हरविंदर सिंग या तरूणाने वयोवृद्ध नेते शरद पवार यांना थप्पड मारल्याची घटना नुकतीच आपण पाहिली. अनेकांना या घटनेमुळे गुदगुल्या झाल्या असल्या (आणि तरीही दु:ख झाल्याचे नाटक करावे लागले असले) तरी मला मात्र हा सगळा प्रकार दु:खद आणि वेदनादायी वाटला.
सध्या देशात घडत असलेल्या प्रकाराने हरविंदर सिंग हा तरूण अस्वस्थ झाला असेल, पण ती अस्वस्थता प्रकट करण्याची त्याची त-हा नक्कीच चुकीची होती. ७५ वयाच्या एका बेसावध माणसाला ३० वर्षांचा एक तरूण मारहाण करतो यात शौर्याची गोष्ट कुठली? शरद पवारांचा, त्यांच्या गलिच्छ राजकारणाचा नि त्यांच्या एकूणच गढूळ राजकीय प्रवासाचा मी अजिबात चाहता नाही, पण त्यांना किंवा इतर मंत्र्यांना मारहाण करून हे प्रश्न सुटणार आहेत? म्हणजे ह्या मंत्र्याला टपली मारली की पेट्रोलचे भाव कमी होणार नि त्याला थप्पड मारली की साखर गडगडणार असे होत असते तर तर मीही (जिवावर उदार होऊन) दोन तीन मंत्र्यांना अगदी नक्की फटकावले असते, पण खरेच तसे होणार आहे का?
घडले ते धक्कादायक होते, पण त्यावरही कळस चढवला तो आपल्या अण्णांनी. 'एकही मारा क्या?' हे त्यांचे वाक्य ऐकून मी तर अक्षरशः दिग्मुढ झालो. आपण ज्यांना डोक्यावर बसवले ते थोर गांधीवादी अण्णा हेच का हा प्रश्न तेव्हा माझ्यासारखा करोडो भारतीयांना नक्कीच पडला असणार!
पण या घटनेने सगळ्यात मोठी चांदी झाली ती प्रसारमाध्यमांची. या घटनेनंतर त्यांची अवस्था 'आधीच मर्कट त्यात मद्य प्याला' अशी काहीशी झाली. 'अमेरिकेत एका कुत्रीला २० पिल्ले' किंवा 'चीनमधे आहे आठ फुटांचा माणूस' अशा बातम्या दाखवणा-या या वाहिन्यांना ही असली गरमागरम बातमी मिळाल्यावर तिला कुठे दाखवू नि कुठे नको असे झाले तर त्यात नवल काय? त्या थपडेची चित्रफीत तर इतक्यावेळा दाखवली गेली की आता डिजीटल तंत्रज्ञान आले आहे म्हणून बरे, नाहीतर जुन्या काळातली रिळावरची चित्रफीत एव्हाना नक्कीच झिजून गेली असती असा एक विनोदी विचार माझ्या मनात तरळून गेला. शनिवारी बारा वाजता सुरू झालेली ह्या बातमीची भट्टी आता घटनेला ६० तास झाले तरी अजूनही धडाडून पेटलेली आहे यावरूनच तिच्या 'पावर'ची कल्पना यावी!
आणि सगळ्यात शेवटी कार्यकर्ते! मला वाटते भारतातल्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते न म्हणता दुष्कार्यकर्ते म्हणायला हवे. कारण त्यांची सगळी कामे जनतेला मदत करण्यासाठी नव्हे तर तिला त्रास देण्यासाठीच असतात. अशा या कार्यकर्त्यांनी राडा करण्याची ही दुर्मिळ संधी सोडली असती तर त्यांच्या नावाला बट्टा लागला नसता का? 'गोंधळ घालू नका' असे आदेश वरून आले असले तरी ते गंभीरपणे घ्यायचे नसतात हे सूज्ञ कार्यकर्ते जाणतातच. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही संधी उचलली आणि रास्ता रोकणे, दुकाने बंद पाडणे, बसेसची तोडफोड करणे, सरकारी वाहनांवर दगडफेक करणे अशा 'शांततामय' मार्गांनी आपला निषेध व्यक्त केला. अर्थात शहराच्या पहिल्या नागरिकाने स्वतः बंदचे आवाहन केले असताना ते दुर्लक्षून चालणार कसे? एका गुन्हेगारी कृत्याचा निषेध करताना स्वतः गुंडगिरी करणारे कार्यकर्ते हा विरोधाभास फक्त भारतातच दिसू शकतो!
असो, पण ह्या सगळ्या गदारोळात एका चांगल्या बातमीकडे दुर्लक्ष झाले हे मात्र खरे! कुप्रसिद्ध माओवादी नेता किशनजी पश्चिम बंगाल पोलिस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत मारला गेला. या शूरवीरांनी केलेल्या या अतुलनीय कामगिरीबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या दाउदचा हस्तक असलेल्या माणसाला कुठल्याही वयात आणि सावध/बेसावध कुठल्याही अवस्थेत मारणं यात काहीही वावगं नाही !!!
ReplyDeleteथपडेहून जोराचे धक्के खाण्याची वेळ रेल्वेच्या गर्दीत रोजच येते. त्याचा इश्यू करण्याचे कारण काय?
ReplyDeleteswatala ahinsawadi mhanavnare anna bolale te kharach tyana shobhat nahi..
ReplyDeleteया घटणेचे गांभिर्य कमी करण्याचे काम राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले आहे. आम. जितेंद्र आव्हाड यांनी आण्णांना थेट नथूरामची उपमा देऊन अण्णांच्या विरुध्द जणू फतवाच काढला आहे. अण्णा असोत रामदेवबाबा असोत या लोकांना हे राजकारणी इतके घाबरतात की त्यांच्याविरुध्द बोलण्याचा आणि ओढून ***ला लावण्याचा प्रकार सरसकट होतो आहे.
ReplyDeleteआणि हा सर्व प्रकार हे लोक जाणुनबुजून करतात. यांना माहीत आहे की हरविंदरने केलेला प्रकार चूकीचा आहे पण त्यामागील त्याचा उद्वेग, नैराश्य आणि त्याच्या मनातले आम. आव्हाडांच्या भाषेतले " सांगू शकत नाही आणो सहणही करू शकत नाही ... " त्याचे काय ? एकूण काय तर शरद पवारांना या असल्या रास्ता रोको , पुतळा दहणमध्ये रस नाही पण त्यांच्या नावावर निवडून येणा-यांना असे प्रकार करावे लागतात. खरा विषय महागाई, भ्रष्टाचार, कापुसदर, उसदर, गव्हाचा दर हे होते पण तो या लोकांनी अण्णांच्याकडे वळविला. मी हरविंदरचे समर्थन करत नाही पण आम्हाला लोकशाही शिकवणारे हे राजकारणी लोक मावळप्रकरण, किंवा मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना अमानुष्य मारहानीचे प्रकरण, लावासा असो किंवा जैतापूर असो याबद्दल बोलत नाहीत किंवा रस्त्यावर उतरत नाहीत. अण्णांची प्रतिक्रिया ऐकून आण्णांना आणखी मौनाची गरज आहे असे वाटते.