परवा टीव्हीवर दीवार पहात होतो; जे चित्रपट कितीही वेळा पाहिले तरी अजिबात शिळे वाटत नाहीत अशा चित्रपटांमधे दीवारचा समावेश होतो. अभिनय, कथा या पातळीवर उत्कृष्ट असला तरी दीवार गाजला तो त्यातल्या संवादांमुळे. 'मेरे पास माँ है|', 'भाई, तुम साईन करोगे या नहीं?', 'आज खुश तो बहोत होगे तुम...', 'मैं आजभी फेके हुए पैसे नहीं उठाता...' अशा ह्दयाला हात घालणा-या संवादांमुळे हा चित्रपट आजही आपल्याला जवळचा वाटतो. पण आजकाल प्रदर्शित होणारे चित्रपट पाहिले तर मात्र त्यातले संवाद लोकांच्या ओठांवर अजिबात दिसत नाहीत. नव्वदीच्या दशकात किंवा त्यानंतर आलेल्या कुठल्याही चित्रपटातला एखादा गाजलेला संवाद आठवण्याचा प्रयत्न करा, येतो चटकन ओठांवर? नाही ना? का बरं झालं असावं असं?
मला वाटतं याला बरीच कारणे आहेत. एक कारण म्हणजे आज आपल्या भाषांचं दूषित झालेलं स्वरूप. इंग्रजीचं आक्रमण आज इतकं जोरात आहे की एक वाक्य तिचा आधार न घेता बोलणं अशक्य झालेलं आहे. चित्रपटांचा समाजावर परिणाम होतो की समाजाचा चित्रपटांवर हा वाद खूप जुना असला तरी हे दोन्ही एकमेकांवर हळूहळू परिणाम करत असतात हे नक्की. त्यामुळेच आजचे हिंदी चित्रपटांमधले संवाद बरेचसे इंग्रजी नि थोडेसे हिंदी असतात; असले हे धेडगुजरे संवाद काय परिणाम करणार? म्हणजे कल्पना करा, कालिया म्हणतो आहे 'गोली सिक्स और आदमी थ्री. ये तो बहुत इनजस्टिस है|' किंवा राजकुमार साहेब म्हणत आहेत 'ये नाईफ है, लगजाये तो ब्लीडिंग हो सक्ती है|' किंवा डॉन म्हणतो आहे, 'डॉनको पकडना डिफिकल्ट ही नहीं, इम्पॉसिबल हैं' तर त्याचा परिणाम होईल का? चित्रपटाचे नाव इंग्रजीत, नामावली इंग्रजीत, नटनट्यांच्या मुलाखती इंग्रजीत, चित्रपटातले बहुतांश संवाद इंग्रजीत, पुरस्कारसोहळे इंग्रजीत पण चित्रपटाची भाषा मात्र हिंदी असला विनोदी प्रकार फक्त भारतातच होऊ शकतो!
दुसरी गोष्ट म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत असलेली चांगल्या लेखकांची वानवा. पुर्वीचे हिंदी कथालेखक आणि संवादलेखक फार शिकलेले नसले तरी त्यांनी खूप वाचलेले असे. चांगले साहित्य कशाला म्हणावे, त्याची वैशिष्ट्ये काय ही माहिती त्यांना असे. खूप वाचलेले असल्याने नैसर्गिक तरीही परिणामकारक संवाद कसे लिहावेत हे ज्ञान त्यांना आपसूक मिळे. आत्ताची परिस्थिती मात्र वेगळी आहे. हिंदी चित्रपटसुष्टीत काम करत असूनही हिंदीचे ज्ञान नाही अशी परिस्थिती आज अनेकांची आहे, लेखकही याला अपवाद नाहीत. किंबहुना आजचे हिंदी चित्रपटसृष्टीतले बहुतांश लोक चित्रपटांच्या प्रेमापेक्षा आपला बाप तिथे असल्याने किंवा पैसा कमावण्यासाठी (क्वचित दोन्हीं कारणांमुळे) तिथे आहेत. इंग्रजी भाषेत शिकलेले आणि इंग्रजी भाषेतली पुस्तके वाचत मोठे झालेले हे लेखक पल्लेदार हिंदी संवाद लिहिणार तरी कसे?
तिसरी गोष्ट म्हणजे एकूणच चित्रपटांच्या दर्जाबाबत आग्रही राहण्याची आज विस्मरणात गेलेली चाल. आजचा काळ अनेकपडदा चित्रपटांचा आहे. एक चांगला चित्रपट काढण्यापेक्षा पैसा कमवण्यावर लोकांचा आज भर आहे. भारी नट/नट्या घ्याव्यात, सिनेमाची भरपूर जाहिरात करावी, तो ढीगभर चित्रपटगृहांत प्रदर्शित करावा आणि पहिल्या आठवड्यातच पैसे वसूल करून भरपूर नफाही कमवावा अशी सध्याची रीत आहे. कथेकडे लक्ष देणे, प्रसंगांना साजेसे संवाद लिहिणे, अभिनय करणे या गोष्टींकडे लक्ष द्यायला आज वेळ आहे कोणाला? यात प्रेक्षकही थोडेसे दोषी आहेत. त्यांनी जर दर्जाचा आग्रह धरला तरच या फसवणूकीला लगाम घालणे शक्य आहे.
असो, आशा करूयात की एखादा चुरचुरीत, रांगडे संवाद असलेला चित्रपट २०११ मधे प्रदर्शित होईल आणि २०५० साली त्यातले संवाद 'फेकताना' आपण 'हा चित्रपट आम्ही चित्रपटगृहांमधे पाहिला होता' अशी बढाई मारू शकू!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment