Saturday, June 25, 2011

किती दिवस टाकणार हे जुन्या गाण्यांचे रतीब?

जुन्या गाण्यांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत हे कुणीही सहज मान्य करेल. टीव्हीवरच्या खास गाण्यांना वाहिलेल्या कार्यक्रमांत (उदा. 'बाम' वाहिनीवरचा 'म्युझिक सिटी'), पुरस्कार वितरण सोहळ्यांत, नाट्यगृहांमधे सादर होणा-या वाद्यवृंद कार्यक्रमात सध्या जुन्या गाण्यांची चलती आहे. पण हे कार्यक्रम पाहिल्यावर ते सादर करणा-या लोकांना मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, लोकांना आवडतात म्हणून ह्या गाण्यांचे रतीब तुम्ही किती दिवस टाकणार? तुमची नवनिर्मिती आम्हाला ऐकायला मिळणार तरी कधी?

जुनी गाणी ऐकायला लोकांना आवडत असली तरी त्यात नवनिर्मिती काही नसते हे मान्य करायलाच हवे. ती गायली जातात ती मूळ गायकाची नक्कल करून, अर्थात ती सादर करताना फारसे कौशल्यही लागत नाही. त्यामुळे अशी गाणी सादर केली तरी त्यात नविन काही करण्याचे समाधान नसते. या कलाकारांना ते जाणवत नाही का? मी तर म्हणेन, जुनी दहा हजार गाणी गाणा-या गायकापेक्षा (मग तो कितीही गुणवत्तेचा का असेना) ज्याच्या नावावर आपली स्वत:ची दोनच का होईना गाणी आहेत असा गायक कधीही श्रेष्ठ. पुण्यात तर परिस्थिती इतकी वाईट आहे की जुन्या गाण्यांचा इथे रोज किमान एकतरी कार्यक्रम होताना दिसतोच. या गाण्यांमधे गाणारे गायकही अगदी ठरलेले आहेत. सुवर्णा, विभावरी, प्रमोद, आणि 'इतर नेहमीचेच यशस्वी'. आज काय बाबूजी किंवा मदनमोहन, उद्या काय लता मंगेशकर किंवा पंचम - कुणाला तरी पकडायचे आणि त्या व्यक्तीची गाणी लोकांना ऐकवायची हा त्यांचा कार्यक्रमच ठरून गेला आहे.

जुनी गाणी उत्कृष्ट आहेत हे मान्य, पण त्याच त्याच गोष्टी किती दिवस उगळत राहणार? जुनी गाणी गात राहिल्यामुळे आपण नविन गाणी बनवायलाच विसरलो आहोत असे म्हटले तर ते मुळीच चुकीचे ठरणार नाही. एखाद्या संगीतक्षेत्राचा दर्जा ठरवला जातो तिथल्या नवनिर्मितीकडे पाहून. तिथे आज कशी, किती, कुठल्या दर्जाची गाणी बनत आहेत यावरून त्या क्षेत्राची प्रगती किंवा अधोगती ठरवली जाते. नवनिर्मिती हा मुद्दा घेतला तर आज हिंदी किंवा मराठी संगीतक्षेत्रात काय चित्र दिसते? अलीकडच्या एकातरी नव्या अल्बमचे नाव पटकन ओठांवर येते का? नविन गाण्यांची निर्मिती पूर्णपणे थंडावल्याचे चित्र सध्यातरी दिसते आहे. अल्बम चांगला की वाईट हे नंतर पहाता येईल, अरे पण आधी काहीतरी बनवा तरी!

यावर 'गायकांना आवडतात म्हणून ते ही गाणी गातात नि लोकांना आवडतात म्हणून ते ती ऐकतात, तुमचं काय जातंय?' असं काही लोक म्हणतील. त्यांना मी एवढेच सांगेन की गायकांनी जुनी गाणी गाण्याबद्दल माझा आक्षेप नाही; मी स्वत: अनेकदा जुनी गाणी ऐकतो. जुनी गाणी गा, पण त्याबरोबरच नविनही काही येउद्या की. नव्या गाण्यांचे पाच नि जुन्या गाण्यांचे दोन कार्यक्रम झाले तर हरकत नाही, पण जुन्या गाण्यांचे पाच कार्यक्रम नि नव्या गाण्यांचा एकही नाही याला काय अर्थ आहे? निदान पुढच्या पिढीला जुनी गाणी म्हणून तुमची गाणी गाता यावीत म्हणूनतरी काहीतरी करा लेको!

No comments:

Post a Comment