Saturday, June 26, 2010

रद्दीची दुकाने, शांताबाईंच्या सहीचे पुस्तक आणि मी

रद्दीची दुकाने धुंडाळण्याची सवय मला कधी लागली ते नेमके आठवत नाही, पण ती लहानपणापासून आहे हे नक्की. लहानपणी हातात पैसे फारसे नसत, कधीतरी मिळत, कुणीतरी दिले किंवा रद्दी विकली की. पुस्तके विकत घेण्यासाठी घरातून पैसे मिळत, पण ते अगदी क्वचित, खूप रडल्यावर. त्यामुळे मी जुनी पुस्तके पहाण्यासाठी रद्दीच्या दुकानांमधे जात असलो पाहिजे. मला वाटते, या सवयीसाठी अजून एक कारण आहे. जुन्या वस्तू घेण्यात नि त्या वापरण्यात काही चुकीचे आहे असे मला कधीच वाटले नाही. आजही उत्तमोत्तम वस्तू कमीत कमी भावात मिळवण्याचा माझा प्रयत्न असतो, त्यामुळेच त्या जुन्या घ्यायलाही माझी ना नसते. आजकाल असे करण्यामागे पैसे वाचवण्याबरोबर आपल्या चंगळवादामुळे पर्यावरणाची होणारी हानी किंचीत कमी करणे हाही मुद्दा असतो. असो, पण मुद्दा तो नव्हे, मुद्दा आहे रद्दीच्या दुकानांचा. रीडर्स डायजेस्ट किंवा नॅशनल जिओग्राफिक या इंग्रजी मासिकांशी माझी ओळख झाली ती दुकानांमुळेच. [रीडर्स डायजेस्ट या मासिकाने आपला दर्जा टिकवून ठेवलेला तो काळ होता. आजकाल ते फक्त जाहिराती नि उरल्यासुरल्या जागेत चित्रपटतारकांच्या मुलाखतींसारखे छटोर लेख छापणारे एक भुक्कड मासिक झाले आहे, (पुन्हा) असो!] एकदा अशाच कुणीतरी रद्दीत दिलेल्या या मासिकाच्या ऐंशी प्रती मी घरी आणल्याचे आठवते. दोन किंवा तीन रुपयांना एक अशा मिळाल्या असाव्यात, पुढे कितीतरी दिवस त्या मला वाचायला पुरल्या होत्या.

रद्दीच्या दुकानातला पुस्तकांचा गठ्ठा चिवडताना मला नेहमी वाटते की आपण जणू अडगळीच्या भरपूर वस्तू साठवलेला एखादा माळाच साफ करतो आहोत. समोर अचानक काय येईल ते काही सांगता येत नाही! माझ्या संग्रहातली अनेक पुस्तके मला या खजिन्यातूनच मिळाली आहेत. अनेकदा तर असे घडले आहे की एखाद्या लेखकाबद्दल किंवा पुस्तकाबद्दल काहीतरी वाचावे नि त्या दिवशी रद्दीतली पुस्तके शोधताना त्याच लेखकाचे एखादे किंवा नेमके तेच पुस्तक हाती यावे. ऍगाथा ख्रिस्ती/आर्थर कॉनन डॉयल/पेरी मेसन/जेम्स हॅडली चेस या लेखकांच्या कादंब-यांबरोबरच कधीतरी एडगर ऍलन पो, समरसेट मॉम अशा लेखकांची पुस्तकेही रद्दीत सापडत. मराठीत ’डोंगरीच्या तुरूंगातले आमचे एकशे एक दिवस’ हे आगरकरांचे पुस्तक, बालकवींच्या समग्र कवितांचे कुसुमाग्रजांच्या प्रस्तावनेचे पुस्तक, ’आठवणीतल्या कवितांचा’ पहिला भाग आणि पुलंचे ’खोगीरभरती’ ही पुस्तके अशीच मिळवलेली. कधीतरी एखाद्या पुस्तकाचा गठ्ठाच्या गठ्ठा पहायला मिळे, बहुधा त्या कुणा नवोदित लेखकाच्या नुकत्याच पकाशित झालेल्या पुस्तकाच्या प्रती असत. कवितासंग्रह किंवा लेखकाने लिहिलेले कुणा अपरिचित व्यक्तीचे चरित्र असे काहीतरी. पण कधीतरी दगडाच्या खाणीत हिरा दिसावा असे काहीतरी मिळे. गोनीदांचे ’रामायण’ हे रसाळ पुस्तक किंवा खुद्द शांता शेळके यांनी सही केलेले त्यांचेच ’आंधळ्याचे डोळे’ ही दोन उदाहरणे.

पुस्तके बेदरकारपणे रद्दीत देणा-या महान विभूतींविषयी माझ्या मनात नेहमीच आश्चर्याची भावना राहिलेली आहे. ज्ञानाचा सागर असलेले हे ग्रंथराज हे लोक अगदी सहज रद्दीत कसे देऊ शकतात? शांता शेळके यांनी हे पुस्तक कुणालातरी भेट म्हणून दिलेले आहे. ’चि. सौ. सुमन, चि. राजन, प्रेमपूर्वक. शान्ताबाई - ३०/३/९७’ असा मजकूर त्याच्या पहिल्या पानावर आहे.नेमके काय घडले असेल त्या दिवशी? हे जोडपे शांताबाईंना भेटायला आल्यावर प्रेमळ स्वभावाच्या शांताबाईंनी अगदी आपुलकीने त्यांची विचारपूस केली असेल, त्यांचा पाहुणचार केला असेल नि ते निघताना त्यांना आपल्याजवळचे आपले स्वतःचे एक पुस्तक भेट म्हणून दिले असेल. हे पुस्तक त्यांनी न वाचले तरी माझी काही हरकत नव्हती, पण ते शान्ताबाईंची एक आठवण म्हणून जवळ ठेवायला काय अडचण होती? असो, पण त्यांनी हे पुस्तक रद्दीत दिल्यामुळेच माझ्यासारख्या एका शान्ताबाईंच्या चाहत्याला ते मिळाले हेही तितकेच खरे नाही का?

किंबहूना, मी तर असे म्हणेन की ह्या लोकांनी अशीच पुस्तके रद्दीत देत जावी आणि आम्हा पुस्तकप्रेमींचा असाच दुवा घेत जावा!

2 comments:

  1. I got Borkar's 'chinmayi' signed by no other than Pu La Deshpande (1984) on a raddi stall. what all raddi stalls do u regularly visit? I visit one on deccan and one on bajirao road quite often

    ReplyDelete
  2. धनंजय: पुलंच्या सहीचे पुस्तक, भारीच नशिबवान आहात मग तुम्ही!
    मी चव्हाणनगर (कात्रज) भागात रहातो. तिथली जवळचीच रद्दी दुकाने मी धुंडाळत असतो. बाजीराव रोडवरच्या भिकारदास मारूती बसथांब्याजवळच्या त्या जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्याकडे मीही जात असतो.

    ReplyDelete