Thursday, June 30, 2011

मनमोहनसिंग साहेब, आवरा...

वृत्तपत्रांच्या पाच संपादकांबरोबर काल पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सुमारे १०० मिनिटे संवाद साधला आणि त्यांच्या विविध (पण ठरलेल्या) प्रश्नांना कुशलतेने (ठरलेली) उत्तरे दिली. खरे सांगायचे तर मला हा सगळा प्रकारच विनोदी वाटला. पण सगळ्यात हास्यास्पद होती ती पंतप्रधानांनी केलेली 'मी दुबळा नाही' ही गर्जना. पंतप्रधानसाहेब, अहो जे खरोखरच सबल असतात त्यांना 'मी दुबळा नाही','मी दुबळा नाही' असे ओरडण्याची गरज नसते, उलट अशी घोषणाबाजी करणारे लोकच खरे दुबळे असतात ही साधी गोष्ट आपल्यासारख्या मोठ्या माणसाच्या लक्षात कशी येत नाही बरे?

पंतप्रधान करत असलेली विविध विधाने आता मला तरी पाठ झाली आहेत. 'मी दुबळा नाही', 'या देशाचा सर्वेसर्वा मीच आहे', 'सोनिया गांधी माझ्या कामकाजात दखल देत नाहीत', 'भ्रष्टाचार, काळा पैसा ह्या देशासमोरच्या मोठ्या अडचणी असल्या तरी त्या एका रात्रीत नाहीशा होऊ शकत नाहीत','राहुल गांधींना पंतप्रधान करण्यात मला काहीही हरकत नाही','आघाडी सरकार चालवताना काही वेळा तडजोड कराव्या लागतात, जनतेने आम्हाला समजून घ्यावे' ही वाक्ये ऐकून आता सा-या देशाचे कान किटले आहेत. पंतप्रधान सज्जन असतील (किंबहुना आहेतच) पण राजाने नुसते सज्जन असून चालत नाही, राज्य चालवण्यासाठी त्याने धूर्त, चाणाक्ष नि सतत सावध असावे लागते. अन्यथा त्या राजाची अवस्था राज्य सोडून वनवासात हिंडणा-या रामासारखी होण्यास वेळ लागत नाही. मनमोहन सिंग यांचे काहीसे असेच झाले आहे. ते सज्जन आहेत पण त्यांच्याभोवतीची भुतावळ मात्र चांगली नाही आणि ती भुतावळ दूर करण्याइतके धैर्य त्यांच्याकडे नाही.

सरकारमधल्या मंत्र्यांनी गैरप्रकार केले की सरकारचा सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून त्याची जबाबदारी अंतिमत: पंतप्रधानांवर येते हे मनमोहन सिंग यांनी विसरता कामा नये. अन्यथा त्यांचा या गैरप्रकारांना पाठिंबा आहे असा समज जनतेचा होतो (जो रास्तच आहे.) सुरेश कलमाडी, ए राजा यांसारख्या मंत्र्यांना मनमोहन सिंग यांनी त्वरेने दूर करायला हवे होते, पण तसे झाले नाही. महागाईची समस्या दिवसेंदिवस भयान स्वरूप धारण करते आहे आणि त्याला सरकारची चुकीची धोरणेच कारणीभूत आहेत. अण्णा हजारे किंवा बाबा रामदेव यांच्या आंदोलनांना मिळणारा पाठिंबा हा जनता त्यांच्यावर भुळून गेल्यामुळे नव्हे तर ती भ्रष्टाचाराला कंटाळल्याने मिळतो आहे हे पंतप्रधानांना का समजत नाही?

वाढत्या महागाईने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे, भ्रष्टाचार जोराने फोफावतो आहे, गुन्हेगारांना कायद्याचा नि न्यायालयांचा वचक राहिलेला नाही, सामान्य माणसाचे जगणे अवघड नि मरण सोपे होत आहे असे सगळे घडत असताना पंतप्रधान मात्र 'मी दुबळा नाही', 'मी दुबळा नाही' अशी घोषणाबाजी करण्यात गुंग झाले आहेत. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे दुर्दैव याहून जास्त काय असू शकते?

No comments:

Post a Comment