ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांची खेळमालिका 'आयपीएल' नुकतीच सुरु झाली. क्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ, त्यात ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट हा त्याचा मसालेदार, झटपट अवतार. हा अवतार आजच्या काळाला साजेसा वेगवान नि चुरचुरीत असल्यामुळे थोड्याच वेळात लोकप्रिय झाला आहे. पाच दिवस, एक दिवस नि आता तीन तास असा क्रिकेटच्या सामन्याचा वेळ कमी कमी होत आहे. काही दिवसांनी पाच षटकांचे सामने टीव्हीवर मालिका दाखवल्या जातात तसे अर्ध्या तासात संपवले गेले तर कुणालाच आश्चर्य वाटणार नाही!
यातला विनोद क्षणभर बाजूला ठेवला तरी की क्रिकेट या खेळाला आजकाल जे बाजारू स्वरूप मिळते आहे ती नक्कीच चिंतेची बाब आहे. क्रिकेट हा आता खेळ राहिला नाही, तो एक व्यवसाय झाला आहे. क्रिकेटमुळे आताशा सगळेच कसे खूष आहेत! प्रायोजकांकडून नि क्रिकेट मंडळाकडून भरपूर पैसा मिळत असल्यामुळे खेळाडु खूष, प्रक्षेपणाचे नि इतर हक्क विकून मिळणा-या पैशाने क्रिकेटमंडळे खूष, जाहिरातींचे भरपूर पैसे मिळत असल्याने वाहिन्या खूष, खर्च होत असलेला पैसा दामदुपटीने वसूल होत असल्याने प्रायोजक खूष नि फुकट करमणूक होत असल्याने प्रेक्षक खूष, असा सगळा 'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे...' प्रकार आयपीएलमुळे दिसतो आहे. आयपीएल वर बरीच टीकाही होते, पण त्यातल्या सगळ्याच मुद्द्यांशी मी सहमत नाही. 'हॉकी वगेरे खेळांना भारतीय प्रतिसाद देत नाहीत, मग आयपीएलमागेच ते एवढे वेडे का?' असे काही जण विचारतात. मी त्यांच्या रडण्याशी सहमत नाही. कुठला खेळ आवडायचा नि कुठला नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ते आपण कसे ठरवणार? शिवाय इतर खेळात आपले खेळाडू फक्त खेळतात, कधीच जिंकत नाहीत, प्रेक्षक सामना बघणार तरी का? दुसरा मुद्दा पैसा, त्यालाही माझा आक्षेप नाही. खेळाडु, क्रिकेटमंडळे नि प्रायोजक सगळ्यांनी योग्य मार्गाने पैसा मिळवावा, त्यात गैर काय? माझा आयपीएलला मुख्य आक्षेप आहे तो म्हणजे त्यांनी क्रिकेट या खेळाला आणलेले ओंगळवाणे बाजारू स्वरुप. क्रिकेट हे एक उत्पादन असल्यासारखे ते विकण्याची जी चढाओढ चालू झाली ती क्रिकेटवर प्रेम करणार्या खर्या क्रिकेटप्रेमीला नक्कीच अस्वस्थ करणारी आहे. तुमच्याकडे क्रिकेटसाठी पुर्ण दिवस नाही, तर मग घ्या तीन तासांचा सामना. क्रिकेट तुम्हाला हवेतेवढे मसालेदार नाही, मग घ्या चिअरगर्ल्स. गृहिणी, तुमच्यासाठी आयपीएलमधे काही नाही, घ्या तुमच्यासाठी ही गायकस्पर्धा! अरे हे काय चालले आहे काय? क्रिकेटस्पर्धा असा जो आयपीएल स्वतःचा उल्लेख करते तो तरी खरा आहे का? फलंदाजी, गोलंदाजी नि क्षेत्ररक्षण अशी क्रिकेटची तीन अंगे आहेत, त्यापैकी फलंदाजी हे आयपीअलचे आवडते बाळ दिसते, त्यामुळेच तिचे इतर दोन बाळांकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले आहे. प्रेक्षक फलंदाजी बघायला येतात नि फक्त त्याचीच मजा लुटतात असे गृहीतक आयपीएलने पक्के ठरवल्यामुळे इतर दोन क्षेत्रात काही करायला त्यांनी खेळाडुंना काही वावच ठेवलेला नाही. तुफान हाणामारी करत असलेले फलंदाज नि त्यांसमोर केविलवाणे झालेले गोलंदाज असे चित्र प्रत्येक आयपीएल सामन्यात दिसते. काही दिवसांनी तर गोलंदाज पूर्णपणे कटाप करुन त्यांऐवजी चेंडू फेकणारी यंत्रे जर आयपीएल सामन्यांमधे दिसली तरी मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही!
क्रिकेट हा नजाकतीने भरलेला नि हळुवारपणे खेळायचा खेळ आहे, धसमुसळेपणे खेळायला ती कुस्ती नव्हे. चेंडूवर दातओठ खात धावून जाणारे नि बॅट आडवीतिडवी फिरवून तो सटकवणारे हे खेळाडू फलंदाज आहेत की धोबी? नजाकतीने मारलेला एक देखणा फटका पाहण्यासाठी मैदानावर अख्खा दिवस घालवणारे ते क्रिकेट्प्रेमी कुठे नि ह्या षटकात अजून एकही षटकार न बसल्यामुळे नाराज होणारे क्रिकेटप्रेमी कुठे?
आयपीएल संघांचे मालक नि त्यांचे नखरे हे तर एक वेगळेच प्रकरण आहे. गुलामांना विकत घेत असल्यासारखी खेळाडू विकत घ्यायची ही पद्धत ज्याने शोधून काढली त्याच्या बुद्धीला खरोखरच सलाम केला पाहिजे. अर्थात, आपण दिलेले पैसे दामदुपटीने परत कसे मिळतील याची चिंता या संघमालकांना लागली असल्यामुळे त्यांच्या मनात या गुलामांपासून जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल याचेच विचार असतात. त्यातुन मग संघनिवडीमधे ढवळाढवळ करणे, संघाची व्युहरचना ठरवताना मधेमधे लुडबुड करणे, क्वचित अपयशी झाल्यास खेळाडूंना अपमानित करणे असे प्रकार होतात. आपले खेळाडू असे विकून नि त्यांना ह्या उद्योगपतींच्या मर्जीवर सोडून क्रिकेटमंडळ कसला आदर्श निर्माण करते आहे?
एकूणच, आयपीएल ही क्रिकेट सामन्यांची मालिका असली तरी तिथे क्रिकेटपेक्षा (पैसारुपी) चीअरगर्ल्सचा नंगानाचच जास्त दिसतो हेच खरे!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Ekdum Patesh...... :) Keep writing... Tu chaan lihitos... :)
ReplyDeleteDude... kya baat hai... u are becoming too serious ... good one !!!
ReplyDelete