Saturday, June 26, 2010

रद्दीची दुकाने, शांताबाईंच्या सहीचे पुस्तक आणि मी

रद्दीची दुकाने धुंडाळण्याची सवय मला कधी लागली ते नेमके आठवत नाही, पण ती लहानपणापासून आहे हे नक्की. लहानपणी हातात पैसे फारसे नसत, कधीतरी मिळत, कुणीतरी दिले किंवा रद्दी विकली की. पुस्तके विकत घेण्यासाठी घरातून पैसे मिळत, पण ते अगदी क्वचित, खूप रडल्यावर. त्यामुळे मी जुनी पुस्तके पहाण्यासाठी रद्दीच्या दुकानांमधे जात असलो पाहिजे. मला वाटते, या सवयीसाठी अजून एक कारण आहे. जुन्या वस्तू घेण्यात नि त्या वापरण्यात काही चुकीचे आहे असे मला कधीच वाटले नाही. आजही उत्तमोत्तम वस्तू कमीत कमी भावात मिळवण्याचा माझा प्रयत्न असतो, त्यामुळेच त्या जुन्या घ्यायलाही माझी ना नसते. आजकाल असे करण्यामागे पैसे वाचवण्याबरोबर आपल्या चंगळवादामुळे पर्यावरणाची होणारी हानी किंचीत कमी करणे हाही मुद्दा असतो. असो, पण मुद्दा तो नव्हे, मुद्दा आहे रद्दीच्या दुकानांचा. रीडर्स डायजेस्ट किंवा नॅशनल जिओग्राफिक या इंग्रजी मासिकांशी माझी ओळख झाली ती दुकानांमुळेच. [रीडर्स डायजेस्ट या मासिकाने आपला दर्जा टिकवून ठेवलेला तो काळ होता. आजकाल ते फक्त जाहिराती नि उरल्यासुरल्या जागेत चित्रपटतारकांच्या मुलाखतींसारखे छटोर लेख छापणारे एक भुक्कड मासिक झाले आहे, (पुन्हा) असो!] एकदा अशाच कुणीतरी रद्दीत दिलेल्या या मासिकाच्या ऐंशी प्रती मी घरी आणल्याचे आठवते. दोन किंवा तीन रुपयांना एक अशा मिळाल्या असाव्यात, पुढे कितीतरी दिवस त्या मला वाचायला पुरल्या होत्या.

रद्दीच्या दुकानातला पुस्तकांचा गठ्ठा चिवडताना मला नेहमी वाटते की आपण जणू अडगळीच्या भरपूर वस्तू साठवलेला एखादा माळाच साफ करतो आहोत. समोर अचानक काय येईल ते काही सांगता येत नाही! माझ्या संग्रहातली अनेक पुस्तके मला या खजिन्यातूनच मिळाली आहेत. अनेकदा तर असे घडले आहे की एखाद्या लेखकाबद्दल किंवा पुस्तकाबद्दल काहीतरी वाचावे नि त्या दिवशी रद्दीतली पुस्तके शोधताना त्याच लेखकाचे एखादे किंवा नेमके तेच पुस्तक हाती यावे. ऍगाथा ख्रिस्ती/आर्थर कॉनन डॉयल/पेरी मेसन/जेम्स हॅडली चेस या लेखकांच्या कादंब-यांबरोबरच कधीतरी एडगर ऍलन पो, समरसेट मॉम अशा लेखकांची पुस्तकेही रद्दीत सापडत. मराठीत ’डोंगरीच्या तुरूंगातले आमचे एकशे एक दिवस’ हे आगरकरांचे पुस्तक, बालकवींच्या समग्र कवितांचे कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेचे पुस्तक, ’आठवणीतल्या कवितांचा’ पहिला भाग आणि पुलंचे ’खोगीरभरती’ ही पुस्तके अशीच मिळवलेली. कधीतरी एखाद्या पुस्तकाचा गठ्ठाच्या गठ्ठा पहायला मिळे, बहुधा त्या कुणा नवोदित लेखकाच्या नुकत्याच पकाशित झालेल्या पुस्तकाच्या प्रती असत. कवितासंग्रह किंवा लेखकाने लिहिलेले कुणा अपरिचित व्यक्तीचे चरित्र असे काहीतरी. पण कधीतरी दगडाच्या खाणीत हिरा दिसावा असे काहीतरी मिळे. गोनीदांचे ’रामायण’ हे रसाळ पुस्तक किंवा खुद्द शांता शेळके यांनी सही केलेले त्यांचेच ’आंधळ्याचे डोळे’ ही दोन उदाहरणे.

पुस्तके बेदरकारपणे रद्दीत देणा-या महान विभूतींविषयी माझ्या मनात नेहमीच आश्चर्याची भावना राहिलेली आहे. ज्ञानाचा सागर असलेले हे ग्रंथराज हे लोक अगदी सहज रद्दीत कसे देऊ शकतात? शांता शेळके यांनी हे पुस्तक कुणालातरी भेट म्हणून दिलेले आहे. ’चि. सौ. सुमन, चि. राजन, प्रेमपूर्वक. शान्ताबाई - ३०/३/९७’ असा मजकूर त्याच्या पहिल्या पानावर आहे.नेमके काय घडले असेल त्या दिवशी? हे जोडपे शांताबाईंना भेटायला आल्यावर प्रेमळ स्वभावाच्या शांताबाईंनी अगदी आपुलकीने त्यांची विचारपूस केली असेल, त्यांचा पाहुणचार केला असेल नि ते निघताना त्यांना आपल्याजवळचे आपले स्वतःचे एक पुस्तक भेट म्हणून दिले असेल. हे पुस्तक त्यांनी न वाचले तरी माझी काही हरकत नव्हती, पण ते शान्ताबाईंची एक आठवण म्हणून जवळ ठेवायला काय अडचण होती? असो, पण त्यांनी हे पुस्तक रद्दीत दिल्यामुळेच माझ्यासारख्या एका शान्ताबाईंच्या चाहत्याला ते मिळाले हेही तितकेच खरे नाही का?

किंबहूना, मी तर असे म्हणेन की ह्या लोकांनी अशीच पुस्तके रद्दीत देत जावी आणि आम्हा पुस्तकप्रेमींचा असाच दुवा घेत जावा!

Thursday, June 24, 2010

गुंडा - हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड!

[वि. सू. ज्या सद्गृहस्थांना नि विदुषींना चावटपणा ह्या प्रकारचे वावडे आहे किंवा आपल्या उच्चअभिरुचीबद्दल ज्यांना आत्यंतिक अभिमान आहे, त्यांनी हा लेख न वाचलेलाच उत्तम. नंतर कसलीही तक्रार चालणार नाही!]

’शोले’ हा इतका महान चित्रपट आहे की सगळ्या हिंदी चित्रपटांचे शोलेपूर्व नि शोलेपश्चात् असे वर्गीकरण करता येईल असे शेखर कपूर या दिग्दर्शकाचे एक वाक्य आहे, त्यात थोडासा बदल करून मी म्हणेन की ’गुंडा’ हा इतका महान चित्रपट आहे की सगळ्या हिंदी चित्रपटांचे "गुंडा" नि "जे ’गुंडा’ नाहीत ते" असे वर्गीकरण करता येईल! जे माझ्याशी सहमत नाहीत त्यांच्याविषयी मी एकच म्हणू शकतो, त्यांनी नक्कीच ’गुंडा’ पाहिलेला नाही!

१९९८ साली प्रदर्शित झालेल्या ’गुंडा’चे दिग्दर्शक आहेत कांती शाह. या दिग्दर्शकाने अनेक महान चित्रपट दिले आहेत, पण त्यापैकी ’गुंडा’ची सर कशालाच नाही! ’गुंडा’ हा कांती शाह यांचा ’मास्टरपीस’ आहे. ’शोले’शी मी ’गुंडा’ची तुलना करतो ती त्याच्या महानतेमुळेच नव्हे, त्यांच्यात इतर अनेक बाबींतही साम्य आहे. आपल्या नातलगांचा खलनायकाने खून केल्यामुळे चित्रपटाच्या नायकाने त्याचा घेतलेला बदला अशी ’शोले’ चित्रपटाची कथा आहे, ’गुंडा’ची कथाही साधारण अशीच. अनेक पात्रे आणि त्यांची महत्वाची किंवा बिनमहत्वाची अशी वर्गवारी करणे कठीण हा ’शोले’मधला प्रकार ’गुंडा’तही दिसतो. दोन नायक (शोलेत धर्मेंद्र नि अमिताभ तर गुंडात मिथुन नि त्याचे माकड), एक मुख्य खलनायक नि त्याचे सहकारी (शोलेत गब्बर नि त्याचे साथीदार तर गुंडात बुल्ला नि त्याची गॅंग) ही आणखी काही साम्यस्थळे.

पण गुंड बुल्ला, त्याचा भाऊ चुटिया, पोटे, इबू हटेला नि भ्रष्ट पोलिस अधिकारी काळे ह्यांना खलनायक का म्हणावे? इतर चित्रपटांमधले खलनायक हिरोला बदडतात नि प्रेक्षकांना रडवतात, पण ’गुंडा’मधले खलनायक मात्र आपले प्रत्येक वाक्य यमक जुळवून बोलतात नि आपल्या कर्णकटू शब्दांनी हिरोच्या नि प्रेक्षकांच्या कानांना त्रास होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतात. आमच्या ’गुंडा’चे हेच तर वैशिष्ट्य आहे, इथले खलनायकही कविमनाचे आहेत!
नमुन्यादाखल ही पहा काही पात्रांची ठराविक वाक्ये.

बुल्ला - मेरा नाम है बुल्ला, रखता हुं खुल्ला।(इथे ’शर्टका बटन’ हा अर्थ अभिप्रेत आहे याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी.)
पोटे - मेरा नाम है पोते, जो अपने बापकेभी नही होते।
इबू हटेला - मेरा नाम है इबू हटेला। मॉं मेरी चुडेल की बेटी, बाप मेरा सैतान का चेला। बोल खायेगा केला? (हाय!)
चुटिया - नाम है मेरा चुटिया, अच्छेअच्छोंकी खडा करता हुं मै खटिया।

चित्रपटाची कथा सुरू होते विमानतळावर. एक ’कफनचोर’ नेता गुंड ’लंबू आटा’ला आपला प्रतिस्पर्धी ’बाचुभाई भिगोना’चा खून करण्याची सुपारी देतो. का? कारण गुंड बुल्लाला आपली सुपारी त्या नेत्याने दिल्याची पक्की खबर त्याच्याकडे असते. पण हुशार लंबू आटा त्यापुढे एक वेगळीच योजना ठेवतो. बाचुभाई बरोबर बुल्लाचाही खातमा करायची. पण अट एकच, या नेत्याने पोलिसांना सांभाळावे, त्यांना मधे येऊन राडा करू देऊ नये. मग काय? योजनेचा प्रारंभ करत लंबू आटा सगळ्यात पहिल्यांदा बुल्लाच्या बहिणीला आडवे करतो.(अक्षरश: आडवे - फारच ह्दयद्रावक प्रसंग आहे हा!) अर्थात्, आपल्या बहिणीचा खुनाचा बदला घेणार नाही तो बुल्ला कसला? तो लंबू आटाला अगदी सहज लंबा करतो [बुल्ला मारत असताना लंबू आटाने जो अभिनय केला आहे तो अफलातून आहे, त्याला तोड नाही, या अभिनेत्याला ’जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात यावे अशी शिफारस मी करतो!] नि गुन्हेगारीविश्वाचा अनभिषिक्त सम्राट बनतो. नंतर बाचुभाई भिगोना पुन्हा त्याला आपल्या मूळ सुपारीची आठवण करुन देताच बुल्ला जागा होतो नि त्या नेत्याच्या मागे लागतो. बुल्लाचा हस्तक त्याला मारतो खरा, पण आपला हिरो शंकर (मिथुन) त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देतो नि ईथेच चित्रपटाला ख-या अर्थाने सुरूवात होते. [वाचकांनी कृपया नोंद घ्यावी - कुठल्याही चांगल्या चित्रपटसमीक्षेत हे वाक्य असायलाच हवे.]

या नंतर चित्रपटात मुडदे असे पडतात, पोटेंच्याच शब्दांत सांगायचे झाले तर "जैसे नन्हेमुन्ने बच्चेकी नुन्नीसे पिशाबकी बुंदे!" इथून चित्रपट वेग पकडतो नि मग पुढे दोन तास प्रेक्षक अगदी जागेवर खिळून राहतात. [हे वाक्यही.] पुढे अनेक घटना घडतात, जसे की शंकरने गोदीमधे गुंडाचा फक्त हात पिरगाळून त्याच्याविरुद्धची लढत जिंकणे, लंडनहून आणलेल्या गोळ्या खाऊन चुटियाने(हो, हे पात्र थोडेसे ’तसले’ आहे) मिथुनच्या बहिणीची अब्रू लुटणे, मिथुनने ४/५ सरकारी गाड्या नि ७/८ मोटारसायकल स्वार यांच्या संरक्षणात असलेल्या भ्रष्ट नेत्याला सगळ्यांसमोर खत्म करणे, शेवटी शेकडो रिक्षावाल्यांसह बुल्लाने मिथुन वर मशीनगनने हल्ला करणे पण तरीही मिथुन त्यातून वाचणे! पण त्यांचे रसभरीत वर्णन करून मी प्रेक्षकांचा रसभंग करणार नाही, ह्या सगळ्या गोष्टींची मजा पडद्यावरच घ्यायला हवी.

मिथुनला म्हातारा म्हणून हिणवणा-या सा-यांना मिथुनने या चित्रपटाद्वारे अगदी सणसणीत चपराक दिली आहे. त्याला गुंडांना मारताना किंवा नायिकेबरोबर थिरकताना पहावे, डोळे अगदी निवतात. मी तर असे म्हणेन की ह्रितीकने गुंडा पहावा, त्याला मिथूनकडून बरेच शिकण्यासारखे आहे.

’गुंडा’ची निर्मितीमुल्ये सामान्य आहेत अशी तक्रार काहीजण करतील, करूदेत बापडे! त्यांना आमचे एकच म्हणणे आहे, उत्तम निर्मितीमुल्ये हवी असतील तर त्यांनी जेम्स कॅमेरूनचा ’अवतार’ किंवा ’टायटॅनिक’ किंवा अगदीच परवडेत नसेल तर संजय लीला भन्सालीचा ’देवदास’ बघावा. ज्यांना चित्रपटात निर्मितीमुल्ये (नि फक्त निर्मितीमुल्येच) महत्वाची वाटतात त्यांनी ’गुंडा’च्या वाटेला जाऊच नये. ’गुंडा’ अद्वितीय ठरला आहे तो त्यामधल्या अविस्मरणीय अभिनयाने, ह्दयाला हात घालणा-या संवादांमुळे नि अप्रतिम दिग्दर्शनामुळे! पैशांचा ओंगळवाणा चकचकाट दिसायला तो काही ’काईटस्’ नव्हे, तो ’गुंडा’ आहे, ’गुंडा’!

यापुढेही जाऊन आम्ही असे म्हणू की गुंडा हिंदी चित्रपटसृष्टीतला एक मैलाचा दगड आहे!

Friday, June 18, 2010

दिवाकरांच्या नाट्यछटा - ३ (’शिवी कोणा देऊ नये’)

पहिल्या दोन नाट्यछटा वाचून जर ’दिवाकर हे एक गंभीरप्रवृत्तीचे गृहस्थ होते आणि त्यामुळे फक्त जगण्यातले दु:ख दाखवणा-या नि शोकांतिका प्रवृत्तीच्या नाट्यछटाच त्यांनी लिहिल्या’ असा समज जर वाचकांनी करून घेतला असेल तर तो चुकीचा होय. खेळकरपणा, विनोद यांचे दिवाकरांना वावडे नव्हते, किंबहुना, विरोधाभास व्यक्त करण्यासाठी विनोदाएवढे मोठे साधन नाही ही जाणीव त्यांना होती. त्यामुळे जगातला अप्पलपोटेपणा, लबाडपणा, ढोंगीपणा दाखवण्यासाठी दिवाकरांनी अनेकदा विनोदाचा सहारा घेतलेला दिसतो, प्रस्तुत नाट्यछटेतही त्यांनी हेच केले आहे.

ही नाट्यछटा बेतलेली आहे एका मास्तरांवर. मास्तरांचे कसलेच वर्णन यात आलेले नाही, पण तरीही नाट्यछटा वाचल्यावर मास्तरांची तंतोतंत आकृती आपल्यासमोर उभी राहते, दिवाकरांचे हे केवढे मोठे यश आहे! फक्त संवादांतून व्यक्तिरेखा उभी करणे ही खरोखरच अवघड गोष्ट, पण दिवाकरांना हे कसब अगदी सहज जमलेले आहे. (दिवाकर स्वत: शिक्षक असल्याचा फायदा त्यांना ईथे झाला असेल काय?)

तर हे आहेत एक मास्तर, मुलांना ’शिवी कोणा देऊ नये’ ही कविता शिकवीत असलेले. पण ’लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण’ या शिक्षकी वृत्तीला जागून ते ही कविता शिकवता शिकवता स्वत:च मुलांना शिव्या देत आहेत. ’कुत्रा, गुलाम, रेडा, म्हारडा, टोणा, इरसाल, कोंबडीचा’ - कुठली म्हणून शिवी मास्तर सोडत नाहीत. आता मुलांना शिव्या देणे चुकीचे, पण निदान ही कविता शिकवताना तरी त्या देऊ नयेत हे भान मास्तरांना असायले हवे, पण एवढे जर कळत असते तर ते मास्तर थोडेच झाले असते? नाट्यछटा लिहिता लिहिता वाचकालाच टप्पल मारण्याचे काम या छटेतही दिवाकरांनी केले आहे. त्यामुळेच छटा वाचून झाल्यावर आपण क्षणभर थबकतो नि मनाशी विचार करतो, ’आपण या मास्तरांवर हसतो आहोत खरे, पण आपण स्वत: अजिबात त्यांच्यासारखे वागत नाही हे नक्की का?’

मूळ नाट्यछटा इथे वाचा.

Thursday, June 10, 2010

भोपाळ गॅस दुर्घटना खटला - न्यायाची क्रूर थट्टा!

न्यायाला विलंब म्हणजे न्यायाला नकार या अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे, अर्थात् भोपाळ गॅस दुर्घटनेबाबत मात्र ती लागू करता येणार नाही, कारण या दुर्घटनेला पंचवीस वर्षे होऊनही या दुर्घटनेतील बळींना अजूनही न्याय मिळालेला नाही! जगातल्या सर्वात भयानक अशा या औद्योगिक अपघातात अनेक निरपराध लोकांनी आपले प्राण गमावले, अनेक जण अपंग झाले, एवढेच नव्हे तर या दुर्घटनेचे भयंकर परिणाम या दुर्घटनाग्रस्तांच्या पुढच्या अनेक पिढ्यांनीही भोगले. मात्र असे असले तरी या खटल्यातील आरोपींना कठोर शिक्षा देऊन सरकार आपल्या जखमांवर फुंकर तरी घालेल अशी दुर्घटनाग्रस्तांची अपेक्षा होती, तीही पूर्ण झाली नाही! दोन वर्षांची शिक्षा झाल्यावर या आरोपींना लगेचच जामीन मिळाला आहे, उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा त्यांना आहेच, तिथून पुढे खटला सर्वोच्च न्यायालयात जाणार हेही पक्के; तेव्हा खटल्याचा निकाल लागायला अजून २५ वर्षे लागतील असे म्हटल्यास ते चुकीचे ठरु नये. अलबत्, ह्या खटल्यातल्या आरोपींना कठोर शिक्षा झाली असती तरीही त्यातून काहीही साध्य झाले नसते कारण हे सारे आरोपी म्हणजे फक्त दिखाव्याची प्यादी होती; या खटल्यातला मुख्य आरोपी - कंपनीचा तत्कालीन अध्यक्ष वॉरन अँडरसन फरार घोषित केला गेला असून आजही अमेरिकेत अगदी मोकळा फिरतो आहे. अँडरसनविरुद्धचा खटला अजून संपला नाही असे भारत सरकारने जाहीर केले असले तरी आता पंचवीस वर्षे झाल्यावर अँडरसनला भारतात आणणार कधी व कसे याचे उत्तर त्यांच्याकडे आहे काय?

२ डिसेंबर १९८४ रोजी भोपाळवासी जेव्हा झोपले तेव्हा त्या पहाटे केवढे मोठे संकट कोसळणार आहे याची किंचितही कल्पना त्यांना नव्हती. एखादे भयानक स्वप्न पाहून घाबरून उठावे असे कधीतरी आपल्या बाबतीत घडते, पण भोपाळवासीयांसाठी हे स्वप्न नव्हते, ते होते कटू सत्य! भोपाळजवळच असलेल्या ’युनियन कार्बाईड’ या कारखान्यातल्या ६१० क्रमांकाच्या टाकीत पाणी शिरले नि त्यात असलेल्या बेचाळीस टन मिथाईल आयसोसायनेटशी त्याची रासायनिक प्रक्रिया होऊन या टाकीचे तापमान २०० अंश सेल्सियस पर्यंत वाढले. शेवटी या टाकीच्या सुरक्षा वाल्वचा स्फोट झाला नि अत्यंत विषारी असे वायू वातावरणात सोडले गेले. झोपेत असलेल्या नागरिकांना काय घडले ते कळेपर्यंतच अनेकांना त्या वायूने आपले लक्ष्य बनवले होते. जे पळू शकत होते ते पळाले; वृद्ध, लहान मुले यासारखे दुर्बळ मात्र श्वसनावाटे आपला मृत्युच शरीरात घेत गतप्राण झाले. या भीषण अपघातात नेमक्या किती लोकांनी प्राण गमावले याबाबत मतभिन्नता आहे. मध्यप्रदेश सरकारचा अधिकृत आकडा ३७८७ असला तरी मृतांची संख्या सुमारे १५००० असा अनेकांचा अंदाज आहे. यातील सुमारे निम्मे लोक अपघातानंतर लगेच तर बाकीचे लोक अपघातानंतर सुमारे काही वर्षांत मृत्युमुखी पडले. अशी दुर्घटना होणे ही दुर्दैवाची गोष्ट आहेच पण त्याहून चीड आणणारी गोष्ट अशी की पंचवीस वर्षे होऊनही या अपघातस्थळाची योग्य सफाई अजूनही झालेली नाही आणि त्यामुळे तिथे पसरलेली दूषितद्रव्ये अजूनही त्या परिसरात भू, जल नि वायूप्रदूषण घडवित आहेत!

हे मात्र खरे, या अपघातामुळे अमेरिकेचा दुतोंडीपणा पुन्हा अगदी ठळकपणे जगासमोर आला. स्वत:च्या देशातील नागरिकांच्या जीवाला मोठी किंमत देणारी नि त्यांच्या रक्षणासाठी आकाशपाताळ एक करणारी अमेरिका ईतर देशांतील नागरिकांच्या जीवाला कसे कस्पटासमान लेखते हे या खटल्यातून दिसून आले. अमेरिकेचा अणुबॉम्ब वापर, व्हिएतनाम युद्ध, ईराक/अफगानिस्तानातील युद्ध ही अशीच काही उदाहरणे. पण आपलेच नाणे खोटे असताना अमेरिकेला दोष का द्या? सदर कारखान्यात सुरक्षेच्या सगळ्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आणि लहानमोठे अनेक अपघात झाल्याचे वेळोवेळी दिसून आले होते, पण तरीही त्याकडे दुर्लक्ष का केले गेले? कारखान्यांचे कामकाज तपासणारी कुठलीही यंत्रणा सरकारकडे नव्हती का, असल्यास तिने तिचे काम का केले नाही? अपघातानंतर वॉरन अडरसनला देशाबाहेर पडण्याची संधी का दिली गेली? नंतरही त्याला देशात आणण्यासाठी सरकारने निकराचे प्रयत्न का केले नाहीत? या खटल्याचा निकाल लावण्यासाठी २५ वर्षे एवढा प्रचंड कालावधी न्यायालयाने का घेतला? दुस-या कुठल्याही देशात असे घडले असते तर दोषी व्यक्तींना कडक सजा होऊन अगदी कंपनीला दिवाळखोरीत काढूनही दुर्घटनाग्रस्तांना भरपाई दिली गेली असती, पण आमच्या ’महान’ भारतात असे का झाले नाही?

हजारो लोकांच्या मृत्युस नि त्याहून अधिक अनेक लोकांचे जीवन उध्वस्त होण्यास कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही; भारताच्या ’सत्यमेव जयते’ या बोधवाक्याची याहून मोठी विटंबना अजून दुसरी कुठली असू शकते काय?

Monday, June 7, 2010

दिवाकरांच्या नाट्यछटा - २ (’चिंगी महिन्याची झाली नाही तोच?’)

"चिंगी महिन्याची झाली नाही तोच?" ही दिवाकरांची सर्वोत्कृष्ट मानली जाणारी नाट्यछटा आहे. एकाचवेळी, सामान्यांना आवडलेली आणि समीक्षकांनी गौरवलेली ही नाट्यछटा आहे मात्र अगदी साधी. आपल्या एक महिना वयाच्या मुलीशी - चिंगीशी खेळताखेळता तिच्या आईने रचलेली मनोगते असे तिचे अगदी साधेसोपे स्वरूप आहे.

या नाट्यछटेत दिवाकरांनी वापरलेली भाषा हा तिचा मानबिंदू आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. आपल्या लहान मुलीशी खेळताना आईने बोललेल्या बोबड्या बोलातून एक श्रेष्ट साहित्यकृती बनू शकते असे कुणी म्हटले तर त्यावर विश्वास ठेवणे कठीण, पण दिवाकरांनी अगदी सहज ही किमया केली आहे!

चिंगी आहे अगदी तान्ही, अजून महिन्याचीही झाली नाही ती, पण तिच्याशी खेळताना तिची आई मात्र कागदी ईमले बांधण्यात अगदी गुंग होऊन गेली आहे. चिंगीला सगळे दागिने करायचे, तिला परकर शिवायचा, शाळेत पाठवायचे आणि बुके शिकून अगदी मोठे करायचे इथेच ही मनोगते संपत नाहीत, ती पोचतात चिंगीच्या लग्नापर्यंत!

आईचे आपल्या मुलीवरील भाबड्या प्रेमाचे मोठे ह्द्य चित्रण दिवाकरांनी या नाट्यछटेत केले आहे.

मूळ नाट्यछटा इथे वाचा.