Monday, January 31, 2011

सिंहासन - एक विशेष प्रभाव न पाडू शकणारा चित्रपट

मराठी सिनेमाचा इतिहास लिहिताना ज्याला टाळून पुढे जाता येणार नाही आणि आपला एक विशिष्ठ ठसा उमटवणा-या चित्रपटांच्या यादीत ज्याचा समावेश निश्चितपणे करावा लागेल असा 'सिहासन' नुकताच पाहिला आणि प्रामाणिकपणे सांगायचे झाले, तर फारसा आवडला नाही.

ही कथा आहे दिगू टिपणीसची. दिगू एका वृत्तपत्रात काम करणारा पत्रकार आहे. सडाफटिंग असलेला दिगू एका लहानशा फ्लॅटमधे एकटाच राहतो. सकाळी उशीरा उठावे, आवरून बाहेर पडावे आणि दिवसभर इकडेतिकडे फिरून बातम्या मिळवून रात्री उशीरा घरी परतावे असा त्याचा दिनक्रम. 'सिंहासन'ची कथा केंद्रित आहे दिगूवर, पण त्याला या कथेचा नायक म्हणता येणार नाही, रुढार्थाने सिंहासनला कुणीच नायक नाही. या कथेत अनेक पात्रे आहेत, किंबहुना पात्रांची इथे अगदी जत्रा झाली आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये. असे असले तरीही या पात्रांना सांभाळणे, त्यांना खेळवणे हे दिग्दर्शकाने (जब्बार पटेल) सहज जमवले आहे आणि त्यासाठी त्याचे कौतुक करायला हवे.

मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे, मुख्यमंत्र्यांचे मेव्हणे आनंदराव, अर्थमंत्री विश्वासराव दाभाडे (आणि त्यांची तरूण देखणी सून), विदर्भातून आलेले मुख्यमंत्र्यांचे पक्षांतर्गत विरोधक - शेतकीमंत्री माणिकराव पाटील, मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देणारे आमदार रावसाहेब टोपले, कामगार पुढारी डिकास्टा, सोन्याची चोरटी आयात करणारा स्मगलर, त्याचा हस्तक, तिथेच काम करणारा एक मध्यमवर्गीय संसारी पुरुष, जगूकडे काम करणारी मोलकरीण आणि तो प्रेम करत असलेली एक मरणासन्न वेश्या अशा सगळ्या पात्रांभोवती सिंहासनची कथा फिरते.

सिंहासनची बलस्थान आहेत त्यातल्या कलाकारांचा अभिनय आणि अर्थातच् त्यातले संवाद. निळू फुले, अरूण सरनाईक, श्रीराम लागू, मधुकर तोरडमल, श्रीकांत मोघे, डॉ. मोहन आगाशे, लालन सारंग, नाना पाटेकर असे नंतर आपल्या अभिनयाने गाजलेले अनेक मोठे अभिनेते सिंहासनमधे आहेत. प्रत्येकाने आपली भूमिका अगदी चोख वठवली आहे, पण सगळ्यात भाव खाऊन जातात ते श्रीराम लागू. बोलताना जीभेवर साखर ठेवून बोलणारे पण बेरकी, कावेबाज दाभाडे लागूंनी उत्तम उभे केले आहेत. अगदी छोट्या भूमिकेमधूनही एक अभिनेता आपल्या अभिनयाची चुणूक दाखवू शकतो या गोष्टीची प्रचिती सिंहासनमधे येते; जगूचा न्हावी आणि शेवटी त्याला भेटणारा भिकारी ही याची दोन चांगली उदाहरणे.

सिंहासनमधले संवाद लिहिले आहेत विजय तेंडुलकर यांनी. चित्रपटातला प्रत्येक संवाद नेमकी हवी ती गोष्ट अचूकपणे सांगणारा आहे; संवादांची उदाहरणे देऊन मी उगीच इथे जागा वाया घालवणार नाही. संवाद हे चित्रपटाचे एक महत्वाचे अंग आहे हे गाजलेल्या प्रत्येक चित्रपटाने दाखवून दिले असूनही ही गोष्ट आजकालचे दिग्दर्शक का बरे विसरले असावेत?

पण - आणि हा पण खूप महत्वाचा आहे - एवढे सगळे असूनही सिंहासनचा प्रभाव पडत नाही. एखाद्या उमेदवाराने हरेक मतदारसंघात आघाडी मिळवावी पण शेवटी निवडणूक मात्र हरावी असे काहीसे सिंहासनमधे घडते. चित्रपटात दिगू शेवटी वेडा होतो, पण (चित्रपटात त्याच्याबरोबर फारसे वाईट असे काहीच न घडूनही) असे का व्हावे याचे कारण स्पष्ट होत नाही. धूर्त नि मुरब्बी मुख्यमंत्र्यांनी एका निनावी दूरध्वनीने एवढे अस्वस्थ का व्हावे, आपल्या बुडणा-या पत्नीला न वाचवणा-या पक्षाध्यक्षांनी या कारणाने मुख्यमंत्र्यांना का घाबरावे, मुख्यमंत्र्यांनी डिकास्टाला भेटताना, त्याने अर्थमंत्र्यांना भेटताना कुणीच कसे पाहू नये, रावसाहेब टोपलेंनी सोन्या महार नि त्याच्या मुलीला एवढे दिवसाढवळ्या मारूनही त्याचा अजिबात ब्रभा का होऊ नये या प्रश्नांची उत्तर चित्रपटात मिळत नाहीत.

सत्तासंघर्षाचे चित्रण करणारा चित्रपट मधेच गरीबांच्या जगण्यावर (उषःकाल होता होता...) भाष्य करतो आणि आपला सगळा प्रभाव गमावून बसतो. प्रसंगांमधून जमला असला तरी एक कथा म्हणून चित्रपटाचा जो अंतिम परिणाम व्हायला हवा तसा तो सिंहासनमधे होत नाही आणि इथेच तो मार खातो. चित्रपट संपल्यावर प्रेक्षकांच्या मनात रेंगाळत राहिलेला हा परिणाम खूप महत्वाचा असतो; किंबहुना तोच एखादा चित्रपट सामान्य की असामान्य हे ठरवत असतो. अनेकदा एखाद्या चित्रपटात काही संवाद चुकतात, काही प्रसंग हवा तसा परिणाम साधत नाहीत, पण त्याचा अंतिम परिणाम अनुकूल असतो आणि त्यामुळेच तो यशस्वी ठरतो; सिंहासनमधे नेमके उलटे घडते, त्यातले संवाद, प्रसंग परिणामकारक असले तरी तो एक चित्रपट म्हणून आपला प्रभाव टाकू शकत नाही.

'यू डोन्ट हॅव टू विन इच बॅटल, यू हॅव टू विन द वॉर' या वाक्याच्या नेमके विरुद्ध सिंहासनबाबत घडते. हरेक लढाई जिंकलेला हा चित्रपट शेवटी युद्ध हरतो. असे सगळे असले तरी दिग्गज कलाकारांच्या अभिनयासाठी आणि उत्कृष्ट संवादांसाठी तो एकदा पहायला हवाच!

3 comments:

 1. अप्रतिम चित्रपट आहे हा. मला तरी खुपच आवडला होता. शेवटच्या प्रसंगातलं दिगूचं वेड्यासारखं वागणं हे तर फार प्रातिनिधिक स्वरुपात दाखवलं आहे. तो सगळे प्रसंग, घडामोडी, त्या व्यक्ती या सगळ्यांना रोज जवळून बघत असतो आणि तरीही शेवटच्या धक्क्याने त्याला वेड लागायची पाळी येते तर मग सर्वसामान्य जनता जिला हे छक्केपंजे वगैरे काहीच माहित नाहीत त्यांची तर काय अवस्था होते अशा स्वरूपाचा संदेश आहे असं मला तरी वाटलं.

  शेवटच्या प्रसंगाविषयी अजून एक वाचलेलं. शेवटचा प्रसंग कसा घ्यावा याविषयी जब्बार पटेलांचं नक्की होत नव्हतं. त्यावेळी निळू फुले म्हणाले की शेवट कसा हवा याबद्दल माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. आणि फुल्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे शेवटचा प्रसंग (एकाही संवादाशिवाय) रंगवला आणि तो जब्बार पटेल आणि इतर सर्वांना प्रचंड आवडला आणि मग तो प्रसंग तसाच्या तसा स्वीकारण्याचं ठरलं.

  ReplyDelete
 2. सिंहासनला आणीबाणीचा संदर्भ होता आणि त्या संदर्भाच्या धांदोट्या झाल्याने सिनेमा आता निरर्थक वाटतो.

  ReplyDelete
 3. मला तरी सिंहासन फारच आवडलेला. जबराट म्हणेन मी. त्या काळात इतका छान चित्रण केलंय. महाराष्ट्राच राजकारण आजही असंच चालतं.

  ReplyDelete