Thursday, June 10, 2010

भोपाळ गॅस दुर्घटना खटला - न्यायाची क्रूर थट्टा!

न्यायाला विलंब म्हणजे न्यायाला नकार या अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे, अर्थात् भोपाळ गॅस दुर्घटनेबाबत मात्र ती लागू करता येणार नाही, कारण या दुर्घटनेला पंचवीस वर्षे होऊनही या दुर्घटनेतील बळींना अजूनही न्याय मिळालेला नाही! जगातल्या सर्वात भयानक अशा या औद्योगिक अपघातात अनेक निरपराध लोकांनी आपले प्राण गमावले, अनेक जण अपंग झाले, एवढेच नव्हे तर या दुर्घटनेचे भयंकर परिणाम या दुर्घटनाग्रस्तांच्या पुढच्या अनेक पिढ्यांनीही भोगले. मात्र असे असले तरी या खटल्यातील आरोपींना कठोर शिक्षा देऊन सरकार आपल्या जखमांवर फुंकर तरी घालेल अशी दुर्घटनाग्रस्तांची अपेक्षा होती, तीही पूर्ण झाली नाही! दोन वर्षांची शिक्षा झाल्यावर या आरोपींना लगेचच जामीन मिळाला आहे, उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा त्यांना आहेच, तिथून पुढे खटला सर्वोच्च न्यायालयात जाणार हेही पक्के; तेव्हा खटल्याचा निकाल लागायला अजून २५ वर्षे लागतील असे म्हटल्यास ते चुकीचे ठरु नये. अलबत्, ह्या खटल्यातल्या आरोपींना कठोर शिक्षा झाली असती तरीही त्यातून काहीही साध्य झाले नसते कारण हे सारे आरोपी म्हणजे फक्त दिखाव्याची प्यादी होती; या खटल्यातला मुख्य आरोपी - कंपनीचा तत्कालीन अध्यक्ष वॉरन अँडरसन फरार घोषित केला गेला असून आजही अमेरिकेत अगदी मोकळा फिरतो आहे. अँडरसनविरुद्धचा खटला अजून संपला नाही असे भारत सरकारने जाहीर केले असले तरी आता पंचवीस वर्षे झाल्यावर अँडरसनला भारतात आणणार कधी व कसे याचे उत्तर त्यांच्याकडे आहे काय?

२ डिसेंबर १९८४ रोजी भोपाळवासी जेव्हा झोपले तेव्हा त्या पहाटे केवढे मोठे संकट कोसळणार आहे याची किंचितही कल्पना त्यांना नव्हती. एखादे भयानक स्वप्न पाहून घाबरून उठावे असे कधीतरी आपल्या बाबतीत घडते, पण भोपाळवासीयांसाठी हे स्वप्न नव्हते, ते होते कटू सत्य! भोपाळजवळच असलेल्या ’युनियन कार्बाईड’ या कारखान्यातल्या ६१० क्रमांकाच्या टाकीत पाणी शिरले नि त्यात असलेल्या बेचाळीस टन मिथाईल आयसोसायनेटशी त्याची रासायनिक प्रक्रिया होऊन या टाकीचे तापमान २०० अंश सेल्सियस पर्यंत वाढले. शेवटी या टाकीच्या सुरक्षा वाल्वचा स्फोट झाला नि अत्यंत विषारी असे वायू वातावरणात सोडले गेले. झोपेत असलेल्या नागरिकांना काय घडले ते कळेपर्यंतच अनेकांना त्या वायूने आपले लक्ष्य बनवले होते. जे पळू शकत होते ते पळाले; वृद्ध, लहान मुले यासारखे दुर्बळ मात्र श्वसनावाटे आपला मृत्युच शरीरात घेत गतप्राण झाले. या भीषण अपघातात नेमक्या किती लोकांनी प्राण गमावले याबाबत मतभिन्नता आहे. मध्यप्रदेश सरकारचा अधिकृत आकडा ३७८७ असला तरी मृतांची संख्या सुमारे १५००० असा अनेकांचा अंदाज आहे. यातील सुमारे निम्मे लोक अपघातानंतर लगेच तर बाकीचे लोक अपघातानंतर सुमारे काही वर्षांत मृत्युमुखी पडले. अशी दुर्घटना होणे ही दुर्दैवाची गोष्ट आहेच पण त्याहून चीड आणणारी गोष्ट अशी की पंचवीस वर्षे होऊनही या अपघातस्थळाची योग्य सफाई अजूनही झालेली नाही आणि त्यामुळे तिथे पसरलेली दूषितद्रव्ये अजूनही त्या परिसरात भू, जल नि वायूप्रदूषण घडवित आहेत!

हे मात्र खरे, या अपघातामुळे अमेरिकेचा दुतोंडीपणा पुन्हा अगदी ठळकपणे जगासमोर आला. स्वत:च्या देशातील नागरिकांच्या जीवाला मोठी किंमत देणारी नि त्यांच्या रक्षणासाठी आकाशपाताळ एक करणारी अमेरिका ईतर देशांतील नागरिकांच्या जीवाला कसे कस्पटासमान लेखते हे या खटल्यातून दिसून आले. अमेरिकेचा अणुबॉम्ब वापर, व्हिएतनाम युद्ध, ईराक/अफगानिस्तानातील युद्ध ही अशीच काही उदाहरणे. पण आपलेच नाणे खोटे असताना अमेरिकेला दोष का द्या? सदर कारखान्यात सुरक्षेच्या सगळ्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आणि लहानमोठे अनेक अपघात झाल्याचे वेळोवेळी दिसून आले होते, पण तरीही त्याकडे दुर्लक्ष का केले गेले? कारखान्यांचे कामकाज तपासणारी कुठलीही यंत्रणा सरकारकडे नव्हती का, असल्यास तिने तिचे काम का केले नाही? अपघातानंतर वॉरन अडरसनला देशाबाहेर पडण्याची संधी का दिली गेली? नंतरही त्याला देशात आणण्यासाठी सरकारने निकराचे प्रयत्न का केले नाहीत? या खटल्याचा निकाल लावण्यासाठी २५ वर्षे एवढा प्रचंड कालावधी न्यायालयाने का घेतला? दुस-या कुठल्याही देशात असे घडले असते तर दोषी व्यक्तींना कडक सजा होऊन अगदी कंपनीला दिवाळखोरीत काढूनही दुर्घटनाग्रस्तांना भरपाई दिली गेली असती, पण आमच्या ’महान’ भारतात असे का झाले नाही?

हजारो लोकांच्या मृत्युस नि त्याहून अधिक अनेक लोकांचे जीवन उध्वस्त होण्यास कारणीभूत ठरलेल्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही; भारताच्या ’सत्यमेव जयते’ या बोधवाक्याची याहून मोठी विटंबना अजून दुसरी कुठली असू शकते काय?

1 comment:

  1. न्यायाची अशी थट्टा होण्याला जबाबदार कोण याचे उत्तर प्रथम मिळणे आवश्यक आहे. निकालाचे विश्र्लेषण झाल्याशिवाय याचा खुलासा होणार नाही. विरोधी पक्ष याकडे लक्ष देणार नाहीत. त्याना सरकारला अडचणीत आणण्यातच रस आहे.

    ReplyDelete