Wednesday, January 19, 2011

१५ जानेवारी - एक महत्वाचा दिवस

या वर्षी १४ जानेवारीस पानिपतच्या लढाईला २५० वर्षे पूर्ण झाली आणि सगळ्यांचे लक्ष या दिवसाकडे वेधले गेले. पण त्यामुळे तिच्या पुढची अर्थात् १५ जानेवारीची तारीख महत्वाची असूनही थोडी झाकोळली गेली; या तारखेचे महत्व सगळ्यांना कळावे हेच या लेखाचे कारण. मार्टिन ल्युथर किंग आणि विकीपिडीया यांचा जन्म अशा दोन महत्वाच्या गोष्टी याच दिवशी घडलेल्या असताना त्याला विसरून कसे चालेल?

मार्टिन ल्युथर किंग हे अमेरिकेतले मोठे समाजसुधारक. लोकांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करणार्‍या आणि त्यांच्या जगात मोठे बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरलेल्या काही मोजक्या लोकांमधे त्यांचा समावेश होतो. वंशवाद आणि असमानता यांच्या विरुद्ध मार्टिन ल्युथर किंग यांनी निकराने लढा दिला आणि अमेरिकेतील काळ्या लोकांना गोर्‍यांच्या बरोबरीने स्थान मिळावे यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. गोर्‍यांपेक्षा काळे लोक कुठल्याही बाबतीत कमी नाहीत आणि गोरे लोक जगत असलेले जीवन जगण्याचा आणि ते बजावत असलेला प्रत्येक हक्क बजावण्याचा अधिकार काळ्या लोकांना आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. पण हे सगळे त्यांनी केले ते हिंसेची साथ न घेता. गोरे लोक नव्हे तर त्यांची वागणूक मला पसंत नाही असे त्यांचे म्हणणे होते आणि त्यामुळेच त्यांचा लढा काळे विरुद्ध गोरे असा नव्हे तर काळे विरुद्ध वर्णद्वेष असा लढला गेला. मी माझ्या कातडीच्या रंगाने नव्हे तर माझ्या अंगच्या गुणावगुणांमुळे ओळखला जाईन असा एक दिवस येईल अशी आशा त्यांनी प्रकट केली आणि त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात येताना आज आपण पहातो आहोत.

अस्पृश्यांना पुर्वी देवळात प्रवेश नव्हता, त्यांना बरोबर थुंकीचे मडके ठेवावे लागे किंवा काळ्या लोकांना पुर्वी हॉटेलात प्रवेश नसे, त्यांना गोर्‍या लोकांपेक्षा कितीतरी कमी पगार मिळे या गोष्टींवर आज विश्वास बसत नाही, पण हे सारे घडलेले आहे. माणूस असूनही फक्त कातडीचा रंग किंवा जात वेगळी असल्याने काही लोकांना आपण जनावरासारखे वागवले आहे; आज मात्र परिस्थिती वेगाने बदलते आहे आणि यासाठी महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, मार्टिन ल्युथर किंग, रोझा पार्क्स, नेल्सन मंडेला यांसारख्या लोकांनी दाखवलेले धाडस आणि त्यांनी उपसलेले अपार कष्टच कारणीभूत आहेत. समाजातून जातीयवाद/अस्पृश्यता यांसारख्या व्याधींचे निर्मूलन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, ती चालू राहीलच, पण समाजाच्या या अजस्त्र रेल्वेगाडीला त्या दिशेने ढकलण्यासाठी या लोकांनी जे कष्ट उपसले त्याबद्दल त्यांचे उपकार मानावे तेवढे कमीच!

दुसरी गोष्ट विकीपिडियाची. अमेरिकेतली गरीब-श्रीमंत ही दरी दूर करण्यासाठी झटणारे मार्टिन ल्युथर किंग आणि गरिबातल्या गरीब मुलालाही ज्ञानजल मिळावे यासाठी प्रयत्न करणारा विकीपिडीया हे दोन्ही सारखेच. विकीपिडिया विश्वासार्ह नाही असे अनेक जण म्हणतात, पण त्यांनी हे ध्यानात घ्यायला हवे की प्रबंध लिहिण्यासाठी लागणारी माहिती मिळवण्याचे हे स्थान नव्हे; विकीपिडिया उपयोगी पडतो, कुठल्याही गोष्टीची प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी. एखाद्या व्यक्तीविषयी, एखाद्या संकल्पनेविषयी जर आपण पूर्णपणे अनभिज्ञ असाल तर तिची मूलभूत माहिती मिळवण्यासाठी विकीपिडीयासारखा स्त्रोत नाही. विकीपिडीया सगळ्यांना बदल करण्यासाठी खुला आहे; सुदैवाने ही गोष्ट त्याचा सगळ्यात मोठा सकारात्मक मुद्दा आहे आणि दुर्दैवाने त्याचा सगळ्यात मोठा दोषही. विकीपिडीयाच्या या मर्यादांचे भान ठेवून त्याचा योग्य तो वापर करणे हे शेवटी आपल्या हाती आहे. माझ्या मते 'ऑल द बेस्ट थिंग्ज इन लाईफ आर फ्री!' या प्रसिद्ध वाक्याचे विकीपिडीया हे एक उत्तम उदाहरण आहे. जगातल्या या सगळ्यात मोठ्या ज्ञानकोशास माझ्या शुभेच्छा!

No comments:

Post a Comment