कळसुबाई नि आजोबा ही आमची दोन दिवसांची महत्वकांक्षी सहल प्रत्यक्षात यायची काही चिन्हे दिसेनात, तेव्हा एक दिवसाची एखादी लहानशी किल्लेसहल करून यावी असे आम्हा सगळ्यांचे मत पडले. त्यासाठी योग्य अशा किल्ल्याचा शोध सुरू झाला, पण पुण्याच्या आजुबाजुचे सगळे किल्ले पाहून झालेले असल्याने आमच्या पुढील पर्याय काहीसे मर्यादीतच होते. होता होता हडसर किल्ल्याचे नाव ठरले. या उन्हात दुचाकीवरून जायची इच्छा नसल्याने शेवटी माझ्या टाटा इंडिगो मरिना गाडीतून जायचे ठरले.
आदल्या दिवशी आमची नेहमीप्रमाणेच ’रात्र थोडी सोंगे फार’ अशी अवस्था झाल्याने झोपायला साडेबारा वाजले होते. पण साडेचारचा गजर असूनही आम्हाला चार वाजून वीस मिनिटांनीच जाग आली हा एक चमत्कारच म्हणायला हवा, नाही का? पण ’लवकर उठलोच आहोत तर झोपू थोडा वेळ आणखी’ असे करत थोडा (म्हणजे बराच) वेळ लोळण्यात गेला. शेवटी मग उठलो, झटापट आवरले, पाण्याच्या बाटल्या नि कॅमेरा पिशवीत टाकला नि गाडीतून निघालो. साडेपाचची वेळ ठरली असली तरी आमच्या ऑफिसमधून आम्ही जुन्या पुणे मुंबई रस्त्याच्या दिशेने कूच केले तेव्हा सकाळचे सहा वाजून गेले होते.
जुन्या पुणे मुंबई रस्त्याने आम्ही निघालो. सकाळ होत होती, पण रस्त्यावरचे दिवे अजून चालू होते. ह्या पिवळ्या दिव्यांच्या प्रकाशात गाडी चालवायला मला खूप आवडते. दिव्यांचा पिवळा उबदार प्रकाश नि त्यात न्हाऊन निघालेला रस्ता. आणि अशा रस्त्यावर जर तुम्ही एकटेच असाल तर मग तर सोन्याहून पिवळेच. पुणे मुंबई रस्ता आता अतिशय उत्तम बनविण्यात आलेला आहे. ज्या रस्त्यांवर गाडी चालवण्याचा आनंद घेता येतो अशा मोजक्या रस्त्यांपैकी तो आहे. पण आम्हाला त्या रस्त्याने पुढे जाऊन चालणार नव्हते, तेव्हा नाशिकफाट्यापाशी दु:खद मनाने आम्ही त्याचा निरोप घेतला नि खेडच्या रस्त्याने पुढे निघालो. साधारण एका तासात आम्ही खेडला पोचलो. मात्र त्यानंतर चारपदरी टोल रस्ता संपला नि साधा रस्ता सुरू झाला. पुणे नि नाशिक ही महाराष्ट्रातली दोन महत्त्वाची शहरे जोडणारा हा रस्ता चांगला, प्रशस्त असायला काय हरकत आहे?
नारायणगावाजवळ हा रस्ताही आम्ही सोडला नि जुन्नरचा रस्ता पकडला. साधारण एक तासात आम्ही जुन्नर गाठले, तेथे शिवाजी पुतळ्याजवळ उजवीकडे वळून लगेचच डावीकडे वळल्यावर हडसरचा रस्ता आहे त्या दिशेने आता आमचा प्रवास सुरु झाला. आता उन अगदी मी म्हणू लागले होते. हड्सर गाव रस्त्यावरच आहे. तेथे पोचल्यावर गावात जाण्यासाठी जो रस्ता आहे त्याच्या कडेला एके ठिकाणी आम्ही आमची गाडी लावली नि पाणी वगेरे घेऊन किल्याकडे निघालो. किल्ल्याकडे निघाल्यावर उजव्या बाजुला एक लहानसे मंदिर आहे. पायवाटेने पुढे गेले की एक लहानसा ओहोळ लागतो , तोही पार केला की निलगिरीची झाडे असलेली एक लहानशी टेकडी दिसते. ती पार केली की काळ्याकभिन्न पत्थराची एक अभेद्य भिंत तुमच्या समोर येते, पण घाबरू नका, ती तुम्हाला पार करायची नाही. तिला समांतर असे तुम्ही थोडे पुढे आलात की दोन मोठ्या डोंगरांमधला किल्ल्याचा एक बुरुज तुम्हाला दिसतो. 'अरे लहानसाच तर आहे किल्ला!' असे मनाशी म्हणत तुम्ही जर त्या दोन डोंगरांमधून किल्ला सर करायचा विचार करत असाल, तर क्षणभर थांबा, किल्ल्याकडे जायचा रस्ता तो नाही. त्या दोन डोंगरांपैकी डाव्या बाजुच्या डोंगराला वळसा घालून, तो चढून वर गेल्यावर किल्ल्याची पाय-या असलेली वाट आहे. कुठल्याही किल्ल्यावर चढणे जर एवढे सोपे असते तर कुणीही सोम्यागोम्या सहज किल्यावर चढून गेला असता, हो की नाही?
मगाशी मी म्हटलो ती निलगिरीची झाडे असलेली ती टेकडी पार केल्यावर आम्ही जरा थबकलो. थोडे पाणी पिले नि संत्र्याच्या स्वादाच्या गोळ्या चघळल्या. पुन्हा निघालो तेव्हा सूर्यदेव मी म्हणू लागले होते. अगदी सोपा वाटलेला तो लहानसा डोंगर आता अवघड भासू लागला होता. पण आम्ही कसले घाबरतो, मर्द मराठे आम्ही! आम्ही शेवटी तो डोंगर सर केलाच नि वर जाऊन सावलीशी बसलो. तेथे छायाचित्रकारांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले नि हौशी लोकांनी त्यांच्यासाठी आपल्या पोझ देण्याच्या कलेचे. थोडे अंतर चालल्यावर गडावर जायच्या पाय-या सुरू होतात. त्याआधी एक भुयार दिसते. हे भुयार पुर्वी बरेच उंच असावे पण आता त्यात माती भरल्याने त्याची उंची कमी होऊन आत जाण्यासाठी साधारण ३ फुट एवढीच जागा उरलेली आहे. अमर नि रामने आत सरपटत जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते भुयार आत उजवीकडे वळल्याचे दिसले. पण आमच्याकडच्या विजेरीची शक्ती क्षीण असल्याने तिचा फारसा उपयोग होत नव्हता. तेव्हा, भुयाराचा नाद सोडून आता आम्ही पाय-यांकडे वळलो नि गडावर चढायला सुरुवात केली. गडाच्या पाय-या मजबूत नि ब-याच उंच आहेत पण उन, वारा नि पावसाच्या मा-याने त्या आता ढासळू लागलेल्या दिसतात. गडावर आलो की दोन देखणे दगडी दरवाजे दिसतात. पूर्ण दगड कोरून बनवलेले हे दगडी दरवाजे पाहून मन थक्क होते. दुसरा दरवाजा चढून उजव्या बाजूने वर आलो की गणपतीची एक जीर्णशीर्ण मुर्ती दिसते, पुर्वी हे गणपतीचे मंदिर असावे. गणपती हा एक देखणा देव, त्याचे रूप कसेही असले तरी ते मनाला लुभावतेच, ही मुर्तीही त्याला अपवाद नाही. शेकडो वर्षे उन वारा पाऊस झेलूनही बाप्पांच्या मुर्तीचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही हे विशेषच नाही का? एका लहानश्या निलगिरीच्या झाडाशी थोडेसे थबकून आम्ही गड पहायला निघालो. गडावर पाहण्यासारखे काही खास नाही. एक पाण्याचे टाके, एक मंदिर हा गडांवरच्या प्रेक्षणीय स्थळांचा लसावि इथेही आहेच. एवढेच काय, गडाला साधी तटबंदीही नाही. त्याचे कारण असे असावे की रायगड किंवा राजगडासारखा हा एक किल्ला लढाऊ किल्ला नाही; नाणेघाटातून होणारी मालवाहतूक नि तेथे होणार जकातवसुलीचे काम यावर नियंत्रण ठेवणे एवढाच ह्या किल्ल्याचा उपयोग असावा. पण गडावरून दिसणार दृश्य अतिशय देखणे आहे यात काही वादच नाही. माणिकडोह धरणाचा आडवातिडवा पसरलेला जलाशय, मधेच प्रकट होणारे काही किल्ले, डोंगर नि वर निळेशार आकाश. अशी काही दृश्ये पाहिली की किल्यांवर चढायच्या श्रमांचे सार्थक झाल्यासारखे वाटते हे नक्की!
गडप्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर आम्ही जिथून निघालो त्याच दरवाज्याशी परतलो. तिथे रामच्या आईने बनवलेल्या चविष्ठ गुळपोळ्यांचा आस्वाद घेऊन आम्ही गड उतरायला सुरूवात केली. सुर्यदेव अजूनही ऐन भरात होते, पण आत्ता गुरुत्वाकर्षाणाचे पारडे आमच्या बाजूने असल्याने त्यांचा आम्हाला फारसा त्रास झाला नाही. साधारण अर्ध्या तासात आम्ही गड उतरून खाली पोचलो. गाडीजवळ पोचलो तर तिथे काही लहान मुले आमच्या गाडीशेजारी जमून आमच्याकडे टकामका पहात असलेली दिसली. त्यांना मगाचच्याच गोळ्या वाटल्या, त्यांच्याबरोबर काही फोटो काढले नि पुन्हा पुण्याकडे प्रयाण केले. उन्हात बराच वेळ थांबल्याने गाडी प्रचंड गरम झाली होती नि त्यामुळे एखाद्या भट्टीतून चालल्यासारखे वाटत होते. पण गाडीने वेग पकडताच वारे आत शिरले नि जीवाला हायसे वाटले. घड्याळात तीन वाजत होते नि सकाळी जुन्नरच्या शिवाजी चौकातून दिसलेल्या शिवनेरीच्या पोटातल्या त्या लेणी अजून आम्हाला पहायच्या होत्या. शिवनेरीच्या त्या लेण्या आम्ही पाहिल्या की नाही, अन पाहिल्या असल्यास त्या होत्या कशा असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल, पण त्याबद्दल नंतर कधीतरी, तुर्तास इतकेच!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment