल्या काही अंकात प्रसिद्ध झालेल्या सिनेतारकांच्या मुलाखती पाहून तर आरडी हे एखादे फिल्मी मासिक असावे अशी शंका लोकांना यायला लागली. मासिकाच्या छपाईचा/छायाचित्रांचा दर्जा सुधारून त्याचे बाह्यरूप आकर्षक बनवले गेले तरी त्याचा गाभा असलेले लेखन मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक कनिष्ट दर्जाचे बनत गेले. पुढे तर मालकांची हाव इतकी वाढली की नंतर तिच्यातून चक्क मासिकाचे मलपृष्ठही सुटले नाही. एखाद्या सुप्रसिद्ध (किंवा क्वचित उदयोन्मुखही) चित्रकाराचे एखादे सुंदर चित्र मलपृष्ठावर छापायची परंपरा विसरून चक्क तिथे जाहिराती छापल्या जाऊ लागल्या, त्यासाठी चित्राचे ते सदर आत हलवण्यात आले. नोव्हेंबर २००९ सालचे न्यायाधीश श्रीकृष्ण यांची मुलाखत असलेले आरडी आत्ता माझ्यासमोर आहे. १९४ पानांच्या या मासिकात चक्क ६५ पाने जाहिराती आहेत! ६५! म्हणजे चक्क ३३% जाहिराती? ३ पैकी १ पानात जाहिराती, ही तर वाचकांची घोर फसवणूक आहे! अर्थात जाहिराती वाढल्या असल्या तरी मासिकाची किंमत मात्र सतत वाढतच राहिली आहे. काही वर्षांपुर्वी २५-३० रूपयांना विकले जात असलेले हे मासिक आता चक्क ६० रूपयांना विकले जात आहे.

परंतु आरडीच्या दर्जात दिवसेंदिवस होत असलेल्या घसरणीपेक्षाही मला जास्त अचंबित करणारी गोष्ट म्हणजे दर महिन्याला प्रसिद्ध होणा-या आरडीच्या प्रतींची(भारतीय आवृत्ती) दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या! याचे कारण काय असावे? याचे कारण सोपे आहे, आरडी वाचणे ही एक फॅशनेबल गोष्ट आहे असा भारतातल्या मध्यम नि गरीबवर्गाचा ग्रह झालेला आहे. आरडी वाचले म्हणजे आपले इंग्रजी सुधारेल हा आणखी एक गैरसमज! एक चांगले नि सगळ्या कुटुंबाला वाचता येण्यासारखे दुसरे चांगले इंग्रजी मासिक भारतात नाही ही नेहमीची रडकथा आहेच!

अर्थात एवढे होऊनही हे मासिक मी का वाचतो असा प्रश्न काही जागरूक वाचक जरूर विचारतील, त्याचे उत्तर सोपे आहे. आजपर्यंत मी आयुष्यात आरडी एकदाही नविन विकत घेतलेले नाही. पुर्वी दोन रुपयांना, तर आजकाल पाच रूपयांना हे मासिक मी रद्दीच्या दुकानातूनच विकत घेत आलेलो आहे. सद्ध्या वृत्तपत्रांचीच किंमत तीन रू. झाली असताना फिल्मी नटनट्यांच्या मुलाखती नि बक्कळ जाहिराती छापत असले तरी विनोदी चुटके वाचण्यासाठी आरडीची पाच रू. किंमत फार नाही असे माझे प्रामाणिक मत आहे, काय म्हणता?

Saturday, July 3, 2010

दिवाकरांच्या नाट्यछटा - ४ (’-पण बॅट नाही!’)[अंतिम]

दिवाकरांच्या अनेक नाट्यछटांमधे जीवनातील विसंगती, दु:ख, खोटेपणा, अप्पलपोटेपणा, ढोंगीपणा अशा गोष्टींचे चित्रण असले तरी त्यांच्या सगळ्याच नाट्यछटा या साच्यात बसवता येत नाहीत. बरोबर आहे, प्रत्येक नाट्यछटेत हा मसाला ठासून भरलेला हवाच हा नियम का? रोजच्या जेवणात आपण अनेक चमचमीत पदार्थ खात असलो तरी शेवट वरणभाताने करतोच की! दिवाकरांची ’-पण बॅट नाही!’ ही नाट्यछटा अशीच आहे, एका लहानग्या क्रिकेट खेळाडूचे मोठे गंमतीदार चित्रण यात आहे. या नाट्यछटेचा प्राण म्हणजे हिची भाषा. दिवाकरांची निरीक्षणशक्ती किती बारीक नि अचूक होती हे या नाट्यछटेतून दिसते. दिवाकरांचे हे बोल दिवाकरांचे वाटतच नाहीत, ही नाट्यछटा वाचताना आपण जणू स्टेडियममधे ह्या बालक्रिकेटरशेजारी बसून त्याच्या तोंडचे बोलच ऐकत आहोत असा भास होतो. कुठलेही पात्र तितक्याच सहजतेने उभे करतो तो श्रेष्ठ लेखक असे जर म्हटले तर दिवाकरांना श्रेष्ठ लेखक का म्हणावे ह्या प्रश्नाचे उत्तर ह्या नाट्यछटेत मिळते. (एक मजेची गोष्ट म्हणजे, मराठी भाषा मोठ्या वेगाने बदलते आहे असे आपण रोज ऐकत असलो तरी खरेच तसे आहे का असा प्रश्न ही नाट्यछटा वाचल्यावर पडावा. ह्या नाट्यछटेतले बोल जर आजच्या एखाद्या बालक्रिकेटरच्या तोंडी टाकले तर ते मुळीच विचित्र वाटणार नाहीत, अगदी १००% शोभतील त्याला. ही नाट्यछटा ९५ वर्षांची असूनही असे व्हावे, ही मोठीच आश्चर्याची गोष्ट आहे, नाही का?)

वर सांगितल्याप्रमाणे, ही नाट्यछटा म्हणजे एका लहान क्रिकेट खेळाडूच्या तोंडचे उद्गार आहेत. नुकताच झेलबाद होऊन पॅवेलियनमधे परतलेला हा खेळाडू अर्थातच त्याचा दोष स्वत:कडे घेण्यास तयार नाही, तो पंचांचा चुकीचा निर्णय होता असे तो ठणकावून सांगतो आहे. मात्र आपल्या चांगल्या कामगिरीचे कारण म्हणजे आपली बॅट हे मान्य करायचा प्रामाणिकपणा त्याच्याकडे आहे. ही बॅट कशी बनली आहे, चेंडू टोलवायला कशी हुशार आहे नि कशी आपला जीव की प्राण आहे हेही पुढे तो आपल्याला सांगतो. मग ही लाखमोलाची बॅट दुस-याला द्यायची कशी? त्यामुळेच आपल्या मित्राने बॅट मागितल्यावर ह्या राजश्रींचे उद्गार आहेत, ’स्वत:च्या जीवाचा माणूस, अरे स्वत:चा जीव देईन मी, पण बॅट नाही!’

मूळ नाट्यछटा इथे वाचा.