Monday, January 31, 2011

सिंहासन - एक विशेष प्रभाव न पाडू शकणारा चित्रपट

मराठी सिनेमाचा इतिहास लिहिताना ज्याला टाळून पुढे जाता येणार नाही आणि आपला एक विशिष्ठ ठसा उमटवणा-या चित्रपटांच्या यादीत ज्याचा समावेश निश्चितपणे करावा लागेल असा 'सिहासन' नुकताच पाहिला आणि प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर फारसा आवडला नाही.

ही कथा आहे दिगू टिपणीसची. दिगू एका वृत्तपत्रात काम करणारा पत्रकार आहे. सडाफटिंग असलेला दिगू एका लहानशा फ्लॅटमधे एकटाच राहतो. सकाळी उशीरा उठावे, आवरून बाहेर पडावे आणि दिवसभर इकडेतिकडे फिरून बातम्या मिळवून रात्री उशीरा घरी परतावे असा त्याचा दिनक्रम. 'सिंहासन'ची कथा केंद्रित आहे दिगूवर, पण त्याला या कथेचा नायक म्हणता येणार नाही, रुढार्थाने सिंहासनला कुणीच नायक नाही. या कथेत अनेक पात्रे आहेत, किंबहुना पात्रांची इथे अगदी जत्रा झाली आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. असे असले तरीही या पात्रांना सांभाळणे, त्यांना खेळवणे हे दिग्दर्शकाने (जब्बार पटेल) सहज जमवले आहे आणि त्यासाठी त्याचे कौतुक करायला हवे.

मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे, मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे आनंदराव, अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे (आणि त्यांची तरूण देखणी सून), विदर्भातून आलेले मुख्यमंत्र्यांचे पक्षांतर्गत विरोधक - शेतकीमंत्री माणिकराव पाटील, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणारे आमदार रावसाहेब टोपले, कामगार पुढारी डिकास्टा, सोन्याची चोरटी आयात करणारा स्मगलर, त्याचा हस्तक, तिथेच काम करणारा एक मध्यमवर्गीय संसारी पुरुष, जगूकडे काम करणारी मोलकरीण आणि तो प्रेम करत असलेली एक मरणासन्न वेश्या अशा सगळ्या पात्रांभोवती सिंहासनची कथा फिरते.

सिंहासनची बलस्थान आहेत त्यातल्या कलाकारांचा अभिनय आणि अर्थातच् त्यातले संवाद. निळू फुले, अरूण सरनाईक, श्रीराम लागू, मधुकर तोरडमल, श्रीकांत मोघे, डॉ. मोहन आगाशे, लालन सारंग, नाना पाटेकर असे नंतर आपल्या अभिनयाने गाजलेले अनेक मोठे अभिनेते सिंहासनमधे आहेत. प्रत्येकाने आपली भूमिका अगदी चोख वठवली आहे, पण सगळ्यात भाव खाऊन जातात ते श्रीराम लागू. बोलताना जीभेवर साखर ठेवून बोलणारे पण बेरकी, कावेबाज दाभाडे लागूंनी उत्तम उभे केले आहेत. अगदी छोट्या भूमिकेमधूनही एक अभिनेता आपल्या अभिनयाची चुणूक दाखवू शकतो या गोष्टीची प्रचिती सिंहासनमधे येते; जगूचा न्हावी आणि शेवटी त्याला भेटणारा भिकारी ही याची दोन चांगली उदाहरणे.

सिंहासनमधले संवाद लिहिले आहेत विजय तेंडुलकर यांनी. चित्रपटातला प्रत्येक संवाद नेमकी हवी ती गोष्ट अचूकपणे सांगणारा आहे; संवादांची उदाहरणे देऊन मी उगीच इथे जागा वाया घालवणार नाही. संवाद हे चित्रपटाचे एक महत्वाचे अंग आहे हे गाजलेल्या प्रत्येक चित्रपटाने दाखवून दिले असूनही ही गोष्ट आजकालचे दिग्दर्शक का बरे विसरले असावेत?

पण - आणि हा पण खूप महत्वाचा आहे - एवढे सगळे असूनही सिंहासनचा प्रभाव पडत नाही. एखाद्या उमेदवाराने हरेक मतदारसंघात आघाडी मिळवावी पण शेवटी निवडणूक मात्र हरावी असे काहीसे सिंहासनमधे घडते. चित्रपटात दिगू शेवटी वेडा होतो, पण (चित्रपटात त्याच्याबरोबर फारसे वाईट असे काहीच न घडूनही) असे का व्हावे याचे कारण स्पष्ट होत नाही. धूर्त नि मुरब्बी मुख्यमंत्र्यांनी एका निनावी दूरध्वनीने एवढे अस्वस्थ का व्हावे, आपल्या बुडणा-या पत्नीला न वाचवणा-या पक्षाध्यक्षांनी या कारणाने मुख्यमंत्र्यांना का घाबरावे, मुख्यमंत्र्यांनी डिकास्टाला भेटताना, त्याने अर्थमंत्र्यांना भेटताना कुणीच कसे पाहू नये, रावसाहेब टोपलेंनी सोन्या महार नि त्याच्या मुलीला एवढे दिवसाढवळ्या मारूनही त्याचा अजिबात ब्रभा का होऊ नये या प्रश्नांची उत्तर चित्रपटात मिळत नाहीत.

सत्तासंघर्षाचे चित्रण करणारा चित्रपट मधेच गरीबांच्या जगण्यावर (उषःकाल होता होता...) भाष्य करतो आणि आपला सगळा प्रभाव गमावून बसतो. प्रसंगांमधून जमला असला तरी एक कथा म्हणून चित्रपटाचा जो अंतिम परिणाम व्हायला हवा तसा तो सिंहासनमधे होत नाही आणि इथेच तो मार खातो. चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत राहिलेला हा परिणाम खूप महत्वाचा असतो; किंबहुना तोच एखादा चित्रपट सामान्य की असामान्य हे ठरवत असतो. अनेकदा एखाद्या चित्रपटात काही संवाद चुकतात, काही प्रसंग हवा तसा परिणाम साधत नाहीत, पण त्याचा अंतिम परिणाम अनुकूल असतो आणि त्यामुळेच तो यशस्वी ठरतो; सिंहासनमधे नेमके उलटे घडते, त्यातले संवाद, प्रसंग परिणामकारक असले तरी तो एक चित्रपट म्हणून आपला प्रभाव टाकू शकत नाही.

'यू डोन्ट हॅव टू विन इच बॅटल, यू हॅव टू विन द वॉर' या वाक्याच्या नेमके विरुद्ध सिंहासनबाबत घडते. हरेक लढाई जिंकलेला हा चित्रपट शेवटी युद्ध हरतो. असे सगळे असले तरी दिग्गज कलाकारांच्या अभिनयासाठी आणि उत्कृष्ट संवादांसाठी तो एकदा पहायला हवाच!

Monday, January 24, 2011

हिंदी चित्रपटांमधली 'डायलॉगबाजी' गेली कुठे?

परवा टीव्हीवर दीवार पहात होतो; जे चित्रपट कितीही वेळा पाहिले तरी अजिबात शिळे वाटत नाहीत अशा चित्रपटांमधे दीवारचा समावेश होतो. अभिनय, कथा या पातळीवर उत्कृष्ट असला तरी दीवार गाजला तो त्यातल्या संवादांमुळे. 'मेरे पास माँ है|', 'भाई, तुम साईन करोगे या नहीं?', 'आज खुश तो बहोत होगे तुम...', 'मैं आजभी फेके हुए पैसे नहीं उठाता...' अशा ह्दयाला हात घालणा-या संवादांमुळे हा चित्रपट आजही आपल्याला जवळचा वाटतो. पण आजकाल प्रदर्शित होणारे चित्रपट पाहिले तर मात्र त्यातले संवाद लोकांच्या ओठांवर अजिबात दिसत नाहीत. नव्वदीच्या दशकात किंवा त्यानंतर आलेल्या कुठल्याही चित्रपटातला एखादा गाजलेला संवाद आठवण्याचा प्रयत्न करा, येतो चटकन ओठांवर? नाही ना? का बरं झालं असावं असं?

मला वाटतं याला बरीच कारणे आहेत. एक कारण म्हणजे आज आपल्या भाषांचं दूषित झालेलं स्वरूप. इंग्रजीचं आक्रमण आज इतकं जोरात आहे की एक वाक्य तिचा आधार न घेता बोलणं अशक्य झालेलं आहे. चित्रपटांचा समाजावर परिणाम होतो की समाजाचा चित्रपटांवर हा वाद खूप जुना असला तरी हे दोन्ही एकमेकांवर हळूहळू परिणाम करत असतात हे नक्की. त्यामुळेच आजचे हिंदी चित्रपटांमधले संवाद बरेचसे इंग्रजी नि थोडेसे हिंदी असतात; असले हे धेडगुजरे संवाद काय परिणाम करणार? म्हणजे कल्पना करा, कालिया म्हणतो आहे 'गोली सिक्स और आदमी थ्री. ये तो बहुत इनजस्टिस है|' किंवा राजकुमार साहेब म्हणत आहेत 'ये नाईफ है, लगजाये तो ब्लीडिंग हो सक्ती है|' किंवा डॉन म्हणतो आहे, 'डॉनको पकडना डिफिकल्ट ही नहीं, इम्पॉसिबल हैं' तर त्याचा परिणाम होईल का? चित्रपटाचे नाव इंग्रजीत, नामावली इंग्रजीत, नटनट्यांच्या मुलाखती इंग्रजीत, चित्रपटातले बहुतांश संवाद इंग्रजीत, पुरस्कारसोहळे इंग्रजीत पण चित्रपटाची भाषा मात्र हिंदी असला विनोदी प्रकार फक्त भारतातच होऊ शकतो!

दुसरी गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत असलेली चांगल्या लेखकांची वानवा. पुर्वीचे हिंदी कथालेखक आणि संवादलेखक फार शिकलेले नसले तरी त्यांनी खूप वाचलेले असे. चांगले साहित्य कशाला म्हणावे, त्याची वैशिष्ट्ये काय ही माहिती त्यांना असे. खूप वाचलेले असल्याने नैसर्गिक तरीही परिणामकारक संवाद कसे लिहावेत हे ज्ञान त्यांना आपसूक मिळे. आत्ताची परिस्थिती मात्र वेगळी आहे. हिंदी चित्रपटसुष्टीत काम करत असूनही हिंदीचे ज्ञान नाही अशी परिस्थिती आज अनेकांची आहे, लेखकही याला अपवाद नाहीत. किंबहुना आजचे हिंदी चित्रपटसृष्टीतले बहुतांश लोक चित्रपटांच्या प्रेमापेक्षा आपला बाप तिथे असल्याने किंवा पैसा कमावण्यासाठी (क्वचित दोन्हीं कारणांमुळे) तिथे आहेत. इंग्रजी भाषेत शिकलेले आणि इंग्रजी भाषेतली पुस्तके वाचत मोठे झालेले हे लेखक पल्लेदार हिंदी संवाद लिहिणार तरी कसे?

तिसरी गोष्ट म्हणजे एकूणच चित्रपटांच्या दर्जाबाबत आग्रही राहण्याची आज विस्मरणात गेलेली चाल. आजचा काळ अनेकपडदा चित्रपटांचा आहे. एक चांगला चित्रपट काढण्यापेक्षा पैसा कमवण्यावर लोकांचा आज भर आहे. भारी नट/नट्या घ्याव्यात, सिनेमाची भरपूर जाहिरात करावी, तो ढीगभर चित्रपटगृहांत प्रदर्शित करावा आणि पहिल्या आठवड्यातच पैसे वसूल करून भरपूर नफाही कमवावा अशी सध्याची रीत आहे. कथेकडे लक्ष देणे, प्रसंगांना साजेसे संवाद लिहिणे, अभिनय करणे या गोष्टींकडे लक्ष द्यायला आज वेळ आहे कोणाला? यात प्रेक्षकही थोडेसे दोषी आहेत. त्यांनी जर दर्जाचा आग्रह धरला तरच या फसवणूकीला लगाम घालणे शक्य आहे.

असो, आशा करूयात की एखादा चुरचुरीत, रांगडे संवाद असलेला चित्रपट २०११ मधे प्रदर्शित होईल आणि २०५० साली त्यातले संवाद 'फेकताना' आपण 'हा चित्रपट आम्ही चित्रपटगृहांमधे पाहिला होता' अशी बढाई मारू शकू!

Wednesday, January 19, 2011

१५ जानेवारी - एक महत्वाचा दिवस

या वर्षी १४ जानेवारीस पानिपतच्या लढाईला २५० वर्षे पूर्ण झाली आणि सगळ्यांचे लक्ष या दिवसाकडे वेधले गेले. पण त्यामुळे तिच्या पुढची अर्थात् १५ जानेवारीची तारीख महत्वाची असूनही थोडी झाकोळली गेली; या तारखेचे महत्व सगळ्यांना कळावे हेच या लेखाचे कारण. मार्टिन ल्युथर किंग आणि विकीपिडीया यांचा जन्म अशा दोन महत्वाच्या गोष्टी याच दिवशी घडलेल्या असताना त्याला विसरून कसे चालेल?

मार्टिन ल्युथर किंग हे अमेरिकेतले मोठे समाजसुधारक. लोकांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करणार्‍या आणि त्यांच्या जगात मोठे बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरलेल्या काही मोजक्या लोकांमधे त्यांचा समावेश होतो. वंशवाद आणि असमानता यांच्या विरुद्ध मार्टिन ल्युथर किंग यांनी निकराने लढा दिला आणि अमेरिकेतील काळ्या लोकांना गोर्‍यांच्या बरोबरीने स्थान मिळावे यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. गोर्‍यांपेक्षा काळे लोक कुठल्याही बाबतीत कमी नाहीत आणि गोरे लोक जगत असलेले जीवन जगण्याचा आणि ते बजावत असलेला प्रत्येक हक्क बजावण्याचा अधिकार काळ्या लोकांना आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पण हे सगळे त्यांनी केले ते हिंसेची साथ न घेता. गोरे लोक नव्हे तर त्यांची वागणूक मला पसंत नाही असे त्यांचे म्हणणे होते आणि त्यामुळेच त्यांचा लढा काळे विरुद्ध गोरे असा नव्हे तर काळे विरुद्ध वर्णद्वेष असा लढला गेला. मी माझ्या कातडीच्या रंगाने नव्हे तर माझ्या अंगच्या गुणावगुणांमुळे ओळखला जाईन असा एक दिवस येईल अशी आशा त्यांनी प्रकट केली आणि त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात येताना आज आपण पहातो आहोत.

अस्पृश्यांना पुर्वी देवळात प्रवेश नव्हता, त्यांना बरोबर थुंकीचे मडके ठेवावे लागे किंवा काळ्या लोकांना पुर्वी हॉटेलात प्रवेश नसे, त्यांना गोर्‍या लोकांपेक्षा कितीतरी कमी पगार मिळे या गोष्टींवर आज विश्वास बसत नाही, पण हे सारे घडलेले आहे. माणूस असूनही फक्त कातडीचा रंग किंवा जात वेगळी असल्याने काही लोकांना आपण जनावरासारखे वागवले आहे; आज मात्र परिस्थिती वेगाने बदलते आहे आणि यासाठी महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, मार्टिन ल्युथर किंग, रोझा पार्क्स, नेल्सन मंडेला यांसारख्या लोकांनी दाखवलेले धाडस आणि त्यांनी उपसलेले अपार कष्टच कारणीभूत आहेत. समाजातून जातीयवाद/अस्पृश्यता यांसारख्या व्याधींचे निर्मूलन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, ती चालू राहीलच, पण समाजाच्या या अजस्त्र रेल्वेगाडीला त्या दिशेने ढकलण्यासाठी या लोकांनी जे कष्ट उपसले त्याबद्दल त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच!

दुसरी गोष्ट विकीपिडियाची. अमेरिकेतली गरीब-श्रीमंत ही दरी दूर करण्यासाठी झटणारे मार्टिन ल्युथर किंग आणि गरिबातल्या गरीब मुलालाही ज्ञानजल मिळावे यासाठी प्रयत्न करणारा विकीपिडीया हे दोन्ही सारखेच. विकीपिडिया विश्वासार्ह नाही असे अनेक जण म्हणतात, पण त्यांनी हे ध्यानात घ्यायला हवे की प्रबंध लिहिण्यासाठी लागणारी माहिती मिळवण्याचे हे स्थान नव्हे; विकीपिडिया उपयोगी पडतो, कुठल्याही गोष्टीची प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी. एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या संकल्पनेविषयी जर आपण पूर्णपणे अनभिज्ञ असाल तर तिची मूलभूत माहिती मिळवण्यासाठी विकीपिडीयासारखा स्त्रोत नाही. विकीपिडीया सगळ्यांना बदल करण्यासाठी खुला आहे; सुदैवाने ही गोष्ट त्याचा सगळ्यात मोठा सकारात्मक मुद्दा आहे आणि दुर्दैवाने त्याचा सगळ्यात मोठा दोषही. विकीपिडीयाच्या या मर्यादांचे भान ठेवून त्याचा योग्य तो वापर करणे हे शेवटी आपल्या हाती आहे. माझ्या मते 'ऑल द बेस्ट थिंग्ज इन लाईफ आर फ्री!' या प्रसिद्ध वाक्याचे विकीपिडीया हे एक उत्तम उदाहरण आहे. जगातल्या या सगळ्यात मोठ्या ज्ञानकोशास माझ्या शुभेच्छा!

Friday, January 14, 2011

पानिपतची लढाई - अडीचशे वर्षांची जखम!

आज चौदा जानेवारी २०११. पानिपताच्या लढाईला आज बरोबर अडीचशे वर्षे पूर्ण झाली. १७६१ साली आजच्या दिवशीच अहमद शहा अब्दाली आणि मराठे यांच्या प्रचंड फौजा एकमेकांना भिडल्या आणि १८व्या शतकातल्या एका मोठ्या युद्धाला सुरुवात झाली. २५० वर्षे म्हणजे पाव सहस्रक, इतका मोठा काळ होऊनही मराठी मनाला झालेली ही जखम भरली नाही, ती अजूनही ठसठसतेच आहे. पानिपताचे नाव काढल्यावर ज्याच्या ह्दयात कळ आली नाही त्याला मराठी कसे म्हणावे?

ह्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला, पण भावनिक न होता त्या कारणांचा वस्तुनिष्ठपणे ऊहापोह करणे महत्वाचे आहे. पहिले म्हणजे मराठ्यांची सेनापतीची निवड चुकली; अनुनभवी सदाशिवराव भाऊंना सेनापती करणे ही मोठी चूक मराठ्यांनी केली. ही लढाई लढताना मराठ्यांच्या साथीला कोणी नव्हते ही त्यांची आणखी एक मोठी चूक. अर्थात यासाठी इतरांना दोष देता येणार नाही. आपण जिंकून घेतलेला भाग आपलासा करणे या गोष्टीला मराठ्यांनी कधीच महत्व दिले नाही. त्यामुळेच त्यांनी जिंकलेली राज्ये कधीच मनाने त्यांच्यासोबत नव्हती. शत्रू जेव्हा बाहेरचा असतो तेव्हा आपापसातले वैर विसरून त्याच्याशी एक होऊन लढायचे असते ही गोष्ट मराठे काय, भारतातल्या इतर राज्यकर्त्यांनाही कधी समजली नाही. अर्थात इतरांचे सोडा, मराठ्यांचे काय? त्यांमधे तरी एकी होती का? हेवेदावे, एकमेकांवर कुरघोड करण्याची वृत्ती, स्वार्थीपणा या दुर्गुणांचा शिरकाव महाराज्यांच्या मृत्युनंतर मराठ्यांमधे झाला आणि पानिपत युद्धाच्यावेळीही हीच परिस्थिती कायम होती.

युद्धासाठीची लागणारी सामग्री, रसद यांचा पुरवठा योग्य रितीने चालू ठेवण्यात आलेले अपयश ही गोष्टही मराठ्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. तीच गोष्ट हेरगिरीची. याबाबतीत अब्दाली मराठ्यांच्या किती तरी पावले पुढे होता ही गोष्ट त्याकाळच्या अनेक कागदपत्रांवरून सहज स्पष्ट होते. याखेरीज, समोरासमोर, मोकळ्या पटांगणात युद्ध करण्याचा अनुभव मराठ्यांना नसणे हाही महत्वाचा मुद्दा आहेच.

या युद्धातं मराठ्यांची अपरिमित हानी झाली. 'दोन मोत्यें गळाली, सत्तावीस मोहरा हरवल्या, रुपये- खुर्दा किती गेला याची तर गणतीच नाही' हे प्रसिद्ध वाक्य या युद्धात झालेल्या हानीचे समर्थपणे वर्णन करणारे आहे. पानिपताचा धक्का इतका प्रचंड होता की 'पानिपत होणे' हा एक नविन शब्दप्रयोग या निमित्ताने मराठीत जन्मला. असे असले तरी मराठ्यांचे बलिदान वाया गेले नाही. धर्मरक्षणासाठी त्यांनी केलेल्या या युद्धामुळे भारतात पुढे पाय पसरणे मुस्लिम राज्यकर्त्यांना अवघड बनले. मराठे जर हे युद्ध जिंकले असते तर भारतात एवढ्या सहजतेने हातपाय पसरणे ब्रिटिशांनाही अवघड गेले असते हे नक्की!

पण इतिहासात जर/तर यांना अर्थ नसतो. जे घडले ते घडले हे मान्य करून त्यामधून काही शिकायचे असते. पानिपताच्या पराभवातून मराठ्यांनीच नव्हे तर देशानेही खूप काही शिकण्यासारखे आहे. दुर्दैवाने २५० वर्षे होऊनही परिस्थिती किंचितही बदललेली नाही. आजही या भारतभूचे लचके तोडण्यास अनेक शत्रू टिपलेले आहेत आणि अडीचशे वर्षांपुर्वी मराठ्यांनी केलेल्या चुका आजही भारतीय राज्यकर्ते पुन्हा करतच आहेत. या पराभवातून योग्य तो बोध घेणे आणि या चुका सुधारणे हीच अडीचशे वर्षांपुर्वी शहीद झालेल्या त्या वीरांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Tuesday, January 11, 2011

पत्र नव्हे (इंग्रजी) मित्र!

अखेर बरेच दिवस गाजावाजा होत असलेली घटना घडली आणि मुंबईचा मटा पुण्यात दाखल झाला. 'सकाळ'वर लिहिलेल्या माझ्या या लेखाच्या शेवटी व्यक्त केलेली माझी इच्छा ['दगडापेक्षा वीट मऊ' या नात्याने लोक अजूनही सकाळच घेत आहेत. त्यांच्या या नाविलाजावर काहीतरी उपाय निघो नि त्यांना सकाळसाठी एक उत्तम पर्याय लवकरात लवकर उपलब्ध होवो अशी प्रार्थना करणे एवढेच तूर्त आपल्या हाती आहे!] इतक्या लवकर फलद्रूप होईल असे मला वाटले नव्हते. मी मटा घरी ४/५ दिवस वाचतो आहे खरा, पण का कोण जाणे, आता मात्र रोगापेक्षा इलाज भयंकर असेच काहीसे मला वाटू लागले आहे!

सकाळमधे इंग्रजीचा वापर भयंकर वाढला आहे अशी मी तक्रार करत असलो तरी तो मटापेक्षा निश्चितच कमी आहे याबाबत वाद नसावा. मटा वाचताना असे वाटतच नाही की आपण एक मराठी वृत्तपत्र वाचत आहोत, असे वाटते की आपण देवनागरी लिपीत लिहिलेले एक इंग्रजी वृत्तपत्र वाचतो आहोत. म्हणजे मराठी वृत्तपत्रे लाजेकाजे का होईना मराठी शब्द वापरताना दिसतात, मटा मात्र त्या भानगडीत पडत नाही. मटामधे प्रसिद्ध झालेल्या या शीर्षकांवरून नि बातम्यांवरून याची खात्री पटावी.

***मुलांवर नजर... 'बिग बॉस'ची!

मुलांना शाळेत सोडल्यानंतर आता नोकरदार पालकांना त्यांच्याबद्दल काळजी करण्याचे कारण नाही! आपले पाल्य शाळेत पोहोचले का, शाळेतून घरी आले का, असे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टीफिकेशन डिव्हायसेस सिस्टीमची (आरएफआयडी) सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुलांना देण्यात आलेल्या आयकार्डमुळे पालकांना मोबाइलवरील मेसेजद्वारे ही सर्व माहिती प्राप्त होत आहे.***


***पुण्याच्या रस्त्यांवर एलपीजी स्फोटके!

तुम्ही रिक्षात किंवा कारमध्ये 'एलपीजी किट' बसवले आहे, त्याला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत आणि तरीही तुम्हाला 'हायड्रो टेस्ट'बद्दल काहीच माहिती नाही? मग तुम्ही नक्कीच मोठी 'रिस्क' घेताय. वाहनांमधील एलपीजी सिलिंडर कालांतराने लीक होण्याची शक्यता असते. लिकेजमुळे मोठी दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे वेळीच 'हायड्रो टेस्ट' करुन घ्या आणि निर्धास्त व्हा!***


***'मेंटल' मृत्यूप्रकरणी आंदोलनाचा इशारा

थंडीने गारठून मेंटल हॉस्पिटलमधील पेशंटचा झालेल्या मृत्यूमुळे हॉस्पिटलच्या कारभाराचा कडेलोट झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.***


*** एम्बलेम चोरणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडले

महागड्या गाड्यांचे एम्बलेम चोरले तर खूप पैसे मिळतात, असे कोणी तरी सांगितले आणि त्यावर चार शाळकरी दोस्तांनी विश्वासही ठेवला. बीएमडब्ल्यू, जग्वार, मारूती असे मोठ-मोठ्या गाड्यांचे एम्बलेमही चोरले.***

मराठी वृत्तपत्रसृष्टीचा आजपर्यंतचा इतिहास असे सांगतो की एका शहरात प्रसिद्ध असलेले वृत्तपत्र अजूनपर्यंत दुस-या शहरात आपले पाय रोवू शकलेले नाही. कोल्हापुरातला पुढारी पुण्यात फारसा चालत नाही, पुण्यातला सकाळ मुंबईकरांना पसंत पडत नाही आणि नागपुरातला तरूण भारत बाकीच्या महाराष्ट्रातले लोक हातातही धरत नाहीत. असे का घडावे याची कारणे अज्ञात आहेत. प्रत्येक वृत्तपत्र त्या त्या शहराच्या स्वभावानुसार घडलेले असल्याने ते इतर शहरांना पसंत पडत नाही असे होत असावे कदाचित. मटा हे मुंबईतून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र आहे आणि मुंबई एक अठरापगड लोकांचे शहर असल्याने तिथली दैनंदिन भाषा अर्थातच मराठी नाही. तिथली मराठी इंग्रजाळलेली असल्याने तिचे प्रतिबिंब तिथल्या वृत्तपत्रात पडणे साहजिक आहे.

एकूणच ही मुंबईची पाणीपुरी पुणेकरांना पसंत पडते का ते येत्या काही दिवसात दिसेल. पण तोपर्यंत मटामुळे मी 'माझा एक इंग्रजी मित्र आहे' असे म्हणून लोकांमधे भाव खावू शकतो हे काय कमी आहे?

Sunday, January 9, 2011

ह्या सगळ्या सुंदर मुली गेल्या कुठे?

परवा माझ्या आवडत्या महिमा चौधरीला चक्क एका केशतेलाच्या 'टेलिब्रांड' जाहिरातीत बघितले नि आश्चर्याचा मोठा धक्का बसला. एखाद्या प्रसिद्ध नटाला त्याच्या पडत्या काळात रस्त्याच्या कोप-यावर नट (नि बोल्ट) विकताना पाहिल्यावर जेवढा मोठा धक्का बसेल तेवढा! म्हणजे काय हे? ठीक आहे, नसतील मिळत कामे पण म्हणून जाहिरात? आणि तीही 'टेलिब्रांड'ची?

मनात हा विचार आला आणि मला आवडणा-या आधीच्या सगळ्या नायिकांची नावे झर्रकन डोळ्यासमोरून गेली. त्या आत्ता काय करत असतील असा विचार मनात आला आणि मन हळहळले. चित्र फारसे उत्साहवर्धक नव्हते. म्हणजे पूजा भट्ट फरशी पुसून घेते आहे आणि शमिता शेट्टी कपडे वाळत घालते आहे हे चित्र डोळ्यासमोर आलेले कोणाला आवडेल?

हिंदी चित्रपटसृष्टी रोज उगवत्या सुर्याला सलाम करते असे म्हटले जाते. इथे दर आठवड्याला एक 'सुपरस्टार' जन्म घेतो आणि पुढच्या आठवड्यात कुणीतरी त्याची जागा घेण्यास तयार असतो. अर्थात नवे 'सुपरस्टार' जन्माला येत असताना जुने विस्मरणात जावे हे ओघाने आलेच. पण का कोण जाणे, आपल्या आवडत्या अभिनेत्रींच्या बाबतीत मात्र मन हे मानायला तयार होत नाही. पूजा भट्ट कुणाला आवडो न आवडो, आपण मात्र एके काळी तिचे पंखे होतो. तिचे तो थोडेसे बोबडे बोलणे आणि बिनधास्त वागणे आपल्याला फार आवडे. 'जख्म' चित्रपटातले तिचे ते साडीतले रूप आणि ते दर्दभरे 'तुम आए तो आया मुझे याद, गलीमें आज चॉंद निकला...' गाणे आठवले की आजही ह्दयाला खड्डा पडतो. तीच गोष्ट राणी मुखर्जीची. आठवा ते गुलाम मधले 'ए... क्या बोलती तू' हे गाणे. अभिनय आणि सौंदर्य यांचा दुर्मिळ मिलाफ असलेली राणी अचानक कुठे गायब झाली? (असो, दोन वर्षांनी का होईना, ती आता परत आलीये, 'नो वन किल्ड जेसिका' मधे. {ते असो, पण हिंदी चित्रपटांना इंग्रजी नावे देण्याची ही घाणेरडी चाल कधी बंद होणार आहे?}) सौंदर्यावरून आठवले, ही नौहीद सायरसी कुठे गायब झाली? 'सुपारी'तल्या त्या गाण्यात फक्त हिच्यासाठी आम्ही उदय चोप्राला सहने केले होते हो... उदय चोप्रावरून आठवले, ती शमिता शेट्टी कुठे गेली? आणि ती किम शर्मा? (तिचे कमी कपडे पाहून माझा एक मित्र तिला कमी कपड्यातली शर्मा म्हणत असे!) तो 'मोहब्बतें' (इथे पुन्हा उदय चोप्रा आहेच) आम्ही फक्त या दोघींसाठीच (चित्रपटात शाहरूख खान असूनही) पाहिला होता! रिमी आणि रिया सेन या सेनभगिनींचे तेच. ही फटाकडी रिया गेली कुठे? आणि ती रिमी 'जॉनी गद्दार'नंतर कुठेच का दिसली नाही?

ही झाली चित्रपट अभिनेत्रींची कथा, पण यांच्याबरोबरच एका दूरदर्शन अभिनेत्रीचेही आम्ही पंखे होतो. ती म्हणजे 'मौली गांगुली'. 'कहीं किसी रोज' या मालिकेतून लोकांसमोर आलेली ही अतिशय देखणी अभिनेत्री अचानक दिसेनाशी का झाली बरे?

या नायिका कशाही असल्या तरी सुंदर होत्या, टवटवीत होत्या, रसरशीत होत्या. आजची ती कुठल्यातरी रोगाने ग्रस्त असल्यासारखी दिसणारी पांढरीफटक करिना किंवा अभिनय तर दूरच पण साधे हिंदी बोलताही न येणारी कत्रीना किंवा सगळ्या गाण्यांमधे एकाच पद्धतीने हसणारी दिपीका पाहिली की ह्या नायिका प्रकर्षाने आठवतात. पण याला काय इलाज? 'बदल हीच या जगातली एकमेव कायम गोष्ट आहे!' आणि हा नियम इथेही लागू होतो! जुने जाणार नि नविन येणार हा सृष्टीचा नियमच आहे आणि तो इथे लागू होत असलेला पाहणे एवढेच आपल्या हाती आहे.

'गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी!' असे म्हणत सुस्कारे टाकणे सोडून!