Sunday, March 21, 2010

आयपीएल - पैशांचा नंगानाच!

ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांची खेळमालिका 'आयपीएल' नुकतीच सुरु झाली. क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ, त्यात ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट हा त्याचा मसालेदार, झटपट अवतार. हा अवतार आजच्या काळाला साजेसा वेगवान नि चुरचुरीत असल्यामुळे थोड्याच वेळात लोकप्रिय झाला आहे. पाच दिवस, एक दिवस नि आता तीन तास असा क्रिकेटच्या सामन्याचा वेळ कमी कमी होत आहे. काही दिवसांनी पाच षटकांचे सामने टीव्हीवर मालिका दाखवल्या जातात तसे अर्ध्या तासात संपवले गेले तर कुणालाच आश्चर्य वाटणार नाही!

यातला विनोद क्षणभर बाजूला ठेवला तरी की क्रिकेट या खेळाला आजकाल जे बाजारू स्वरूप मिळते आहे ती नक्कीच चिंतेची बाब आहे. क्रिकेट हा आता खेळ राहिला नाही, तो एक व्यवसाय झाला आहे. क्रिकेटमुळे आताशा सगळेच कसे खूष आहेत! प्रायोजकांकडून नि क्रिकेट मंडळाकडून भरपूर पैसा मिळत असल्यामुळे खेळाडु खूष, प्रक्षेपणाचे नि इतर हक्क विकून मिळणा-या पैशाने क्रिकेटमंडळे खूष, जाहिरातींचे भरपूर पैसे मिळत असल्याने वाहिन्या खूष, खर्च होत असलेला पैसा दामदुपटीने वसूल होत असल्याने प्रायोजक खूष नि फुकट करमणूक होत असल्याने प्रेक्षक खूष, असा सगळा 'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे...' प्रकार आयपीएलमुळे दिसतो आहे. आयपीएल वर बरीच टीकाही होते, पण त्यातल्या सगळ्याच मुद्द्यांशी मी सहमत नाही. 'हॉकी वगेरे खेळांना भारतीय प्रतिसाद देत नाहीत, मग आयपीएलमागेच ते एवढे वेडे का?' असे काही जण विचारतात. मी त्यांच्या रडण्याशी सहमत नाही. कुठला खेळ आवडायचा नि कुठला नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ते आपण कसे ठरवणार? शिवाय इतर खेळात आपले खेळाडू फक्त खेळतात, कधीच जिंकत नाहीत, प्रेक्षक सामना बघणार तरी का? दुसरा मुद्दा पैसा, त्यालाही माझा आक्षेप नाही. खेळाडु, क्रिकेटमंडळे नि प्रायोजक सगळ्यांनी योग्य मार्गाने पैसा मिळवावा, त्यात गैर काय? माझा आयपीएलला मुख्य आक्षेप आहे तो म्हणजे त्यांनी क्रिकेट या खेळाला आणलेले ओंगळवाणे बाजारू स्वरुप. क्रिकेट हे एक उत्पादन असल्यासारखे ते विकण्याची जी चढाओढ चालू झाली ती क्रिकेटवर प्रेम करणार्‍या खर्‍या क्रिकेटप्रेमीला नक्कीच अस्वस्थ करणारी आहे. तुमच्याकडे क्रिकेटसाठी पुर्ण दिवस नाही, तर मग घ्या तीन तासांचा सामना. क्रिकेट तुम्हाला हवेतेवढे मसालेदार नाही, मग घ्या चिअरगर्ल्स. गृहिणी, तुमच्यासाठी आयपीएलमधे काही नाही, घ्या तुमच्यासाठी ही गायकस्पर्धा! अरे हे काय चालले आहे काय? क्रिकेटस्पर्धा असा जो आयपीएल स्वतःचा उल्लेख करते तो तरी खरा आहे का? फलंदाजी, गोलंदाजी नि क्षेत्ररक्षण अशी क्रिकेटची तीन अंगे आहेत, त्यापैकी फलंदाजी हे आयपीअलचे आवडते बाळ दिसते, त्यामुळेच तिचे इतर दोन बाळांकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. प्रेक्षक फलंदाजी बघायला येतात नि फक्त त्याचीच मजा लुटतात असे गृहीतक आयपीएलने पक्के ठरवल्यामुळे इतर दोन क्षेत्रात काही करायला त्यांनी खेळाडुंना काही वावच ठेवलेला नाही. तुफान हाणामारी करत असलेले फलंदाज नि त्यांसमोर केविलवाणे झालेले गोलंदाज असे चित्र प्रत्येक आयपीएल सामन्यात दिसते. काही दिवसांनी तर गोलंदाज पूर्णपणे कटाप करुन त्यांऐवजी चेंडू फेकणारी यंत्रे जर आयपीएल सामन्यांमधे दिसली तरी मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!

क्रिकेट हा नजाकतीने भरलेला नि हळुवारपणे खेळायचा खेळ आहे, धसमुसळेपणे खेळायला ती कुस्ती नव्हे. चेंडूवर दातओठ खात धावून जाणारे नि बॅट आडवीतिडवी फिरवून तो सटकवणारे हे खेळाडू फलंदाज आहेत की धोबी? नजाकतीने मारलेला एक देखणा फटका पाहण्यासाठी मैदानावर अख्खा दिवस घालवणारे ते क्रिकेट्प्रेमी कुठे नि ह्या षटकात अजून एकही षटकार न बसल्यामुळे नाराज होणारे क्रिकेटप्रेमी कुठे?


आयपीएल संघांचे मालक नि त्यांचे नखरे हे तर एक वेगळेच प्रकरण आहे. गुलामांना विकत घेत असल्यासारखी खेळाडू विकत घ्यायची ही पद्धत ज्याने शोधून काढली त्याच्या बुद्धीला खरोखरच सलाम केला पाहिजे. अर्थात, आपण दिलेले पैसे दामदुपटीने परत कसे मिळतील याची चिंता या संघमालकांना लागली असल्यामुळे त्यांच्या मनात या गुलामांपासून जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल याचेच विचार असतात. त्यातुन मग संघनिवडीमधे ढवळाढवळ करणे, संघाची व्युहरचना ठरवताना मधेमधे लुडबुड करणे, क्वचित अपयशी झाल्यास खेळाडूंना अपमानित करणे असे प्रकार होतात. आपले खेळाडू असे विकून नि त्यांना ह्या उद्योगपतींच्या मर्जीवर सोडून क्रिकेटमंडळ कसला आदर्श निर्माण करते आहे?


एकूणच, आयपीएल ही क्रिकेट सामन्यांची मालिका असली तरी तिथे क्रिकेटपेक्षा (पैसारुपी) चीअरगर्ल्सचा नंगानाचच जास्त दिसतो हेच खरे!

Wednesday, March 17, 2010

'ग्राउंडहॉग डे' - एक झकास विनोदी चित्रपट!

चित्रपट दोन प्रकारचे असतात, खूप गाजलेले पण आपल्याला न आवडलेले आणि खूप गाजलेले नि आपल्याला चक्क आवडलेले. आज मी दुस-या वर्गातल्या अशाच एका चित्रपटाविषयी तुम्हाला सांगणार आहे, ज्याचं नाव आहे 'ग्राउंडहॉग डे'.

'ग्राउंडहॉग दिवस' हा अमेरिकेतला एक उत्सवदिवस. सगळ्या अमेरिकेत हा दिवस दुसर्‍या फेब्रुवारीला साजरा केला जातो. हिवाळी मोसमाच्या अखेरी मोठ्या उंदरासारखा दिसणारा ग्राउंडहॉग हा प्राणी त्याच्या बिळातून बाहेर येतो नि हिवाळा संपणार की अजून सहा आठवडे चालणार याचा निर्णय देतो अशी ह्या दिवसाची पुर्वापार चालत आलेली कथा आहे. आपल्या चित्रपटाचा नायक 'फिल कॉनर्स' हा एका वृत्तवाहिनीवर हवामानतज्ञ म्हणून काम करतो आहे. आपल्या कामात हुशार असला तरी फिलचा स्वभाव तुसडा आहे. आपल्याबरोबर काम करणार्‍या लोकांशी तो अगदी तुटकपणे वागतो, विशेषतः त्याचा चालक 'लॅरी'शी. आपण कुणीतरी खास आहोत असं मानून इतर लोकांकडे पाहणार्‍या लोकांची एक जमात असते, त्या जमातीतलाच फिल आहे.

सालाबादाप्रमाणे ह्या वर्षीही फिलवर 'पंक्सटॉनी' या गावात जाउन ग्राउंडहॉग दिवसाचं वार्तांकन करायची जबाबदारी येते. ग्राउंडहॉग दिवस जरी पुर्ण अमेरिकेत साजरा होत असला तरी पंक्सटॉनी या गावात साजरा होणारा हा उत्सव अमेरिकेतला सगळ्यात जुना उत्सव आहे. तिथे हा उत्सव वर्षानुवर्षे साजरा होत आलेला आहे. हा उत्सव एवढा प्रसिद्ध आहे की जगाची अनौपचारिक हवामान राजधानी असा पंक्सटॉनीवासी आपल्या गावाचा कौतुकाने उल्लेख करतात. अर्थातच फिलला हे सारं काही पसंत नाही. हा शुद्ध फालतूपणा आहे, थिल्लरपणा आहे नि वेळ वाया घालवायचा एक बालिश प्रकार आहे असं त्याचं स्पष्ट मत आहे. पण करणार काय, तेव्हा 'आलिया भोगासी...' असं म्हणत तो लॅरी नि रिटाबरोबर आदल्या दिवशी ह्या गावात येतो. दुसर्‍या दिवशी सगळं आवरून साहेब तयार होतात नि ग्राउंडहॉग उत्सव जिथं साजरा होतो त्या मैदानावर पोहोचतात. तिथलं वातावरण अगदी उत्साहानं ओसंडणारं असतं. लोक रात्रभर गात असतात, नाचत असतात आणि थोडे थकले की शेकोटीपाशी जाऊन, ऊब घेऊन ताजेतवाने होऊन पुन्हा नाचगाण्यात सामील होत असतात. पण फिलला हे सगळं थोतांड वाटतं, तो कार्यक्रमात पोचतो नि अगदी दोन मिनिटातच आपलं वार्तांकन संपवतो. ते संपलं की त्याला ह्या गावात एक क्षणही थांबण्यात रस नसतो, रिटा नि लॅरीबरोबर तो परतीच्या प्रवासाला निघतोही. पण इथेच मोठी माशी शिंकते. जे हिमवादळ पंक्सटॉनी टाळून अल्टूना ह्या गावी धडकणार आहे असं फिलनं काल मोठ्या तोर्‍यात सांगितलेलं असतं, तेच फिलला त्याच्या परतीच्या प्रवासात गाठतं. परतीचा मार्ग बंद! आता फिलला परत पंक्सटॉनीमधे परतण्याशिवाय काही पर्यायच नसतो. त्याची खूप चरफड होते, पण करतो काय?

दुसर्‍या दिवशीचा सकाळचा सहाचा गजर लावून फिल उठतो तेव्हाच त्याला आपल्याबरोबर विचित्र काहीतरी घडतंय अशी जाणीव होते. काल त्यानं रेडिओवर जो कार्यक्रम ऐकलेला असतो तोच आज परत लागलेला असतो. 'हे चाललंय काय?' फिल स्वत:शी म्हणतो नि सगळं आवरुन खाली येतो. त्याला आदल्या दिवशी भेटलेले सगळे लोक त्याला अगदी त्याच क्रमाने भेटतात, तेच प्रसंग, सारं काही तेच ते. आपण कालचाच दिवस पुन्हा जगतोय असा संशय फिलला येतो नि जसजसा दिवस पुढे सरकतो तसतसा तो खरा होत जातो. तिसरा दिवस उजाडतो, पुन्हा तोच दिवस, दोन फेब्रुवारी अर्थात ग्राउंडहॉग डे. फिल पहिल्यांदा वैतागतो, मग चिडतो नि नंतर सारं काही लक्षात आल्यावर आपल्यावरची सगळी बंधनं झुगारून देऊन अक्षरशः बेदुंध जीवन जगतो. समाजाचे सारे नियम धाब्यावर बसवत तो मस्त दारू पितो, आपल्या दोन मित्रांबरोबर गावभर उंडारतो नि चक्क अपघात करून पोलिस स्टेशनाची हवाही खातो. मग 'नॅन्सी टेलर' या मुलीची माहिती आधी तिच्याकडूनच काढून मग पुन्हा तिला पटवणे, बँकेतली रोकड पळवून ऐश करणे असे उद्योगही करुन होतात. ह्याचं कारण म्हणजे फिलचं शरीर जरी रोज 'ग्राउंडहॉग दिवस' हा एकच दिवस जगत असलं तरी तरी फिलच्या मनातल्या आठवणी मात्र पुसल्या जात नसतात, त्यामुळे काल आपण काय केलं, कुणाशी बोललो हे त्याला पक्कं आठवत असतं. इतर मुली झाल्यावर रिटाची सगळी माहिती तिच्याकडूनच काढून तिला आपल्या प्रेमजाळ्यात ओढायचा पुरेपूर प्रयत्न फिल करतो. पण रिटा कसली त्याला बधते, त्याला आपल्याबाबतची इतकी माहिती असलेली पाहून तिला संशय येतो नि असं करण्यामागे फिलचा काही डाव आहे असं वाटून ती त्याच्या श्रीमुखात भडकावते.(अनेकवेळा, जवळपास रोजच!)

पण हे सारं किती दिवस करणार? फिल लवकरच या सगळ्या गोष्टींना कंटाळतो आणि आत्महत्येचा प्रयत्न करतो. एकदा नव्हे अनेकदा. पण त्याचं नशिब त्याची अशी सहजासहजी पाठ सोडणार नसतं. आदल्या दिवशी मेला तरीही फिल दुसर्‍या दिवशी पुन्हा त्याच्या अंथरूणात असतोच, जिवंत.


असे अनेक दिवस गेल्यावर आणि सगळं काही करून झाल्यावर मात्र फिल बदलतो, अंतर्बाह्य. त्याला जाणवतं की इतके दिवस आपण फक्त स्वत:चा विचार करत होतो, आता बस्स, आता जगायचं ते इतरांसाठी. मग त्याचं आयुष्य पालटतं. रोज पियानो शिकणं, बर्फाच्या मुर्ती करायला शिकणं असे नवे उद्योग तो हाती घेतो. जेवताना घशात काही अडकल्याने श्वास कोंडला जात असलेल्या एका माणसाला वाचवणं, तीन म्हातार्‍यांची गाडी पंक्चर झाल्यावर त्यांच्या गाडीचं चाक बदलून देणं, रोज सकाळी भेटत असलेल्या त्याच्या जुन्या वैतागवाण्या मित्राकडून विमा पॉलिसी विकत घेणं अशा अनेक चांगल्या गोष्टी तो करतो. त्या दिवशी संध्याकाळच्या ग्राउंडहॉग पार्टीत तो झक्कास पियानो वाजवून (रिटासह) सगळ्यांना पार वेडं करून टाकतो. त्यानं मदत केलेले सगळे लोक तिथे असतातच, ते त्याला धन्यवाद देतात. रिटा हे सगळं पहाते. आणि तेव्हाच फिल तिला तिच्यावर प्रेम असल्याचं सांगतो. फिलचं हे बदललेलं रूप पाहत असलेली रिटाही आता त्याला प्रतिसाद देते. ते दोघं फिलच्या रुमवर जातात नि झोपी जातात. सकाळी जेव्हा फिल जागा होतो तेव्हा तारीख असते ३ फेब्रुवारी. त्या दुष्टचक्रातून फिल एकदाचा बाहेर पडलेला असतो!


अतिशय साधी पण दमदार कथा, मुख्य कलाकारांचा अप्रतिम अभिनय नि दुय्यम कलाकारांनी त्यांना दिलेली साथ यामुळे चित्रपट प्रेक्षणीय झालाय. 'बिल मरे' ह्या नटानं फिलची भुमिका अतिशय उत्तम वठवली आहे. पहिला माणुसघाणा, घमेंडखोर ते नंतरचा शांत, सगळ्यांना मदत करणारा मितभाषी फिल हा बदल त्यानं अगदी सहज दाखवलाय. त्याचे डोळे कमालीचे बोलके आहेत आणि चेहेर्‍यावरच्या अगदी लहानशा हालचालींनी आपल्या भावना व्यक्त करायचं कसब त्याला साधलंय. 'अँडी मॅक्डोवेल'ही अभिनेत्रीही तशीच. गोड, निरागस नि प्रेमळ रिटा तिनं सहज उभी केलीय. आपली भुमिका जगणं हे हॉलीवूडपटातल्या प्रत्येक अभिनेत्याचं नि अभिनेत्रीचं वैशिष्ट्य राहिलं आहे, ह्या चित्रपटातले अभिनेतेही त्याला अपवाद नाहीत. 'अभिनेते अभिनय करत आहेत असं न वाटणं त्यालाच उत्तम अभिनय म्हणतात' हे वाक्य ह्या दोघांकडे पाहिल्यावर पटतं. दुय्यम अभिनेत्यांचीही तीच गोष्ट. मग तो फिलचा लोचट मित्र नि विमा पॉलिसी विक्रेता टेड असो, ड्रायव्हर लॅरी असो किंवा फिलच्या घरमालकीण मिसेस लँकॅस्टर असोत. आपल्या प्रत्येक चित्रपटात शाहरूख खानच वाटणार्‍या शाहरूखसारख्या अभिनेत्यांनी हे असले चित्रपट जरूर पहावेत, अभिनय म्हणजे काय हे तेव्हा त्यांना कळेल! चित्रपट चालतात ते अभिनयामुळे, भपकेबाज कपड्यांमुळे, परदेशातील चित्रीकरणामुळे किंवा कोट्यावधींच्या प्रसिद्धीमुळे नव्हे ही गोष्ट आपल्या निर्मात्यांना कधी समजणार?

उत्तम चित्रपट उत्तम असतात कारण ते नुसतं तुमचं मनोरंजनच करीत नाहीत अप्रत्यक्षरित्या तुम्हाला काही सांगतातही. 'ग्राउंडहॉग डे'ही याला अपवाद नाही. अर्थातच चित्रपटाचं तात्पर्य मी तुम्हाला सांगणार नाही, ते प्रत्येकानं आपापलं ठरवायचं असतं. आणि ते अगदी दर वेळी स्पष्ट समोर दिसेलच असं नाही, ते कधीकधी अप्रत्यक्षरित्यादेखील तुम्हाला येऊन धडकु शकतं. तेव्हा 'ग्राउंडहॉग डे'चं तात्पर्य तुम्ही काढा किंवा काढुही नका, पण एक सुंदर चित्रपट म्हणून तरी तो बघायला काय हरकत आहे?

Saturday, March 6, 2010

शिवनेरीच्या पोटातील लेणी नि आमच्या पोटातला गोळा.

आमच्या हडसर किल्ल्याच्या सहलीचा वृत्तांत तुम्ही वाचलाच. पण तो पूर्वार्ध होता, त्या प्रवासाचा रंजक नि रोचक उत्तरार्ध म्हणजेच हा लेख. एखाद्या हिंदी चित्रपटातील पहिल्या भागात काही म्हणजे काहीच घडू नये नि दुस-या भागात 'सेक्स नि व्हायोलन्स' यांची जबरदस्त आतषबाजी पाहून मेंदू बधिर होऊन जावा असेच काहीसे त्या दिवशी घडले.

हडसर किल्ल्यावरून उतरताना हातात बराच वेळ असल्याने दुसरी एखादी प्रेक्षणीय जागा पहायची हे तर आम्ही आधीच नक्की केलेले होते. तेव्हा शिवनेरी किल्ला किंवा शिवनेरी किल्ल्याच्याच पोटात असलेली लेणी हे दोन पर्यात समोर आले. त्यापैकी शिवनेरी किल्ला पाहिलेला असल्याने मी दुसरा पर्याय निवडला. अर्थात राहिलेल्या कमी वेळेत किल्ला नीट पाहून होणार नाही हेही कारण होतेच.(पण मित्रांना ते पटले नाही, त्यांना पहिलेच कारण खरे वाटले.) असो, तेव्हा लेणीच पहायचे ठरले. विचारलेल्या प्रत्येक माणसाने वेगवेगळी वाट सुचवणे हा आमच्याबाबतीत नेहमी होणारा प्रकार इथेही झालाच. एका सद्गृहस्थांच्या सल्ल्यानुसार वर किल्ल्याकडे गाडी नेत असताना मधेच वाटेत एक वयस्कर गृहस्थ दिसले, त्यांना विचारल्यावर त्यांनी 'लेण्यांसाठी शॉर्टकट तर खालून आहे' असे सांगितल्यावर पुन्हा गाडी वळवणे आले. मात्र त्यांना खालीच जायचे असल्याने ते गाडीत बसले नि एवढेच नव्हे तर आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी नि समजवून देण्यासाठी अगदी स्वतः शेवटपर्यंत आमच्याबरोबर आलेही. याखेरीज वरच्या लेण्यांमधे एक गणपतीची सुंदर मुर्ती आहे ही उपयुक्त माहितीही त्यांनी आम्हाला दिली. 'गणपती!' बास आता तर ही संधी मी मुळीच सोडणार नव्हतो. त्यांनी सांगितलेल्या जागी आम्ही गाडी लावली नि लेणी पाहण्यासाठी निघालो. आम्ही लेणी पहायला येणार नाही असे म्हणणारे अनेक वीरही आता आमच्याबरोबर निघाले. लेणी अगदी समोर दिसत होती, वर जायला जास्तीत जास्त अर्धा तास, लेणी पहायला अर्धा तास नि खाली यायला पाव तास असे सव्वा तासात सहज खाली येऊ हा आमचा होरा.

मजेची गोष्ट अशी की शिवनेरी किल्ल्याला जी तटबंदी घातलेली आहे, ती भिंत लेणी चढायच्या वाटेस अगदी आडवी छेदते नि ही भिंत उभारणा-या हुशार माणसांना ह्या गोष्टीची काहीच कल्पना नसल्याने त्यांनी तिथे फाटकाची सोय केलेली नाही. तस्मात, लेणी पहायला जाणा-यांना या भिंतीवरून उडी मारूनच आपला रस्ता शोधावा लागतो, आम्हीही तसेच केले. डोंगर जरी लांबून सोपा दिसत असला तरी तो तसा नव्हता. त्यातच आधीच एक किल्ला सर करून आल्याने आमची चढताना चांगलीच दमछाक होत होती. एक मिनीट चालले की दोन मिनीट थांबायचे असे करत आम्ही बरेचसे अंतर पार केले. थोडे पुढे गेल्यावर रस्त्याला दोन फाटे फुटले नि आम्ही पुन्हा थांबलो. पण तेवढ्यात नशिबाने ४/५ पोरांचे एक टोळके तिथे प्रकटले. ही मुले उजव्या बाजुच्या रस्त्याने येऊन डावीकडे जात होती. लेण्यांकडे जाण्याचा रस्ता कुठला असे त्यांना विचारल्यावर त्यांनी ते ज्या रस्त्याने आले होते त्याच रस्त्याकडे बोट दाखवले. त्यांचे आभार मानून आम्ही तो रस्ता पकडला.(ही एक घोडचूक होती हे आम्हाला खूप उशीरा कळले!)

रस्ता कसला पायवाटच होती ती. आणि एक विचित्र गोष्ट अशी, की सागाच्या पानांनी सगळी जमीन आच्छादली गेल्याने ही पायवाट अगदी पुसुनशी गेली होती. त्यात ही पाने असल्याने आम्हाला कुठे खोल खडडा आहे नि कुठे सपाट जमीन यांचा अंदाजही येईना. म्हणजे पुढे पाऊल टाकावे नि तो ह्या पानांनी झाकलेला खडडा असल्याने पाय भसकन आत जावा असे अनेकदा घडले. पण आता मागे फिरून चालणार नव्हते, आमचे परतीचे दोर कापले गेले होते. तेव्हा आम्ही तसेच पुढे निघालो. रस्ता आता आणखी अवघड होत होता. अशीच एक अवघड जागा आली नि 'आता बस्स, आपण काही आता पुढे येत नाही!' असे पाच पैकी तीन मर्द मराठ्यांनी जाहीर करून टाकले. मी अर्थातच त्यांच्यांमधे नव्हतो. अमरचे मत अजून बनले नव्हते तेव्हा मी त्याला माझ्या बाजूने ओढले नि 'काहीही झाले तरी आम्ही ही लेणी पाहणारच' असे मोठ्या आवेशाने जाहीर केले. तीन वीर हे आधीच थकलेले होते, त्यांच्यात आम्हाला विरोध करायचेही त्राण नसावेत. त्यामुळे आम्हाला पुढे जायची अनुमती देऊन ते तत्परतेने मागे फिरले.

अमर नि मी पुढे निघालो खरे, पण रस्ता आता आणखी अवघड बनत होता. तरीही २० किल्ल्यांचा अनुभव वापरीत आम्ही हळूहळू पुढे चाललो होतो, अमर पुढे नि मी मागे. असाच थोडासा पुढे जाऊन अमर थबकला नि तो का थबकला ते मी पाहिले तेव्हा समोरचे दृश्य भीतीदायक होते. आमच्या पुढे एक बरीचशी उभी चढण होती नि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती दगडी नव्हे तर मातीची चढण होती. दगडी नि मातीच्या चढणीतला एक मोठा फरक म्हणजे धरायला नि आधार घ्यायला खोबणी असल्याने दगडी चढण चढणे हे बरेचसे सोपे असते, मातीच्या चढणात खोबणी नसल्याने ती चढून वर जाणे हा एक अतिशय अवघड भाग असतो. पण आम्ही आता मागे हटणार नव्हतो. अमर हा आमचा आघाडीचा मावळा, कुठलीही चढण असो, कितीही अवघड मार्ग असो, तो अशा अडचणी लीलया पार करणार. पण इथे तोही क्षणभर थबकला होता. 'चल रे, सोपा तर आहे रस्ता' मी त्याला खालून ढोसले. 'अरे साल्या इथे धरायला काय नाही, जाऊ कसा वर?' तो म्हटला. खरेच, धरायला वर काहीच नव्हते. डोंगराची माती अतिशय सुटी झाली होती नि त्यामुळे साध्या रस्त्यावर चालतानाही घसरायला होत होते, ही चढण कशी चढणार? आता काय करायचे? पण अमरने तशाही परिस्थितीत मार्ग काढला. एके ठिकाणी माती थोडी उकरून तिथे आपला हात रोवून तो एका झटक्यात वर गेला. आता माझी पाळी होती.

हे प्रकरण दिसते तेवढे सोपे नव्हते हे एव्हाना मला कळले होते. जर तुम्हाला वर जायचे असेल तर काहीतरी भक्कम आधार हवा ज्यावर स्वतःला तोलून तुम्ही तुमचे शरीर वर खेचून घ्याल, पण इथे तीच तर गोची होती, धरायला माझ्याकडे काही आधारच नव्हता. पण काहीतरी करणे भागच होते, तेव्हा मी एका झाडाचे अर्धवट जमिनीबाहेर आलेले मूळ पकडले नि वर चढलो, पण हा आगीतून फुफाट्यात जाण्याचाच प्रकार होता. वर येताच मला कळाले की मी आता अर्धवट लटकलेल्या स्थितीत आलो होतो, मला वरही जाता येत नव्हते नि खालीही! मी आजूबाजूला पाहिले, मी जिचा आधार घेऊ शकतो अशी एकही जागा आजूबाजूला नव्हती आणि खाली जायचे तर खालचे काही दिसत नसल्याने तेही शक्य नव्हते. तशात, खाली जोरात उडी मारली तर बारीक मातीमुळे पाय घसरण्याचा नि मी पडण्याचा धोका होताच. काही सेकंदच गेले असतील त्या अवस्थेत, पण मला ते काही तासांसारखे वाटले. एक क्षण तर असा आला की आता आपले काही खरे नाही असा एक विचार माझ्या मनात चमकून गेला. खोटे कशाला बोला, मी प्रचंड घाबरलो! खरे तर ती काही १०० फुटी चढण नव्हती, मी जरी खाली घसरलो असतो तरी थोडे खरचटण्यापलीकडे मला काहीच झाले नसते, पण तरीही! 'अमर, मला मदत कर यार!' मी अमरला म्हटले. पण त्याचीही अडचण अशी होती की मी जिथे होतो त्या जागेपासून तो बराच वर होता नि मला हात देण्यासाठी त्याला खाली काहीश्या घसरड्या भागात यावे लागणार होते. 'अमर, यार मी मधेच अडकलोय, काहीतरी कर भिडू.' मी अमरला पुन्हा म्हटले. तेव्हा तो थोडासा खाली आला. 'साल्या मला ओढू नकोस.' त्याने म्हटले नि आपला डावा हात मला दिला. आता मला काहीतरी करणे भाग होते, मी त्याचा हात धरला आणि एके ठिकाणी पाय घट्ट रोवून त्यावर जोर दिला, नि पुढच्याच क्षणी वर पोचलो. ही अडचण आम्ही पार केली असली तरी ही फक्त सुरुवात होती. सुट्ट्या मातीने आच्छादलेल्या त्या वाटेने आम्ही पुढे निघालो, थबकत थबकत पुढे जात असताना अचानक आम्हाला आश्चर्याचा पुढचा धक्का बसला, आम्ही चालत येत असलेली ती वाट चक्क संपली होती!

आता काय करायचे? आमच्या पुढे आता हा यक्षप्रश्न होता. आजुबाजुला दाट झुडुपे, त्यांच्या काट्यांनी ओरबाडले जाणारे कपडे, मागे दिसत असलेली ती भयानक वाट नि थोड्याच वेळात अंधार पडणार आहे ही मनातली जाणीव. 'अभ्या चल रे परत जाऊ.' अमर म्हटला. पण मी त्याला तयार नव्हतो. 'एवढे कष्ट घेऊन इथपर्यंत आलो, परत जायला? नाही, काहीही झालं तरी आज लेणी पहायचीच.' मी म्हटलो. आम्ही जिथे थांबलो होतो तिथे समोरच एक मोठी दगडांची रांग आमची वाट अडवून उभी होती. आता ती पार करणे किंवा तिच्या कडेकडेने आडवे जात लेण्यांजवळ जाण्याची वाट शोधणे असे दोन पर्याय आमच्यासमोर होते. 'ठीकाय, चल मी वर जातो. तू मला मदत कर. माझ्या पायांना खाली आधार दे, मी वर जायचा प्रयत्न करतो.' अमर म्हटला. माझ्या पायांवर भार देत तो वर सरकला नि पुढे एका झाडाला पकडून वर गेला. तो वर गेला खरा, पण पुढे जायचा रस्ता तिथेही नव्हताच. आम्ही आता थकलो होतो. महत्त्वाची बाब म्हणजे आमच्याकडे पाणी नव्हते. मगाशी वर येताना त्या अवघड जागेवर वर जाता यावे म्हणून अमरने त्याच्या हातातली बाटली वर फेकली होती नि ती पुन्हा उचलायची राहूनच गेली होती. आता वेळही बराच गेला होता, घड्याळात पावणेपाच होत होते. 'ठीक आहे, पाच पर्यंत रस्ता शोधू, तो नाही सापडला तर खाली निघू. मी असा कडेकडेने जातो.' मी दुसरा पर्याय आजमावून पहायचे ठरवले.


पण इथेही अडचणी होत्याच. इथे मोठमोठे कातळ होते, नि ते अगदी तिरके (जवळपास उभेच) असल्याने त्यावरून चालणे अवघड होते. इथं गवत बरंच माजलं होतं, त्यामुळे त्यात पाय टाकावा नि तो भसकन आत जावा असे घडत होते. पण का कोण जाणे असे या कातळांच्या कडेकडेन चालत गेले तर रस्ता नक्की सापडेल असे मला वाटत होते. मधेच मी वर पाही, तेव्हा लेण्यांचा एक भाग दिसतो आहे असे वाटे, पण नीट पहाता तो एक साधा डोंगरातला दगड निघे. तरीही मी तसाच पुढे निघालो. झाडाझुडपांमुळे मी जवळजवळ दोन पायांवर खाली बसतबसतच चाललो होतो. साधारण ५० फूट असे रांगल्यावर मी थोड्याशा मोकळ्या जागेत आलो नि ब्राव्हो, उजव्या बाजूने वर जाणारी एक पायवाट मला दिसली, मला खात्री होती की ही वाट आम्हाला नक्कीच लेण्यांपर्यंत पोहोचवणार होती.


मी अमरला आवाज दिला नि त्याला त्या वाटेने यायला सांगितले. थोड्या वेळाने तो आलाच. आता या वाटेने सरळ खाली जायचे किंवा ही वाट लेण्यांकडे जाते असे मानून तिने पुढे जायचे असे दोन पर्याय आमच्यासमोर होते. अर्थातच आम्ही दुसरा पर्याय निवडला नि चालायला सुरुवात केली होती. हा रस्ताही अर्थातच सोपा नव्हता. थोडे अंतर जाताच, मगाशी दिसली होती तशीच एक चढण आम्हाला दिसली, पण यावेळी नशीब आमच्या बाजूने होते, ही चढण दगडी होती. चढण दगडी असल्याने पाय घसरण्याचा धोका नव्हता नि खाचा नि कोपर्‍यांमधे पाय ठेवून वर जाणेही खूपच सोपे होते. आम्ही ही चढण सहज पार केली नि थोडे वर येताच ज्यांच्यासाठी आम्ही एवढा खटाटोप केला होता ती लेणी आमच्या दृष्टीस पडली. आम्ही दोघांनी सुटकेचा एक निश्वास सोडला. लेणी दिसली खरी, पण ती पाहून आमची घोर निराशा झाली हेही तितकेच खरे.


एक बौद्ध स्तूप असलेला मोठा मंडप वगळता लेण्यांमधे पाहण्यासारखे काहीही नव्हते. अजिंठा नि वेरूळ नुकतेच पाहिल्यामुळे तर ही लेणी खूपच साधी वाटत होती. हे स्पष्ट होते की लेणी बनविताना ती बनविणा-या कलाकारांचा उद्देश काहीतरी भव्यदिव्य करावे असा नसून राहण्यासाठी नि त्यांना ध्यानधारणा करण्यासाठी निवारा बनवणे हाच होता. पण आम्हाला दिसत असलेली लेणी फक्त चार ते पाचच होती, नि खालून तर लेण्यांची मोठी रांग आम्हाला दिसली होती, हे प्रकरण काय होते? अमर आणि मी याचा तपास लावायचे ठरवले. मी शिवनेरी किल्ल्याच्या बाजूला तर अमर उलट्या बाजूला गेला. मी ज्या बाजूला गेलो तिथे आणखी दोन लेणी होती, अर्थात तिथेही पाहण्यासारखे काही नव्हतेच. एक पायवाट मात्र पुढे जात असलेली दिसली. त्या वाटेने मी पुढे गेलो, पण बरेच चालूनही तिथे काहीच दिसेना, तेव्हा परतलो. इकडे अमरनेही त्या बाजूला काहीच नसल्याची निराशाजनक बातमी आणली होती. तेवढ्यात रामचा फोन आला. त्याला खालून आम्ही दिसत होतो, तेव्हा त्याला आम्ही अजून लेणी कुठे आहेत असे विचारल्यावर, आमच्या डावीकडे काही अजून लेणी आहेत ही माहिती त्याने दिली. ती लेणी पहायची अमर नि माझी दोघांची तयारी होती, पण चर्चा केल्यावर तसे न करण्याचे आम्ही ठरवले. आमच्याजवळ पाणी नव्हते नि आता अंधारही पडू लागला होता. आता खाली जाण्यातच शहाणपणा होता. आल्या वाटेनेच आम्ही निघालो. खाली बसत, पायांवर चालत हळूहळू आम्ही ती वाट उतरलो. खाली आल्यावर भिंतीवरून उडी टाकल्यावर आमचे मित्र अर्ध्या वाटेतच आमची वाट पहात असलेले दिसले. त्यांना भेटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा मी गौरवकडचे पाणी घेऊन माझा कधीचा सुकलेला घसा ओला केला. राहिलेला डोंगर उतरताना आमच्या मनात संमिश्र भावना होत्या. डोंगर चढून आम्ही लेणी पाहिल्याचा आनंद होता पण तो गणपती पहायचा राहिल्याचे दु:खही होतेच. चालायचेच, सगळ्याच गोष्टी सगळ्याच वेळी जमल्या तर मग मजा काय?


जवळच्याच पुनम या सुंदर नावाच्या छानशा हॉटेलात पोटपूजा करून आम्ही पुण्याकडे प्रस्थान केले तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता, 'आज नि उद्या हा गणपती पहायचाच!'

Wednesday, March 3, 2010

हडसर किल्लेभ्रमण

कळसुबाई नि आजोबा ही आमची दोन दिवसांची महत्वकांक्षी सहल प्रत्यक्षात यायची काही चिन्हे दिसेनात, तेव्हा एक दिवसाची एखादी लहानशी किल्लेसहल करून यावी असे आम्हा सगळ्यांचे मत पडले. त्यासाठी योग्य अशा किल्ल्याचा शोध सुरू झाला, पण पुण्याच्या आजुबाजुचे सगळे किल्ले पाहून झालेले असल्याने आमच्या पुढील पर्याय काहीसे मर्यादीतच होते. होता होता हडसर किल्ल्याचे नाव ठरले. या उन्हात दुचाकीवरून जायची इच्छा नसल्याने शेवटी माझ्या टाटा इंडिगो मरिना गाडीतून जायचे ठरले.

आदल्या दिवशी आमची नेहमीप्रमाणेच ’रात्र थोडी सोंगे फार’ अशी अवस्था झाल्याने झोपायला साडेबारा वाजले होते. पण साडेचारचा गजर असूनही आम्हाला चार वाजून वीस मिनिटांनीच जाग आली हा एक चमत्कारच म्हणायला हवा, नाही का? पण ’लवकर उठलोच आहोत तर झोपू थोडा वेळ आणखी’ असे करत थोडा (म्हणजे बराच) वेळ लोळण्यात गेला. शेवटी मग उठलो, झटापट आवरले, पाण्याच्या बाटल्या नि कॅमेरा पिशवीत टाकला नि गाडीतून निघालो. साडेपाचची वेळ ठरली असली तरी आमच्या ऑफिसमधून आम्ही जुन्या पुणे मुंबई रस्त्याच्या दिशेने कूच केले तेव्हा सकाळचे सहा वाजून गेले होते.


जुन्या पुणे मुंबई रस्त्याने आम्ही निघालो. सकाळ होत होती, पण रस्त्यावरचे दिवे अजून चालू होते. ह्या पिवळ्या दिव्यांच्या प्रकाशात गाडी चालवायला मला खूप आवडते. दिव्यांचा पिवळा उबदार प्रकाश नि त्यात न्हाऊन निघालेला रस्ता. आणि अशा रस्त्यावर जर तुम्ही एकटेच असाल तर मग तर सोन्याहून पिवळेच. पुणे मुंबई रस्ता आता अतिशय उत्तम बनविण्यात आलेला आहे. ज्या रस्त्यांवर गाडी चालवण्याचा आनंद घेता येतो अशा मोजक्या रस्त्यांपैकी तो आहे. पण आम्हाला त्या रस्त्याने पुढे जाऊन चालणार नव्हते, तेव्हा नाशिकफाट्यापाशी दु:खद मनाने आम्ही त्याचा निरोप घेतला नि खेडच्या रस्त्याने पुढे निघालो. साधारण एका तासात आम्ही खेडला पोचलो. मात्र त्यानंतर चारपदरी टोल रस्ता संपला नि साधा रस्ता सुरू झाला. पुणे नि नाशिक ही महाराष्ट्रातली दोन महत्त्वाची शहरे जोडणारा हा रस्ता चांगला, प्रशस्त असायला काय हरकत आहे?

नारायणगावाजवळ हा रस्ताही आम्ही सोडला नि जुन्नरचा रस्ता पकडला. साधारण एक तासात आम्ही जुन्नर गाठले, तेथे शिवाजी पुतळ्याजवळ उजवीकडे वळून लगेचच डावीकडे वळल्यावर हडसरचा रस्ता आहे त्या दिशेने आता आमचा प्रवास सुरु झाला. आता उन अगदी मी म्हणू लागले होते. हड्सर गाव रस्त्यावरच आहे. तेथे पोचल्यावर गावात जाण्यासाठी जो रस्ता आहे त्याच्या कडेला एके ठिकाणी आम्ही आमची गाडी लावली नि पाणी वगेरे घेऊन किल्याकडे निघालो. किल्ल्याकडे निघाल्यावर उजव्या बाजुला एक लहानसे मंदिर आहे. पायवाटेने पुढे गेले की एक लहानसा ओहोळ लागतो , तोही पार केला की निलगिरीची झाडे असलेली एक लहानशी टेकडी दिसते. ती पार केली की काळ्याकभिन्न पत्थराची एक अभेद्य भिंत तुमच्या समोर येते, पण घाबरू नका, ती तुम्हाला पार करायची नाही. तिला समांतर असे तुम्ही थोडे पुढे आलात की दोन मोठ्या डोंगरांमधला किल्ल्याचा एक बुरुज तुम्हाला दिसतो. 'अरे लहानसाच तर आहे किल्ला!' असे मनाशी म्हणत तुम्ही जर त्या दोन डोंगरांमधून किल्ला सर करायचा विचार करत असाल, तर क्षणभर थांबा, किल्ल्याकडे जायचा रस्ता तो नाही. त्या दोन डोंगरांपैकी डाव्या बाजुच्या डोंगराला वळसा घालून, तो चढून वर गेल्यावर किल्ल्याची पाय-या असलेली वाट आहे. कुठल्याही किल्ल्यावर चढणे जर एवढे सोपे असते तर कुणीही सोम्यागोम्या सहज किल्यावर चढून गेला असता, हो की नाही?


मगाशी मी म्हटलो ती निलगिरीची झाडे असलेली ती टेकडी पार केल्यावर आम्ही जरा थबकलो. थोडे पाणी पिले नि संत्र्याच्या स्वादाच्या गोळ्या चघळल्या. पुन्हा निघालो तेव्हा सूर्यदेव मी म्हणू लागले होते. अगदी सोपा वाटलेला तो लहानसा डोंगर आता अवघड भासू लागला होता. पण आम्ही कसले घाबरतो, मर्द मराठे आम्ही! आम्ही शेवटी तो डोंगर सर केलाच नि वर जाऊन सावलीशी बसलो. तेथे छायाचित्रकारांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले नि हौशी लोकांनी त्यांच्यासाठी आपल्या पोझ देण्याच्या कलेचे. थोडे अंतर चालल्यावर गडावर जायच्या पाय-या सुरू होतात. त्याआधी एक भुयार दिसते. हे भुयार पुर्वी बरेच उंच असावे पण आता त्यात माती भरल्याने त्याची उंची कमी होऊन आत जाण्यासाठी साधारण ३ फुट एवढीच जागा उरलेली आहे. अमर नि रामने आत सरपटत जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते भुयार आत उजवीकडे वळल्याचे दिसले. पण आमच्याकडच्या विजेरीची शक्ती क्षीण असल्याने तिचा फारसा उपयोग होत नव्हता. तेव्हा, भुयाराचा नाद सोडून आता आम्ही पाय-यांकडे वळलो नि गडावर चढायला सुरुवात केली. गडाच्या पाय-या मजबूत नि ब-याच उंच आहेत पण उन, वारा नि पावसाच्या मा-याने त्या आता ढासळू लागलेल्या दिसतात. गडावर आलो की दोन देखणे दगडी दरवाजे दिसतात. पूर्ण दगड कोरून बनवलेले हे दगडी दरवाजे पाहून मन थक्क होते. दुसरा दरवाजा चढून उजव्या बाजूने वर आलो की गणपतीची एक जीर्णशीर्ण मुर्ती दिसते, पुर्वी हे गणपतीचे मंदिर असावे. गणपती हा एक देखणा देव, त्याचे रूप कसेही असले तरी ते मनाला लुभावतेच, ही मुर्तीही त्याला अपवाद नाही. शेकडो वर्षे उन वारा पाऊस झेलूनही बाप्पांच्या मुर्तीचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही हे विशेषच नाही का? एका लहानश्या निलगिरीच्या झाडाशी थोडेसे थबकून आम्ही गड पहायला निघालो. गडावर पाहण्यासारखे काही खास नाही. एक पाण्याचे टाके, एक मंदिर हा गडांवरच्या प्रेक्षणीय स्थळांचा लसावि इथेही आहेच. एवढेच काय, गडाला साधी तटबंदीही नाही. त्याचे कारण असे असावे की रायगड किंवा राजगडासारखा हा एक किल्ला लढाऊ किल्ला नाही; नाणेघाटातून होणारी मालवाहतूक नि तेथे होणार जकातवसुलीचे काम यावर नियंत्रण ठेवणे एवढाच ह्या किल्ल्याचा उपयोग असावा. पण गडावरून दिसणार दृश्य अतिशय देखणे आहे यात काही वादच नाही. माणिकडोह धरणाचा आडवातिडवा पसरलेला जलाशय, मधेच प्रकट होणारे काही किल्ले, डोंगर नि वर निळेशार आकाश. अशी काही दृश्ये पाहिली की किल्यांवर चढायच्या श्रमांचे सार्थक झाल्यासारखे वाटते हे नक्की!

गडप्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर आम्ही जिथून निघालो त्याच दरवाज्याशी परतलो. तिथे रामच्या आईने बनवलेल्या चविष्ठ गुळपोळ्यांचा आस्वाद घेऊन आम्ही गड उतरायला सुरूवात केली. सुर्यदेव अजूनही ऐन भरात होते, पण आत्ता गुरुत्वाकर्षाणाचे पारडे आमच्या बाजूने असल्याने त्यांचा आम्हाला फारसा त्रास झाला नाही. साधारण अर्ध्या तासात आम्ही गड उतरून खाली पोचलो. गाडीजवळ पोचलो तर तिथे काही लहान मुले आमच्या गाडीशेजारी जमून आमच्याकडे टकामका पहात असलेली दिसली. त्यांना मगाचच्याच गोळ्या वाटल्या, त्यांच्याबरोबर काही फोटो काढले नि पुन्हा पुण्याकडे प्रयाण केले. उन्हात बराच वेळ थांबल्याने गाडी प्रचंड गरम झाली होती नि त्यामुळे एखाद्या भट्टीतून चालल्यासारखे वाटत होते. पण गाडीने वेग पकडताच वारे आत शिरले नि जीवाला हायसे वाटले. घड्याळात तीन वाजत होते नि सकाळी जुन्नरच्या शिवाजी चौकातून दिसलेल्या शिवनेरीच्या पोटातल्या त्या लेणी अजून आम्हाला पहायच्या होत्या. शिवनेरीच्या त्या लेण्या आम्ही पाहिल्या की नाही, अन पाहिल्या असल्यास त्या होत्या कशा असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल, पण त्याबद्दल नंतर कधीतरी, तुर्तास इतकेच!