आमच्या हडसर किल्ल्याच्या सहलीचा वृत्तांत तुम्ही वाचलाच. पण तो पूर्वार्ध होता, त्या प्रवासाचा रंजक नि रोचक उत्तरार्ध म्हणजेच हा लेख. एखाद्या हिंदी चित्रपटातील पहिल्या भागात काही म्हणजे काहीच घडू नये नि दुस-या भागात 'सेक्स नि व्हायोलन्स' यांची जबरदस्त आतषबाजी पाहून मेंदू बधिर होऊन जावा असेच काहीसे त्या दिवशी घडले.
हडसर किल्ल्यावरून उतरताना हातात बराच वेळ असल्याने दुसरी एखादी प्रेक्षणीय जागा पहायची हे तर आम्ही आधीच नक्की केलेले होते. तेव्हा शिवनेरी किल्ला किंवा शिवनेरी किल्ल्याच्याच पोटात असलेली लेणी हे दोन पर्यात समोर आले. त्यापैकी शिवनेरी किल्ला पाहिलेला असल्याने मी दुसरा पर्याय निवडला. अर्थात राहिलेल्या कमी वेळेत किल्ला नीट पाहून होणार नाही हेही कारण होतेच.(पण मित्रांना ते पटले नाही, त्यांना पहिलेच कारण खरे वाटले.) असो, तेव्हा लेणीच पहायचे ठरले. विचारलेल्या प्रत्येक माणसाने वेगवेगळी वाट सुचवणे हा आमच्याबाबतीत नेहमी होणारा प्रकार इथेही झालाच. एका सद्गृहस्थांच्या सल्ल्यानुसार वर किल्ल्याकडे गाडी नेत असताना मधेच वाटेत एक वयस्कर गृहस्थ दिसले, त्यांना विचारल्यावर त्यांनी 'लेण्यांसाठी शॉर्टकट तर खालून आहे' असे सांगितल्यावर पुन्हा गाडी वळवणे आले. मात्र त्यांना खालीच जायचे असल्याने ते गाडीत बसले नि एवढेच नव्हे तर आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी नि समजवून देण्यासाठी अगदी स्वतः शेवटपर्यंत आमच्याबरोबर आलेही. याखेरीज वरच्या लेण्यांमधे एक गणपतीची सुंदर मुर्ती आहे ही उपयुक्त माहितीही त्यांनी आम्हाला दिली. 'गणपती!' बास आता तर ही संधी मी मुळीच सोडणार नव्हतो. त्यांनी सांगितलेल्या जागी आम्ही गाडी लावली नि लेणी पाहण्यासाठी निघालो. आम्ही लेणी पहायला येणार नाही असे म्हणणारे अनेक वीरही आता आमच्याबरोबर निघाले. लेणी अगदी समोर दिसत होती, वर जायला जास्तीत जास्त अर्धा तास, लेणी पहायला अर्धा तास नि खाली यायला पाव तास असे सव्वा तासात सहज खाली येऊ हा आमचा होरा.
मजेची गोष्ट अशी की शिवनेरी किल्ल्याला जी तटबंदी घातलेली आहे, ती भिंत लेणी चढायच्या वाटेस अगदी आडवी छेदते नि ही भिंत उभारणा-या हुशार माणसांना ह्या गोष्टीची काहीच कल्पना नसल्याने त्यांनी तिथे फाटकाची सोय केलेली नाही. तस्मात, लेणी पहायला जाणा-यांना या भिंतीवरून उडी मारूनच आपला रस्ता शोधावा लागतो, आम्हीही तसेच केले. डोंगर जरी लांबून सोपा दिसत असला तरी तो तसा नव्हता. त्यातच आधीच एक किल्ला सर करून आल्याने आमची चढताना चांगलीच दमछाक होत होती. एक मिनीट चालले की दोन मिनीट थांबायचे असे करत आम्ही बरेचसे अंतर पार केले. थोडे पुढे गेल्यावर रस्त्याला दोन फाटे फुटले नि आम्ही पुन्हा थांबलो. पण तेवढ्यात नशिबाने ४/५ पोरांचे एक टोळके तिथे प्रकटले. ही मुले उजव्या बाजुच्या रस्त्याने येऊन डावीकडे जात होती. लेण्यांकडे जाण्याचा रस्ता कुठला असे त्यांना विचारल्यावर त्यांनी ते ज्या रस्त्याने आले होते त्याच रस्त्याकडे बोट दाखवले. त्यांचे आभार मानून आम्ही तो रस्ता पकडला.(ही एक घोडचूक होती हे आम्हाला खूप उशीरा कळले!)
रस्ता कसला पायवाटच होती ती. आणि एक विचित्र गोष्ट अशी, की सागाच्या पानांनी सगळी जमीन आच्छादली गेल्याने ही पायवाट अगदी पुसुनशी गेली होती. त्यात ही पाने असल्याने आम्हाला कुठे खोल खडडा आहे नि कुठे सपाट जमीन यांचा अंदाजही येईना. म्हणजे पुढे पाऊल टाकावे नि तो ह्या पानांनी झाकलेला खडडा असल्याने पाय भसकन आत जावा असे अनेकदा घडले. पण आता मागे फिरून चालणार नव्हते, आमचे परतीचे दोर कापले गेले होते. तेव्हा आम्ही तसेच पुढे निघालो. रस्ता आता आणखी अवघड होत होता. अशीच एक अवघड जागा आली नि 'आता बस्स, आपण काही आता पुढे येत नाही!' असे पाच पैकी तीन मर्द मराठ्यांनी जाहीर करून टाकले. मी अर्थातच त्यांच्यांमधे नव्हतो. अमरचे मत अजून बनले नव्हते तेव्हा मी त्याला माझ्या बाजूने ओढले नि 'काहीही झाले तरी आम्ही ही लेणी पाहणारच' असे मोठ्या आवेशाने जाहीर केले. तीन वीर हे आधीच थकलेले होते, त्यांच्यात आम्हाला विरोध करायचेही त्राण नसावेत. त्यामुळे आम्हाला पुढे जायची अनुमती देऊन ते तत्परतेने मागे फिरले.
अमर नि मी पुढे निघालो खरे, पण रस्ता आता आणखी अवघड बनत होता. तरीही २० किल्ल्यांचा अनुभव वापरीत आम्ही हळूहळू पुढे चाललो होतो, अमर पुढे नि मी मागे. असाच थोडासा पुढे जाऊन अमर थबकला नि तो का थबकला ते मी पाहिले तेव्हा समोरचे दृश्य भीतीदायक होते. आमच्या पुढे एक बरीचशी उभी चढण होती नि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती दगडी नव्हे तर मातीची चढण होती. दगडी नि मातीच्या चढणीतला एक मोठा फरक म्हणजे धरायला नि आधार घ्यायला खोबणी असल्याने दगडी चढण चढणे हे बरेचसे सोपे असते, मातीच्या चढणात खोबणी नसल्याने ती चढून वर जाणे हा एक अतिशय अवघड भाग असतो. पण आम्ही आता मागे हटणार नव्हतो. अमर हा आमचा आघाडीचा मावळा, कुठलीही चढण असो, कितीही अवघड मार्ग असो, तो अशा अडचणी लीलया पार करणार. पण इथे तोही क्षणभर थबकला होता. 'चल रे, सोपा तर आहे रस्ता' मी त्याला खालून ढोसले. 'अरे साल्या इथे धरायला काय नाही, जाऊ कसा वर?' तो म्हटला. खरेच, धरायला वर काहीच नव्हते. डोंगराची माती अतिशय सुटी झाली होती नि त्यामुळे साध्या रस्त्यावर चालतानाही घसरायला होत होते, ही चढण कशी चढणार? आता काय करायचे? पण अमरने तशाही परिस्थितीत मार्ग काढला. एके ठिकाणी माती थोडी उकरून तिथे आपला हात रोवून तो एका झटक्यात वर गेला. आता माझी पाळी होती.
हे प्रकरण दिसते तेवढे सोपे नव्हते हे एव्हाना मला कळले होते. जर तुम्हाला वर जायचे असेल तर काहीतरी भक्कम आधार हवा ज्यावर स्वतःला तोलून तुम्ही तुमचे शरीर वर खेचून घ्याल, पण इथे तीच तर गोची होती, धरायला माझ्याकडे काही आधारच नव्हता. पण काहीतरी करणे भागच होते, तेव्हा मी एका झाडाचे अर्धवट जमिनीबाहेर आलेले मूळ पकडले नि वर चढलो, पण हा आगीतून फुफाट्यात जाण्याचाच प्रकार होता. वर येताच मला कळाले की मी आता अर्धवट लटकलेल्या स्थितीत आलो होतो, मला वरही जाता येत नव्हते नि खालीही! मी आजूबाजूला पाहिले, मी जिचा आधार घेऊ शकतो अशी एकही जागा आजूबाजूला नव्हती आणि खाली जायचे तर खालचे काही दिसत नसल्याने तेही शक्य नव्हते. तशात, खाली जोरात उडी मारली तर बारीक मातीमुळे पाय घसरण्याचा नि मी पडण्याचा धोका होताच. काही सेकंदच गेले असतील त्या अवस्थेत, पण मला ते काही तासांसारखे वाटले. एक क्षण तर असा आला की आता आपले काही खरे नाही असा एक विचार माझ्या मनात चमकून गेला. खोटे कशाला बोला, मी प्रचंड घाबरलो! खरे तर ती काही १०० फुटी चढण नव्हती, मी जरी खाली घसरलो असतो तरी थोडे खरचटण्यापलीकडे मला काहीच झाले नसते, पण तरीही! 'अमर, मला मदत कर यार!' मी अमरला म्हटले. पण त्याचीही अडचण अशी होती की मी जिथे होतो त्या जागेपासून तो बराच वर होता नि मला हात देण्यासाठी त्याला खाली काहीश्या घसरड्या भागात यावे लागणार होते. 'अमर, यार मी मधेच अडकलोय, काहीतरी कर भिडू.' मी अमरला पुन्हा म्हटले. तेव्हा तो थोडासा खाली आला. 'साल्या मला ओढू नकोस.' त्याने म्हटले नि आपला डावा हात मला दिला. आता मला काहीतरी करणे भाग होते, मी त्याचा हात धरला आणि एके ठिकाणी पाय घट्ट रोवून त्यावर जोर दिला, नि पुढच्याच क्षणी वर पोचलो. ही अडचण आम्ही पार केली असली तरी ही फक्त सुरुवात होती. सुट्ट्या मातीने आच्छादलेल्या त्या वाटेने आम्ही पुढे निघालो, थबकत थबकत पुढे जात असताना अचानक आम्हाला आश्चर्याचा पुढचा धक्का बसला, आम्ही चालत येत असलेली ती वाट चक्क संपली होती!
आता काय करायचे? आमच्या पुढे आता हा यक्षप्रश्न होता. आजुबाजुला दाट झुडुपे, त्यांच्या काट्यांनी ओरबाडले जाणारे कपडे, मागे दिसत असलेली ती भयानक वाट नि थोड्याच वेळात अंधार पडणार आहे ही मनातली जाणीव. 'अभ्या चल रे परत जाऊ.' अमर म्हटला. पण मी त्याला तयार नव्हतो. 'एवढे कष्ट घेऊन इथपर्यंत आलो, परत जायला? नाही, काहीही झालं तरी आज लेणी पहायचीच.' मी म्हटलो. आम्ही जिथे थांबलो होतो तिथे समोरच एक मोठी दगडांची रांग आमची वाट अडवून उभी होती. आता ती पार करणे किंवा तिच्या कडेकडेने आडवे जात लेण्यांजवळ जाण्याची वाट शोधणे असे दोन पर्याय आमच्यासमोर होते. 'ठीकाय, चल मी वर जातो. तू मला मदत कर. माझ्या पायांना खाली आधार दे, मी वर जायचा प्रयत्न करतो.' अमर म्हटला. माझ्या पायांवर भार देत तो वर सरकला नि पुढे एका झाडाला पकडून वर गेला. तो वर गेला खरा, पण पुढे जायचा रस्ता तिथेही नव्हताच. आम्ही आता थकलो होतो. महत्त्वाची बाब म्हणजे आमच्याकडे पाणी नव्हते. मगाशी वर येताना त्या अवघड जागेवर वर जाता यावे म्हणून अमरने त्याच्या हातातली बाटली वर फेकली होती नि ती पुन्हा उचलायची राहूनच गेली होती. आता वेळही बराच गेला होता, घड्याळात पावणेपाच होत होते. 'ठीक आहे, पाच पर्यंत रस्ता शोधू, तो नाही सापडला तर खाली निघू. मी असा कडेकडेने जातो.' मी दुसरा पर्याय आजमावून पहायचे ठरवले.
पण इथेही अडचणी होत्याच. इथे मोठमोठे कातळ होते, नि ते अगदी तिरके (जवळपास उभेच) असल्याने त्यावरून चालणे अवघड होते. इथं गवत बरंच माजलं होतं, त्यामुळे त्यात पाय टाकावा नि तो भसकन आत जावा असे घडत होते. पण का कोण जाणे असे या कातळांच्या कडेकडेन चालत गेले तर रस्ता नक्की सापडेल असे मला वाटत होते. मधेच मी वर पाही, तेव्हा लेण्यांचा एक भाग दिसतो आहे असे वाटे, पण नीट पहाता तो एक साधा डोंगरातला दगड निघे. तरीही मी तसाच पुढे निघालो. झाडाझुडपांमुळे मी जवळजवळ दोन पायांवर खाली बसतबसतच चाललो होतो. साधारण ५० फूट असे रांगल्यावर मी थोड्याशा मोकळ्या जागेत आलो नि ब्राव्हो, उजव्या बाजूने वर जाणारी एक पायवाट मला दिसली, मला खात्री होती की ही वाट आम्हाला नक्कीच लेण्यांपर्यंत पोहोचवणार होती.
मी अमरला आवाज दिला नि त्याला त्या वाटेने यायला सांगितले. थोड्या वेळाने तो आलाच. आता या वाटेने सरळ खाली जायचे किंवा ही वाट लेण्यांकडे जाते असे मानून तिने पुढे जायचे असे दोन पर्याय आमच्यासमोर होते. अर्थातच आम्ही दुसरा पर्याय निवडला नि चालायला सुरुवात केली होती. हा रस्ताही अर्थातच सोपा नव्हता. थोडे अंतर जाताच, मगाशी दिसली होती तशीच एक चढण आम्हाला दिसली, पण यावेळी नशीब आमच्या बाजूने होते, ही चढण दगडी होती. चढण दगडी असल्याने पाय घसरण्याचा धोका नव्हता नि खाचा नि कोपर्यांमधे पाय ठेवून वर जाणेही खूपच सोपे होते. आम्ही ही चढण सहज पार केली नि थोडे वर येताच ज्यांच्यासाठी आम्ही एवढा खटाटोप केला होता ती लेणी आमच्या दृष्टीस पडली. आम्ही दोघांनी सुटकेचा एक निश्वास सोडला. लेणी दिसली खरी, पण ती पाहून आमची घोर निराशा झाली हेही तितकेच खरे.
एक बौद्ध स्तूप असलेला मोठा मंडप वगळता लेण्यांमधे पाहण्यासारखे काहीही नव्हते. अजिंठा नि वेरूळ नुकतेच पाहिल्यामुळे तर ही लेणी खूपच साधी वाटत होती. हे स्पष्ट होते की लेणी बनविताना ती बनविणा-या कलाकारांचा उद्देश काहीतरी भव्यदिव्य करावे असा नसून राहण्यासाठी नि त्यांना ध्यानधारणा करण्यासाठी निवारा बनवणे हाच होता. पण आम्हाला दिसत असलेली लेणी फक्त चार ते पाचच होती, नि खालून तर लेण्यांची मोठी रांग आम्हाला दिसली होती, हे प्रकरण काय होते? अमर आणि मी याचा तपास लावायचे ठरवले. मी शिवनेरी किल्ल्याच्या बाजूला तर अमर उलट्या बाजूला गेला. मी ज्या बाजूला गेलो तिथे आणखी दोन लेणी होती, अर्थात तिथेही पाहण्यासारखे काही नव्हतेच. एक पायवाट मात्र पुढे जात असलेली दिसली. त्या वाटेने मी पुढे गेलो, पण बरेच चालूनही तिथे काहीच दिसेना, तेव्हा परतलो. इकडे अमरनेही त्या बाजूला काहीच नसल्याची निराशाजनक बातमी आणली होती. तेवढ्यात रामचा फोन आला. त्याला खालून आम्ही दिसत होतो, तेव्हा त्याला आम्ही अजून लेणी कुठे आहेत असे विचारल्यावर, आमच्या डावीकडे काही अजून लेणी आहेत ही माहिती त्याने दिली. ती लेणी पहायची अमर नि माझी दोघांची तयारी होती, पण चर्चा केल्यावर तसे न करण्याचे आम्ही ठरवले. आमच्याजवळ पाणी नव्हते नि आता अंधारही पडू लागला होता. आता खाली जाण्यातच शहाणपणा होता. आल्या वाटेनेच आम्ही निघालो. खाली बसत, पायांवर चालत हळूहळू आम्ही ती वाट उतरलो. खाली आल्यावर भिंतीवरून उडी टाकल्यावर आमचे मित्र अर्ध्या वाटेतच आमची वाट पहात असलेले दिसले. त्यांना भेटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा मी गौरवकडचे पाणी घेऊन माझा कधीचा सुकलेला घसा ओला केला. राहिलेला डोंगर उतरताना आमच्या मनात संमिश्र भावना होत्या. डोंगर चढून आम्ही लेणी पाहिल्याचा आनंद होता पण तो गणपती पहायचा राहिल्याचे दु:खही होतेच. चालायचेच, सगळ्याच गोष्टी सगळ्याच वेळी जमल्या तर मग मजा काय?
जवळच्याच पुनम या सुंदर नावाच्या छानशा हॉटेलात पोटपूजा करून आम्ही पुण्याकडे प्रस्थान केले तेव्हा माझ्या मनात एकच विचार होता, 'आज नि उद्या हा गणपती पहायचाच!'
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment