Friday, January 14, 2011

पानिपतची लढाई - अडीचशे वर्षांची जखम!

आज चौदा जानेवारी २०११. पानिपताच्या लढाईला आज बरोबर अडीचशे वर्षे पूर्ण झाली. १७६१ साली आजच्या दिवशीच अहमद शहा अब्दाली आणि मराठे यांच्या प्रचंड फौजा एकमेकांना भिडल्या आणि १८व्या शतकातल्या एका मोठ्या युद्धाला सुरुवात झाली. २५० वर्षे म्हणजे पाव सहस्रक, इतका मोठा काळ होऊनही मराठी मनाला झालेली ही जखम भरली नाही, ती अजूनही ठसठसतेच आहे. पानिपताचे नाव काढल्यावर ज्याच्या ह्दयात कळ आली नाही त्याला मराठी कसे म्हणावे?

ह्या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला, पण भावनिक न होता त्या कारणांचा वस्तुनिष्ठपणे ऊहापोह करणे महत्वाचे आहे. पहिले म्हणजे मराठ्यांची सेनापतीची निवड चुकली; अनुनभवी सदाशिवराव भाऊंना सेनापती करणे ही मोठी चूक मराठ्यांनी केली. ही लढाई लढताना मराठ्यांच्या साथीला कोणी नव्हते ही त्यांची आणखी एक मोठी चूक. अर्थात यासाठी इतरांना दोष देता येणार नाही. आपण जिंकून घेतलेला भाग आपलासा करणे या गोष्टीला मराठ्यांनी कधीच महत्व दिले नाही. त्यामुळेच त्यांनी जिंकलेली राज्ये कधीच मनाने त्यांच्यासोबत नव्हती. शत्रू जेव्हा बाहेरचा असतो तेव्हा आपापसातले वैर विसरून त्याच्याशी एक होऊन लढायचे असते ही गोष्ट मराठे काय, भारतातल्या इतर राज्यकर्त्यांनाही कधी समजली नाही. अर्थात इतरांचे सोडा, मराठ्यांचे काय? त्यांमधे तरी एकी होती का? हेवेदावे, एकमेकांवर कुरघोड करण्याची वृत्ती, स्वार्थीपणा या दुर्गुणांचा शिरकाव महाराज्यांच्या मृत्युनंतर मराठ्यांमधे झाला आणि पानिपत युद्धाच्यावेळीही हीच परिस्थिती कायम होती.

युद्धासाठीची लागणारी सामग्री, रसद यांचा पुरवठा योग्य रितीने चालू ठेवण्यात आलेले अपयश ही गोष्टही मराठ्यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. तीच गोष्ट हेरगिरीची. याबाबतीत अब्दाली मराठ्यांच्या किती तरी पावले पुढे होता ही गोष्ट त्याकाळच्या अनेक कागदपत्रांवरून सहज स्पष्ट होते. याखेरीज, समोरासमोर, मोकळ्या पटांगणात युद्ध करण्याचा अनुभव मराठ्यांना नसणे हाही महत्वाचा मुद्दा आहेच.

या युद्धातं मराठ्यांची अपरिमित हानी झाली. 'दोन मोत्यें गळाली, सत्तावीस मोहरा हरवल्या, रुपये- खुर्दा किती गेला याची तर गणतीच नाही' हे प्रसिद्ध वाक्य या युद्धात झालेल्या हानीचे समर्थपणे वर्णन करणारे आहे. पानिपताचा धक्का इतका प्रचंड होता की 'पानिपत होणे' हा एक नविन शब्दप्रयोग या निमित्ताने मराठीत जन्मला. असे असले तरी मराठ्यांचे बलिदान वाया गेले नाही. धर्मरक्षणासाठी त्यांनी केलेल्या या युद्धामुळे भारतात पुढे पाय पसरणे मुस्लिम राज्यकर्त्यांना अवघड बनले. मराठे जर हे युद्ध जिंकले असते तर भारतात एवढ्या सहजतेने हातपाय पसरणे ब्रिटिशांनाही अवघड गेले असते हे नक्की!

पण इतिहासात जर/तर यांना अर्थ नसतो. जे घडले ते घडले हे मान्य करून त्यामधून काही शिकायचे असते. पानिपताच्या पराभवातून मराठ्यांनीच नव्हे तर देशानेही खूप काही शिकण्यासारखे आहे. दुर्दैवाने २५० वर्षे होऊनही परिस्थिती किंचितही बदललेली नाही. आजही या भारतभूचे लचके तोडण्यास अनेक शत्रू टिपलेले आहेत आणि अडीचशे वर्षांपुर्वी मराठ्यांनी केलेल्या चुका आजही भारतीय राज्यकर्ते पुन्हा करतच आहेत. या पराभवातून योग्य तो बोध घेणे आणि या चुका सुधारणे हीच अडीचशे वर्षांपुर्वी शहीद झालेल्या त्या वीरांना खरी श्रद्धांजली ठरेल.

2 comments:

  1. खरं आहे आज २५० वर्षांनी देखील परिस्थिती बदललेली नाही. भाऊला स्वकीयांकडून देखील पूर्ण सहकार्य मिळाले नाही.
    पोस्ट छान झाली आहे. पानिपतच्या पराभवाची कारणमीमांसा करणार्‍या या आणखी काही पोस्ट आज वाचण्यात आल्या.

    दवबिंदू

    मन उधाण वार्‍याचे

    मराठा इतिहासाची दैनंदिनी

    ReplyDelete
  2. पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला हा आपला समज बरोबर नाही. तसा पराभव झाला असता तर अब्दालीने दिल्लीवर चाल केली असती. तसे घडले नाही. आपण त्या कारणाचा शोध घेतल्यास बरे होईल.

    ReplyDelete