Thursday, June 30, 2011

मनमोहनसिंग साहेब, आवरा...

वृत्तपत्रांच्या पाच संपादकांबरोबर काल पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सुमारे १०० मिनिटे संवाद साधला आणि त्यांच्या विविध (पण ठरलेल्या) प्रश्नांना कुशलतेने (ठरलेली) उत्तरे दिली. खरे सांगायचे तर मला हा सगळा प्रकारच विनोदी वाटला. पण सगळ्यात हास्यास्पद होती ती पंतप्रधानांनी केलेली 'मी दुबळा नाही' ही गर्जना. पंतप्रधानसाहेब, अहो जे खरोखरच सबल असतात त्यांना 'मी दुबळा नाही','मी दुबळा नाही' असे ओरडण्याची गरज नसते, उलट अशी घोषणाबाजी करणारे लोकच खरे दुबळे असतात ही साधी गोष्ट आपल्यासारख्या मोठ्या माणसाच्या लक्षात कशी येत नाही बरे?

पंतप्रधान करत असलेली विविध विधाने आता मला तरी पाठ झाली आहेत. 'मी दुबळा नाही', 'या देशाचा सर्वेसर्वा मीच आहे', 'सोनिया गांधी माझ्या कामकाजात दखल देत नाहीत', 'भ्रष्टाचार, काळा पैसा ह्या देशासमोरच्या मोठ्या अडचणी असल्या तरी त्या एका रात्रीत नाहीशा होऊ शकत नाहीत','राहुल गांधींना पंतप्रधान करण्यात मला काहीही हरकत नाही','आघाडी सरकार चालवताना काही वेळा तडजोड कराव्या लागतात, जनतेने आम्हाला समजून घ्यावे' ही वाक्ये ऐकून आता सा-या देशाचे कान किटले आहेत. पंतप्रधान सज्जन असतील (किंबहुना आहेतच) पण राजाने नुसते सज्जन असून चालत नाही, राज्य चालवण्यासाठी त्याने धूर्त, चाणाक्ष नि सतत सावध असावे लागते. अन्यथा त्या राजाची अवस्था राज्य सोडून वनवासात हिंडणा-या रामासारखी होण्यास वेळ लागत नाही. मनमोहन सिंग यांचे काहीसे असेच झाले आहे. ते सज्जन आहेत पण त्यांच्याभोवतीची भुतावळ मात्र चांगली नाही आणि ती भुतावळ दूर करण्याइतके धैर्य त्यांच्याकडे नाही.

सरकारमधल्या मंत्र्यांनी गैरप्रकार केले की सरकारचा सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून त्याची जबाबदारी अंतिमत: पंतप्रधानांवर येते हे मनमोहन सिंग यांनी विसरता कामा नये. अन्यथा त्यांचा या गैरप्रकारांना पाठिंबा आहे असा समज जनतेचा होतो (जो रास्तच आहे.) सुरेश कलमाडी, ए राजा यांसारख्या मंत्र्यांना मनमोहन सिंग यांनी त्वरेने दूर करायला हवे होते, पण तसे झाले नाही. महागाईची समस्या दिवसेंदिवस भयान स्वरूप धारण करते आहे आणि त्याला सरकारची चुकीची धोरणेच कारणीभूत आहेत. अण्णा हजारे किंवा बाबा रामदेव यांच्या आंदोलनांना मिळणारा पाठिंबा हा जनता त्यांच्यावर भुळून गेल्यामुळे नव्हे तर ती भ्रष्टाचाराला कंटाळल्याने मिळतो आहे हे पंतप्रधानांना का समजत नाही?

वाढत्या महागाईने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे, भ्रष्टाचार जोराने फोफावतो आहे, गुन्हेगारांना कायद्याचा नि न्यायालयांचा वचक राहिलेला नाही, सामान्य माणसाचे जगणे अवघड नि मरण सोपे होत आहे असे सगळे घडत असताना पंतप्रधान मात्र 'मी दुबळा नाही', 'मी दुबळा नाही' अशी घोषणाबाजी करण्यात गुंग झाले आहेत. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे दुर्दैव याहून जास्त काय असू शकते?

Saturday, June 25, 2011

किती दिवस टाकणार हे जुन्या गाण्यांचे रतीब?

जुन्या गाण्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत हे कुणीही सहज मान्य करेल. टीव्हीवरच्या खास गाण्यांना वाहिलेल्या कार्यक्रमांत (उदा. 'बाम' वाहिनीवरचा 'म्युझिक सिटी'), पुरस्कार वितरण सोहळ्यांत, नाट्यगृहांमधे सादर होणा-या वाद्यवृंद कार्यक्रमात सध्या जुन्या गाण्यांची चलती आहे. पण हे कार्यक्रम पाहिल्यावर ते सादर करणा-या लोकांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, लोकांना आवडतात म्हणून ह्या गाण्यांचे रतीब तुम्ही किती दिवस टाकणार? तुमची नवनिर्मिती आम्हाला ऐकायला मिळणार तरी कधी?

जुनी गाणी ऐकायला लोकांना आवडत असली तरी त्यात नवनिर्मिती काही नसते हे मान्य करायलाच हवे. ती गायली जातात ती मूळ गायकाची नक्कल करून, अर्थात ती सादर करताना फारसे कौशल्यही लागत नाही. त्यामुळे अशी गाणी सादर केली तरी त्यात नविन काही करण्याचे समाधान नसते. या कलाकारांना ते जाणवत नाही का? मी तर म्हणेन, जुनी दहा हजार गाणी गाणा-या गायकापेक्षा (मग तो कितीही गुणवत्तेचा का असेना) ज्याच्या नावावर आपली स्वत:ची दोनच का होईना गाणी आहेत असा गायक कधीही श्रेष्ठ. पुण्यात तर परिस्थिती इतकी वाईट आहे की जुन्या गाण्यांचा इथे रोज किमान एकतरी कार्यक्रम होताना दिसतोच. या गाण्यांमधे गाणारे गायकही अगदी ठरलेले आहेत. सुवर्णा, विभावरी, प्रमोद, आणि 'इतर नेहमीचेच यशस्वी'. आज काय बाबूजी किंवा मदनमोहन, उद्या काय लता मंगेशकर किंवा पंचम - कुणाला तरी पकडायचे आणि त्या व्यक्तीची गाणी लोकांना ऐकवायची हा त्यांचा कार्यक्रमच ठरून गेला आहे.

जुनी गाणी उत्कृष्ट आहेत हे मान्य, पण त्याच त्याच गोष्टी किती दिवस उगळत राहणार? जुनी गाणी गात राहिल्यामुळे आपण नविन गाणी बनवायलाच विसरलो आहोत असे म्हटले तर ते मुळीच चुकीचे ठरणार नाही. एखाद्या संगीतक्षेत्राचा दर्जा ठरवला जातो तिथल्या नवनिर्मितीकडे पाहून. तिथे आज कशी, किती, कुठल्या दर्जाची गाणी बनत आहेत यावरून त्या क्षेत्राची प्रगती किंवा अधोगती ठरवली जाते. नवनिर्मिती हा मुद्दा घेतला तर आज हिंदी किंवा मराठी संगीतक्षेत्रात काय चित्र दिसते? अलीकडच्या एकातरी नव्या अल्बमचे नाव पटकन ओठांवर येते का? नविन गाण्यांची निर्मिती पूर्णपणे थंडावल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे. अल्बम चांगला की वाईट हे नंतर पहाता येईल, अरे पण आधी काहीतरी बनवा तरी!

यावर 'गायकांना आवडतात म्हणून ते ही गाणी गातात नि लोकांना आवडतात म्हणून ते ती ऐकतात, तुमचं काय जातंय?' असं काही लोक म्हणतील. त्यांना मी एवढेच सांगेन की गायकांनी जुनी गाणी गाण्याबद्दल माझा आक्षेप नाही; मी स्वत: अनेकदा जुनी गाणी ऐकतो. जुनी गाणी गा, पण त्याबरोबरच नविनही काही येउद्या की. नव्या गाण्यांचे पाच नि जुन्या गाण्यांचे दोन कार्यक्रम झाले तर हरकत नाही, पण जुन्या गाण्यांचे पाच कार्यक्रम नि नव्या गाण्यांचा एकही नाही याला काय अर्थ आहे? निदान पुढच्या पिढीला जुनी गाणी म्हणून तुमची गाणी गाता यावीत म्हणूनतरी काहीतरी करा लेको!

Saturday, June 18, 2011

का? ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक माणूस नसतात?

कधीकधी मी लग्नाच्या जाहिराती वाचतो. आमचे लग्न ठरवण्याची मोहीम सध्या जोरात सुरू आहे, पण जाहिराती वाचण्यामागे हे कारण नाही. एक गंमत म्हणून मी त्या वाचतो इतकेच. त्यातल्या ब-याचशा ठराविक साच्याच्या असल्या (गोरी, सुंदर, गृहकृत्यदक्ष, मनमिळावू / उंच, देखणा, एकुलता एक, फॉरेन रिटर्न्ड, पुण्यात स्वत:चा फ्लॅट इ.) तरी त्यांमधे कधीकधी एखादा अजब नमुना सापडतोच. पण हा लेख त्या अजब नमुन्यावर नाही, तो आहे या जाहिरातींमधे दिसणा-या एका सूचनेवर. यापैकी अनेक जाहिरातींमधे मला ‘एस. सी./एस.टी. क्षमस्व‘ अशी सूचना दिसते आणि मी क्षणभर स्तब्ध होतो. पूर्वी मला हे चुकीचे वाटत असेच, पण आता ते विशेषकरून खटकते. जातीभेद विसरण्यात आपल्या समाजाने बरीच प्रगती केली आहे अशी वाक्ये मी येताजाता टाकत असलो तरी ‘मंजिल अभी बहोत दूर है‘ असा झटका मला अचानक त्या सूचनेमुळे मिळतो.

ही सूचना लिहिणा-यांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, ‘एस. सी.‘ आणि ‘एस.टी.‘ लोक कमी दर्जाचे आहेत असे आपले म्हणणे आहे काय? जर मी ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ नसतानाही मला ही गोष्ट इतकी खटकत असेल तर त्यांना ही गोष्ट किती खटकत असावी! कल्पना करा, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत गप्पा मारत उभे आहात, आणि तुमचा एक वर्गबंधू तिथे येतो. तुमची गरिबी, तुमची जात किंवा तुमच्या हातात नसलेल्या दुस-या कुठल्यातरी गोष्टीमुळे तो तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे ह्या वर्गबंधूचा (गैर)समज आहे. तर हा वर्गबंधू तिथे येतो आणि त्या दिवशी असलेल्या आपल्या वाढदिवसाचे निमंत्रण तुम्ही सोडून सगळ्यांना देतो. तुमचा तो मित्र(?) इथेच थांबला असता तरी ते चालले असते, पण तो एवढ्यावरच थांबत नाही; ‘तू ह्या कार्यक्रमाला येऊ नकोस‘ असे तो सगळ्यांदेखत तुम्हाला सांगतो. अशा वेळी तुम्हाला कसे वाटेल? ह्या जाहिराती वाचून त्या जातीतल्या लोकांना असेच वाटत नसेल काय?

लग्नाची जाहिरात ही काही कुठल्या वस्तुची जाहिरात नव्हे की ती वाचून आलेल्या पहिल्या माणसाबरोबर तुम्हाला तुमचा सौदा करणे भाग पडावे. ‘एस. सी.‘ किंवा ‘एस.टी.‘ जातीतल्या एखाद्या मुला(ली)ने ‘उच्च‘ जातीतल्या मुली(ला)ला मागणी घालावी ही घटना तशी दुर्मिळच, पण ती घडली तरी हा प्रस्ताव टाळण्यासाठी ‘उच्च‘ जातीतल्या लोकांकडे हजार कारणे असतातच की. आणि कुठलेही कारण देणे जमले नाही तरी ‘पत्रिका जुळत नाही‘ हे नेहमीचे कारण पुढे करता येतेच. असे असताना ह्या सूचनेची गरज काय?

ही सूचना आपल्या समाजातल्या ‘उच्च‘ जातींकडून केली जात असली तरी मी त्या जातींना सरसकट दोष देणार नाही. त्या जातींमधले सगळेच लोक असे करतात आणि हा दृष्टीकोन बाळगतात असे म्हणणे गाढवपणाचे ठरेल. (त्यामुळे सन्माननीय अपवादांनी स्वत:ला वगळावे.) जे असे करतात, त्यांनाही मी एवढेच म्हणेन की त्यांनी आपले वागणे एकदा तपासून घ्यायला हवे. एखादा मनुष्य एका विशिष्ट जातीतला आहे म्हणून त्याच्याविषयी विशिष्ट मत बनवणे कितपत योग्य आहे ह्याचा त्यांनी विचार करावा एवढेच माझे त्यांना सांगणे आहे. ‘खालच्या जातीतला‘ असे म्हणून कुणा ब्राह्मणाने महाराला असंस्कृत ठरवू नये आणि याच्या पूर्वजाने माझ्या पूर्वजांवर अत्याचार केले म्हणून कुणा चांभाराने कुणा मराठ्याचा तिरस्कार करू नये. अभिमान असावा तो आपण साध्य केलेल्या गोष्टींचा; ज्या गोष्टी नशिबाने आपल्याला मिळाल्या त्यांचा अभिमान बाळगण्यात काय अशील? हे म्हणजे एखाद्या धनाढ्य माणसाच्या मुलाने आपल्या संपत्तीचा अभिमान बाळगण्यासारखेच हास्यास्पद आहे, हो की नव्हे?

Monday, June 13, 2011

अखेर उपोषण संपले!

गेले अनेक दिवस गाजत असलेले बाबा रामदेव यांचे उपोषण अखेर संपले. चित्रपट नि उपोषणे लांबली की ती कंटाळवाणी होतात, त्यामुळे हे उपोषण संपल्यावर अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला. या उपोषणातून काय कमावले नि काय गमावले याचा हिशोब बाबा रामदेव यांनी केल्यास (बाकी तो करण्याचा सूज्ञपणा ते दाखवतील का हा प्रश्नच आहे!) तो वजाच येणार यात काय शंका? किंबहुना गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडी पाहता बाबा रामदेव दिसले की ‘कोण होतास तू, कोण झालास तू‘ हे गाणे आठवावे अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे नक्की.

बाबांच्या गाडीची वाटचाल चुकली ती सुरुवातीलाच. अण्णा हजारे यांनी केलेले उपोषण नुकतेच ताजे असताना बाबा रामदेव यांनी काहीशा तशाच मागण्यांसाठी पुन्हा वेगळे उपोषण करावे ही गोष्ट लोकांना काही फारशी पचनी पडली नाही. त्यातच बाबा रामदेव यांनी आपल्या उपोषणासाठी उभारलेल्या पंचतारांकित शामियान्याचा मुद्दाही गाजला. भ्रष्टाचार, काळ्या पैशाच्या विरोधात केलेल्या आंदोलनासाठी भरमसाठ पैसे खर्च करून हा जामानिमा करण्याची गरज काय? लोकांना रामदेव बाबांचे हे वागणे दुटप्पीपणाचे वाटले. स्वत: वातानुकूलित मंडपात राजेशाही उपोषण करणारे बाबा रामदेव मंत्र्यांना जाब कसे विचारू शकतात हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आणि मुलाला साखर खाऊ नये एवढे सांगण्यासाठी स्वत: साखर सोडणा-या त्या महात्म्याची आठवण झाली.

नंतर मुद्दा गाजला तो बाबा रामदेवांच्या सहका-यांचा. आपण ताडाच्या झाडाखाली ताक जरी प्यायलो तरी लोकांना ताडी पिल्यासारखेच वाटणार हे रामदेवबाबा कसे विसरले? आपण कुणासोबत राहतो, दिसतो याचे भान समाजसेवकांनी सतत ठेवायला हवे. किंबहुना समाजसेवकांचे चारित्र्य धुतलेल्या तांदळाइतके स्वच्छ हवे, त्यावर एकही डाग असता कामा नये. साध्वी वितंबरा, राष्ट्रीय स्वयंसेवक दलाचे लोक अशा लोकांना बाबांसोबत पाहून हे बाबांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन आहे की विरोधी पक्षांचे सरकारविरोधी आंदोलन हा प्रश्न लोकांना पडला. बाबांचे आंदोलन जनतेच्या मनातून उतरायला सुरूवात झाली ती इथेच.

नंतर उपोषण सुरू झाले आणि बाबांनी आपल्या मागण्या पुढे ठेवल्या. मात्र त्या मांडतानाही वास्तवाचा विसर त्यांना पडला. त्यांनी केलेल्या अनेक मागण्या अवास्तव नि राजकीय स्वरूपाच्या होत्या; देशहिताशी त्यांचा दुरूनदुरून संबंध नव्हता. काळ्या पैशाची मागणी ही त्यांची महत्वाची मागणी खरी, पण (सरकारलाही) ते काम तितके सोपे नाही या महत्वाच्या वस्तुस्थितीचे विस्मरण त्यांना झाले. स्विस सरकारचे कायदे पहाता ही माहिती मिळवणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे हे त्यांनी समजून घ्यायला हवे होते. ‘५००/१००० च्या नोटा रद्द व्हाव्यात‘ ही मागणी योग्य खरी, पण तिची तातडीने अंमलबजावणी करण्याचे काम अवघड होते. बाकी ‘भ्रष्टाचा-यांना फाशीची शिक्षा व्हावी, प्रधानमंत्री थेट निवडण्याचा अधिकार लोकांना मिळावा, इंग्रजीच्या जागी हिंदी वापरली जावी‘ या त्यांच्या मागण्या तर थक्क करणा-या होत्या. त्या मान्य झाल्यास जनतेचे आयुष्य कसे सुधारणार हे सांगण्यास ते का बरे विसरले असावेत?

नंतर घडला तो चार जूनचा प्रकार. हजारो पोलिसांनी रामलीला मैदानावर अचानक धाड टाकली आणि तिथल्या जवळपास लाखभर समर्थकांना पळवून लावत रामदेव बाबांना अटक करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत स्वत:ला अटक करून न घेता बाबांनी स्त्रीवेश परिधान करून तेथून पळण्याचा प्रयत्न केला. गमतीची गोष्ट अशी की एवढे करूनही पळून जाण्यात ते यशस्वी झाले नाहीतच. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांना हरिद्वारला नेले आणि तिथे त्यांना मोकळे सोडून दिले. असा प्रकार घडल्यावर वर ‘आपण स्त्रीवेश घातला यात काहीच गैर केले नाही; किंबहुना आपण शिवाजी महाराजांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला‘ असे लंगडे स्पष्टीकरण बाबांनी दिले. खरेतर स्वत:ला सन्मानाने अटक करून घेऊन स्वत:चे महत्व वाढवण्याची मोठी संधी बाबांकडे होती; तिचा फायदा त्यांनी का करून घेतला नाही या प्रश्नाचे उत्तर बराच विचार करूनही मला आजपर्यंत सापडलेले नाही. या प्रकारानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बाबांनी सरकारवर केलेले आरोप अक्षरश: थक्क करणारे होते. ‘मला मारण्याचा सरकारचा डाव होता आणि माझे ५००० कार्यकर्ते बेपत्त्ता झाले आहेत‘ अशी सनसनाटी वक्तव्ये करून त्यांनी स्वत:च स्वत:च्या पायांवर धोंडा मारून घेतला. त्यातच १८०० कोटी हा आपल्या संपत्तीचा भरभक्कम आकडा जाहीर करून बाबांनी उपोषणापासून सामान्य जनतेला आणखीनच दूर लोटले.

मला वाटते, प्रत्येक समाजसेवकाची जी शोकांतिका होते तीच बाबांची झाली. ‘आपले म्हणणे लोक ऐकत आहेत, ते त्यांना पटते आहे, लोक आपल्याला मानू लागले आहेत‘ हे एकदा जाणवले की मग आपण काय करतो आहोत याचे भान लोकांना रहात नाही, बाबांचे काहीसे असेच झाले. याखेरीज समाजसेवकाने प्रचंड धूर्त असायला हवे हे बाबांना समजले नाही. आपल्या मंत्र्यांना आपण बरीच नावे ठेवत असलो तरी त्यांचा हा गुण निश्चितच घेण्यासारखा आहे. प्रत्येक चाल जिंकण्यासाठीच चालायची आणि नशिबाने ती उलटी पडली तरी तिचा आपल्या फायद्यासाठी उपयोग कसा करून घ्यायचा हे कसब त्यांना पक्के जमलेले आहे. धूर्तपणा, मुत्सद्दीपणा, चाणाक्षपणा हे गुण का कोण जाणे आपण नकारात्मक माणतो, प्रत्यक्षात मात्र ते अतिशय उपयोगी आहेत. कुठे थांबायचे, कुठे विरोधकांना कोंडीत पकडायचे, कुठे थोडे नमते घ्यायचे नि कुठे आक्रमकपणा दाखवायचा हे जाणत्या समाजसुधारकाला नेमके कळायला हवे, रामदेव बाबा इथेच कमी पडले. याबाबत समाजसेवकांनी श्रीकृष्णाचा आदर्श समोर ठेवायला हवा. ह्या गोष्टीचे आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. गांधींना आपण खूप साधे समजत असलो तरी ते तसे नव्हते, ते अतिशय चतुर आणि मुत्सद्दी होते. जनआंदोलन कसे सूरू करायचे, ते कसे चालवायचे नि ते थांबवायची कधी याची खूणगाठ त्यांच्या मनात पक्की होती, त्यामुळेच ते स्वातंत्र्यासाठीचा सर्वव्यापी लढा उभारण्यात नि इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्यात यशस्वी ठरले. समाजसुधारकांना आणि चळवळ करणा-यांना त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

असो, झाले ते झाले. जे घडले त्याला बहुतांशी रामदेव बाबा स्वत:च जबाबदार असले तरी मन त्यामुळे उदास झाले हे खरे. बाबांचे जनमानसांमधले स्थान डळमळले, आपल्या पहिल्याच चळवळीत ते संपूर्णपणे अपयशी झाले आणि त्यांच्याकडे डोळे लावून बसलेल्या सगळ्या भारतवर्षाचा त्यांनी भ्रमनिरास केला याची बोचणी मनात आहे नि पुढेही राहीलच!

Thursday, June 2, 2011

सचिनच्या चाहत्याच्या लेखाला उत्तर!

नमस्कार मिलिंद कारेकर साहेब, आपल्या http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8670221.cms या लेखाला उत्तर म्हणून सदर लेख लिहितो आहे. आता 'हे पत्र्युत्तर तुम्हाला मागितले कुणी?' असा प्रश्न तुम्ही विचाराल, त्याचे उत्तर सोपे आहे. अहो आम्ही पुणेकर, जे कुणीही करायला सांगितले नाही (किंवा करू नका असे सांगितले आहे) नेमके ते करणे हा आमचा स्वभावच आहे, त्याला आम्ही काय करणार! बाकी हा लेख वाचून 'आम्हाला शिकवणारे टिकोजीराव तुम्ही कोण?' असे म्हणू नकात म्हणजे झाले, कारण आमचे खरे नावच टिकोजीराव आहे.

असो, बाकी तुमचा लेख आम्हाला आवडला. पोटतिडीकीने म्हणतात तो काय तसा लिहिल्यासारखा वाटला. किंबहुना सचिनवरचे तुमचे प्रेम पाहून आम्ही अक्षरशः धन्य झालो. इतके की आम्हाला अचानक 'हर किसीको नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगीमे' हे गाणेच ऐकू यायला लागले. पण नंतर ते आमच्या खुराड्यात बसणा-या आमच्या सहका-याच्या भ्रमणध्वनीचे केकाटणे असल्याचे कळाल्यावर मात्र आमची निराशा झाली. (बाकी पकडलेत बरोबर हो तुम्ही आम्हाला! हो, हो, कार्यालयातच वाचला आम्ही हा लेख.) असो. (हा शब्द या लेखात पुन्हापुन्हा येतो आहे हे आम्ही जाणतो, पण ते पुण्याचे वैशिष्ट्य आहे आणि त्याला आमचा नाईलाज आहे.)

तर तुमच्या लेखाविषयी. या लेखाच्या सुरुवातीलाच तुम्ही म्हणता 'सचिन हा काही लोकांसाठी देव आहे देव! मी देखील त्याला देव मानतो. पण फक्त मैदानावर. मैदानाबाहेर मी त्याच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा वागतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.' कारेकर साहेब, मला तुमचे हे वाक्य भयंकर वाटते. वैयक्तिक प्रश्न? अहो साहेब, माणूस सार्वजनिक झाला की त्याला वैयक्तिक काही नसते, त्याचे सगळे काही सार्वजनिक होते. आता समजा, महाराष्ट्रातल्या एखाद्या मंत्र्याने त्याच्या घरात काम करणा-या एका मुलीवर बलात्कार केला, तर तुम्ही तिथे हाच युक्तिवाद करणार आहात का? अहो, जेव्हा लोक एखाद्यावर एवढे प्रेम करतात, तेव्हा त्याचे वागणे आदर्श असावे अशी अपेक्षा लोकांनी केली तर त्यात चुकीचे काय? प्रत्येक मोठी व्यक्ती शेवटी माणूस असते हे खरे, त्यामुळे तिच्या चुका लोक माफ करतीलही, पण तिचे अपराध कसे काय माफ केले जावेत?

पुढे तुम्ही म्हणता, 'आपण खोटेपणा करून देशाचं नुकसान केलं तर ते चालतं. पण सचिनने कायद्यात राहून जर स्वतःचा पैसा वाचवायचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरतो काय?' अहो कारेकर साहेब, पण काही लोक सरकारचे नुकसान करतात ही गोष्ट चुकीचीच नाही का? इथे लक्षात घ्या, सचिनने केलेली मागणी बेकायदेशीर आहे असे नव्हे तर ती नैतिकदृष्ट्या चुकीची आहे म्हणून तिच्यावर टीका झाली. (आता तो बेकायदेशीर गोष्टी करत नाही म्हणून तुम्ही त्याचा सत्कार करणार असाल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.)

आता तुमचे हे वाक्य, 'पैसा कमावणं जितकं कठीण असतं ना त्याही पेक्षा पैसा टिकवणं जास्त कठीण असतं. नुसता आपल्या जवळ पैसा आहे म्हणून तो कसाही उडवून चालत नाही तर त्याची कदरही असावी लागते.' अहो, करावी ना, सचिनने जरून धनवृद्धी करावी, पैसा कमवावा, टिकवावा, पण असा खोटेपणा करून? नाही, ही गोष्ट चुकीची आहे, आणि असेल. पुढे तुम्ही म्हणता, 'बेकायदेशीररित्या FSI वाढवून घेऊन मग पेनल्टी भरून ते बांधकाम कायदेशीर करून घेता येतं, पण तसं न करता त्याने सरळ FSI वाढवायला परवानगी मागितली. हा त्याचा चांगुलपणा आपल्या लक्षात का येत नाही?' कारेकर साहेब, आपण पुन्हा पुन्हा चुकीची कामे करणा-यांचे संदर्भ का देता आहात? अहो, एका हि-याची तुलना दुस-या हि-याशी केली जावी, दगडाशी नव्हे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, 'बाकीचे लोक चुकीच्या गोष्टी करतात आणि सचिन तसे करत नाही म्हणून तो महान.' हा आपला युक्तिवाद ऐकून आम्हाला हसावे की रडावे तेच कळेनासे झाले आहे.

पुढे तुम्ही लिहिता, 'फेरारी ३६० मॉडेना ह्या गाडीवर कस्टमने सूट दिल्यामुळे त्याच्यावर लोकांनी खूप चिखलफेक केली.' मग काय चूक त्यात? अहो, सर्वसामान्य माणसाला हे कस्टम्सवाले किती त्रास देतात हे तुम्ही कधी पाहिले आहे काय? जर नियमात बसत नसेल तर परदेशातून आणलेल्या वस्तूवर सामान्य माणूस आयातशुल्क भरतोच ना? मग अब्जाधीश असलेल्या सचिनला त्यात अवघड ते काय? पण 'मी कुणीतरी खास आहे, म्हणून मला खास वागणूक हवी' असे तो म्हटला नि त्यामुळेच त्याच्यावर सडकून टीका झाली.

नंतर तुम्ही म्हणता, 'माझा स्वतःचा सत्यसाईबाबांवर विश्वास नाही. पण माझा विश्वास नाही म्हणून सचिनचा देखील विश्वास नसावा अशी अपेक्षा मी करीत नाही.' अर्थात सत्यसाईबाबा हे एक भोंदू होते हे तुम्ही मान्य करताच ना? उद्या, आपल्या मुख्यमंत्र्यांनी स्वामी नित्यानंदांना आपल्या कार्यालयात आणून आपल्या खुर्चीवर बसवले तर तुमची भूमिका काय असेल? सचिनच्या एका भोंदू बाबावरील श्रद्धेमुळे लोकांमधे चुकीचा संदेश जातो हे तुम्ही नाकारता आहात काय?

आणि सगळ्यात शेवटी तर आपण कडी केली आहे. 'अरे ज्याला केलेल्या कामाचे पैसे पण देऊ नयेत, अशा सैफ अली खानला "पद्मश्री" देतात तेव्हा आमच्या तोंडून 'ब्र' निघत नाही. पण सचिन तेंडुलकर हे नाव घेतलं की आपण लगेच बाह्या वर करून चर्चा करायला का लागतो?' कारेकर साहेब हे काय आहे? अहो, सैफ अली खानच्या पद्मश्रीचा इथे संबंध काय? आणि सैफ अली खानला पद्मश्री मिळाल्यावर महाराष्ट्रात पेढे वाटले गेले होते नि सचिनला भारतरत्न मिळाल्यास महाराष्ट्रात सुतक पाळले जाईल असे आपल्याला म्हणायचे आहे काय?

मिलिंदराव, 'सचिनने तरी' असे करू नये असे आम्ही म्हणतो आहोत आणि 'सचिनने' हे केले तर काय हरकत आहे असे म्हणता आहात, आपल्या दोघांच्या दृष्टीकोनात हाच तर फरक आहे. अहो, भारतरत्न मिळवण्याच्या लायकीचा माणूस हा. लहानसहान आहे का हा सन्मान? मराठी माणसांमधे बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, धों. के. कर्वे अशा महान व्यक्तींना मिळाला हा सन्मान. हाच सन्मान सचिनलाही देण्याच्या गोष्टी आम्ही करत असताना सचिनने काही रुपड्यांसाठी असा खोटेपणा करावा? छे, आम्हाला नाही पटत!

बाकी कारेकर साहेब, आपल्या या लेखाबद्दल आम्ही तुम्हाला दोष देत नाही, अहो हा देश नि या देशाची मनोवृत्तीच तशी आहे. 'एखादा माणूस आम्हाला आवडला की त्याचे शंभर गुन्हे माफ' ही मनोवृत्ती एकदा स्वीकारली की मग लहान मुलांच्या नरबळीच्या बातम्या येऊनही आसाराम बापूंची व्याख्याने हाउसफुल्ल होतात, गंभीर गुन्हे करूनही संयज दत्त, सलमान यांना प्रत्यक्ष पहायला मारामारी होते आणि खुनाचे अनेक गुन्हे असूनही नेते सलग १० वेळा मतदारसंघातून निवडून येतात. अहो चालायचेच, आताशा तर आम्हाला त्याची सवय झाली आहे. नुसते 'मेरा भारत महान' म्हणायचे नि एक सुस्कारा सोडायचा झाला!

असो (हा शेवटचा),
पत्रोत्तर द्याच.
आपला विश्वासू,
टिकोजीराव तिरशिंगराव पुणेकर.

ता.क. मिलिंदराव, आमचे मराठी थोडे कच्चे असल्याने पुन्हा पुन्हा वाचूनही आपण खाली लिहिलेल्या परिच्छेदाचा अर्थ आम्हाला समजलेला नाही, तो समजावून देण्याचे कष्ट आपण घ्याल काय?

आम्हाला भ्रष्ट मुख्यमंत्री चालतो. लालू, कलमाडी, ए. राजा आणि कनीमोळी सारखे घोटाळेबाज आम्ही सहन करतो. स्वतःच्या मनमानीने कारभार करणारे आणि नवनवीन कायदे अमलात आणणारे गृहराज्यमंत्री आम्हाला चालतात. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने लाख लाख रुपयांच्या हंड्या बांधणारे नेते आम्हाला जास्त प्रिय. मग त्या चढाओढीत छोट्या मंडळातील कुणाचा अगदी जीव गेला तरी आम्हाला फिकीर नसते.' पण सचिनने मात्र शॉवरखाली आंघोळ न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करा.' असा जरुरीचा सल्ला दिला तरी आम्ही तो मनावर घेत नाही.