Wednesday, November 30, 2011

कबूतर, जा... जा... जा...

भाग्यश्री पटवर्धन या मराठी मुलीनं (काय गोड दिसायची ती - हिमालयाची सावली बनून राहण्याचा निर्णय घेतला नसता तर खूप पुढे गेली असती पोरगी!) 'कबूतर जा जा जा' हे गाणं लोकप्रिय केल्याला आता खूप वर्षं झाली. सध्या मीही रोज हेच गाणं गातो, पण फरक एवढाच की भाग्यश्री ते गाणं प्रेमानं म्हणायची, मी ते वैतागून म्हणतो.

कारण सोप्पं आहे, ते म्हणजे आमच्या घराच्या गॅलरीत पारव्यांनी मांडलेला उच्छाद. (आता पारवे म्हणजे कबूतरं नव्हेत हे मला माहितीये, पण मनोज कुमार म्हटलं काय किंवा जॉय मुखर्जी म्हटलं काय, काही फरक पडतो का?) आमची गच्ची ही एक मॅटर्निटी वॉर्ड आहे असा या पक्षांचा समज झाला आहे आणि त्यामुळे हे सगळे रामायण घडते आहे.

खरंतर पक्षी या प्राणीप्रकाराचा मी दिवाणा आहे. [पुरावा हवा असल्यास सदर जालनिशीवर 'आमची कवडीसहल' ही पोस्ट चाणाक्ष वाचकांनी धुंडाळावी नि वाचावी.] अपवाद फक्त पारव्यांचा. त्यांचं ते घुं... घुं... असा घाणेरडा आवाज करणं, डोक्यावर परिणाम झाल्यासारखं स्वतःभोवती फिरणं आणि बसतील तिथे शिटेचा सडा टाकणं हे सगळेच प्रकार माझ्या डोक्यात जातात. आम्ही या फ्लॅटमधे रहायला आलो तेव्हा गच्चीत पारव्यांची काही पिसं आम्हाला दिसली होती, पण 'येत असतील पारवे इथे कधीतरी' असं म्हणून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे दुर्लक्षच पुढे धोकादायक ठरलं.(हे वाक्य वाचलं की आपण विमान अपघातावरचा एखादा लेख वाचतोय असं वाटतं, नै?) पहिल्या, त्यानंतर दुस-या जोडीनं आपलं बाळंतपण इथं उरकल्यावर आता चक्क तिस-या जोडीचं बाळंतपण इथे सुरू आहे. एवढंच काय, आता तर घरट्यात एक काळंबेंद्र, मरतुकडं पिल्लू दिसूही लागलं आहे. काही दिवसांपुर्वी प्लास्टिकच्या पत्र्यानी ही गच्ची आम्ही झाकली असली तरी त्याखालून घुसून पारव्यांचे हे उद्योग सुरूच आहेत. ('हम दो हमारा एक' ही घोषणा पारव्यांनी ऐकलेली दिसत नाही. का कावळ्यांची संख्या वाढते आहे असा खोटा प्रचार पारव्यांमधल्या कुठल्या संघानं चालवल्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललं आहे?)

असो, हा बालपारवा मोठा होईपर्यंत तरी आम्हाला वाट पहाणे भाग आहे. तोपर्यंत तरी सकाळ नि संध्याकाळ पारव्यांचा मारवा ऐकणे या डोकेदुखीला तरणोपाय नाही!

Saturday, November 26, 2011

हरविंदर, अण्णा, प्रसारमाध्यमे आणि कार्यकर्ते!

हरविंदर सिंग या तरूणाने वयोवृद्ध नेते शरद पवार यांना थप्पड मारल्याची घटना नुकतीच आपण पाहिली. अनेकांना या घटनेमुळे गुदगुल्या झाल्या असल्या (आणि तरीही दु:ख झाल्याचे नाटक करावे लागले असले) तरी मला मात्र हा सगळा प्रकार दु:खद आणि वेदनादायी वाटला.

सध्या देशात घडत असलेल्या प्रकाराने हरविंदर सिंग हा तरूण अस्वस्थ झाला असेल, पण ती अस्वस्थता प्रकट करण्याची त्याची त-हा नक्कीच चुकीची होती. ७५ वयाच्या एका बेसावध माणसाला ३० वर्षांचा एक तरूण मारहाण करतो यात शौर्याची गोष्ट कुठली? शरद पवारांचा, त्यांच्या गलिच्छ राजकारणाचा नि त्यांच्या एकूणच गढूळ राजकीय प्रवासाचा मी अजिबात चाहता नाही, पण त्यांना किंवा इतर मंत्र्यांना मारहाण करून हे प्रश्न सुटणार आहेत? म्हणजे ह्या मंत्र्याला टपली मारली की पेट्रोलचे भाव कमी होणार नि त्याला थप्पड मारली की साखर गडगडणार असे होत असते तर तर मीही (जिवावर उदार होऊन) दोन तीन मंत्र्यांना अगदी नक्की फटकावले असते, पण खरेच तसे होणार आहे का?

घडले ते धक्कादायक होते, पण त्यावरही कळस चढवला तो आपल्या अण्णांनी. 'एकही मारा क्या?' हे त्यांचे वाक्य ऐकून मी तर अक्षरशः दिग्मुढ झालो. आपण ज्यांना डोक्यावर बसवले ते थोर गांधीवादी अण्णा हेच का हा प्रश्न तेव्हा माझ्यासारखा करोडो भारतीयांना नक्कीच पडला असणार!

पण या घटनेने सगळ्यात मोठी चांदी झाली ती प्रसारमाध्यमांची. या घटनेनंतर त्यांची अवस्था 'आधीच मर्कट त्यात मद्य प्याला' अशी काहीशी झाली. 'अमेरिकेत एका कुत्रीला २० पिल्ले' किंवा 'चीनमधे आहे आठ फुटांचा माणूस' अशा बातम्या दाखवणा-या या वाहिन्यांना ही असली गरमागरम बातमी मिळाल्यावर तिला कुठे दाखवू नि कुठे नको असे झाले तर त्यात नवल काय? त्या थपडेची चित्रफीत तर इतक्यावेळा दाखवली गेली की आता डिजीटल तंत्रज्ञान आले आहे म्हणून बरे, नाहीतर जुन्या काळातली रिळावरची चित्रफीत एव्हाना नक्कीच झिजून गेली असती असा एक विनोदी विचार माझ्या मनात तरळून गेला. शनिवारी बारा वाजता सुरू झालेली ह्या बातमीची भट्टी आता घटनेला ६० तास झाले तरी अजूनही धडाडून पेटलेली आहे यावरूनच तिच्या 'पावर'ची कल्पना यावी!

आणि सगळ्यात शेवटी कार्यकर्ते! मला वाटते भारतातल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते न म्हणता दुष्कार्यकर्ते म्हणायला हवे. कारण त्यांची सगळी कामे जनतेला मदत करण्यासाठी नव्हे तर तिला त्रास देण्यासाठीच असतात. अशा या कार्यकर्त्यांनी राडा करण्याची ही दुर्मिळ संधी सोडली असती तर त्यांच्या नावाला बट्टा लागला नसता का? 'गोंधळ घालू नका' असे आदेश वरून आले असले तरी ते गंभीरपणे घ्यायचे नसतात हे सूज्ञ कार्यकर्ते जाणतातच. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही संधी उचलली आणि रास्ता रोकणे, दुकाने बंद पाडणे, बसेसची तोडफोड करणे, सरकारी वाहनांवर दगडफेक करणे अशा 'शांततामय' मार्गांनी आपला निषेध व्यक्त केला. अर्थात शहराच्या पहिल्या नागरिकाने स्वतः बंदचे आवाहन केले असताना ते दुर्लक्षून चालणार कसे? एका गुन्हेगारी कृत्याचा निषेध करताना स्वतः गुंडगिरी करणारे कार्यकर्ते हा विरोधाभास फक्त भारतातच दिसू शकतो!

असो, पण ह्या सगळ्या गदारोळात एका चांगल्या बातमीकडे दुर्लक्ष झाले हे मात्र खरे! कुप्रसिद्ध माओवादी नेता किशनजी पश्चिम बंगाल पोलिस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत मारला गेला. या शूरवीरांनी केलेल्या या अतुलनीय कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो.

Friday, November 11, 2011

मराठी माणूस आणि दिवाळी अंक!

तर लेखाचे कारण आहे उपक्रमवरचा http://mr.upakram.org/node/3522#comment-60990 हा प्रतिसाद आणि त्यातला वादाचा मुद्दा - 'दिवाळी अंक विकत घेऊनच वाचले जावेत की ते वाचनालयातून आणून वाचण्यास काही हरकत नसावी' हा. माझ्या मते दिवाळी अंक ही एक खास आगळीवेगळी मराठी परंपरा असल्याने ती वाचवण्याची नि वाढवण्याची जबाबदारी मराठी माणसाची आहे आणि ती टिकवण्यासाठी त्याने दिवाळी अंक आवर्जून विकत घेऊनच वाचायला हवेत.

आता 'सगळेच लोक दिवाळी अंक विकत घेण्याइतके श्रीमंत नसतात' असं काही लोक म्हणतील, मी त्यांच्याशी सहमत आहे. महागाईची आग झळाळून पेटून उठली असताना आणि ती खिशातून बाहेर आलेला पैसा बघताबघता स्वाहा करत असताना गरीब लोक दिवाळी अंक खरेदी करणार कसे? पण त्यांचा अपवाद सोडला तर सामान्य मराठी माणसाच्या घरात (दिवाळीत तरी) ब-यापैकी पैसा असतो. दिवाळी अंकाची किंमत १०० रूपयांच्या घरात असताना कमीत कमी एक दिवाळी अंक विकत घेण्यास त्यांना हरकत नसावी. ही गोष्ट मध्यमवर्गीयांची, इतर श्रीमंत लोकांनी(विशेषतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले लोक) तर कमीतकमी दोन अंक विकत घ्यायला हवेतच. दिवाळी अंकांचा आता दर्जा पुर्वीसारखा राहिलेला नाही असं काही जण म्हणतात. त्यांना मी सांगेन की अजूनही काही दिवाळी अंक आपला दर्जा टिकवून आहेत. 'मौज', 'आवाज', 'नवल' असे काही माझे (वैयक्तिक) आवडते दिवाळी अंक आहेत; थोडे शोधल्यास तुम्हाला आवडतील असे दिवाळी अंकही नक्कीच सापडतील. आजचे दिवाळी अंक चांगले नसतील, पण ते वाचून आपण हे मत बनवले तर ते जास्त योग्य ठरणार नाही का? आपण पहात असलेले झाडून सगळे चित्रपट कुठे चांगले असतात, पण तरीही आपण नव्या चित्रपटाला संधी देतोच ना? मग दिवाळी अंकांना अशी एक संधी दिली तर बिघडले कुठे? मी म्हणतो लोकांनी दिवाळी अंकांना नावे जरूर ठेवावीत, पण ते विकत आणून वाचल्यावरच.

दिवाळी अंक ही एक खास मराठी परंपरा आहे. इतर कुठल्याही भाषेत एखाद्या सणानिमित्त असे खास अंक काढले आणि वाचले जातात असे मला तरी वाटत नाही. आज अनेक कारणांनी आपले वाचन कमीकमी होत चालले आहे, अशा वेळी दिवाळी अंकाच्या निमित्ताने तरी काही चांगले वाचायला मिळत असेल तर ती संधी का दवडा? आज पुण्यासारख्या शहरात 'रा.वन' सारखा चित्रपट पहायचा झाल्यास एका कुटुंबासाठी कमीत कमी १००० रुपये खर्च होत असताना दिवाळी अंकांसाठी एक दोनशे रूपये खर्च करण्यास आढेवेढे कशाला?